माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात.
हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील.
आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो.