Skip to main content

सद्गुरू माउली

सद्गुरू माउली

Published on रवीवार, 11/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
अजपाचे संगती | एकारली वृत्ती | ठाके सीता-पती | सन्निधानी || स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी | लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती || आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा | दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी || नाम जप गोडी | जरी लाभे थोडी | साधने तोकडी | बाकी होती || याजन याजन | दान तीर्थाटन | सद्गुरुवाचोन | शून्य होय || सद्गुरू माउली | देई नाम साउली | तेणे लोभावली | जिव्हा माझी || सागर लहरी - ११.७.२०१०
लेखनविषय:

याद्या 1582
प्रतिक्रिया 6

रचना आवडली. चांगली आहे. थोडी भाषा आणिक सोपी केली तर गोडी वाढेल! :) काही सांगावेसे वाटले - अजपाचे संगती | एकारली वृत्ती | ठाके सीता-पती | सन्निधानी || अजपाजप हा आपोआप व्हायचा असतो. करायचा नसतो. त्यामुळे अजपाच्या संगती असे म्हणणे योग्य होणार नाही असे वाटते. चुभुद्याघ्या. स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी | लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती || "स्व-स्थ" शब्दाचा छान वापर. विशेष आवडला. :) आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा | दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी || "आत्मवृत्तीची कळा" हा शब्दप्रयोग नाही समजला. नाम जप गोडी | जरी लाभे थोडी | साधने तोकडी | बाकी होती || बाकीची साधने "तोकडी" होत नाहीत. त्यांच्याकडे मन लागत नाही कारण ते नामजपाकडे लागलेले आहे अशी ती अवस्था आहे. शब्दप्रयोग चुकलासा वाटतो. चुभुद्याघ्या. याजन याजन | दान तीर्थाटन | सद्गुरुवाचोन | शून्य होय || खूप सुंदर ओवी. अतिशय आवडली. एक रचना माझ्याकडूनही तयार झालेली आहे - आवाहन. कदाचित तुम्हालाही आवडेल! :) राघव

सागरलहरी आणि राघव दोघांच्याही रचना अप्रतिम !! =D> =D> मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

__/\__ शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

वा !

आपण लक्षपूर्वक कविता वाचून केलेल्या कौतुका साठी आणि सूचनांसाठी मनापासून धन्यवाद .. फक्त मला लिहिताना काय अभिप्रेत होते ते मांडतो.. कदाचित तुम्ही म्हणता तसे शब्दांकन होताना चुकले असेलही.. >>अजपाचे संगती | एकारली वृत्ती | >> ठाके सीता-पती | सन्निधानी || >>अजपाजप हा आपोआप व्हायचा असतो. करायचा नसतो. >>त्यामुळे अजपाच्या संगती असे म्हणणे योग्य होणार नाही असे वाटते. >>चुभुद्याघ्या. अजपाजप होतोच आहे... त्याची फक्त संगत करुन म्हणजे "अनुसंधान" ठेवुन वृत्ती एकाकार (पक्षी उपास्याशी तदाकार) झाली.. यात जप करणे अभिप्रेत नव्हते. >>> स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी | >>> लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती || >>> आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा | >>>> दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी || >>>> "आत्मवृत्तीची कळा" हा शब्दप्रयोग नाही समजला. आधीच्या ओवीतील " स्व-स्थ " अजपाजपाच्या अनुसंधानात प्राप्त झाली की इंद्रियांची बाहेरील धाव कमी होउन ती आत रमतात आणि ही अवस्था मुरली की आत्मवृत्ती ची अवस्था (आत्मस्थिती त रमण्याची.. रंगुन जाण्याची स्वाभाविक प्रवृत्ती ) येते. या " आत्मवृत्तीची कळा " म्हणजे अशा वर वर्णन केलेल्या भावस्थिती ची अवस्था किंवा वैशिष्ट्य असे होते की सर्व चित्तवृत्ती निरभ्र होउन अ-द्वैताची व सर्व चराचरात "तो" च आहे ही अनुभूती येते व त्यातून येणारा शुद्ध प्रेम भाव बाळगला जातो. >>>> नाम जप गोडी | जरी लाभे थोडी | >>> साधने तोकडी | बाकी होती || >> बाकीची साधने "तोकडी" होत नाहीत. त्यांच्याकडे मन लागत नाही कारण >>> ते नामजपाकडे लागलेले आहे अशी ती अवस्था आहे. शब्दप्रयोग >>>> चुकलासा वाटतो. चुभुद्याघ्या. यात असे म्हणायचे होते की एकदा नाम जपा तून मिळणारी गोडी चाखायला मिळाली की बाकी ची साधने त्यापुढे तोकडी वाटू लागतात ( म्हणजे नामाच्या गोडीतून मिळणा-या आनंदावस्थे प्रत ती इतर साधने नेतील का ? त्या पेक्षा आपले नामच छान आहे असे वाटू लागते ) आपली रचना वाचली अतिशय छान आहे. आपण माझी रचना Appreciate केलीत त्या बद्दल धन्यवाद. -- सागरलहरी