त्यांच्या कवितेतील पाऊस
त्यांच्या कवितेतील पाऊस
पाऊस आला आणि पाठोपाठ उगवल्या जिकडे तिकडे
पावसाच्या कविता...
त्यांच्या कवितेतला पाऊस रिमझिमत होता
मोत्यासारखे भासत होते टपोरे थेंब
हवेत दाटला होता सुखद गारवा
त्यांनी लपेटल्या काश्मिरी शाली
त्यांच्या अंगणात मोर नाचले पिसारा फुलवून.
पावसानं आधी आमचं छप्पर उडवलं
मग आमची पार दाणादाण उडवली.
माणसं, चूल, कापडं सगळंच चिंब भिजलं
छातीशी हात बांधून बसून राहिलो आडोशाला
उपाशी पोटानं, काकडत, कुडकुडत...
ज्यांच्या डोक्यावर असते छप्पर
त्यांच्या कवितेत नाचतात मोर
आमच्या कवितेत पावसानं फक्त चिखल केला
फक्त चिखल केला...
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
