मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..उरला पलाश आता

राघव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सगळीच राख येथे.. दिसतो विनाश आता.. नुसते वळून बघता तुटतात पाश आता.. पाहून कुंपणा त्या.. जाणीव तीव्र होते; घर तेवढे निमाले..उरला पलाश आता.. राखेत जन्मणार्‍या पक्ष्यापरी स्थिती..की.. सर्वस्व जाळुनी मज दिसते अकाश आता? अंधार तेवतांना ठिणगी महाग होती.. डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता... आसुसल्या मनाला.. कूस तेवढी मिळेना.. आसेतलेच आर्त.. होते निराश आता.. (विषण्ण) राघव

वाचने 1986 वाचनखूण प्रतिक्रिया 8

श्रावण मोडक 01/11/2011 - 16:46
चांगली रचना. नियमांनुसार गझल आहे का हे माहिती नाही, नसली तरी फरक पडत नाही मला. काही गोष्टी बोलाव्याशा. पाश तुटणे हे तसे पाहिले तर चांगलेच. कारण मुक्ती असते त्यात. पण इथं पहिल्या द्विपदीतील सूर खंतावणारा वाटतो. मुक्ती अपेक्षीत नाही का तेथे?

In reply to by श्रावण मोडक

राघव 01/11/2011 - 23:11
रचनाच मुळात विषण्ण मनोवस्थेत तयार झालीये. त्यामुळे त्यात जीवनाची चांगली बाजू दाखविण्याचा अजिबात प्रयत्न नाही. शेवटच्या द्विपदीत मूळ व्यथा आणिक स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. रचनेतल्या व्यक्तीला जे मिळत नाही त्याची आस अजुनही लागलेलीच आहे. म्हणजे त्याला स्वतःलाच मुक्ती नकोय असा अर्थ निघेल. त्यामुळे मुक्ती साठीचा अर्थ या रचनेत अपेक्षीत नाही. किंबहुना असे म्हणता येईÿल की हवे ते मिळणे शक्य असतांना, स्वतः नको असण्याची निवड करणे यात एक आनंद सामावलेला आहे. जेथे शक्यच नाही तेथे निवड कसली अन् आनंद कसला. :) राघव

दत्ता काळे 01/11/2011 - 18:42
अंधार तेवतांना ठिणगी महाग होती.. डोळ्यांस त्रास होतो दिसता प्रकाश आता... - फार सुंदर कल्पना. "अंधार घालवण्यासाठी ठिणगी शोधत होतो ( तरीही मिळत नव्हती ) अन् आता प्रकाश दिसला तरी त्रास होतो." वा.. व्वा..