मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

॥ प्राजक्त ॥

स्पंदना · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
माझ्या पोरकेपणाचा हा एकंच साथीदार ! त्यामुळे प्राजक्ता बद्दल लिहिण मी कायम टाळत आले. कारण? माझ्यासाठी तो एव्हढा मोठ्ठा आधार होता; की माझ्या शब्दात तो कधीच मावेल असा विश्वास मनी नव्हता. आज मी लिहितेय कारण असं वाटत की ते त्याच देण आहे जे मी कुठतरी व्यक्त केल पाहिजे . प्राजक्ताची कथा तुम्हाला माहित आहे का? नाही ... ते समुद्र मंथन वगैरे सोडून आणि एक आख्यायिका सांगितली जाते. ही एक राजकुमारी ! तेजोमय सूर्यावर आसक्त ! राजकुमारी ती; तिचा हट्ट राजान पुरवला. सूर्य देवाला साकड घातल गेल, अन भूलोकीच ते अनोख मागण सूर्य देवान स्वीकारलं. त्याच्या होकाराला धरून लग्न ठरलं. पण लग्न घटिकेला सूर्य देव फिरकलेच नाहीत. विवाह वेदीवर अपमानित ती बालिका स्व अग्नीत जळून खाक झाली. अन तेथ उमटलं हे स्वर्गीय अद्भुत रोपट . सुर्यावरील रागाने ती बाकीच्या फुलांसारखी सूर्योदयाला नाही उमलत. ना ही तिची फुल कधी उमलून डोलतात. बस उमललेलं प्रत्येक फुल मूक अश्रु सारख टप , टप गळत!! कविता या कहाणीवर नाही आहे. पण एक संदर्भ !! हे फक्त त्या सुगन्धी प्राजक्ताच वर्णन. प्राजक्त पाच पाकळ्या प्राजक्ताच्या ; सान चिमुकल्या ; फक्त पांढऱ्या. देठ ही इवला; संथ केशरी, देह हलका हवेहूनही ॥ उठण्या आधी भ्रमर पाखरे, फुलण्या आधी प्रफ्फुल्ल किरणे, लपून कोपरी फुलूनी गेला लाजरा प्राजक्त केंव्हाचा ॥ नाही मादक; ना माळण्या, स्पर्श कुणाचा कधी न भावला, धरला हाती; त्वरित मळला, सुकुमार प्राजक्त हा ॥ उपमा याला कवी मनाची, आणिक कोवळ्या बाल प्रीतीची, नाजूक हळू गुणगुणण्याची , नि:शब्द चांदण्या रातीची ॥ फुलण्यासाठी, फुलून गेला लकेर मनीची खुलवीत गेला, तरंग सुगंधी उठवीत गेला, एकला प्राजक्त हा ॥

वाचने 14103 वाचनखूण प्रतिक्रिया 25

आवशीचो घोव् 15/04/2010 - 10:08
कथा माहित नव्हती. फार छान आहे. माझ्या चुलतबहिणीचं नाव प्राजक्ता आहे. तिला पाठवीन हि गोष्ट. :) पण एक प्रश्न पडला कविता वाचून (कदाचित चुकीचा असावा) प्राजक्ताच्या झाडाचा उल्लेख पुल्लिंगी करावा की स्त्रिलिंगी?

In reply to by आवशीचो घोव्

तर प्राजक्ता (प्राजक्ताच्या फुलांसारखी सुंदर नि नाजूक अशी) आणि शेफाली हे स्त्रीलिंगी उल्लेख असावेत, असे वाटते. (अंदाजपंचे)बेसनलाडू

भूंगा 15/04/2010 - 10:47
अपर्णाताई आपण प्राजक्ताचे वर्णन खरोखर बहारदार केले आहे. तुम्ही तुमच्या कृज्ञतेला योग्य वाट करून दिल्यानें तुम्हाला आता बरेच मोकळे वाटेल. भुंगा

स्पंदना 15/04/2010 - 10:50
पुरे तो स्त्री जन्म ! म्हणुन 'तिचा',' तो' म्हणुन जन्म झाला असेल. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

प्रदीपा 15/04/2010 - 12:38
क्या बात है.... बहोत अच्छे...!! ....ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते. फारच छान... हे आपलच्...की ऐकीवातल?... कसही असुद्या पण छान आहे..!

मीनल 15/04/2010 - 19:00
शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त. प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती. रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं. पानं काळवंडलेली उदास. वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले. देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. " प्राजक्ताने ती केली. दिवस-महिने-वर्ष उलटले. तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात. आणि एकदिवस पहाटे सुगंधी हिर्या माणकांनी डहाळी न डहाळी ओथंबली. प्राजक्ताच्या ह्या अवर्णनीय वैभवाकडे सारं वन मंत्रमुग्ध होऊन पहात राहिलं. पण प्राजक्ताला कसली जाणीवच नव्हती. तपातच दंग शेफ़ालिकेला शेवटी शेजारच्या एका वृक्षाने हलवून जाग आणली. वैभव? करू काय मी ह्याच? निरिच्छपणे काया झटकून दिली तिने ती सारी दौलत मातीत उधळून.. धुळीत पडल्यावर लखलखती हिरे माणकं जराशी मंदावली आणि सूर्याच्या पहाटेच्या किरणांत मोती पोवळ्यांच रुप ल्यायली. शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते. बंगालमधे प्राजक्त खूप फ़ुलतो. आणि शगुन म्हणून घरात येणार्‍या सूनेची ओटी प्राजक्ताच्या फ़ुलांनी भरायची पूर्वीची रीत. काळाच्या ओघात, वैभव दाखवण्याच्या हौसेपायी त्यांची मोती पोवळी झाली. श्री रंवींद्रनाथ टागोर यांचे हे सुंदर लेखन फार पूर्वी http://tulipsintwilight.blogspot.com/ येथे वाचायला मिळाले होते. आता तो ब्लॉग फक्त invited readers साठीच आहे. मला आमंत्रण नाही याचे वाईट वाटते. लेखिकेचे स्वतःचे लेखन ही छान असते. मीनल. http://myurmee.blogspot.com/

