हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १
पूर्वपिठीका
वर्षानुवर्षे हंपीला जायचं चाललं होतं पण काही ना काही कारणांनी जाणं सतत लांबणीवर पडत होतं. तो योग शेवटी भर उन्हाळ्यात आला. आधी ठिकाणं ठरवण्यात वेळ गेला. सुरुवातीला ठरलं होतं बदामी, ऐहोळे, पट्टदकल. पण कडक उन्हाळ्यामुळे तो बेत मागे पडला, मग ठिकाण ठरत होत ते दांडेली. भर उन्हाळ्यातही जाता येण्याजोगं असं जंगलझाडीत असलेलं काहीसं थंड असलेलं ठिकाण. तिकडच्या जंगललॉजेसमध्ये चौकशी करुन झाली पण ती सगळी फुल असल्याने इतर पर्याय शोधायला लागलो. एक जंगललॉज होतं ते हंपीनजीकच्या दरोजी स्लॉथ बेअर पार्क मध्ये. काहीसं महागच होतं ते, हंपीपासून साधारण१३ किमी. दरोजी अभयारण्याची चौकशी करुन झाली. अभयारण्यात दुपारी २ ते संध्याकाळी ६ इतक्याच मर्यादित वेळेत प्रवेश असतो आणि त्याच वेळेस अस्वलं दिसतात अशी पक्की माहिती मिळाली. मग विचार केला की तिथल्या जंगललॉज मध्ये राहण्यापेक्षा खुद्द हंपीनजीक राहून एक संध्याकाळ दरोजीसाठी राखीव ठेवावी. मग त्या दृष्टीने हंपीनजीक मुक्कामाची ठिकाणे शोधणे सुरु झाले. हंपीतील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरानजीक असलेल्या हंपी बाझार येथे काही होम स्टे'ज आहेत पण तिथे कार पार्किंगची व्यवस्था नाही. हंपीला येणारे पर्यटक मुख्यतः होस्पेटला मुक्काम करुन हंपी दर्शन करतात, होस्पेट मात्र १२ किमी लांब, त्यापेक्षा मग कमलापूर जे हंपी पासून (म्हणजे हंपीच्या मुख्य विरुपाक्ष संकुलापासून) चार किमी लांब आहे तेथील मयुरा भुवनेश्वरी ह्या कर्नाटक राज्य पर्यटन महामंडळाच्या रिसोर्टची माहिती मिळाली. एप्रिल/मे हा हंपीचा ऑफ सीजन असल्याने (कारण अतिशय कडक उन्हाळा) खोल्याही उपलब्ध होत्याच. अर्थात खोल्या उपलब्ध असल्या तरीही आमचं जाणं काही नीट ठरत नव्हतं. मित्रांचं स्केड्युल नीट जमत नव्हतं. शेवटी शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला हंपी़ला जायचं एकदाचं नक्की झालं आणि शनिवारी म्हणजे २९ तारखेला चिंचवडहून दुपारी निघायचं ठरलं. मग लगेच कमलापूरच्या रिसोर्टला एक खोली आरक्षित केली. आणि सर्व काही जमवून शनि दुपारी ३ च्या आसपास पुणं सोडलं.
हंपीला जायचे मुख्य मार्ग दोन. पहिला पुणे-कोल्हापूर-बेळगाव-धारवाड-हुबळी-गदग-होस्पेट-हंपी असा आणि दुसरा पुणे-सोलापूर-विजापूर- बदामी-बागलकोट -होस्पेट - हंपी असा. सोलापूरमार्ग किंचित जवळचा असूनही बेळगाव मार्गे निघालो कारण हा रस्ता अतिशय वेगवान आहे. कोल्हापूरला चहा घेऊन कित्तूरपासून थोडंसं पुढे जेवणासाठी एका ढाब्यावर जेवण्यासाठी थांबा घेतला. एकदा बेळगाव सोडलं तर हुबळी वगळता जेवायची सोय होणे थोडे अवघडच आहे. धारवाडला होते पण त्यासाठी हायवे सोडून शहरात शिरावे लागते. ढाबे अगदी कमी प्रमाणात आहेत. हुबळी सोडल्यावर थेट होस्पेटपर्यंत तर ढाबे अतिशयच कमी आहेत. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन प्रवास करताना जेवायच्या सोयीसाठी बेळगाव किंवा हुबळी उत्तम. कित्तूरनजीक जेवण करुन १२/१२:३० पर्यंत हुबळीस पोहोचलो. तिथे एका ज्युस सेंटरवर मिल्कशेथ विथ आईसक्रीम खाऊन पुढच्या प्रवासास लागलो. उत्तररात्रीचा प्रवास टाळायचा असल्याने शिरगुप्पीपासून पुढे आणि गदगच्या अलीकडे हुबळीपासून चाळीस/पन्नास किमी प्रवास करुन रात्री दी़डच्या सुमारास एका पेट्रोल पंपावर गाडी लावली आणी गाडीतच आडवे होऊन २/३ तास झोप काढली. पहाटे पावणेपासच्या सुमारास पुन्हा प्रवास सुरु केला. दिडशे किमी अंतर राहिलं होतं. गदग-लकुंडी-कोप्पल असा प्रवास करुन होस्पेटला पोहोचलो तेव्हा सात वाजले होते. गदग, लकुंडीलाही भरपूर मंदिरे आहेत, परतीच्या प्रवासातही वेळेअभावी ती पाहता आली नाहीत.
होस्पेटपासूनच हंपीचे अवशेष दिसायला सुरुवात होतेच. हंपीच्या खडकाळ टेकड्या लक्षवेधी आहेत, तुंगभद्रा धरण, नदीचं मोठमोठ्या खडकांनी युक्त असलेलं पात्र, आजूबाजूला सतत दिसणारी लहानमोठी प्राचीन मंदिरे हे बघत बघतच साडेसातच्या सुमारास कमलापूरला पोहोचलो. कमलापूरच्या अलीकडेच एका रस्त्याच्या एका बाजूला एक बंधारा आहे. बंधार्याच्या एका बाजूला उन्हाळ्यात पाणी आटल्याने पूर्ण दलदलीचा प्रदेश आणि दुसर्या बाजूला केळीच्या गच्च बागा. आजचा रस्ता ह्या बंधार्यावरुनच गेलेला आहे. हा बंधारा विजयनगरच्या राजांनी बांधलेला असून त्याचे पाणी हंपीत खेळवलेले आहे. असे कित्येक बंधारे येथील आसपासच्या प्रदेशात त्या महान राजवटीत बांधले गेलेले आहेत.
कमलापूरला मयुरा भुवनेश्वरीत जाऊन खोली ताब्यात घेतली आणि छानपैकी तासभर झोप काढली आणि आवरुन हंपी बघायला निघालो. हंपी बघायला कशी आणि कुठून सुरुवात करायची ह्याची कसलीही योजना न आखल्याने आणि स्थलदर्शनाचा नकाशाही जवळ नसल्याने मन मानेल तसं भटकायचं असा विचार केला आणि कमलापूर येथील हंपी गेटमधून आत शिरलो.
हंपी: दिवस पहिला
हंपी म्हणजे रामायणात उल्लेख असलेले पंपाक्षेत्र. तुंगभ्रद्रा नदीचे पूर्वीचे नाव पंपा, त्याचाच अपभ्रंश होऊन पंपाचे हंपी हे नाव रूढ झाले. इकडील सर्व टेकड्यांची नावेही रामायणात उल्लेख असलेलीच. उदा. मातंग, गंधमादन, अंजनेय टेकड्या. हंपीवर पूर्वी चालुक्यांची राजवट होती हे तिथल्या विरुपाक्ष मंदिरावरुन स्पष्ट होते. हंपीच्या टेकड्यांमध्ये विजयनगर हे शहर वसवले ते हरिहर आणि बुक्कराय ह्या दोघांनी त्यांच्या गुरुंची, स्वामी विद्यारण्यांची प्रेरणा घेऊन. हे हरिहर आणि बुक्कराय होयसळ राजा बल्लाळ ह्याच्या पदरी होते. इस्लामच्या वावटळीत होयसळ राजवट संपुष्टात आल्यावर ह्या दोघांनी होयसळांचे सरदार, आप्त इत्यादिंच्या पाठिंब्याने हिंदू धर्म आणि हिंदू राजवटीच्या पुनरुत्थान करण्याच्या इर्षेने विजयनगर ही राजधानी स्थापन केली. पहिल्या हरिहराचा काळ हा राज्य स्थिरस्थावर करण्यात गेला, ह्याचानंतर गादीवर आला तो ह्याचा भाऊ बुक्कराय. ह्याच्या राजवटीत विजयनगरचा राज्यविस्तार होत जाउन राज्य समृद्ध होत गेले आणि सर्वबाजूंनी घेरुन असलेल्या मुसलमानी सत्तांवर विजयनगरची दहशत बसायला सुरुवात झाली. विजनगरच्या राजकीय इतिहासात ४ घराणी झाली. हरिहर/बुक्करायाचे संगम घराणे, साळुव नरसिंहाचे साळुव घराणे, तुळूव नरसिंहाचे (नरसा नायक) तुळूव घराणे आणि अलिय (जावई) रामरायाचे अराविडू घराणे. तुळूव घराण्यातच विजयनगरचा सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला तो म्हणजे कृष्णदेवराय. अर्थात हंपीचा इतिहास सांगणे हा ह्या लेखाचा उद्देश नाही. जयंत कुलकर्णी काकांनी हा इतिहास आपल्या अप्रतिम लेखमालेद्वारे मिपावर ह्याआधीच आणलेला आहे. मी फक्त इथले अल्पसे स्थलदर्शन ह्या लेखमालेद्वारे घडवून आणणार आहे.
आमच्याकडे नकाशा नसल्याने आम्ही मनमुराद भटकत होतो, त्यामुळेच काही वेगळी ठिकाणे पाहता आली. इतरांच्या सोयीसाठी हा मुख्य नकाशा खाली देत आहे त्यानुसार नीट योजना आखल्यास कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणे पाहता येतील.
हंपी स्थलदर्शन नकाशा www.hampi.in ह्या संस्थळावरुन साभार.
चंद्रशेखर मंदिर
कमलापूर गेट मधून हंपीत प्रवेश करता करताच उजव्या हाताला एक मंदिर लक्ष वेधून घेतं ते म्हणजे चंद्रशेखर मंदिर. तिकडे जाण्यासाठीडांबरी रस्ता सोडून उजवीकडे कच्च्या रस्त्यावर गाडी घेताच एकाएकी असंख्य अवशेष दिसू लागतात आणि हंपीचं विराट, ओसाड, भग्न स्वरुप सामोरे येते.
चंद्रशेखर मंदिर जरी कमलापूरला सर्वात जवळ असलं तरी हे हंपीच्या मुख्य ठिकाणांपासून लांब असल्याने बरेचसे दुर्लक्षित आहे. त्यामुळे इकडे अजिबात गर्दी नसते. हे मंदिर राजवाडा परिसरात (Royal Enclosure)गणले जाते. तरीही ते शाही ठिकाणांपासून लांबच आणि एका कोपर्यात असल्याने खूपच दुर्लक्षित आहे. हे मंदिर साधारण १६ व्या शतकात बांधले गेले. इकडील मुख्य मंदिरांवर गोपुरे दिसतात. सम्राट कृष्णदेवरायाने ही गोपुरे बांधवून घेतली असल्याकारणाने त्यांना रायगोपुरे असे म्हटले जाते.
चंद्रशेखर मंदिर
इकडील जवळपास सर्वच मंदिरांची शैली एकसारखी आहे. गोपुर, मंदिराचे आवार, वाद्यमंडप, सभामंडप, दोन्ही बाजूंस असलेले अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह.
गोपुर तसंच कळसांची बांधकामं ही मातीच्या भाजलेल्या वीटांची आहेत. विटकामामुळे त्यांची बरीच हानी झालेली दिसते.
चंद्रशेखर मंदिराचे गोपुर
गोपुरांवर विविध मूर्ती कोरलेल्या दिसतात.
मुख्य मंदिर परिसर
मंदिराचा बाह्यभाग
सभामंडपात नक्षीदार स्तंभ असून त्यावर व्याल, बाळकृष्ण, गायी, वानरं, तसंच इतरही अनेक वेगवेगळ्या मूर्ती, नक्षी इत्यादींचे कोरीव अंकन केले गेले आहे.
सभामंडप
घोंगडी पांघरलेल्या गुराख्याची मूर्ती लक्षवेधी आहे.
एका स्तंभावर गायवासरु कोरलेले आहे. हंपीतल्या बहुतेक सर्वच मंदिरात हे शिल्प दिसते.
स्तंभांवरची अजून काही शिल्पे
--
ह्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर समोरच दिसते ते सरस्वती मंदिर
सरस्वती मंदिर
सरस्वती मंदिर
हे मंदिर एका अतिशय लहानश्या अशा टेकडीवर किंबहुना दगडाच्या ढिगार्यावर वसलेलं आहे. हे एक लहानसे मंदिर असून ते किंचित उंचावर असल्याने येथून राजवाडा परिसराचे कित्येक अवशेष दिसतात.
सरस्वती मंदिराच्या प्रवेशद्वारातून दिसणारे अवशेष
सरस्वती मंदिर
हे मंदिर मूळचं वैष्णव असून १५५४ सालच्या शिलालेखाप्रमाणे हे तिरुवेंगलनाथ ह्या नावाने ओळखले जात होते. कालांतराने ह्या मंदिराला सरस्वती मंदिर हे नाव पडले. मात्र मुख्य वैष्णव मंदिराची ओळख अजिबात लपत नाही. मंदिरातील स्तंभांवर कृष्ण, विष्णू, दशावतार, गोपिका वस्त्रहरण आदी प्रतिमा कोरलेल्या आहेत तसेच गाभार्यातही गरुड मूर्ती कोरलेले एक पीठ आहे, त्यावर विष्णू अर्थात तिरुवेंगलनाथाची उभी मूर्ती असणार हे निश्चित.
गोपिका वस्त्रहरण प्रसंग
--
--
मत्स्यावतार
गर्भगृहातील विष्णूमूर्तीचे पीठ
सरस्वती मंदिरातून बाहेर येताच उजव्या हातास आहे ते अष्टकोनी स्नानगृह
अष्टकोनी स्नानगृह
हे एक अष्टकोनी आकारातलं प्रचंड मोठं स्नानगृह आहे. स्तंभयुक्त मंडप, आत उतरती रचना, पाणी खेळवण्यासाठी बनवलेले दगडी चॅनेल्स. मध्यभागी एक रुंद स्तंभ (ह्यावर पूर्वी कारंजे असावे) अशी याची रचना. चंद्रशेखर मंदिरापासून एका रेषेत हे साधारण पाऊण किलोमीटर अंतरावर आहे.
अष्टकोनी स्नानगृह
स्नानगृह जवळून
अष्टकोनी स्नानगृहाचा मुख्य भाग
स्नानगृह परिसरातून दिसणारा हंपीचा रुक्ष, ओसाड, भग्न प्रदेश
ह्यानंतर आम्ही निघालो ते राजवाडा परिसर पाहायला. सरस्वती मंदिरापासूनच पुढे अर्ध्या/पाऊण किलोमीटर अंतरावर हा ठिकाण आहे. तटबंद असलेला हा राजवाडा परिसर (Royal enlcosure) हा जवळपास असंख्य विविध प्रकारच्या इमारतींचा समुच्चय, विजनगरच्या राजधानीचे केंद्र, विजयनगरचा दसरा, दिवाळी तसेच इतरही सण, उत्सव साजरे होणारा महत्वाचा परिसर, त्याविषयी पुढच्या भागात.
क्रमशः
चंद्रशेखर मंदिर
कमलापूर गेट मधून हंपीत प्रवेश करता करताच उजव्या हाताला एक मंदिर लक्ष वेधून घेतं ते म्हणजे चंद्रशेखर मंदिर. तिकडे जाण्यासाठीडांबरी रस्ता सोडून उजवीकडे कच्च्या रस्त्यावर गाडी घेताच एकाएकी असंख्य अवशेष दिसू लागतात आणि हंपीचं विराट, ओसाड, भग्न स्वरुप सामोरे येते.
चंद्रशेखर मंदिर जरी कमलापूरला सर्वात जवळ असलं तरी हे हंपीच्या मुख्य ठिकाणांपासून लांब असल्याने बरेचसे दुर्लक्षित आहे. त्यामुळे इकडे अजिबात गर्दी नसते. हे मंदिर राजवाडा परिसरात (Royal Enclosure)गणले जाते. तरीही ते शाही ठिकाणांपासून लांबच आणि एका कोपर्यात असल्याने खूपच दुर्लक्षित आहे. हे मंदिर साधारण १६ व्या शतकात बांधले गेले. इकडील मुख्य मंदिरांवर गोपुरे दिसतात. सम्राट कृष्णदेवरायाने ही गोपुरे बांधवून घेतली असल्याकारणाने त्यांना रायगोपुरे असे म्हटले जाते.
चंद्रशेखर मंदिर
वाचन
32914
प्रतिक्रिया
0