पूर्वपिठीका
वर्षानुवर्षे हंपीला जायचं चाललं होतं पण काही ना काही कारणांनी जाणं सतत लांबणीवर पडत होतं. तो योग शेवटी भर उन्हाळ्यात आला. आधी ठिकाणं ठरवण्यात वेळ गेला. सुरुवातीला ठरलं होतं बदामी, ऐहोळे, पट्टदकल. पण कडक उन्हाळ्यामुळे तो बेत मागे पडला, मग ठिकाण ठरत होत ते दांडेली. भर उन्हाळ्यातही जाता येण्याजोगं असं जंगलझाडीत असलेलं काहीसं थंड असलेलं ठिकाण. तिकडच्या जंगललॉजेसमध्ये चौकशी करुन झाली पण ती सगळी फुल असल्याने इतर पर्याय शोधायला लागलो. एक जंगललॉज होतं ते हंपीनजीकच्या दरोजी स्लॉथ बेअर पार्क मध्ये. काहीसं महागच होतं ते, हंपीपासून साधारण१३ किमी.