ह्या भारतवारीत अशाच निवांत गप्पा चाललेल्या असताना काकूने एअर फ्रायरचा विषय काढला. विषय मोठा टेम्टिंग होता. गरम हवेचे झोत वेगात फिरवून फ्रेंच फ्राइज पासून केकपर्यंत कोणतेही पदार्थ तयार केले जातात आणि तेलाचा वापर त्यात नगण्य असतो ही गोष्टच क्रांतिकारी होती. अर्धा चमचा तेलात कटलेट आणि एक चमचा तेलात समोसे बनतात अशा संभाषणातले समोसे, कटलेट, पेस्ट्री असं सारखं सारखं ऐकून जीभ चाळवली आणि कोपर्यावरच्या वडेवाल्याकडून वडे, भजी आणलेच आम्ही..