✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

DNA : आनुवंशिकतेपासून गुन्हेगाराच्या शोधापर्यंत

ह
हेमंतकुमार यांनी
Mon, 01/12/2026 - 10:04  ·  लेख
लेख
‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली. हा नक्कीच विसाव्या शतकातील क्रांतिकारक जीवशास्त्रीय शोध होता. पुढील 70 वर्षांमध्ये या मूलभूत संशोधनाचा उपयोग जीवशास्त्रापासून न्यायवैद्यकीय शास्त्रापर्यंत अनेक शाखांमध्ये झालेला आहे त्याचा थोडक्यात हा आढावा : १. या शोधातूनच पुढे ‘जनुकीय अभियांत्रिकी’ या नव्या विज्ञानशाखेचा उगम झाला आणि त्यातून पुढे जैवतंत्रज्ञान ही शाखा विकसित झाली. त्या शाखेत सूक्ष्मजीवांच्या जनुकांत फेरफार करून विविध प्रथिने, हॉर्मोन्स आणि प्रतिजैविके तयार करतात. ती विविध रोगोपचारांत वापरली जातात. २. प्रत्येक व्यक्तीच्या डीएनएची रचना अद्वितीय (unique) असते. या मुद्द्याचा उपयोग न्याय्यवैद्यकशास्त्रात केला जातो. मृतदेहांची ओळख गुन्हेगाराची ओळख पक्की करणे तसेच वादग्रस्त पितृत्वाच्या दाव्यातला त्याचा उपयोग ही त्याची महत्त्वाची उदाहरणे. या लेखात आपण हे उपयोग विस्ताराने पाहू : मृतदेहांची जैविक ओळख ok भीषण विमान अपघात, भयानक आगीच्या घटना, भूकंप, चक्रीवादळे, महापूर आणि विविध युद्धांसारख्या दुर्दैवी आपत्तीत जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होते. अशा प्रसंगी एकत्रित विखुरलेल्या अनेक मृतदेहांची ओळख पटवणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि जिकीरीचे काम असते. विमान अपघातासारख्या भयानक घटनांमध्ये मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत विखुरले जातात. त्यातून मृतांची पक्की ओळख पटवणे हे काम मोठ्या कष्टाचे आणि आव्हानात्मक असते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जैविक पद्धतींमध्ये मुख्यतः मयताची दंतरचना, बोटांचे ठसे आणि डीएनए चाचणीचा समावेश आहे. जसजसे वैद्यक आणि जनुकशास्त्र विकसित होत गेले तशा वरील पद्धती अनुक्रमे वापरात आल्या. प्रत्येक व्यक्तीच्या बोटाचे ठसे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण (unique) असतात आणि दोन व्यक्तींचे असे ठसे एकसमान असण्याची शक्यता 64अब्ज लोकांमध्ये एक इतकी कमी असते. अचूक ओळख पटवण्यातील त्याच्या पुढची पायरी म्हणजे एखाद्या व्यक्तीचा डीएनए प्रोफाइल. दोन व्यक्तींचे असे प्रोफाइल एकसमान असण्याची शक्यता 594.1हजार अब्ज(trillion) लोकांमध्ये एक इतकी अत्यल्प म्हणजे जवळजवळ शून्य आहे. म्हणून सध्या ही डीएनए चाचणी ओळख पटवण्याची उत्कृष्ट मानकचाचणी ( gold standard) समजण्यात येते. डीएनए प्रोफाइल चाचणी एखाद्या अपघाताच्या तीव्रतेवर सर्व मृतदेह सापडणे आणि त्यांची अवस्था अवलंबून असते. कित्येकदा संपूर्ण मृतदेहाऐवजी फक्त त्याचे काही सुटे अवयव मिळतात. अपघातस्थळी वैद्यकीय पथक किती वेळात पोचते यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मृत्यूनंतर लवकरच शरीर कुजू लागते हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. त्याचबरोबर शरीर मृत झाल्याझाल्याच पेशींमधील डीएनएचे विघटन चालू होते आणि दमट हवामानात ते वेगाने होते. मृतदेह जर कुजलेल्या वा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असला