निसर्गचित्र ( गिरीभ्रमणाच्या वाटेवर )
मी , १५ आणि १६ ऑगस्ट, २००६ ह्या दिवशी 'कोथळीचा भैरवगड आणि हरिश्चंद्र्गड" हा सलग ट्रेक केला, त्यावेळी मला भावलेला निसर्ग शब्दबध्द करावासा वाटला.
* * * *
अनंत हिरव्या रंगछटांनी
सजला डोंगरमाथा
बेलागकड्यांच्या मधून फिरती
दुर्गम पाऊलवाटा
डोंगरझाडीमधुनी खुलते
रंग फुलोरी नक्षी
हिरव्या पानांआडूनी दिसतो
लाल-सावळा पक्षी
कडे कपारीवरुनी उतरे
वेगाने जलभार
कोसळूनी ओढ्यात उधळतो
फेनल, शुभ्र तुषार
खळाळ जल ओढ्यात पसरते
घेऊन तांबूस माती
भिजवीत काठावरची सारी
हिरवी लव्हाळ पाती
धुंद, गार वार्यावर डुलते
गवतफुलांची काया
हळूच उतरे गिरी माथ्यावर
मेघ सावळी छाया
मिसळपाव