ती एक जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असणारी, माणसांमधील चांगुलपणावर विश्वास ठेवणारी आणि समाजासाठी जाणीवपूर्वक काहीतरी करण्याची इच्छा असणारी श्रद्धाळू स्त्री होती. कधीही कुणाचे वाईट व्हावे असे तिच्या मनात आले नाही. तिने ज्यांच्यावर मनापासून माया केली, त्यातल्या बर्याच लोकांनी त्यांचा हेतू साध्य झाल्यावर तिच्याकडे मागे वळून पाहिलेही नाही. त्याबद्दल तिला खंत वाटली असेलही, पण तिने त्याचा सल मनात ठेवला नाही. तिचे आयुष्य तसे कष्टातच गेले. आज सत्तरीच्या पुढे असणार्या लोकांनी त्यांच्या उमेदीच्या काळात जशा खस्ता खाल्या, ज्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला, तसे तिनेही केले.