Skip to main content
लेखक मनोजकुमार यांनी बुधवार, 21/10/2026 02:44 या दिवशी प्रकाशित केले.

बाबा - १

बाबा - २

बाबा - ३ 

बाबा - ४

बाबा - ५ 


आमच्याकडे पहिली पत्रिका देवाला द्यायची पद्धत आहे. कुलदैवत सावरगावचा महादेव, कारंज्यापासून वीसेक किलोमीटर, नदीकाठचं छोटं देऊळ. सोमवारी सकाळी मी एस.टी.नं निघालो. तिकीट बावीस रुपये. गाडी गर्दीची होती. एका बाईनं पिशवी माझ्या पायावर ठेवली आणि मला उठू दिलं नाही. पिशवीत कोंबडी होती, ते मला थोड्या वेळानं कळलं.

देवळात पुजाऱ्याला पत्रिका दिली. त्यानं ती देवापुढे ठेवली, अक्षता दिल्या आणि दक्षिणेचे वीस रुपये मागितले. मी दिले.

“इथं कुणी महाराज असतात म्हणे? कारंज्याकडचे?”

पुजारी पान चघळत होता. “हायेत. बारा-पंधरा वर्सं झाले. देवळाचा हिशेब, पावत्या सगळं तेच बघतात. कुणाला अर्ज लिहायचा असला तर लिहून देतात, पैसे घेत नाई.”

“कुठे असतात?”

“नदीकाठच्या पडवीत. पण फार बोलत नाई. परवा मी पाणी मागितलं तर नुसता हात दाखवला.”

मी तिकडे गेलो. मला कसलीच खात्री नव्हती. पडवीत एक म्हातारा माणूस हिशोबाची वही घेऊन बसला होता. भगवं धोतर, पांढरी दाढी, मागे बांधलेले केस. बाबा मला चाळिशीचे आठवत होते. हा साठीचा वाटत होता, गाल आत गेलेले. मी बराच वेळ उभा राहिलो आणि परत फिरायला लागलो.

“अशोक?”

मी लगेच वळलो नाही.

“तू अशोक आहेस ना? तुझ्या आजोबांचा चेहरा आहे तुला.”

मी वळलो. ते वर बघत होते. त्यांचे हात वहीवर होते, आणि त्यांना ते कुठे ठेवावेत ते कळत नव्हतं.

“बाबा.”

ते बराच वेळ काही बोलले नाहीत. मग म्हणाले, “उंच झालास.”

“वीस वर्षं झाली.”

“हो. सकाळी निघालास का? काही खाल्लंस?”

“चहा घेतला.”

“वर पोहे मिळतात, नदीच्या वर.”

मी हातातली पत्रिका त्यांना दिली. त्यांनी ती दोन वेळा वाचली. “कधी आहे?”

“तीन आठवड्यांनी.”

“मंडपवाल्याला अॅडव्हान्स दिला का? हल्ली लोक पैसे घेऊन गायब होतात.”

“दिला.”

“पावती घेतली?”

“हो.”

“ठीक. नाव कोणाचं?”

“तुम्ही... वीस वर्षांनी मंडपवाल्याबद्दल विचारताय?”

“अरे विचारतोय म्हणून विचारतोय. असू दे”

“असू दे नाही,” मी म्हटलं. माझा आवाज चढला होता. “वीस वर्षं बाबा. आईला चष्मा लागला, माहीत आहे तुम्हाला? दोन नंबर. मंजूला मी रोज खोटं सांगायचो, दत्तगुरूंकडे गेलेत, महाराज होऊन येतील. मी सगळ्यांना सांगत आलो की मी रागावलो नाही. रागावलोय मी. आजही. फक्त... आता तुम्हाला बघितलं तर...”

मी पुढे बोलू शकलो नाही.

“तुला कारण हवं आहे?” ते म्हणाले.

“हवं आहे.”

“सांगितलं तरी तुला पटणार नाही.” ते थोडा वेळ गप्प राहिले. “काहीतरी गुदमरत होतं. मला नीट सांगता येत नाही. आधी वाटलं देव सापडेल. सापडला नाही, खरं सांगतो. मग हिशोब लिहायला लागलो, ते बरं जमतं. पंढरपूरला होतो काही वर्षं, मग इकडे. मी येणार होतो, अशोक. दर वर्षी वाटायचं. मग काहीतरी निघायचं. मग इतकी वर्षं झाली की तोंड कसं दाखवायचं ते कळेना.”

“आई कशी आहे, ते विचारणार नाही का?”

“कशी आहे?”

“तुम्हाला काय वाटतं?”

“मला तिला सामोरं जायची हिंमत नाही.”

“हिंमत कसली? साडेपाचची बस आहे, एवढंच.”

ते डोळे मिटून बसले. मला काय म्हणायचं होतं, ते मलाच कळलं नव्हतं.

“मंजू?”

“तिला कन्यादान तुमच्या हातानं हवं आहे. ती म्हणते तिला काही वाटत नाही, पण तिनं पत्रिकेवर तुमचं नाव छापायला लावलं.”

ते पुन्हा गप्प.

“मी संन्यासी आहे, अशोक. घरात पाय कसा ठेवू?”

“आधी चला. कन्यादान झालं की जा. आईला तुम्ही स्वतः सांगून जा.”

ते उठले. पुजाऱ्याला काहीतरी सांगितलं, वही त्याच्या हातात दिली आणि भगव्या पिशवीत दोन धोतरं भरली. पुजारी म्हणाला, “महाराज, उद्याचा हिशेब?” महाराज म्हणाले, “काल लिहिलाय, बघ.”

बसमध्ये ते खिडकीजवळ बसले. बाहेर बघत होते. कारंजा जवळ येताना त्यांनी विचारलं, “चौकातला तो जिलबीवाला आहे का अजून?”

“त्याचा मुलगा बसतो.”

ते हसले. समोरच्या सीटवर कोंबडीवाली बाई अजून होती. कोंबडी आता गप्प झाली होती.


संध्याकाळ झाली होती. आम्ही गल्लीत शिरलो. दारात तांब्या नव्हता. बाबा अनवाणी उभे होते.

“तू कडी वाजव.”

“तुम्ही वाजवा.”

त्यांनी हात उचलला, पण तो कडीपर्यंत गेला नाही. मी वाजवली.

“कोण?” आईचा आवाज.

“आई, दार उघड.”

आवाज थांबला. बराच वेळ गेला. आतून पोळपाट खाली ठेवल्याचा आवाज आला. दार उघडलं. आई उभी होती, पंचावन्न वर्षांची, चष्मा, केस पांढरे. बाबा दाढीत, भगव्यात. दोघं एकमेकांकडे बघत राहिले.

“आत या. पाय धुवा, बाहेर धूळ आहे.”

“सुमन...”

“आधी पाय धुवा.”

ती आत गेली, परत आली. “आज नेमका तांब्या ठेवायचा राहिला,” ती म्हणाली, जणू तिला त्याचं वाईट वाटत होतं. तिनं भांड्यातून पाणी आणलं आणि स्वतः वाकून बाबांचे पाय धुतले. बाबा “नको, नको” म्हणत होते.

“गप्प बसा.”

आतल्या खोलीत बाबा त्यांच्या जुन्या खुर्चीवर बसले. वैशालीनं चहा आणला. बाबांनी सावकाश फुंकर मारली.

“गरम आहे,” ते म्हणाले.

“प्या,” आई म्हणाली. “गार झाला की तुम्हाला आवडत नाही.”

आईनं माझ्याकडे बघितलं नाही. मी वैशालीला खुणावलं आणि आम्ही दोघं स्वयंपाकघरात गेलो.

“काय झालं?” वैशालीनं विचारलं.

“माहीत नाही.”

“जेवायला आणखी भात लावू का?”

“लाव.”

मंजू शाळेतून रात्री आली. दारात थांबली. आधी तिनं खाली बघितलं, बाबांचे पाय. मग वर.

“तुम्ही?”

“हो.”

“बाबा?”

“हो.”

“ठीक.”

ती आत गेली, पिशवी ठेवली, कपडे बदलले आणि जेवायला वाढायला सुरुवात केली. जेवताना कुणी काही बोललं नाही. मंजू एकदाच म्हणाली, “मीठ पुरेसं आहे का?”

“हो,” बाबा म्हणाले. त्यांचं तोंड भरलेलं होतं. मला वाटलं ते रडताहेत, पण ते फक्त जेवत होते.

रात्री आईनं बाबांची गादी बाहेरच्या खोलीत घातली. “तिथं झोपा. उशी तिथंच आहे.”

“ठीक आहे,” बाबा म्हणाले.

मी पाणी प्यायला उठलो तेव्हा आईच्या खोलीत दिवा चालू होता.

मंजू स्वयंपाकघरात होती. “मला काही वाटत नाहीये, दादा. वाटायला पाहिजे ना? पण नाही वाटत.”

“झोप आता.”

ती गेली. उद्या मंडपवाल्याला फोन करायचा होता, पावतीचा नंबर लिहून ठेवला होता.


वाचने 3
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया