उष्टावण.....
आजकाल हे रोजचेच झाले होते. दुपारचे चार वाजले नाहीत तोच पोटात भूक दंगा करू लागे. डब्यातल्या दोन पोळ्या कधीच्याच जिरून गेलेल्या. खाली कँटिनमध्येही चहा-कॉफी शिवाय काही मिळत नसे. तश्या आठ-दहा बरण्याही असत. चिवडा, चकल्या, पापड्य़ा, बिस्किटं असे उगाच चावायला काहीतरी. पण बरेचदा त्या बरण्यांच्या तळाशी गळलेले तेल त्यांच्या कालावधीची लांबी दाखवत असे. ते पाहिले की सुधाला मळमळायलाच लागे. बरे बाहेर जाऊन काहीतरी खावे तर सेक्शनमध्ये बोंब. अरे कुठे गेल्यात रे? बराच वेळ झाला. काय ऑफिस आहे का टाईमपास? आँ....... दहा मिनिटांच्यावर जर कोण कुठे गेले तर अर्धी सी.एल कापा म्हणजे चट ताळ्यावर येतील सगळे.
मिसळपाव
