गंधार घेतले तू
लेखनविषय:
काव्यरस
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू
आईस रडवण्याचे, आभार घेतले तू
वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे
मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू
मातीत वेदना ही, का उगवते अजूनी
झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू
अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे
तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू
रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू
स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू
कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी
बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू
- संध्या
वाचने
1188
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
कोमल सुरावटींची, दिधली तुला
व्वाह!!
सुरेख रचना..........
अत्रुप्त आत्मा, मिसळलेला