विक्रमाच्या हेरांच्या ताफ्यात अनेक प्रकारचे हेर होते, काही राज्यात सतत फिरून बातम्या काढणारे तर काही बाहेरच्या राज्यात, शत्रूंच्या राज्यात फिरून, जीवावरचा धोका पत्करून देशनिष्ठा बाळगून देशाशी इमान राखणारे, देशाच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे, देशाच्या शत्रूंवर नजर ठेवणारे. पण या हेरांचा समान गुण काय असेल तर त्यांची वेष, भाषा, रूप, रंग, कला, वागणं सारंच पूर्ण बदलायची त्यांची क्षमता.. एका ठिकाणी साधुबैराग्याच्या वेषात जाऊन अलख निरंजन म्हणतील.. दुसरीकडे गारुडी म्हणून जाऊन जीवंत नाग पुंगीच्या तालावर नाचवतील.. एका जागी नाटकातले नट होतील.. कुठे लोहार काम करणारे कारागीर होतील..