तरीही त्यावर केलेली डीएनए चाचणी बऱ्यापैकी यशस्वी होते. मात्र मृतदेह जर पूर्णपणे जळालेला असेल तर या चाचणीला मर्यादा पडतात. सामूहिक आपत्तीमध्ये मृतदेह ओळखण्यासाठी या चाचणीचा जगात सर्वप्रथम वापर 1990मध्ये केला गेला. त्यानंतर संशोधनातील प्रगतीनुसार या चाचणीचे अधिकाधिक आधुनिक टप्पे उपलब्ध होत गेलेत. चाचणी प्रक्रिया १. मृतदेहाचा डीएनए नमुना मिळवणे : जर मृतदेह ताज्या अवस्थेत सापडला तर त्यातील रक्त आणि स्नायूंमधून नमुना घेतात परंतु जर तो कुजलेल्या अवस्थेकडे गेलेला असेल तर त्याच्या दाढा, हाडे आणि हाडातील मगज यामधून तो मिळवणे श्रेयस्कर असते. सर्व हाडांपैकी मांडीचे हाड (femur), तळपायातील छोटी हाडे ( metatarsals) किंवा गुडघ्याच्या वाटीचे हाड (patella) उत्तम समजले जाते. या हाडांची घनता चांगली असल्याने ती मिळाल्यास केव्हाही चांगले. तसेच उघड्या हाडांपेक्षा त्यावरील स्नायूसकट ती मिळाल्यास चाचणी अधिक अर्थपूर्ण होते. ok २. सख्ख्या नातेवाईकांचे डीएनए नमुने मिळवणे : यासाठी संबंधित मृताचे आई-वडील हा सर्वोत्तम पर्याय आणि ते न मिळाल्यास त्याची अपत्ये हा दुसरा पर्याय उत्तम. फक्त एकापेक्षा किमान दोन सख्ख्या नातेवाईकांचे नमुने मिळवणे श्रेयस्कर. हे नमुने संबंधितांचे रक्त किंवा गालाच्या अंतर्भागामधून मिळवता येतात. मृताचा एकही नातेवाईक उपलब्ध नसल्यास त्याने जिवंतपणे वापरलेल्या काही नित्यनेमाच्या वस्तूंमधून देखील असे नमुने मिळवतात. काही अपघातांमध्ये एखादे संपूर्ण कुटुंबच मृत झालेले असते. अशा वेळी त्यांच्या वस्तूंसारख्या अप्रत्यक्ष नमुन्यांचा आधार घ्यावा लागतो. अशा वस्तूंमध्ये संबंधिताचा टूथब्रश, दाढीचा ब्रश, केसांच्या क्लिपा किंवा बँड, लिपस्टिकचे साधन, कंगवे आणि केसांचे ब्रश इत्यादीचा शोध घेतात. 3. प्रयोगशाळेतील डीएनए प्रोफाईल तपासण्या : वरील १ व २ मधील नमुन्यांचे पृथ:करण करून संबंधित प्रोफाइल मिळवले जातात. त्यासाठी डीएनएचे STR/ SNP, Y-chromosome markers इ. तांत्रिक निकष तपासले जातात; त्या जंजाळात आपल्याला शिरण्याचे कारण नाही. त्यातील विशिष्ट निकषांतून संबंधित मानवी वंश (ethnicity) देखील ओळखता येतो. ४. मग मृत व्यक्ती आणि तिच्या नातेवाईकाचा प्रोफाइल यांची सॉफ्टवेअरच्या मदतीने तुलना केली जाते. दोन प्रोफाइल्सची संख्याशास्त्रीय दृष्ट्या अचूक जुळणी झाल्यास मृताच्या ओळखीवर शिक्कामोर्तब करतात. ok ५. वर उल्लेख केलेल्या संपूर्ण प्रक्रियेत ‘न्यूक्लियर डीएनए’चे प्रोफाइल अपेक्षित आहे. परंतु अत्यंत भीषण अपघातांमध्ये जेव्हा मृतदेह अति कुजलेल्या अवस्थेत आढळतात तेव्हा हा प्रोफाइल उपयुक्त नसतो. त्यावेळेस Mitochondrial DNA (mtDNA) या उपप्रकाराचा प्रोफाइल बनवला जातो. पेशींमध्ये त्याच्या अनेक कॉपी उपलब्ध असल्याने तो अशावेळी फायदेशीर असतो. अजून एक मुद्दा : आनुवंशिकतेच्या बाबतीत mtDNA फक्त आईकडून त्याच्या अपत्यात जातो. जर मृताच्या नातेवाईकांमध्ये फक्त आईकडचे सख्खे नातेवाईक उपलब्ध असतील तर ही चाचणी चांगली. प्रोफाइल चाचणीचे यशापयश वरील चौथ्या मुद्द्यात उल्लेख केल्याप्रमाणे जर मृत आणि नातेवाईक यांची अचूक जुळणी झाल्यास मृतदेहाची ओळख पक्की होते. परंतु या चाचणीचे यश नेहमीच 100% असत नाही. मृतदेहाचे मिळालेले हाड किंवा अन्य