या वर्षी गणेशोत्सव निमित्त, मी आमच्या गोव्याच्या घरी गेलो होतो. आणि अनुभवाने मनाला आलेल्या उन्मनी अवस्थेचं वर्णन कोणीही आपल्या मातृभाषेतूनच सर्वाधिक सक्षमपणे करू शकतो असं माझं मत आहे. ह्या पूर्वी मी तिथे गेलो होतो त्याला आता सहा वर्ष उलटून गेली, त्यामुळे धूसर आठवणींखेरीज माझ्या गाठीला त्यातलं फारसं काही उरलेलं नव्हतं. ह्या आठवड्यात मी एक अत्यंत वेगळा गणेशोत्सव पाहिला.
कोकणात गणपती हा अतिशय मानाचा उत्सव, तसं पाहता, दिवाळी, दसऱ्यापेक्षाही हा सण जास्त उल्ल्हासाने, सुंदरतेने साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी तर कोण गजहब. चतुर्थीला गणेशाची सजवलेल्या मखरात प्रतिष्ठापना केली जाते.