गोष्ट थोडी पर्सनल आहे.. पण तुम्ही आपलीच लोकं आहात... म्हणून सांगतो. फक्त ह्यावरून माझ्याविषयी काही ग्रह करून घेऊ नका. नाही करणार तुम्ही - कारण तुमच्यापैकी अनेकांची पण हीच कथा असणार आहे.
क्रिकेट म्हणजे शेंबुड पुसता न येण्याच्या वयापासून खेळत असतो आपण - म्हणून ते आवडत असतंच. पण ९० च्या दशकात मोठ्या झालेल्यांना टेनिस आवडण्यामागच्या कारणांना चक्क नावं होती. गॅब्रिएला सबातिनी, ॲना कूर्निकोव्हा, बोरिस बेकर, जेनिफर कॅप्रिआती, किम क्लायस्टर्स, याना नोवोत्ना, स्टीफन एडबर्ग, कोंचिता मार्टिनेझ, आन्द्रे अगासी, ईवा मायोली, मार्टिना हिंगिस आणि अर्थातच द वन ॲन्ड द ओन्ली - स्टेफी ग्राफ ही ती नावं! लेख वाचायचा सोडून लगेच ही नावं गूगल करायला जाऊ नका. १९९० च्या दशकात महिला टेनिस आपल्या शिखरावर होतं. मार्टिना नवरातिलोवाच्या व्हॉलीज आणि क्रिस एव्हर्टच्याा प्रेक्षणीय बेसलाइन खेळाचा जमाना संपल्यात जमा होता. टेनिस सम्राज्ञी स्टेफी ग्राफने (भाभी है वो तेरी) जिंकणं हा निसर्गनियम होता. १९८८ मध्येतर टेनिसच्या ह्या राणीने चार ग्रॅंड स्लॅम्स आणि शिवाय सोल ऑलिम्पिक्स जिंकून इतिहासातली एकमेव 'गोल्डन स्लॅम' पूर्ण केली होती. आपल्या ताकदवान फोरहॅंडच्या, मूर्तिमंत नजाकत असलेल्या सिंगल हॅंडेड बॅकहॅंडच्या आणि वेगवान हालचालींच्या जोरावर स्टेफी टेनिस कोर्ट आणि टेनिसप्रेमींच्या हृदयाचीसुद्धा सम्राज्ञी होती. महिला टेनिस हे सर्वार्थाने 'सुंदर' होतं.
पण तेव्हाच न्यूयॉर्कमध्ये १५ वर्षांच्या एका किडकिडीत मुलीने कारकीर्दीच्या अस्ताचलावर असलेल्या क्रिस एव्हर्टला हरवून व्हर्जिनिया स्लिम्स स्पर्धा जिंकली. लोकांच्या भुवया उंचावल्या ते तिच्या खेळाच्या विचित्र पद्धतीमुळे. पोरगी दोन्ही हातांनी खेळायची. बेसलाइनच्या आत येऊन बॉल टप्प्यावरच मारायची. ग्रिपच चुकीची होती! पण काय करणार? तेव्हाच्या युगोस्लाव्हियातल्या नोवी सादमध्ये तिच्या बापाने - कारोयने - दिलेल्या जड लाकडी रॅकेटने भिंतीवर काढलेल्या जेरी माउसवर बॉल मारताना तिला दोन्ही हातांनीच रॅकेट पकडावी लागायची. पण मग तिचा आवाका (reach) खूपच कमी होणार. शिवाय दिसायला सुद्धा किती विचित्र, किती बेडौल दिसतं ते. कसं होणार हिचं? अश्या कमकुवत तंत्राच्या जोरावर किती काळ टिकणार ही?
पण तेव्हा लोकांना जाणीव नव्हती की ती मुलगी खऱ्या अर्थाने टेनिसचा 'विवादी सूर' ठरणार आहे. मोठी झाल्यावर, ताकद वाढल्यावर तिच्या वेगवान हालचाली तिच्या आवाक्याचा प्रश्न सोडवणार आहेत. ह्या 'डबल हॅंडेड' फटक्यांमध्ये तोफगोळ्यांची संहारक शक्ती येणार आहे. अंगाजवळून खेळायची तिची सवय तिच्या फटक्यांना इतरांपेक्षा कितीतरी जास्त ॲंगल देणार आहे. ही मुलगी टेनिस बदलणार आहे. 'मोनिका सेलेस' हे नाव टेनिस इतिहासात अजरामर होणार आहे.

१९९० च्या फ्रेंच ओपन अंतिम सामन्यात टेनिसच्या राणीसमोर होती ती द्वितीय मानांकित सेलेस! त्या मोसमात स्टेफी सलग तब्बल ६६ सामने जिंकलीे होती. पण दोन्ही हातांची वज्रमूठ करून फोरहॅंड आणि बॅकहॅंड अश्या दोन्ही बाजूंनी बॉलवर चवताळून तुटून पडणारी खेळाडू टेनिसविश्व पहिल्यांदाच बघत होतं. पहिल्या सेटच्या टाय ब्रेकरमध्ये चार सेट पॉइंट्स वाचवत तिने स्टेफीला ७-६, ६-४ अशी (रोलॅं गॅरोसवरची शब्दश:) धूळ चारली. तिने स्टेफीच्या एकछत्री अंमलाला केवळ आव्हानच दिलं नव्हतं... तर सुरुंग लावला होता. त्या अनपेक्षित, आक्रमक भडिमाराने कधी नव्हे ती 'धडकी भरलेली' स्टेफी स्पष्टपणे दिसली होती.
त्यानंतरच्या तीन वर्षांत मोनिका सेलेसने स्टेफीचं वर्चस्व उध्वस्त केलं. पुढची तीन वर्षं सेलेसने खेळलेल्या आठपैकी सात ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. ३४ पैकी ३३ स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि त्यातल्या २२ जिंकल्या देखील. तिचं तंत्र कुठल्याही कोचिंग मॅन्युअलमधलं नव्हतं. ती बेसलाइनच्या मागे थांबून चेंडूचा टप्पा खाली येण्याची वाटच बघत नव्हती. सरळ आत घुसून चेंडू वर येत असतानाच (half volley) त्याला जन्माचं वैर काढल्यागत झोडपून काढायची. शॉर्ट - ॲंगल क्रॉसकोर्ट हा प्रकार तिने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. शरीराजवळून खेळलेल्या तिच्या फटक्यांत प्रचंड ताकद होती. ती बेसलाइनच्या पुढे येऊन खेळत असल्याने समोरचीला वेळच मिळायचा नाही.
बरं - तिच्या खेळाचं केवळ तंत्र विध्वंसक नव्हतं - त्या जोडीला होता प्रत्येक घणाघाती फटक्याबरोबर कोर्टवर घुमणारा तिचा आक्रमक आवाज Grunt. स्टेफीप्रेमी पारंपरिक टेनिसच्या रसिकांच्या कानांना तो आवाज बेसूर वाटला - आणि त्यावेळच्या महिला खेळाडूंना भीतीदायक. त्यासाठी सेलेसवर खूप टीका झाली, तक्रारी झाल्या, तिला डिवचण्याचे देखील प्रयत्न झाले. पण सेलेससाठी तो आवाज म्हणजे तिच्या ऊर्जेचं, खेळात स्वत:ला झोकून देण्याच्या पद्धतीचं प्रकटीकरण होतं. त्या टीकेला ती आपल्या रॅकेटने उत्तर देत राहिली. विसाव्या वाढदिवसाच्या आधी तब्बल ८ ग्रॅंड्स्लॅम विजेतेपदांवर नाव कोरणारी सेलेस सार्वकालीन सर्वश्रेष्ठत्वाच्या वाटेवर होती.
पण ३० एप्रिल १९९३ ला हॅंबर्गच्या सिटिझन्स कपच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅग्डेलीना मलीवाशी खेळताना - प्रेक्षकांतल्या गुंतेर पार्च ह्या माथेफिरूने स्टेफीच्या प्रेमापोटी तेव्हाच्या world number one मोनिका सेलेसवर ९ इंची बोन नाइफने हल्ला केला. मोनिकाला पुढची दोन वर्षं टेनिस कोर्टपासून दूर राहावं लागलं. WTA नी तिच्या पुनरागमनापर्यंत तिचं प्रथम स्थान अबाधित ठेवण्याचा प्रस्ताव १७ विरुद्ध ० मतांनी धुडकावून लावला. एकट्या गॅब्रिएला सबातीनीने सेलेसच्या समर्थनार्थ मतदानात भाग घेतला नाही. व्यावसायिक टेनिसचं जग एका चॅम्पियनसाठी थोडंच थांबणार होतं?
शरीरावरच्या आणि मनावरच्या जखमा भरून काढत १९९५ मध्ये सेलेसने पुन्हा कोर्टवर पाऊल ठेवलं आणि १९९६ ची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून आपली जिद्द आणि विजिगीषु वृत्तीदेखील सिद्ध केली. पण त्या हल्ल्याने तिची सर्वोत्तम वर्ष हिरावून घेतली होती - तिच्यापासूनच नाही तर समस्त टेनिस जगतापासून.
आताचं महिला टेनिसदेखील वेगवान, ताकदवान झालंय. त्याची सुरुवात कुठेतरी मोनिका सेलेसने केली होती. सेरेना, व्हीनस विल्यम्स, शारापोवापासून ते आताच्या सबालेंका आणि रायबकीनाचा जो आक्रमक, बेसलाइन - ताकदीचा पॉवर गेम आपण पाहतो, त्याचं मूळ कुठेतरी सेलेसच्या बंडखोर शैलीत आहे. महिला टेनिसला केवळ सुंदर, नजाकतदार खेळातून बाहेर काढून, त्यात वेगवान, जवळपास निर्दयी, आक्रमक मानसिकतेची मुहूर्तमेढ सेलेसने रोवली होती.
एका मूर्ख, व्यक्तिपूजेत आंधळ्या झालेल्या गुंडप्रवृत्तीच्या इसमाने टेनिसकडून एक सर्वश्रेष्ठ विजेता हिरावून घेतला. पण त्याआधीच मोनिका सेलेस नावाच्या 'विवादी सूराने' क्रीडारसिक कानसेनांची टेनिस ऐकण्याची पद्धत कायमसाठी बदलली होती.
© जे.पी.मॉर्गन
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला. केवळ स्टेफि ग्राफ…
लेख आवडला. केवळ स्टेफि ग्राफ चा खेळ (का तिला पाहण्यासाठी) सहकुटुंब टेनिस ची मॅच पाहिली जात असे त्या दिवसात.
मोनिका सेलेस जेव्हा आली तेव्हा अजिबात आवडत नव्हती उलट लाडक्या स्टेफिला हमखास हरवायची म्हणुन रागच यायचा तिचा.पण तिच्यावर तो हल्ला झाल्यानंतर तिच्या बद्दल सहानुभुती वाटु लागली व स्टेफि बद्दल वाटत असलेला जिव्हाळा त्यानंतर कमी झाला.
मोनिका आणि स्टेफी दोघांना मी…
मोनिका आणि स्टेफी दोघांना मी TV वर त्यांच्या उतरतीच्या काळांत पहिले. विलियम्स भगिनींना जास्त पहिले. का ठाऊक नाही पण दूरदर्शनवर त्या काळी टेनिस खूप दाखवले जायचे. पुरुषांत पिट सम्प्रास हा वर्चस्व राखून होता पण आंद्रे आगासी चा खेळ जास्त कलात्मक वाटायचा. विलियम्स भगिनी महाप्रचंड वाटायच्या. त्यांच्यांतन्तर नाजूक वाटणाऱ्या मुली जाऊन अतिशय बलदंड प्रकारच्या महिलांनी कोर्ट गाजवले. पुरुषांत फेडरर म्हणजे विदेशी अरबाज खान, नाडाल, जोकोविच ह्यांची स्पर्धा इतकी लोकप्रिय झाली कि कदाचित महिलांचे टेनिस जास्त मागे पडले असावे.