मी:
शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं,
स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं...
चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ,
त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं...
ती:
अंतरातले अंतर मोजताना,
अंतर काही संपत नाही… (२)
अंतरात माझ्या पाहताना,
अंतर तुला तिथेही नाही.
मी:
माळले नवकिरणांनी नभाचे हार,
रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं...
बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी,
तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं...
ती:
चंद्र विसावला अंतरी तरी,
अंतरात हे कसले अंतर?
अंतरात खोल दडले,
तुझे माझे सैल धागे
- शब्दमेघ
(६ फेब्रुवारी २०२६)
प्रतिक्रिया
6 Feb 2026 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ,
त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं...
अहाहा..! सुंदर कविता आवडली. काही तरी राहून गेलं अशा आशयाची कविता थेट पोहोचली. प्रेमात काही राहून जाण्याची हुरहूर आंनदायी असते.
अपूर्व राजपूत या कवी मित्राच्या चार ओळी टाकण्याचा मोह होतो.
याच एका विचारात
पुन्हा भिजली गे दिठी
युगे लोटली लोटली
कान्हा राहिली रे मिठी
-दिलीप बिरुटे
( गोड मिठीतला)
10 Feb 2026 - 11:09 pm | गणेशा
युगे लोटली लोटली
कान्हा राहिली रे मिठी..
काय सुंदर ओळी...
मी कधीच असा विचार केला नव्हता, वा
6 Feb 2026 - 1:14 pm | श्वेता२४
अंतरातले अंतर मोजताना,
अंतर काही संपत नाही… (२)
अंतरात माझ्या पाहताना,
अंतर तुला तिथेही नाही.