नमुना, त्यातून मिळवता आलेल्या डीएनएचे प्रमाण आणि दर्जा, मृत अवयवाची अवस्था, मृत्यूसमय आणि प्रत्यक्ष तपासणी दरम्यानचा कालावधी आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान या सर्व घटकांवर चाचणीचे यश अवलंबून असते. वरील सर्व घटक अनुकूल असल्यास चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. पूर्णपणे जळालेल्या मृतदेहांच्या बाबतीत आतापर्यंत चाचणी अयशस्वी व्हायची परंतु अलीकडे निघालेल्या काही आधुनिक तंत्रज्ञानामुळे यावर मात करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न झालेला आहे. काही प्रसंगी मृतदेहाच्या बाबतीत वरील सर्व घटक अनुकूल असतात परंतु त्याच्या प्रोफाइलची तुलना करण्यासाठी जर एकही सख्खा नातेवाईक मिळालाच नाही तर संदर्भ नमुन्यांच्या अभावी शिक्कामोर्तब करण्यावर अर्थातच मर्यादा येते. अशा प्रसंगी परिस्थितीजन्य /अन्य पुराव्याचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरते. पूर्वीच्या काही अपघातांच्या प्रसंगी मृतदेह ओळखण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि काही जणांच्या बाबतीत चुकीचे मृतदेह नातेवाईकांकडे दिले गेले होते. . . . गुन्ह्याचा तपास व गुन्हेगाराची ओळख या संदर्भात डीएनएचे नमुने कसे गोळा केले जातात हे जाणून घेणे रोचक आहे. आपल्यातील अनेकांनी आतापर्यंत पोलीस/ सीआयडी आणि तत्सम मालिका व चित्रपट पाहिले असणार आणि त्यात हे सगळे रंजक पद्धतीने दाखवले जाते. पण चित्रपट हा शेवटी कल्पनेचाच खेळ असल्यामुळे तिथे कथानायकाला सगळ्या अनुकूल गोष्टी दाखवल्या जाऊन शेवटी गुन्हेगार सापडतोच व गजाआड जातो ! परंतु वास्तव दरवेळी तसे नसून कित्येकदा ते खडतर असते. ok गुन्ह्याच्या ठिकाणी जेव्हा पोलीस पोचतात तेव्हा तिथे ज्या काही निर्जीव वस्तू सापडतात त्या ताब्यात घेऊन त्यांवर उमटलेले बोटांचे ठसे मानवी डीएनएसाठी तपासले जातात. पुढे जेव्हा संशयित गुन्हेगार पकडले जातात तेव्हा त्यांच्या डीएनए नमुन्याची नमुन्याबरोबर तुलना करून वरीलप्रमाणे निष्कर्ष काढला जातो. ही झाली सध्याची पारंपरिक पद्धत. परंतु या प्रकारे (trace and touch samples) मिळणारा डीएनएचा नमुना कित्येकदा किरकोळ व अपुरा असतो. तसेच या नमुन्यांमध्ये कित्येकदा अन्य गोष्टींची भेसळ (contamination) देखील झालेली असते. त्यामुळे निव्वळ अशा तपासणीतून उपलब्ध झालेला पुरावा गुन्हेगार शोधण्यासाठी तकलादू देखील ठरतो. तसेच सराईत सुशिक्षित गुन्हेगार गुन्हा करताना हातमोज्यांचा आणि शरीरभर घातलेल्या संरक्षक झग्याचा देखील वापर करतात. त्यामुळे त्यांच्या बोटांचे ठसे उमटण्याचाही संभव नसतो. नमुना मिळवण्यातली ही पण एक महत्त्वाची मर्यादा आहे. ok या दृष्टीने गुन्ह्याच्या ठिकाणी काही वेगळ्या स्वरूपाचा डीएनए मिळवता येईल का? यावर अनेक वर्षे संशोधक विचार करीत होते. गेल्या काही वर्षात त्यांना एक महत्त्वाचा आशेचा किरण दिसलेला आहे आणि तो म्हणजे गुन्हास्थळाच्या वातावरणातील डीएनए अर्थात, environmental DNA (eDNA). या डीएनएचे नमुने तिथली हवा आणि आसपासची धूळ यातून गोळा केले जातात. एखाद्या बंदिस्त जागेत जर काही माणसे काही काळ वावरून गेली तर त्यांच्या शरीरातून (त्वचा, केस आणि कपड्यांमार्फत) बाहेर पडलेले डीएनए-रेणू तिथल्या हवा आणि धुळीत