Skip to main content

एक जीवघेणं लावण्य!

लेखक अनिशासूत यांनी मंगळवार, 07/07/2026 18:10 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्य उगवला, सकाळ उमलून आली. जाग आली तर माझ्या हातावर डोकं ठेवून निजलेली तू. अस्ताव्यस्त केस, मोठं कपाळ, लांब नाक, गोऱ्यापेक्षा जरा कमी आणि सावळ्यापेक्षा जरा उजळ रंग. तुझे ते गडद गुलाबी ओठ, नाजूक हनुवटी आणि कचकन चावा घ्यावासा वाटणारे तुझे ते गोड कान. आखीव भुवयांच्या खाली बंद पापण्याआडचे तुझे पाणीदार डोळे.

तुझ्या त्या सुबक मानेखाली, सुघड आणि मार्दव असलेला कोवळा देह. गळ्यापाशी रुळणारी केसांची एक बट आणि खांद्यांची ती नाजूक वळणं. तुझ्या श्वासांच्या लयीत मंद हालणारं तुझं ते शरीर, खोलगट बेंबी आणि कमरेवरचा तो पायजमा. तुझे ते नितळ पाय, गोलाकार पोटऱ्या आणि पसरट पाय... निजलेलं एक जीवघेणं लावण्य!

माझा हात तुझ्या कंबरेवर विसावलेला... जणू काही संपूर्ण जगापासून तुला जपण्यासाठी घातलेला एक मायेचा वेढा. मला जाणवत राहतात तुझे निवांत, शांत श्वास. तुझ्या श्वासात मिसळणारे माझे श्वास, माझ्या पायांवर आपसूक आलेला तुझा पाय. वातावरणातला गारवा आणि अशात तू ही अशी माझ्या मिठीत उबदार. कितीही धीरोदात्त आणि संयमी माणसाचा बांध सुटावा अशी वेळ ही.

पण तरीही सावरतो मी स्वतःला. सुटू देत नाही तोल, तुटू देत नाही तुझी ही शांत झोप. तुला तू झोपेत असताना न्याहळत बसण्याचा एक वेगळाच छंद आहे मला. मला तुझ्यात सर्वात जास्त आवडतं ते तुझं निरागसपण, त्यातही तू झोपेत एखाद्या लहान लेकरासारखी निष्पाप वाटतेस.

कालपरत्वे बदलेल सगळं... तू, मी, आपल्या देहाची ही वळणं. तुझं हे सळसळतं तारुण्य ओसरेल, पण तुझा निरागसपणा अबाधित राहो, कारण तो फार दुर्मिळ आहे.

अशातच तुला जाग येते. मला बघताना तू मला बघतेस तुझ्या त्या किलकिल्या डोळ्यांनी. माझ्या हातावरून डोकं हटवून तू हळूच माझ्या छातीत शिरतेस, मला घट्ट बिलगतेस, एक छोटासा मुका घेतेस आणि पुन्हा निजतेस. मी तुला कंबरेवरच्या हाताने अधिक जवळ ओढत, तुझ्या निरागसतेच्या कविता मनातल्या मनात गिरवत राहतो...

अनिशासूत (अक्षय)...

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 167
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया