मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गाभार्‍यातील शिव शंभो ..!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
त्या छोट्याश्या अरुंद गल्लीत जुन्या पुराण्या वाड्यात मध्यभागी खोलवर उतरत गेलेल्या त्या पायर्या आत शंकराचा गाभारा मिट्ट काळोख . मिणमिणता दिवा टिपुकल्या प्रकाशाची काळोखाला साथ मामा शिवशंभो करीत वाजवायचा ती छोटीशी घण्टा किणकिण नाद उडवून जायची काळोखाची पाखरे अंधाराला भोके पाडीत घुमायचा नाद गोल चौफेर भीती वाटायची मला मी गप्प घाबरून .. मामाचा नाद घुमायचा शी ssss व शsss भो ...!! माझे कान गच्च .....!!! खूप वर्षांनी गावी गेलो गल्लीत गेलो उध्वस्त झालेला वाडा नि चकाचक नवी ईमारत उत्तम बांधणीची भळभळून प्रकाशाची शंकराचा गाभारा सुंदर मार्बलचा प्रकाशाने ओघळलेला सुशिक्षित वाटला पण मन नाही झाले प्रसन्न मन शोधात बसलेय त्या गच्च काळोखाचा गाभारा त्यातला मिणमिणता दिवां काळोखाला प्रकाशाची टिपुकली साथ मी आठवून हरवून जातोय त्या जुन्या गाभार्यात मामाचा आवाज घुमणारा .. हरवून गेलाय कधीचा ......!!

वाचने 3064 वाचनखूण प्रतिक्रिया 9

५० फक्त 01/03/2011 - 07:56
आपली कविता छान आहे, श्री. प्रकाश, आपली पुर्व परवानगी ग्रुहित धरुन आपल्या कवितेच्या दोन्ही कडव्यांना योग्य वाटतील अशी दोन छायाचित्रे टाकत आहे. हे आहे श्री क्षेत्र भुलेश्वर येथील - पहिल्या कडव्यासाठी आणि हे श्री क्षेत्र जटाशंकर, मु़ळज ( माझ्या आईचे माहेर) येथील,

अशोक७०७ 01/03/2011 - 10:34
अप्रतिम कविता. अश्या गाभार्यतील मन्दिरात बरेच शान्त क्षण पूर्वी घालविले आहेत.

गणेशा 01/03/2011 - 14:23
टिपुकला प्रकाश .. काळोखाची पाखरे .. हे शब्द खुप आवडले ... जुन्या गाभार्‍यातील मामाचा आवाज आठवुन ही स्थब्ध होणारे मन शेवटच्या कडव्यामधेय मस्त मांडले आहे. अवांतर : काळेखाची पाखरे अंधाराला भोके पाडुन जात आहेत .. हे वाचुन छान वाटले .. कलप्ना मस्त तरी ही काळोख आणि अंधार थोडे साम्य वाटते आहे.