अमोल केळकर 15/04/2010 - 17:50
सुंदर रचना . मीनल ताईंचा प्रतिसाद ही आवडला. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शुचि 15/04/2010 - 17:57
सुंदर वर्णनं एकेक या लेखातली, प्रतिक्रियेतली. खरच प्राजक्ताचा सुगंध मादक अथवा जीवघेणा नसून एक प्रकारचा विरक्तीचा असतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

अरुंधती 15/04/2010 - 19:23
प्राजक्ताची निर्मळ शुभ्रता आणि त्याच्या देठातील ते गडद केशरीपण.... का कोण जाणे, मला प्राजक्ताची ही पांढरीशुभ्र - केशरी मोत्या-पोवळ्याची फुले कायम काळ्याकुळकुळीत विठुरायाच्या गळ्यातच गुंफलेली दिसतात. दोघेही एकमेकांची शोभा वाढवतात. सत्यभामा व रुक्मिणीलाही श्रीकृष्णाकडे रुसवे-फुगवे धरायला लावणारी ही सुगंधी पुष्पे म्हणजे पहाटेचे साखर स्वप्नच जणू! पहाटेच्या दंवाप्रमाणे दिवसाच्या प्रखरतेत विरघळून जाणारे...पण आपली सुमधुर आठवण मनात ठेवून जाणारे.... अपर्णा, मीनल दोघींचे कौतुक! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

प्राजु 15/04/2010 - 19:40
अरे व्वा! अपर्णा आणि मीनल, दोघिंच्याही गोष्टी छान आहेत. अपर्णा, कविता आवडली. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

बेसनलाडू 15/04/2010 - 23:45
कविता असोत, गोष्टी असोत की मोहक प्रकाशचित्रे..प्राजक्ताशी नाते जोडले गेले आहे ते जन्मभराचे! prajakta (नातलग)बेसनलाडू वरीलपैकी सूर्याबद्दलची गोष्ट माहीत होती; तपश्चर्येबद्दलची नाही. श्रीकृष्णाची ही अत्यंत आवडती फुलं असल्याने त्याने नंदनवनातून एक फांदी चोरून पृथ्वीवर आणली आणि सत्यभामेच्या अंगणात लावली. फुले रुक्मिणीच्या अंगणात पडत. दोघी खूष! मात्र इंद्राची चिडचिड शापाच्या रुपाने भोगायला लागली ती त्या प्राजक्ताला. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्री विष्णूचा अवतार; त्याला शाप देणे इंद्राला शक्य झाले नाही. तेव्हा त्याने प्राजक्तालाचा शाप दिला - तू बहरशील अशा वेळी की तुझे सौंदर्य कोणालाच दिसू शकणार नाही; आणि तू फुललास तरी फळणार नाहीस. प्राजक्ताची फुले गळून जातात नि त्याला फळे येत नाहीत याबद्दलची ही रोचक कथा ऐकली आहे. (स्मरणशील)बेसनलाडू

sur_nair 17/04/2010 - 11:33
सुंदर आहे तुमची कविता. प्राजक्त माझाही आवडता वृक्ष. ही कथा माहित नव्हती. . सत्यभामा -भामिनी एवढाच संदर्भ माहित होता. मीनलतैंचा संदर्भही सुंदर. यावरून माझी एक चारोळी आहे ती आठवली स्वर्गलोकीचा प्राजक्त पृथ्वी वर उभा असतो आसवांची फुले का ढाळीत सदा असतो?

मदनबाण 17/04/2010 - 13:56
छान धागा,अन् त्यावरचे प्रतिसादही सुंदर... लाडुराव फोटु लयं भारी हाय... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

मीनल 17/04/2010 - 18:36
वरचे देठ पाहून एक आठवलं. आमच्या ओळखीच्या एक बाई दूधात प्राजक्ताची देठ चुरडून घालतात म्हणे. त्यात साखर आणि मसाला घालून मसाले दूध करतात. बारीकसा सुगंध येतो दूधाला. शिवाय रंग ( केशर न घालताही) मी ट्राय केले नाही. पण ऐकले आहे. मीनल. http://myurmee.blogspot.com/

In reply to by मीनल

मदनबाण 17/04/2010 - 18:38
मीनल तै...शिरा करताना त्यात सुद्धा घालतात् असं ऐकलयं... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

In reply to by मीनल

अनन्न्या 17/09/2013 - 18:23
माझी आजी नेहमी ताटात देठ काढून सावलीत वाळवायची. तेच केशर म्हणून वापरले जायचे आमच्याकडे! वेगळे केशर असते हेच माहित नव्हते लहानपणी! @ अपर्णा, कविता खूप आवडली.

प्यारे१ 16/09/2013 - 20:29
मस्तच. खूप दिवसांनी काल प्राजक्त पाहिला.

सुधीर 16/09/2013 - 22:10
कविता आवडली होती त्यावेळी, पुन्हा वाचली, काही प्रतिसादही आवडले.

रुमानी 20/09/2013 - 13:25
प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेले एक प्राजक्त अस्तोच..! संदर्भ आणि कविता दोन्हि छान..!