छे! बाबांना कितीतरी मुद्दे सांगायचे होते, पण का कोण जाणे, जमतच नव्हतं काही बोलायला... काल त्यांच्या ऑफीसमधले काका अभिनंदन करत होते, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. मी ठरवलंच होतं सरळ त्यांना सांगायचं - तुमची बढती झालीय ना, मग जा तुम्हीच एकटे. मी नाही येणार! पाहिजे तर आईला पण घेऊन जा, मी राहीन इथे आजीबरोबर. हो, जमेल आम्हाला! काय गं आजी?
इथे माझे मित्र आहेत, माझी शाळा आहे, मस्त मोकळं मैदान आहे, ह्या वर्षी खो-खो चा कॅप्टन पण होईन मी... हे सगळं व्यवस्थित असताना का येऊ तिथे अनोळखी जागी? तिथं कसे मित्र होणार माझे? शाळा तरी असेल का ह्या शाळेसारखी?