बराच काळ टिकून राहतात असे लक्षात आलेले आहे. त्याचबरोबर संबंधित व्यक्तींच्या बोलण्या, खोकण्या आणि शिंकण्यातून देखील डीएनए-रेणू बाहेर पडत असतात. तसेच गुन्ह्याच्या स्थळी जर एखादा छोटामोठा पाण्याचा साठा असेल तर त्यातही माणसांचे डीएनए (Aquatic eDNA) साठून राहू शकतात. या प्रकारचे डीएनए नमुने पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक चांगल्या स्वरूपात व पुरेसे मिळतील अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. किंबहुना गुन्हास्थळी पुरेसा डीएनए गोळा होईपर्यंत संबंधित नमुना गोळा करण्याचे उपकरण चालू स्थितीत ठेवता येईल. तसेच या आधुनिक चाचणीमधून एखाद्या बंदिस्त जागेत येऊन गेलेल्या एकूण माणसांचा अंदाज येईल आणि त्यांनी तिथे घालवलेला एकूण वेळ देखील काढता येईल. याखेरीज गुन्ह्याच्या ठिकाणी एखाद्या प्राण्याचा वापर झाला असल्यास त्याचीही स्वतंत्र माहिती काढता येईल. अर्थात हे नवे तंत्रज्ञान पूर्ण विकसित होण्यास अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. एखादी व्यक्ती संबंधित खोलीत निव्वळ येऊन गेली असेल आणि काही बोलली किंवा खोकली नसेल, तर कितपत डीएनए गोळा होईल हे पहावे लागेल. तसेच व्यक्तींच्या वावरामुळे खोलीत जमा झालेला डीएनए किती काळ चांगल्या अवस्थेत राहतो हे पण पहाणे आवश्यक. खोली जर वातानुकूलित असेल तर त्या यंत्राच्या झडपांद्वारे एका खोलीतील डीएनए दुसऱ्या खोलीत जातो का, हा पण एक महत्वाचा मुद्दा. असा नमुना गोळा करण्याची उपकरणे, त्यांचे प्रमाणीकरण आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञान या सर्वांमध्ये संशोधनानुसार टप्प्याटप्प्याने सुयोग्य बदल करावे लागतील. हे सगळे झाले जीवशास्त्रीय मुद्दे परंतु सरतेशेवटी, जगातील किती न्यायालये या प्रकारच्या अत्याधुनिक पुराव्याला अंतिम पुरावा मानणार हा प्रश्न देखील उरतोच. वादग्रस्त पितृत्व अशा न्यायालयीन दाव्यामध्ये संबंधित मूल आणि संशयित वडील या दोघांच्या डीएनए-नमुन्यांची तपासणी वरीलप्रमाणेच केली जाते. त्याचबरोबर मुलाच्या डीएनएची जुळणी अन्य एका रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर केली जाते. त्या दोन्हीच्या निष्कर्षांवरून एक पितृत्व निर्देशांक (Paternity Index) काढला जातो. तो विशिष्ट मर्यादेच्यावर असल्यास पितृत्व सिद्ध होते. डीएनए हा मानवी जीवनाचा मूलाधार असल्यामुळे त्याच्यावर कितीही संशोधन झाले तरी त्याच्या भोवतालचे काहीसे गूढ वलय अद्यापही कायम आहे. त्या दृष्टिकोनातून त्यावर अधिकाधिक संशोधन सतत होत असते. अशा नवीन संशोधनांची टिप्पणी यथावकाश प्रतिसादांतून केली जाईल. ********************************************************************************** संदर्भ : १.https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7268995/#:~:text=You%20have%20been%20taught%2C%20along,is%20now%20known%20as%20DNA. २. https://analyticalsciencejournals.onlinelibrary.wiley.com/doi/10.1002/elps.202300228 https://www.sciencealert.com/first-step-towards-an-artificial-human-genome-now-underway
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
1205 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

