गणपाशेठ, प्रभो, पांथस्थ,दिपालीताई इ. पासून प्रेरणा घेऊन आपणही आपली एखादी पाककृती लिहावी, असा विचार मनात आला. माझे स्वयंपाकाचे प्रयोग खरे तर केवळ निरीक्षणातून आणि स्वतःच्या चवीसाठी केलेल्या उचापतींमधून चालू झाले. लहानपणी आई-आजीने कधी कशाला हात लावू दिला नाही (आणि त्याबरोबरच अनेकदा 'आयतं गिळायला पाहिजे' वगैरे मुक्ताफळांचे सत्कारही केले), त्यामुळे स्वयंपाकघरात उभे राहून त्या काय करत आहेत, याकडे लक्ष देणे; पाककृतींची पुस्तके वाचणे वगैरेपर्यंत उड्या मारल्या जायच्या.