ती सांज रंगलेली

अशोक गोडबोले's picture
अशोक गोडबोले in जे न देखे रवी...
19 Sep 2007 - 11:59 pm

ती सांज रंगलेली धुंदीतल्या क्षणाने
चोरून प्रीत नेली ओठातल्या स्मिताने

वारा उनाड वाहे उडवीत कुंतलाना
नजरेस रोखलेल्या स्वप्नास झाकताना

काठावरी झर्‍याच्या एकांत स्वर भुकेला
तरुसावल्या सलीली निशःब्द सोबतीला

हातात हात दोन्ही गुंफून बोलण्यास
ते ओठ विलग होती शब्दास शोधण्यास

परिते मुकेच राहे पहिलेच प्रेमगान
डोळ्यात धृवपदाच्या ओळी निळ्या लिहून

सोडून कर कधी ती गेली मला कळेना
तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना

ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने
मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने

काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा
उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा

--अशोक गोडबोले, पनवेल.

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Sep 2007 - 9:42 pm | विसोबा खेचर

वा अशोकराव,

सोडून कर कधी ती गेली मला कळेना
तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना

ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने
मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने

काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा
उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा

ही तीन कडवी केवळ अप्रतिम!

विशेषतः

ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने
मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने

ह्या ओळींना माझे लाख सलाम..अन्य शब्द नाहीत!!

तात्या.

अशोक गोडबोले's picture

30 Sep 2007 - 12:52 pm | अशोक गोडबोले

सर्व वाचकांचा मी आभारी आहे.

प्राजु's picture

30 Sep 2007 - 7:13 pm | प्राजु

काय अफाट लिहीली आहे कविता... खूप सुंदर..

हातात हात दोन्ही गुंफून बोलण्यास
ते ओठ विलग होती शब्दास शोधण्यास

परिते मुकेच राहे पहिलेच प्रेमगान
डोळ्यात धृवपदाच्या ओळी निळ्या लिहून

अप्रतिम ....

सोडून कर कधी ती गेली मला कळेना
तो स्पर्श अमृताचा दिक्कालही पुसेना

ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने
मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने

या तर... दिक्काल राहतील स्मरणात..

- प्राजु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2007 - 6:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशोकराव,
कविता आवडली, खरे तर प्रेमाला वयाचे बंधन नसते आणि व्यक्त करायला शब्दांचे !

ती सांज रंगलेली धुंदीतल्या क्षणाने
चोरून प्रीत नेली ओठातल्या स्मिताने

वा ! किती सुंदर !

ती सांज गाजलेली आषाढ घनरवाने
मेघास गुपीत माझे कथिले महाकवीने

काठावरी झर्‍याच्या वाहे अजून वारा
उडवीत आठवांचा वेडा खुळा पसारा

फारच सुंदर आहेत वरील ओळी, येऊ द्या अशोकराव अशाच सुंदर कविता !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे