रम्य एक संध्या
कोमल गंधार,
कुसुंबी किनार
क्षितिजाला...
तेजस्वी रवीची
किरणे सोनेरी,
लाली गालावरी
संध्येच्या का !?!
मुग्ध प्रियतमा
संध्या ती आरक्त,
का 'रवी' आसक्त
'निशे'वरी !
दुखावली 'संध्या'
हळवा गंधार,
का क्षितिजापार
गेला सखा.....
हवेत गारवा
नभी चंद्र तारे,
मादक इशारे
निशेचेही...
आसुसला 'रवी'
निशेच्या छायेला,
कौमुदी कायेला
चंद्र साक्ष...
मिठीत 'रवी'च्या
'निशा'ही उन्मुक्त,
प्रकाश अव्यक्त
अंधारला...
मेघाचा मल्हार,
कित्येक प्रहर,
प्रणय कहर,
आसमंत.....
पहाट भैरवी
तिमिर छेदून,
गगन भेदून,
झंकारली.