लोणी भापकर- एक लहानसे खेडेगाव, पुण्यापासून साधारण ६५ किमी दूर, मोरगावच्या पुढे जेमतेम ४ मैलांवर. गाव लहानसेच असले तरी मध्ययुगीन कालातली मंदिरे, प्राचीन अवशेष, वाडे हुडे, गढ्या आणि किल्ला असे ऐतिहासिक दृष्ट्या कमालीचे परिपूर्ण.
कित्येक दिवस लोणी भापकरची मंदिरे आणि तिथल्या वीरगळांना भेट द्यायचा विचार चालूच होता. शेवटी एकदाचा बेत नक्की झाला. पुण्यात अत्रुप्त आत्म्याच्या घरापाशी भेटून त्याच्या गाडीने मी, ५० फक्त आणि आत्मा असे तिघेजण निघालो. वाटेत हडपसरला सूडला घेतले आणि पुढे मार्गक्रमण चालू केले. सासवडपर्यंत धूम धूम कोसळणारा पाऊस जेजुरीपाशी येईतो प्रायः थांबला होता.