✪ कुंभकोणमची मंदिरं आणि कावेरी नदी!
✪ शांत गावं आणि रमणीय रस्ते
✪ निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत भेट
✪ “अगर शिवाजी महाराज नही होते तो...”
✪ “कमकुवत युवा पिढी" हासुद्धा देशाचा शत्रू
✪ श्रीमुशनामचं वेलुनाव्हियार केंद्र – वेगळी संस्था
✪ “रगड़ा बनाएगा तगड़ा"
नमस्कार. २९ जानेवारी! ह्या सायकल प्रवासात इतक्या वेगवेगळ्या भेटी होत आहेत! आजसुद्धा एक वेगळी भेट होणार आहे. सेवा भारती दक्षिण तमिळनाडूच्या डॉ. सिद्धार्थजींनी श्रीमुशनाममध्ये अशा ठिकाणी मला जोडून दिलं. तंजावूरनंतर पुद्दुचेरीच्या आधी सोलाथरम असा एक टप्पा होता. पण तिथे गाव किंवा कोणी संस्था मिळत नव्हती. तेव्हा सिद्धार्थजींनी सोलाथरमपासून ७ किलोमीटरवर हे ठिकाण सुचवलं. त्यामुळे निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत खूप छान भेट झाली. त्यांची संस्था व त्यांचं काम बघता आलं.
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) .
.
.
.
.
.
.
बृहदीश्वरा! रामकृष्ण मठातून बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्यावर येतानाही बृहदीश्वरा मंदिर दिसतंच आहे! सकाळी सात वाजता विशेष गर्दी नाहीय. किती वेगळं हे नगर आहे! हळु हळु बाहेर पडून महामार्गाला आलो. आजचा टप्पा थोडा मोठा म्हणजे ९४ किमी आहे. आणि उद्या व परवाही मोठे टप्पेच आहेत. वाटेमध्ये कुंभकोणम लागणार आहे! इथलं मंदिरसुद्धा जगप्रसिद्ध आहे. किंबहुना इथे अनेक मंदिरं आहेत. त्यातली रस्त्यावर असलेली तरी मी बघणार आहे. अनेक दिवस मध्यम रस्त्यांवर सायकल चालवल्यानंतर आता टू बाय टू महामार्गाचा आनंद घेतोय! पूर्ण मोकळा रस्ता! आजूबाजूला हिरवीगार शेतं! उलटा वारा आहेच! आणि त्यामुळे परवाचा पुद्दुचेरी- चेन्नै १४६ किमीच्या टप्प्याची थोडी काळजीही वाटते आहे. पण तो विचार बाजूला ठेवला आणि मोकळ्या महामार्गाचा आनंद घेत सायकल पळवली!
२५ किलोमीटर झाल्यावर कुंभकोणमच्या थोडं अलीकडे नाश्त्यासाठी थांबलो. इडली सांबारचा नाश्ता केला. हॉटेलवाल्यांसोबत थोड्या गप्पाही झाल्या. कुंभकोणमच्या नंतरचा रस्ता नकाशात बघून घेतला. राईड परत सुरू केल्यावर लगेचच कुंभकोणम आलं. इथे अनेक मंदिरं आहेत. माझ्या रस्त्यावर त्यातलं कुंभेश्वरा आहे! सायकल बाजूला लावली आणि आत गेलो. बृहदीश्वरासारखंच सुंदर आणि भव्य! विलक्षण! ह्या सगळ्या दक्षिण भारतीय मंदिरांना अनेक प्रकारे वेगळा अर्थ आहे. स्थापत्य, शिल्पकला, रचनेमागची दृष्टी, त्यातल्या चित्रांमधल्या कहाण्या, समरूपता असलेली मांडणी अशा अनेक प्रकारे त्यांच्यात खूप अर्थ दडलेला आहे. ही सगळीच मंदिरं आज "मानव निर्मित आश्चर्य" प्रकारात येतात. तंजावुर आणि कुंभकोणममध्येही देश- विदेशातले दर्दी पर्यटक फिरताना दिसत आहेत.
कुंभकोणममध्ये अजून छोटी मंदिरंही रस्त्यावर लागली. कुंभकोणमचं भाजी मार्केट आणि बस स्टँड ओलांडलं. कावेरी नदी लागली! बंगलोरनंतर दुसर्या दिवशी कर्नाटकात ओलांडलेली कावेरी इथे परत भेटली! वा! वस्ती कमी होत गेली आणि हळु हळु एकदम शांत परिसर सुरू झाला. श्रीमुशनाम प्रसिद्ध स्थळ असलं तरी हा रस्ता खूप आतून जातोय. वाटेत शहर असं नाहीच आहे. त्यामुळे अगदी ग्रामीण तमिळ नाडू बघायला मिळतोय. रस्ते अंतर्गत आणि छोटे असले तरी एकही खड्डा नाही! नकाशात बघताना कोणताही रस्ता घेतला तरी तो चांगलाच असेल, इतकी इथल्या रस्त्यांची खात्री देता येते!
समुद्राची आठवण येत असतानाच कोल्लिदम नदीवरचा प्रचंड मोठा पूल लागला! अफाट पसरलेलं पाणी! सुंदर दृश्य. पुढेही रस्त्यावरची रमणीय दृश्य सुरूच राहिली. किती वेगवेगळ्या रस्त्यांवरून जायला मिळतंय! मध्ये मध्ये काही अंतर तर चहाची हॉटेलसुद्धा नाही आहेत. साधारण ६० किलोमीटरला परत नाश्ता करायचा होता. पण काही मिळालं नाही. तेव्हा चिक्की आणि सोबत ठेवलेले बिस्कीट खाल्ले. पाणी भरून घेण्यासाठीसुद्धा हॉटेल हवं. प्रवासात मी कुठेच बिस्लरी पाणी पीत नाहीय. हॉटेलमधलंच भरून घेतोय. पुढे एक चौक आला आणि दुसरा महामार्ग क्रॉस झाला. तेव्हा चहा- बिस्कीट घेतलं. पाणी भरून घेतलं. आता चांगलं गरम होतंय. मोबाईलमध्ये नकाशा तपासला आणि पुढे जात राहिलो.
छोट्या छोट्या गावांमध्येही मोठी चर्च आणि चर्चच्या शाळा दिसत आहेत. श्रीमुशनामच्या थोडं आधी मुख्य रस्त्यापासून परत आत वळालो. इथली वळणं जेव्हा फार अवघड वाटली, तेव्हा सरळ मोबाईल समोर लावून गूगल मॅप लावला. मला कॅप्टन आनंदनजींनी खाणा- खुणा सांगितल्या होत्या. त्यानुसार मॅपच्या मदतीने त्यांच्या केंद्रावर पोहचलो! दुपारचा अडीच वाजला आहे. आजचे ९४ किमी पूर्ण झाले. केंद्रावर कॅप्टन आनंदजी व इतर कोणीच नाही आहेत. पण त्यांनी माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवून मला पूर्ण ब्रिफिंग दिलं होतं. की अशा रंगाचं दार असेल, अशी दुर्गा मूर्ती असेल, असा जिना वर जाईल, इकडे ट्रेनिंग सेंटर असेल, तिथून आत गेलं की तुझी रूम! कुलुप लावलेलं नव्हतंच. मी त्यांच्या मिलिटरी पद्धतीच्या अचूक सूचनांनुसार गेलो आणि रूममध्ये पोहचलो. ताईंनी माझ्यासाठी अगदी जेवणही एका ठिकाणी ठेवलं होतं! त्यामुळे आराम केला, जेवून घेतलं. अगदी दाट झाडीच्या मध्ये हे गाव आणि हा परिसर आहे! इथे त्यांचं वेलुनाव्हियार केंद्र चालतं.
दुपारी आनंदजींच्या पत्नी आणि मुलं- मुली आले. संध्याकाळी ५:३० ला मुलांचा एक योग वर्ग आहे. आनंदजींना यायला उशीर होतोय. त्यामुळे ते येण्याआधीच मला त्यांनी वर्गात जायला सांगितलं. गावातली लहान मुलं! उत्साही आणि निरागस चेहरे. इथे भाषेची थोडी अडचण आहे. त्यांना शिकवणार्या एका ताईंना थोडं इंग्लिश येतं. आणि आनंदजींची मुलगी भारतीसुद्धा इंग्लिश बोलते. दोघींच्या मदतीने मुलांशी संवाद साधला. त्यांची ओळख करून घेतली. फिटनेस, खेळ व योगाबद्दल बोललो. माझे सायकल प्रवासातले अनुभव सांगितले. दहा मुलं इथे सायकलवर आलेली दिसली! अनेक जण खेळात पारंगत आहेत! दोन मुलींनी तमिळ लहेजाचं सुंदर वंदे मातरम गायलं. छान कार्यक्रम झाला.
निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत संवाद
आनंदनजी आल्यावर त्यांच्याशी खूप सविस्तर गप्पा झाल्या! त्यांनी २४ वर्षं सेनेमध्ये सेवा दिली. त्यातली ५ वर्षं ते चेन्नैच्या ओ.टी.ए. मध्ये प्रशिक्षक होते. कोरोना काळामध्ये त्यांनी गावातल्या मुलांचं रिकामंबसणं बघितलं. त्यानंतर त्यांनी देशसेवेची ही सेकंड इनिंग सुरू केली. सैनिकाचं पूर्ण आयुष्य देशासाठी- मग तो निवृत्त झालेला असला तरीही, हा त्यांचा विचार. युवक आणि गावासाठी हे वेलुनाव्हियार महिला सक्षमीकरण केंद्र सुरू केलं व त्या अंतर्गत मुलांना उत्तम प्रशिक्षण, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खडतर तयारी, योग, व्यावसायिक शिक्षण, युवांना करिअर मार्गदर्शन असं खूप वेगवेगळं काम केलं जातं. मुख्य म्हणजे मुलांना व युवांना देशभक्ती, ग्राम विकास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाच्या दिशेने पुढे नेलं जातं. आनंदनजींची विजन आहे की, सीमेवर असलेला शत्रू एक गोष्ट आहे. पण देशाचे तरुण कमकुवत असणं- भरकटलेले असणं- गावं विकासाच्या मार्गावर नसणं हे छुपे शत्रू मोठे आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. सेनेतले त्यांचे मित्र आणि इतर सोबती ह्या कामात त्यांना मदत करतात. त्यांच्या सेनेतल्या सेवेद्वारे ते कुटुंबाचा प्रपंच बघतात आणि ह्या सामाजिक प्रपंचासाठी त्यांनी नव्याने नोकरी सुरू केली आहे. वय ५० हून अधिक असलं तरी अतिशय तरूण व्यक्तिमत्व! त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. मुलांना असं रगडून काढतो की, ते छान तयार होतात, त्यांनी सांगितलं. त्यांना मी अजिबातच आराम देत नाही म्हणाले. सुरूवातीला मुलं पळून जायची. पण नंतर त्यांनाही गोडी लागली. हे सगळं ऐकताना अर्थातच प्रहार चित्रपटातला नाना पाटेकर आठवत होता! "रगड़ा बनाएगा तगड़ा!”
आनंदनजींचे प्रयत्न खूप मोठे आहेत. मुलांना संगणक व तंत्रज्ञान शिकवण्यासाठी प्रयोगशाळा आहे. वाचनालय आहे. गावासाठी प्रयत्न आहेत. इतकंच काय, मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या मुलांसाठी व व्यक्तींसाठी काम करणार्या संस्थेसाठी जागा द्यायची त्यांची तयारी आहे. त्यांना परिसरातील जास्तीत जास्त गावांमध्ये हे काम करायचं आहे. त्यांच्या ह्या सामाजिक कामाच्या संदर्भात माझ्या अनेक संस्था बघण्याच्या अनुभवाच्या आधारे त्यांच्याशी चर्चा केली! माझ्या रूपाने बरोबर त्यांना काही गोष्टी सांगू शकणारा माणूस भेटला! असाही योग असतो! जीवनात असेही योग येत असतात. माझं त्यांना कौतुक वाटतंय. आणि त्यांच्या मुलांना मी काही सांगू शकलो, माझ्या उदाहरणातून सांगू शकलो, ह्याचाही खूप "आनंद" होतोय! .
.
.
.
.
नंतरही खूप बोलणं झालं. त्यांचं हिंदी छान असल्यामुळे संवादात काहीच अडचण नाही! त्यांनी त्यांचे काही अनुभवसुद्धा सांगितले. त्यांच्या रूपाने सैनिकाचं एक खूप वेगळं रूप बघायला मिळालं. समाजापासून अलिप्त न राहता स्वत:च्या गावाला आणि समाजाला सतत पुढे नेण्याचा प्रयत्न करणारा आणि देशाच्या वेगळ्या शत्रूंसोबत पूर्ण शक्तीने झुंज देणारा वीर बघायला मिळाला! खूप हृद्य भेट झाली. माझे वाटेतले अनुभवही त्यांना सांगितले. मग तंजावुरचं मंदिर आणि पॅलेसबद्दल बोललो. त्यावेळी ते जे बोलले ते वाक्य फार महत्त्वाचं वाटलं. “अगर शिवाजी महाराज नही होते, तो यह कुछ भी नही दिखाई देता! कुछ नही बचता!”
असा १८ वा दिवस गेला. आता राहिले दोनच दिवस! उद्या पुद्दुचेरी! किती स्वप्नवत प्रवास आहे हा!
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १९: श्रीमुशनाम- पुद्दुचेरी ९६ किमी
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 2 जून 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया