कोल्हापूर आगारातून रात्रीची शेवटची एसी बस सुटली.
नेहेमीप्रमाणे बस एकदम full होती.
सीट क्रमांक एक व
दोनवर मुंडासे बांधलेले एक आजोबा आणि आजी बसलेले होते. बस सुटल्यापासून आजीबाईंची सारखी बारीक आवाजात
चिरचिर चालली होती. आजोबा मात्र काहीच बोलत नव्हते. मुलाने एसी बस मध्ये बसवून दिलेले आजीला फारसे आवडलेले नव्हते.
त्यांच्याच मागे एकदम सूट बुटातील एक माणूस बसला होता.त्याच्या
टॅबलेटला हेडफोन लावून आरामात मूवी पहात होता.
बस सुटल्या सुटल्या कंडक्टरने तिकिटे विकायला सुरुवात केली. मागून तिकिटे विकता विकता अर्धी तिकिटे विकून झाली. बस एव्हाना हायवेवर आली होती. लोक डुलक्या द्यायला लागले होते. अचानक मागच्या बाजूने भांडणाचे आवाज यायला लागले.
" अहो तिकिटाचे पैसे नाहीत तर बसलात कशाला बसमध्ये? खालीपीली माझा टाइम खराब केला "
बसचा कंडक्टर एका वृद्ध बाईवर ओरडत होता.
"अहो अहो पैसे आहेत. पण मुलाने साध्या बस भाड्याचे पैसे दिलेत. 50 रुपयेच कमी आहेत हो. आत्ता रात्री कुठे उतरणार मी? पुण्याला पोचले की देते लगेच.
माझा नातू न्यायला येणार आहे. तो देईल होssss ती वृद्ध बाई कळवळून विनवीत होती.
"नाही नाही, अहो असे चालत नाही, वाटेत चेकर ने बस चेक केली तर नोकरीं जाईल माझी. तुम्हाला मी स्टॅन्डला सोडतो. मागच्या साध्या बसनी या तुम्ही - कंडक्टर चिडून....
Oh god, These old people! किती sound pollution करतायत. आम्हाला ऑफिस आहे उद्या, झोपू की नको आम्ही?पुढच्या सीटवरून सूट बूट महाराज ओरडले.
हो ना, परवडत नव्हते तर यायचे कशाला एसी बस मध्ये? अजून एक प्रवासी.
सरकारने ह्यांना लाडाऊन ठेवले आहे. आधी सवलती द्यायच्या आणि मग बंद करायच्या.
एसी ला चटावलेत हे लोक. अजून एक माणूस....
मी तुम्हाला कराड बस स्टॅन्ड ला उतरवणार आहे. तिथून तुम्हाला साधी बस मिळेल.... तोपर्यंत बसा इकडेच. इति कंडक्टर..
ती वृद्ध बाई अगदी रडवेली झाली. "अहो दादा मी पहिल्यांदीच नातवाकडे पुण्याला जाते आहे. बस डायरेक पुण्यात जाणार म्हणून मुलाने बसवून दिले. एसी चे सवलतीचे असते ना तिकीट? पण त्याला अंदाज नसेल आला हो. हात जोडते.....मला मध्येच उतरवू नका".
"ओ ssss आजी,
ते काय मला सांगू नका. मी काय तुम्हाला रस्त्यावर नाही, कराड स्टॅन्ड वर सोडतोय नीट. बस मिळेल तुम्हाला तिकडून लगेच. पण साधी मिळेल. माझ डोकं खाऊ नका.
आत्ता हायवेला चेकर असेल. मला बाकीची तिकिटे काढुद्या आणि हे घ्या कराड चे एसी तिकीट, पैसे द्या त्याचे.
आजी कडे काही पर्याय राहिला नाही. आजीने एसी चे पैसे देऊन कराड चे तिकीट घेतले. कंडक्टर दादा सुद्धा बाकीची तिकिटे विकत पहिल्या सीट पर्यंत आला.
आपल्या मुंडासे वाल्या आजोबांनी सदर्याच्या खिशात हात घातला.
"मास्तर, दोन कोल्हापूर पुणे आणि एक कराड पुणे द्या!! "
ओ आजोबा, कशाला त्यांचे तिकीट काढताय, काय नका काढू. अहो असे लोक रोज बघतो आम्ही. एसीत बसायला पाहिजे म्हणून नाटकं करतात. - कंडक्टर अख्या बसला ऐकू जाईल असे म्हणाला.
वृद्ध आजोबा हसले. म्हणाले,
"भाऊ, काही दिवसापूर्वी पुण्याहून कोल्हापूरला येताना माझे पण पाकीट हरवले होते. तेव्हा तुझ्याच सारखा एक पोरगा मला बसमधून उतरवायला निघाला होता. तेव्हा एका भल्या माणसाने माझे आणि हिचे तिकीट काढले. कोल्हापूरला उतरल्यावर माझ्या मुलाकडून मी त्याला पैसे दिले, तर तो काय म्हणाला माहित आहे.
" ओ आजोबा, मी पण एकदा अश्याच परिस्थिती होतो. तेव्हा एकाने मला अशीच मदत केली. आणि म्हणाला,
" माझे पैसे देऊ नका. तुम्हाला जर कोणी असे अडचणीत दिसलें तर त्यांना मदत करा. माणुसकीची चेन अशीच चालू राहिली पाहिजे काय? "
तीच चेन मी पुढे चालवतो आहे बेटा. असे म्हणून आजोबांनी तिन्ही तिकिटे घेतली आणि अख्या बस ला ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणले,
" मी माणुसकीची चेन चालवतो आहे.
कोणाकोणाला सहभागी व्हायचे आहे त्यात?? "
आजोबांचे खणखणीत बोलणे कान देऊन ऐकणाऱ्या सगळ्या प्रवाशांनी एकदम हात वर केला.
आणि
माणुसकीची चेन पुढे चालू राहिली.........
साहित्ययात्री (प्रणवजोशी)
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कथा. आवडली.
छान कथा. आवडली.
धन्यवाद भाऊ 👍
In reply to छान कथा. आवडली. by कानडाऊ योगेशु
धन्यवाद भाऊ 👍
Salaman Khan - "Aap thank…
Salaman Khan -
"Aap thank you mat kahiye... uske badle mein teen logon ki madad kijiye... aur un teeno se kehna ki woh teen aur ki madad karein... duniya badal jayegi."
कथा आवडलीच पण ज्याला…
कथा आवडलीच पण ज्याला माणुसकीचा अनुभव येतो तो माणुसकीची चेन चालू ठेवतो, ज्याला कटू अनुभव येतो तो कटूतेची चेन पुढे चालू ठेवतो. अर्थात अपवाद असतातच.
माणुसकीची चेन
कथा सुंदर आहे. संवाद देखिल छानच जमले आहेत.पुलेशु.