मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशीही आणि तशीही

इनिगोय · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जन्म देता देता जन्म घेणारी शब्द नि अर्थ जुळवणारी उंचच उंच गर्दीमध्ये बोट घट्ट धरणारी चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू गिरगिर, भिरभिर.. खुलणारी कधी रुजली हे न कळताही अंगोपांग बहरणारी कधी अंग चोरून बसणारी नको असतानाही असणारी काही आयुष्यभर दिसत, भासत हुलकावणी देत राहणारी उणे अधिक मांडता मांडता हातचा म्हणून राहणारी अन् ती.. आभाळागत सदैव जागी फक्त नजरेत सामावणारी जगणं-बिगणं सुरू असता 'का? कशासाठी?' हे सांगणारी उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी ...नाती!

वाचने 4223 वाचनखूण प्रतिक्रिया 32

मैत्र Fri, 03/22/2013 - 17:38
शब्दयोजना आणि प्रत्येक कडव्यातलं वेगळेपण छान आहे.. शेवट मस्त :)

तिमा Fri, 03/22/2013 - 20:28
नात्यांचा एवढा सुंदर परिचय करुन दिल्याबद्दल तुमचे 'आभार'.

स्पंदना Sat, 03/23/2013 - 04:39
नाती! अलगद जुळणारी सुलगत रहाणारी काळजात खोलवर रुतू पहाणारी रक्तांत खेळणारी आसवांत नहाणारी काटा बनुन कधी अहोरात्र खूपणारी मस्त हो इनिगोय! छान लिहिता तुम्ही.

सुधीर Tue, 04/02/2013 - 14:22
शेवटचा शब्द येईपर्यंत काही समजलं नव्हतं. शेवटचा शब्द वाचल्यावर पुन्हा एकदा वाचली, अर्थ लागला अन आवडून गेली.