वर्षं अशीच गेली. कोणत्या वर्षी काय झालं, ते आता मला क्रमानं सांगता येणार नाही. दहावी झालो, बारावी झालो. बाबा आहेत की नाही, याबद्दल घरात कुणी बोलत नव्हतं. कुणी विचारलं की आई म्हणायची, “बाहेरगावी असतात.” “गेले” हा शब्द तिच्या तोंडून मी कधी ऐकला नाही.
बारावीच्या सुट्टीत मामाच्या ओळखीनं मला एलआयसीची एजन्सी मिळाली. वानखडे साहेब, डेव्हलपमेंट ऑफिसर. पहिल्या दिवशी ते पान खात फोनवर कुणाशी तरी कांद्याच्या भावावरून भांडत होते. मला पाच मिनिटं उभं ठेवलं.
“पोरा, बोलता येतं का?”
“येतं.”
“येत नाही दिसतंय. शिकशील. उद्या ये, टाय लावू नको, उकडतं.”
मी टाय लावलाच नव्हता. असो.
पहिली पॉलिसी जोशी काकूंनी घेतली, पाच हजाराची. फॉर्म भरताना म्हणाल्या, “तुझ्या बाबांसारखं करू नकोस हां, नॉमिनी नीट लिही.” मी नॉमिनीचं नाव, पत्ता, सगळं नीट लिहिलं. पत्ता मात्र त्यांना आठवेना, मग शेजारच्या दुकानदाराला विचारून आलो.
सायकल मी भाड्यानं घ्यायचो, दिवसाला दोन रुपये. आईला हे सांगितलं नव्हतं. सांगितलं असतं तर तिनं सायकलला हात लावू दिला नसता, किंवा भाडं माझ्यासाठी काढून ठेवलं असतं, आणि दोन्हीपैकी मला काहीच नको होतं.
गवळीपुऱ्यातल्या सुरेखा ताईंचा नवरा ट्रकखाली गेला. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी माझ्याकडून पंचवीस हजारांची पॉलिसी घेतली होती. क्लेमचे पैसे मी स्वतः घेऊन गेलो. त्या दारातच रडायला लागल्या.
“भाऊ, तुम्ही देवासारखे आलात.”
“बसा ताई, पाणी घ्या.”
“चहा करते.”
“राहू द्या.”
“करते ना. बिस्कीट आहेत.”
त्यांनी चहा केला. साखर कमी होती. मी तो प्यायलो आणि सही घेतली. क्लेमच्या फाईलमध्ये मृत्यूचा दाखला लागतो, तो त्यांनी आणला होता. आमच्याकडे बाबांचा कुठला दाखला काढायचा, ते मला माहीत नव्हतं. मग मी तो विचार सोडला आणि सायकल मारत जोशी काकूंकडे गेलो, त्यांचा हप्ता बाकी होता.
पहिल्या महिन्याचं कमिशन सातशे चाळीस रुपये आलं. त्यातले पाचशे मी आईसमोर ठेवले. ती कांदा चिरत होती.
“हे काय?”
“कमिशन.”
“कुणाला लुटलंस?”
“कुणाला नाही. विमा.”
तिनं नोटांकडे बघितलं, हात लावला नाही. “तुझ्या फीसाठी ठेव.”
“आई, घे.”
“नाही.”
“आई...”
“अरे, तिकडे ठेव ते,” ती म्हणाली. “मी तुझ्याकडून पैसे घेतले ना, तर तू बाप होऊन बसशील घरचा. आणि मला तुला मुलगा म्हणून ठेवायचंय. समजलं?”
मला समजलं नाही. मी नोटा उचलून घेतल्या. दुसऱ्या दिवशी मंजूला नवीन वह्या आणल्या आणि घरात दोन किलो साखर. आई काही बोलली नाही.
शेतीचं वेगळंच होतं. बोरगावजवळ आमची चार एकर शेती होती, आजोबांपासूनची, बाबांच्या नावावर. बाबा असताना ती बटईनं दत्तू काकाकडे होती, बाबांचा चुलत भाऊ. दिवाळीच्या आधी एक पोतं ज्वारी आणि थोडे पैसे घरी यायचे. बाबा गेल्यावर दोन वर्षं आलं. तिसऱ्या वर्षी तो रिकाम्या हातानं आला.
“वैनी, पाऊस नाई आला. काई निघालं नाई.”
आई म्हणाली, “बरं.” चौथ्या वर्षीही तेच. पाचव्या वर्षी आईनं विचारलं नाही, आणि त्यानंही सांगितलं नाही. मग एक दिवस तो चहा पिऊन निवांत बसला.
“वैनी, आता सात वर्सं झाले. पोरगा माझा नववीत गेला, बघा. बसनं जायला लागतो, ते रोज दहा रुपये. तर कायद्यानं सात वर्सं झाले की माणूस... तुमी समजता ना. शेती इकडं कुणी बघत नाई. तुमी माझ्या नावावर करून द्या. मी तुमाला दर महिन्याला काई-बाई देत जाईन.”
आईनं कप खाली ठेवला.
“दत्तू भावजी, तुमचे भाऊ मेलेत का?”
“वैनी, तसं नाई...”
“मग शेती तुमच्या नावावर कशी?”
“तुमी रागावू नका. मी तुमच्याच भल्यासाठी...”
“भावजी,” ती म्हणाली. आवाज चढला नव्हता. “चहा संपला का? संपला असेल तर बस मिळेल तुम्हाला. साडेपाचची आहे.”
तो उठला. दारातून म्हणाला, “एकटीच्यानं काय होणार हाये?” आई काही बोलली नाही. दार लावलं आणि मला म्हणाली, “अशोक, रविवारी बोरगावला जायचं आहे. बस बघ.”
रविवारी मी शेत पहिल्यांदा नीट बघितलं. तुरीची झाडं वाळलेली, तण गुडघ्याएवढं. आई बांधावर उभी राहिली, साडी वर खोचून. बाजूच्या शेतातला म्हातारा आला.
“कोण?”
“वसंतरावांची बायको.”
“अरे! चार-पाच वर्षं झाली तुमचं कोणी इकडे फिरकलं नाई. वसंतराव कुठं?”
“बाहेरगावी.”
“आणि हे चार एकर आहे ना?” आई म्हणाली.
“तीन एकर तेवीस गुंठे,” तो म्हणाला. “काकानं एक बांध खाऊन टाकला. गाय बांधली का तुमची?”
“नाही.”
“मग ठीक. गाय बांधली की खायला लागते.”
आईनं हातात बांधावरची माती उचलली आणि सोडून दिली. मी विचारलं, “काय झालं?” ती म्हणाली, “काही नाही, बघत होते.”
सोमवारी आम्ही तहसील कचेरीत गेलो. आई तिथे पहिल्यांदाच आली होती. बाबांच्या जुन्या टेबलावर आता दुसरा कुणीतरी बसला होता. बाजूच्या टेबलवर देशमुख बाबू होते. ते बाबांसोबत काम करायचे, आता केस पांढरे झाले होते आणि चष्म्याची काच जाड झाली होती.
“वहिनी, तुम्ही? बसा.”
आईनं सातबारा मागितला. त्यानं दिला. मग हळूच म्हणाला, “वहिनी, दत्तूनं तलाठ्याकडे अर्ज दिलाय. बेपत्ता माणसाच्या नावावरची जमीन... सात वर्षं झाली की कोर्टात जाता येतं.”
आई त्याच्याकडे बघत राहिली.
“देशमुख, मला सांगा. सात वर्षं झाली म्हणून माझा नवरा मेला का?”
“वहिनी, कायदा...”
“तुम्ही कायदा मानायचा तर मानाल. मी नाही मानणार.”
मी बाजूला उभा होतो आणि माझे गुडघे थरथरत होते.
“अर्ज द्या,” आई म्हणाली. “आमचा. लिहायला माझा मुलगा आहे.”
मी तिथं बाकावर बसून अर्ज लिहिला. देशमुख बाबूनं वाचला आणि म्हणाला, “अशोक, तुझं अक्षर वसंतरावांसारखं यायला लागलंय.”
मी अर्ज द्यायला उठलो. हाताला घाम सुटला होता, अर्जावर डाग पडला. दुसरा लिहू का, असं विचारलं.
“चालतो,” ते म्हणाले.
परत येताना बसमध्ये आईनं माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. थोडा वेळ. मग उचललं. “खिडकी उघड, उकडतंय.” बसमध्ये एक माणूस कांदे घेऊन बसला होता, त्याचा वास येत होता.
त्या वर्षीची दिवाळी आली, पोतं आलं नाही, आम्ही तक्रारही केली नाही. आई स्वतः शेती करायला लागली. तिला शेतातलं काही येत नव्हतं.
“तुला येतं का काही? मग तू पण शिक, मीही शिकते,” असं ती म्हणाली. म्हाताऱ्या शेजाऱ्यानं तिला सोयाबीन शिकवलं. कधी पेरायचं, किती खोल. रोज सकाळी सहाची बस. मंजूचा डबा करून, पदराला गाठ मारून ती निघायची. रात्री शिलाई चालूच. मी म्हणायचो, “आई, शिलाई बंद कर.”
ती म्हणायची, “मशीनचे पैसे वेगळे, शेतीचे वेगळे. हिशोब माहीत आहे का तुला?”
माहीत होता. पैसे दोन्हीकडून पुरत नव्हते.
मी रविवारी जायचो, एलआयसीच्या कामातून वेळ मिळाला की. बांध घालायचा, मजुरांचा हिशोब लिहायचा. आईचे हात पहिल्या दोन महिन्यांत फुटले. तळव्यांना भेगा, टाचा सुजलेल्या. रात्री मी तिचे हात हातात घेऊन त्यांना खोबरेल तेल लावलं. ती गप्प बसली. मग म्हणाली, “तुझे बाबा सुट्टीच्या दिवशी शेतात यायचे. तिथं त्यांनी एक छोटं मंदिर बांधलं होतं. येऊन तिथंच बसायचे.”
“आई, तू एवढी खंबीर कशी आहेस?” मी विचारलं.
“खंबीर कुठली. पडायला वेळ नव्हता.” ती हसली. “चल, पायाला पण लाव थोडं. तेल संपवू नकोस.”
तेल संपलंच होतं. मी उठून दुसरी बाटली आणली.
पहिल्या सोयाबीनची गाडी कारंजा मंडीत आली. मंजू तेव्हा आठवीत होती, तिला सुट्टी होती, तीही आमच्या सोबत आली आणि गाडीवरच झोपली. व्यापारी म्हणाला, “ताई, काटा बरोबर आहे.”
आई काट्याजवळ गेली. तिनं स्वतः वजन बघितलं. “परत करा.”
“ताई, असं कधी होतं का?”
“आज होतंय.”
त्यानं परत केलं. वजन चौदा किलोनं वाढलं. मी तिच्या मागे उभा, तोंड उघडं. बाहेर पडल्यावर ती म्हणाली, “तुझ्या मामानं शिकवलं. व्याजाचा हिशोब पक्का ठेवायचा.” पहिल्यांदा आणि शेवटचं मला मामाचं कौतुक वाटलं.
त्या रात्री आईनं पैसे मोजले. सहा हजार तीनशे. तीनशे मजुरांना द्यायचे होते, बाकीचे तिनं कापडात बांधून पेटीत ठेवले.
“कशासाठी?” मी विचारलं.
“मंजूच्या लग्नासाठी.”
“ती आठवीत आहे, आई.”
“म्हणून आत्तापासून.”
याच दिवसांत माझं बी.कॉम. झालं, मामानं पैसे दिले, कर्ज म्हणून, आणि व्याजाचा हिशोब कधी विसरला नाही. त्या पैशांत मी बस स्टँडजवळ पाच बाय सहाचं दुकान घेतलं, श्री स्टेशनरी आणि झेरॉक्स. सकाळी दुकान, दुपारी एलआयसीच्या फेऱ्या. पहिल्या दिवशी आईनं दुकानात दिवा लावला.
“तुझे बाबा असते तर पाटी त्यांनी लिहिली असती,” ती म्हणाली.
पाटी मीच लिहिली. पाटी वाकडीच झाली. मामा म्हणाला, “पाटी वाकडी लागलीय.”
मी म्हटलं, “बघतो, सरळ करतो.”
पुढे दोन वर्षं ती तशीच वाकडी लटकत राहिली.
माझं लग्न झालं. वैशाली आमच्या घरात आली. पहिल्या सकाळी तिनं आईला विचारलं, “आई, हा तांब्या दाराशी कुणासाठी?”
“सवय आहे,” आई म्हणाली.
आई काही दिवस त्यात पाणी भरून ठेवायची, काही दिवस विसरायची. कुणासाठी, हे तिनं कधी सांगितलं नाही, आम्ही विचारलंही नाही. वैशालीनं एकदा तो भरला. आईनं तो रिकामा केला आणि स्वतः भरला.
मंजू बी.एड. झाली, शाळेत नोकरी लागली. पंचवीस वर्षांची. एक स्थळ आलं. प्रशांत, एका गावातला शिक्षक, घरचे साधे. बोलणी पक्की झाली. आणि मंजू एका रात्री म्हणाली, “दादा, कन्यादान बाबांनी केलं पाहिजे.”
“मी करतो.”
“तू दादा आहेस.”
“तुला कुणी सांगितलं बाबा पाहिजेत? मी आहे ना.”
“मला बाबा हवे आहेत असं नाही.” ती म्हणाली. तिचा आवाज वेगळा होता, थोडा चिडका. “लग्नात कुणीतरी म्हणेल, ‘ही त्यांची मुलगी.’ तेव्हा मला... मला फक्त एकदा बघायचंय. बघितल्यावर काय वाटतं, तेवढं बघायचंय.”
मी आईकडे बघितलं. ती कणीक मळत होती.
“कशाला शोधायचं आता?” ती म्हणाली. “मला ते नकोत.”
मंजू गप्प झाली. मी गप्प झालो. आईनं कणकेचा गोळा तसाच ठेवला आणि हात धुतले. जेवण त्या दिवशी उशिरा झालं.
तरी मी शोध सुरू केला. मामा, जोशी काकू, पंधरा-वीस लोक. पोलीस स्टेशनमध्ये जुनी फाईल निघाली, हवालदार बदलले होते, अक्षर तसंच वाईट. काही उपयोग झाला नाही. जोशी काकू मात्र दर दुसऱ्या दिवशी विचारायच्या, “मिळाले का?” आणि मिळाले नाहीत की अर्ध्या तासानं उठून जायच्या.
पत्रिका छापायला दिली तेव्हा वडिलांचं नाव मंजूनं छापायला लावलं.
“वसंतराव इंगळे यांची कन्या.”
छापखानेवाला म्हणाला, “हयात आहेत ना?”
“माहीत नाही.”
“मग?”
“छापा.”
“इंगळे... ळ आहे ना?
ळ चा खिळा संपलाय, थांबा, शोधतो,” तो म्हणाला.
त्यानं वीस मिनिटं शोधला. आम्ही बाहेर बसून चहा पिला.
मिसळपाव
प्रतिक्रिया