किमेराने आनुंवंशिकतेची कल्पना

युयुत्सु
Mon, 01/12/2026 - 11:49 नवीन
किमेराने आनुंवंशिकतेची कल्पना गुंतागुंतीची बनते https://misalpav.com/node/53122
  • Log in or register to post comments

सहमत.

हेमंतकुमार
Mon, 01/12/2026 - 14:40 नवीन
सहमत. पूरक माहितीबद्दल आभार !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण तरी वाचनीय

अनामिक सदस्य
Mon, 01/12/2026 - 12:36 नवीन
धन्यवाद डोक्टरसाहेब. काही प्रश्न आहेत. १. अशी ओळख पटवण्यासाठी दंतरचना कितपत विश्वसनीय असते? डी एन ए इतकी नक्कीच नाही पण कितपत यूनिक असते? तुलना करण्यासाठी दंतरचना किती लोकान्ची उपलब्ध असते? पाश्च्यात्य देशात दंतरचनेचा ठसा साठवून ठेवतात का? २. सर्व घटक अनुकूल असल्यास चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे? उरलेले १.८% statistical error असावी का अजून अज्ञात असे काही घटक? ३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?
  • Log in or register to post comments

चांगले प्रश्न

हेमंतकुमार
Mon, 01/12/2026 - 14:41 नवीन
धन्यवाद ! चांगले प्रश्न आहेत. सवडीने एकेक घेतो. १. मृताची दंत रचना ही ओळख पटवण्याची एक प्राथमिक पद्धत आहे. तिचा एक फायदा म्हणजे अपघाताच्या ठिकाणी जर प्रचंड उष्णता निर्माण झाली असेल तर शरीराचे अन्य अवयव जळून जातात परंतु दातांचे enamel हा मानवी शरीरातील सर्वात कठीण असा पदार्थ असून तो 1000 अंश सेल्सिअस तापमानापर्यन्त सुद्धा व्यवस्थित राहतो. अशा राहिलेल्या दातामधून सुद्धा डीएनए प्रोफाईल तपासणी करता येते हा एक बोनस. तिची विश्वसनीयता यासाठीची पहिली गरज म्हणजे संबंधित व्यक्तीच्या दंत उपचारांची नोंदणी केलेली असणे. जर अशी नोंदणी उपलब्ध झाली तर या चाचणीची विश्वसनीयता 80% पर्यंत राहते. मात्र एखादी व्यक्ती जिवंतपणे कधीच दंतवैद्याकडे गेली नसेल तर मग तिची विश्वसनीयता अर्थातच खूप कमी होते. बऱ्याच युरोपीय देशांमध्ये दंतवैद्यांनी त्यांच्याकडील येणाऱ्या लोकांचे एक्स-रे आणि अन्य अहवाल अनेक वर्षे सक्तीने जपून ठेवायचे असतात. अप्रगत देशांमध्ये अर्थातच नोंदणी प्रक्रिया अत्यंत कमी असते. अशा परिस्थितीतही मृताची ओळख पटवण्यासाठी दातांचा मर्यादित वापर असा होऊ शकतो : १. व्यक्तीचे अंदाजे वय, लिंग आणि वंश समजणे. २. व्यक्तीच्या व्यसनानुसार दातांवर काही डाग आढळू शकतात. ३. सोने किंवा महागड्या धातूचा कृत्रिम दात आढळल्यास ओळख पटवण्यासाठी अजून मदत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक सदस्य

२.

हेमंतकुमार
Mon, 01/12/2026 - 16:04 नवीन
चाचणीचे यश 98.2% पर्यंत असल्याचे आतापर्यंत दिसले आहे. असे का असावे?
सर्वप्रथम एक तांत्रिक कारण : प्रोफाइल चाचणीचा निष्कर्ष हा संबंधित व्यक्ती अमुक असण्याची संभाव्यता व्यक्त करतो; तो निष्कर्ष खात्रीने ही मृत व्यक्ती हीच होती असे (absolute) म्हणत नाही. ही संभाव्यता टक्केवारीच्या संदर्भात सांगितली जाते (statistical confidence). २. एखाद्या व्यक्तीचा डीएनए जेव्हा एकमेवाद्वितीय असतो असे म्हटले जाते ते शब्दशः खरे व्हायचे असल्यास संपूर्ण डीएनएची प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु वास्तवात डीएनएचे फक्त विशिष्ट ठराविक भागच तुलनात्मकरित्या तपासले जातात. याचे कारण म्हणजे कुठल्याही आपत्ती प्रसंगी जेव्हा हजारो मृतदेह ठराविक वेळात ओळखायचे असतात तेव्हा वेळ आणि संसाधनांची मर्यादा हे महत्त्वाचे घटक असतात. ३. प्रयोगशाळेसंबंधीच्या errors : यामध्ये डीएनए नमुना हाताळणीपासून ते प्रशिक्षित मनुष्यबळ, उपकरणे अशा असंख्य गोष्टींचा समावेश होतो. ४. एखादी जीवशास्त्रीय चाचणी 100% अचूक आहे हे विधान कायद्यालाही मान्य होत नाही कारण मानवी चुका अजिबात न होणे हे (जवळजवळ) अशक्य असते. तसेच DNA variation संबंधीचे वैज्ञानिक ज्ञानदेखील 100% ज्ञात असतेच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक सदस्य

३.

हेमंतकुमार
Mon, 01/12/2026 - 16:33 नवीन
३. नातेवाइकान्चा DNA वापरून म्रुत व्यक्तिची ओळख पटवणे आणि एखाद्या मुलाचे पितृत्व सिद्ध करणे यात तान्त्रिकद्रुश्ट्या काही फरक असतो का? रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी करून पितृत्व निर्देशांक का काढावा लागतो? तसे काही म्रुत व्यक्तिची ओळख पटवताना करावे लागत नाही का?
* तांत्रिकदृष्ट्या काही फरक नाही; प्रयोगशाळेतील पद्धत वरीलप्रमाणेच राहील. * रँडम पुरुषाच्या डीएनए बरोबर जुळणी का करायची याचे उत्तर जीवशास्त्रीय असून ते समजायला त्या विज्ञानाची शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यास बरे पडेल. १. प्रथम फक्त मुलाचा डीएनए आणि संशयित वडिलांचा डीएनए ही परिस्थिती पाहू. इथे आपण पुन्हा एकदा डीएनए मधील ठराविक सिक्वेन्सेसचीच तुलना करत आहोत. या सिक्वेन्सेस पैकी काही सर्वसाधारण समाजात दुर्मिळ असतात तर काही अत्यंत कॉमन असतात ( ५०%). २. वरचे जे कॉमन सिक्वेन्सेस आहेत ते त्या वंशातील एखाद्या अन्य काहीही संबंध नसलेल्या पुरुषामध्ये सुद्धा आढळू शकतात. त्यामुळे या जुळणीचा पुरावा दुर्बल होतो. म्हणून निर्देशांक काढायचा. जेव्हा निर्देशांक 99.9% किंवा त्याहूनही जास्ती असतो तेव्हा असे म्हणता येते की, त्या खटल्यातील संभाव्य बाप असलेली व्यक्ती जैविकदृष्ट्याही बाप असण्याची शक्यता अन अन्य कुठल्याही पुरुषाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. . . . मृत व्यक्तीच्या बाबतीत आपण सख्या नातेवाईकांशी तुलना करतोच आणि म्हणून लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त एकापेक्षा किमान दोन सख्ख्या नातेवाईकांचे नमुने मिळवणे श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक सदस्य

DNA फिंगरप्रिंटिंग

Bhakti
Mon, 01/12/2026 - 15:12 नवीन
मस्तच विषय. सर अलेक जेफरीज (Sir Alec Jeffreys )यांनी जागतिक स्तरावर हा DNA फिंगरप्रिंटिंग शोध लावला . डॉ. लालजी सिंग (Dr. Lalji Singh) यांना 'भारतातील DNA फिंगरप्रिंटिंगचे जनक' मानले जाते. environmental DNA (eDNA) विषयी नव्याने समजले.
  • Log in or register to post comments

माहितीपुर्ण लेख आवडला!

टर्मीनेटर
Mon, 01/12/2026 - 16:20 नवीन
माहितीपुर्ण लेख आवडला 👍 एकंदरीत भलतेच गुंतागंतीचे आणि आव्हानात्मक प्रकरण दिसतय हे!
  • Log in or register to post comments

environmental DNA (eDNA) ही

सोत्रि
Tue, 01/13/2026 - 05:32 नवीन
environmental DNA (eDNA) ही भन्नाट कल्पना आहे, त्यावरील संशोधन अनेक सायफाय शक्यतांना वास्तवात आणता येईल! - (अभासू) सोकाजी
  • Log in or register to post comments

अवांतर

निनाद
Tue, 01/13/2026 - 05:59 नवीन
खूप मस्त लेख. जनुकीय अभियांत्रिकीचे अनेक अंग आहेत. भारतात प्रामुख्याने आधी शेतीसाठी याचा वापर झाला. २००२ मध्ये बीटी कापूस ला मिळालेली मान्यता हा या क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. यामुळे भारताच्या कापूस उत्पादनात मोठी क्रांती झाली. क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शास्त्रज्ञांनी भात, गहू आणि मोहरीच्या जाती विकसित केल्या आहेत. मला वाटते इतक्यातच 'जीनोम इंडिया प्रोजेक्ट' यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या अंतर्गत १०,००० भारतीयांच्या जनुकीय नमुन्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. भारतीयांची शरीररचना पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी असल्याने, थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया सारख्या विशिष्ट भारतीय आजारांवर उपचार शोधण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे/असावा. कॅन्सरवरील स्वदेशी उपचार, CAR-T सेल थेरपी,हा पण एक मोठा टप्पा आहे. उपचार भारतात स्वदेशी तंत्रज्ञानामुळे अत्यल्प दरात उपलब्ध झाले आहेत. हे जागतिक आरोग्य क्षेत्रात भारताचे मोठे यश आहे असे वाटते. आपल्याकडे खूप बाय टेक पदवीधर आहेत पण जनुकीय अभियांत्रिकीचे संशोधन मात्र त्यामानाने अगदी किरकोळ आहे. कारणे सर्वांना माहीतच आहेत... त्यामुळे अजून फार मोठा टप्पा यात आपल्याला गाठायचा आहे हे नक्कीच!
  • Log in or register to post comments

सर्वांचेच प्रतिसाद रोचक !

हेमंतकुमार
Tue, 01/13/2026 - 07:52 नवीन
पूरक माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद ! प्रतिसादांमधून आलेले वैज्ञानिकांसंबंधीचे आणि बीटी कापूस आणि आजारांवरील उपचारांचे अन्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. . . . वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या अलीकडे घडलेल्या १-२ रोचक प्रकरणावर नंतर लिहितो.
  • Log in or register to post comments

एक चमत्कारिक खटला व डीएनए चाचणीला मनाई

हेमंतकुमार
Tue, 01/13/2026 - 08:27 नवीन
एका विवाहित स्त्रीने तिच्या डॉक्टरवर आरोप केला होता की तिचे मूल हे नवऱ्यापासून झालेले नसून त्या डॉक्टरपासून झालेले आहे. म्हणून ती स्वतः, तिचे मूल व डॉक्टरची डीएनए चाचणी करण्यात यावी अशी तिची मागणी होती. मात्र त्या चाचणीला संबंधित डॉक्टरने नकार दिला. त्यावर त्या स्त्रीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तिथे तिची विनंती मान्य करण्यात आली. डॉक्टरला हे मंजूर नसल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून या डॉक्टरच्या बाजूने निकाल देताना म्हटले आहे की, आपल्या नवऱ्याबरोबर राहात असलेल्या स्त्रीने अन्य कुठल्याही पुरुषावर निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी करता येणार नाही. असे केल्यास त्या डॉक्टरच्या आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि व्यक्तिगत गोपनीयतेचाही भंग होतो. तसेच ते मूल आता सज्ञान असून त्याचा या प्रकरणात काही संबंध नसल्याचे (not a party to the proceedings) न्यायालयाने म्हटले आहे. एखाद्यावर कोणी निव्वळ आरोप केला म्हणून त्याची डीएनए चाचणी सक्तीने करता येणार नाही, हा या निर्णयाचा मथितार्थ आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा