Skip to main content
लेखक चिगो यांनी शनिवार, 26/09/2026 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

अंग मोडेस्तोवर कष्ट करुन

त्याला मातीमोल होतांना बघतांना,

कर्जदारांच्या पाया पडून

त्यांच्यासमोर दातांच्या कण्या करतांना,

अन् चाकरीत आपलं स्वत्व गमावून

आत्मसन्मान कण कण मरतांना,

खांद्यावरच्या जबाबदारीच्या ओझ्यांनी त्याचा पाय थरथरतो..

पण बाप तरी कुठं काय करतो?
 

आईच्या त्यागावरच्या कथा कविता वाचतांना,

पोरांच्या नजरेतली आपली किंमत जोखतांना,

‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हेडफोनवर ऐकतांना

डोळ्यात आलेलं पाणी लपवत नजर चोरतांना,

आपल्याच भावनांच्या लाटांखाली

त्याचा जीव गुदमरतो..

पण बाप तरी कुठं काय करतो?

 

‘मामा-मावशी चांगले, अन् काका-आत्या वाईट’

ह्या जगरहाटीत आपली नाती तुटतांना,

नोकरी व्यवसाय पोटासाठी

आपली माती माणसं पाठी सुटतांना,

त्याच्या प्रत्येक काळजी-भितीपोटी

मतलबी दुनिया त्याला लुटतांना,

तो पिंजऱ्यात अडकल्या पाखरागत भिरभिरतो..

पण बाप तरी कुठं काय करतो?

 

ज्यांच्यासाठी आपली स्वप्नं जाळली

तीच लेकरं त्याची पापं मोजतांना,

त्यांच्या शहाण्या जिभा

त्याच्या सुरकुतल्या थकलेल्या मनाला टोचतांना,

अन् अजून जरी आई आवडीची असली

तरी उद्या तीही डोईजड होईल, हे अनुभवातून जोखतांना,

आपल्यामागं हिचं काय होईल

ह्या विचारानं त्याचा जीव घाबरतो..

पण बाप तरी कुठं काय करतो?


 

आणि शेवटी कधीतरी

आपल्या सुख-दुःखांचा हिशोब करतांना,

थबकून गेलेला तो, अन् पुढं गेलेला जमाना ह्यात

आपल्याच मनाचे वेग आपल्या दुबळ्या मुठीत धरतांना,

बरंच काही बाकी असतांनाही

लढण्याची-जगण्याची आस सरतांना,

त्याच्या डोळ्यात एक शेवटचा अश्रू उरतो,

अन् मेलेलं मन वाहणारा, त्याचा थकलेला देह मरतो.

 

पण खरंच, बाप कुठं काय करतो?


 

  • चिन्मय
काव्यरस

वाचने 22
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया