✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

काथ्याकूट: आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागते का ?

च
चित्रगुप्त यांनी
Mon, 02/12/2024 - 07:02  ·  लेख
लेख
मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते. तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते. याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो. परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर : आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो. हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते. यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो. तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात. – मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते. हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे. लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ? मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32933 वाचन

💬 प्रतिसाद (133)

प्रतिक्रिया

प्रत्येक गोष्टीत शास्त्र

चौथा कोनाडा
गुरुवार, 02/29/2024 - 14:36 नवीन
प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही. अगतिक झालेल्या मानवी मनावर फुंकर घालण्यासाठी अध्यात्माचाच आधार घ्यावा लागतो. फुंकर घातल्याने जखम बरी होण्यात कोणताही हातभार लागत नसला तरी जखमी माणसाच्या मनाचे समाधान तर होते.
यू सेड इट ! १०१% सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

मूकवाचक
गुरुवार, 02/29/2024 - 19:26 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

पाचव्यांदा गर्भपात झालेल्या

कॉमी
गुरुवार, 02/29/2024 - 19:34 नवीन
पाचव्यांदा गर्भपात झालेल्या मुलीला असे सांगणे कितपत योग्य,की हा सगळा पूर्वसंचिताचा खेळ आहे म्हणून ? तात्पुरते "का" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पण नंतर दुःखातून बाहेर आल्यावर पुन्हा तोच विचार केल्यावर मनावर काय ओरखडा उमटेल ? दोन पर्याय दिले आहेत वरील प्रतिसादात :
प्रत्येक गोष्टीत शास्त्र कामास येत नाही. तेथे अध्यात्मच थोडं फार उपयोगी येतं. ईश्वरेच्छा किंवा पूर्वकर्म हेच सांगावं लागतं. कोणतेही ठोस कारण देता येत नाही.
१. ईश्वरी इच्छा - ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का ? त्यामुळे ईश्वराबाबत प्रचंड कडवट होण्याची शक्यता नाही का ? आणि, इश्वरेच्छा हे सुद्धा "अज्ञात" म्हणण्याचा दुसरा मार्ग आहे. ईश्वराची अशी इच्छा का झाली ह्याला तरी कुठे उत्तर आहे ? मग वैद्यकीय गुंतागुंत जी समजावून सांगता येत नाही, ते एक अज्ञात आणि ईश्वर इच्छा हे दुसरे एक अज्ञात. निर्मळ अज्ञाताऐवजी कोणावर तरी दोष टाकणारे अज्ञात मानसिकदृष्ट्या मदत करणारे ठरेल काय ? २. पूर्वकर्म - आपल्या काही कृती मुळेच आपले गर्भ गेले हे खरोखरी त्या व्यक्तीने मान्य केले तर त्याचे काय मानसिक परिणाम होतील ह्याचा प्रत्येकाने विचार करून पहावा. ह्याबाबत एक अत्यंत भयाण बंगाली लघुकथा आठवते. सारांश लिहिलेला आत्ताच्या चर्चेच्या तुलनेसाठी पण खोडून टाकला. त्यामानाने सौम्य उदाहरण अमीर खानचा तलाश सिनेमा. अमीर खानचा मुलगा बोटिंग अपघातात बुडून मरतो. अमीर खान रात्रभर आपल्या हालचालींमध्ये कुठे उशीर झाला ह्याचा विचार करत असतो. तर असेच कोणाला तुमच्या पूर्व कर्मांची चूक आहे असे सांगणे long term मध्ये कितपत सांत्वनकारी ठरेल ? ह्यातून फुकाचा अपराधबोध तयार होईल त्याचे काय ? अर्थात, डॉक्टर साहेब त्यांच्या प्रोफेशनल अनुभवातून बोलत आहेत. माझ्यासारख्या अज्ञानी लोकांनी ह्याबाबत प्रश्न करणे चुकीचे होईल. हे फक्त माझे विचार मांडले आहेत.
  • Log in or register to post comments

+१

गवि
गुरुवार, 02/29/2024 - 19:52 नवीन
+१ मुळात पराकोटीच्या दुःखाच्या क्षणी कोणी ही तात्विक चर्चा करतच नाही. विचारपद्धती ही सतत विकसित होत जाणारी एक learning method आहे. वस्तुनिष्ठ विचारपद्धती ही देखील एक जीवन पद्धती असू शकते, आणि पराकोटीच्या दुःखद प्रसंगी देखील त्यातून तरून जाण्यास ती सहाय्यभूत होऊ शकते, किमान अधिक त्रासदायक किंवा वंचना करणारी ठरत नाही अशी कदाचित, ..कदाचित .. शक्यता काही जणांच्या बाबतीत असू शकेल हे साधारणतः अमान्य का ठरावे हे कोडे आहे. वस्तुनिष्ठ विचारपद्धती बाळगणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात विदीर्ण करू पाहणारे दुःख बघितलेच नाही, तो कोरडा पाषाण जणू, असेच जगाला वाटत असावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

+१

कॉमी
गुरुवार, 02/29/2024 - 21:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

कोणताही 'विचार' मुळात 'वस्तुनिष्ठ' असू शकतो का ?

चित्रगुप्त
गुरुवार, 02/29/2024 - 23:05 नवीन
कोणताही 'विचार' ( - विचारपद्धती) मुळात 'वस्तुनिष्ठ' असू शकतो का ? -- मज निरोपावे. 'विचार' म्हटला की 'मन' आलेच, आणि मन हे 'संस्कारित'(च) असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही

सुबोध खरे
Fri, 03/01/2024 - 11:46 नवीन
ईश्वराने एकदा नाही दोनदा नाही तब्बल पाच वेळा आपल्या गर्भाला मारले, ही कल्पना मनःशांती देणारी असेल का आपण म्हणत आहात त्यातील अनेक गोष्टींचे माझ्या कडे उत्तर नाही. सामान्य माणसाला टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी होणे मानसिक दृष्ट्या झेपणारे नसते. माझ्याच वाट्याला हे RANDOM BADLUCK का आले याचे उत्तर डॉक्टरांकडेच कशाला शास्त्रज्ञ बुद्धिवंत कुणाकडे नसतेच. अनेक टोकाचे बुद्धिप्रामाण्यवादी स्वतःचा मृत्यू समोर आल्यावर भीतीने आस्तिक होताना पाहिलेले आहेत. हृदयाच्या बायपासचा शल्यक्रिया झाल्यावर छातीत पाणी होऊन श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यावर एक टोकाचे नास्तिक असणारे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्व तर्हेचे भस्म उदि अंगारा लावून घेत होते आणि कालपर्यंत आमच्यासारख्या डॉक्टरांना कस्पटासमान लेखत होते ते आमच्या पुढे हात जोडून विनवणी करत होते. नाही देखील पंचानना तोंवरि जंबुक करी गर्जना. मृत्यू समोर ठाकल्यावर माणसांचा सर्व आवेश गळून पडतो. विकोपाला गेलेल्या कर्करोगी माणसाला आपला आजार शल्यक्रिया करण्याच्या पलीकडे गेलेला आहे असे सांगण्यापेक्षा आपल्याला शल्यक्रियेची गरज नाही, औषधी उपचार करू( केमोथेरपी) हे सांगणे जास्त सोपे असते. मग ते संपूर्ण सत्य नसले तरी. हातपाय गाळून बसलेल्या माणसाचे शरीर सुद्धा उपचारांना नीट साथ देत नाही हा सार्वत्रिक अनुभव आहे. परमेश्वरावर आणि डॉक्टरांवर भरोसा ठेवा, तुमचा सगळं नीट होईल हे माणसाला दिलासा देऊन उपचाराला तयार करते मग ते असत्य असले तरी ही उपयुक्त असू शकते. तुमचा रुग्ण बरा होईल कि नाही हे मला माहिती नाही ते अज्ञात आहे हे उत्तर कितीही सत्य असले तरी रुग्णाला किंवा जवळच्या नातेवाईकाला पचणारे असेल का? रोज मृत्यूला सामोरे जाणारे रुग्ण पाहणारे डॉक्टर आस्तिक नसतील पण नास्तिकही नसतात. याचे कारण श्रद्धा (अंधश्रद्धा) माणसाला बळ देते हे त्यांनी पाहिलेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

डॉक्टर माणसंच...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/06/2024 - 09:11 नवीन
डॉक्टर माणसंच अशी देवाळु व्हायला लागली तर अवघड आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही नास्तिक डॉक्टर शोधा...

अहिरावण
Wed, 03/06/2024 - 10:14 नवीन
तुम्ही नास्तिक डॉक्टर शोधा... इथे नाही मिळाला तर अम्रेकीत मिळेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ प्रा. डॉ. -- 'देवाळु' म्हणजे .....

चित्रगुप्त
Wed, 03/06/2024 - 11:09 नवीन
मानवी जीवनातली, किंबहुना अखिल विश्वातली प्रत्येक लहानमोठी घटना ही असंख्य निसर्गनियम-निसर्गचक्रांच्या परिणामी घडून येत असते. (अमूक एका स्थळी-क्षणी, हे नियम एकत्रितपणे येणे यालाच 'योगायोग' असेही म्हणता येईल) -- या नियमांपैकी काही नियम मनुष्याला (निरिक्षण, अनुमान, शास्त्रीय कसोट्या इ. तून) ठाऊक झालेले असले तरी त्याखेरीज असंख्य नियम हे नेहमीच मानवी आकलनापलिकडले राहतील. या अज्ञात निसर्गनियमांच्या परिणामी घडून येणार्या घटनांना सुटसुटीत शब्द 'देवाची' इच्छा/लीला/करणी ... असा आहे असे वाटते. -- अर्थात हा 'देव' म्हणजे राम, कृष्ण, महादेव, खुदा, गॉड, वेताळ, खंडोबा, बहिरोबा .... वगैरेपैकी नाही, तसेच त्याचा विविध कर्मकांडे, उपासना, श्रद्धा, प्रार्थना, बाप्तिस्मा, व्रतवैकल्ये, नमाज, स्तोत्रे, आरत्या, पूजा इत्यादिकांशीही काहीही संबंध नाही. 'देव' या शब्दाऐवजी 'नियती' 'कपाळावर लिहीलेले' वगैरे शब्दप्रयोगही प्रचलित आहेत. या अर्थाने बघता डॉक्टर किंवा कोणीही आस्तिक-नास्तिक व्यक्ती सुद्धा 'देवाळु' असू शकते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आदर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/06/2024 - 11:19 नवीन
आपल्या मतांचा आदर आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@ सुबोध खरे,

चौथा कोनाडा
Wed, 03/06/2024 - 12:55 नवीन
@ सुबोध खरे, अगदी यथोचित लिहिले आहे ! १०१+ तंतोतंत सहमत ! या वरून एक कविता आठवली : (या चर्चेशी संबधित असावी अ थ वा नसावीही : एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते कि कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्यायीची एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण गरज देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा.. कोणीतरी स्वतःचे ओझे स्वतःच्याच पायावर सांभाळत असल्याचे समाधान लागते देवालाच म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर तात्कळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, ‘दर्शन देत जा अधून मधून.. तुमचा विश्वास नसेल आमच्यावर पण आमचा तर आहे ना!’ देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीने पाठवतो देवळात तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे! - कवि तुम्ही ओळखालच या कवितेचे प्रत्यक्ष सादरीकरण बहारदार असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा विडीयो बघा.

चित्रगुप्त
गुरुवार, 02/29/2024 - 21:31 नवीन
https://youtu.be/WP7fJ9Iw3J8?si=qxKbSA4y6GHB89OK इथे चाललेल्या चर्चेशी एका वेगळ्या दृष्टीने संबंधित असलेला वरील विडीयो अवश्य बघावा.
  • Log in or register to post comments

धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था

नठ्यारा
गुरुवार, 02/29/2024 - 23:26 नवीन
स्वधर्म, तुमचा इथला संदेश वाचला. एकेक विधानं पाहूया. १.
परकीय मुघल व इंग्रज आल्यावर लढायला आपल्याकडचे फक्त १०% क्षत्रिय!
हे कुठेही लिहिलेलं वा सिद्ध केलेलं नाही. जुलुमी परकीय राजवटींच्या विरुद्ध सतत उठाव होत आलेले आहेत. बंदा बैरागी तर संन्याशी असूनही हाती शस्त्र धरता झाला. २.
म्हणून त्यांनी कधीही आपल्या धर्मव्यवस्थेत (वर्णव्यवस्था, कर्मसिध्दांत इ.) ढवळाढवळ केली नाही, व त्यामुळेच ते अनेक शतके आपल्यावर राज्य करू शकले. हे आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले व अजूनही होत आहे.
परकीयांनी अनेक शतके भारतावर राज्य केले, हा निव्वळ गैरसमज आहे. संपूर्ण भारत कधीही कुणाच्याही एक्छात्री अंमलाखाली नव्हता. अगदी सर्वोच्च केंद्रीभूत इंग्रजी सत्तेच्या उत्कर्षकाळातही असंख्य संस्थाने अस्तित्वात होती. त्यांच्यात १/४ जनता व १/३ प्रदेश समाविष्ट होता. बाकी, कर्मसिद्धांतात ढवळाढवळ करता येत नसते. आणि धर्मव्यवस्था म्हणजे कर्मसिद्धांत नव्हे. हा सिद्धांत अधर्माने वागणाऱ्यासही लागू पडतो. आपल्या समाजाचं नुकसान झालं ते धर्म न पाळल्याने. ३.
अन्यायकारक उतरंड म्हणजे वर्णव्यवस्था म्हणायचे होते
वर्ण म्हणजे कल. एखाद्याला ज्या कामाची आवड असेल तो त्याचा वर्ण होय. आवडतं काम करायला मिळणं ही चैन आहे. हिचा अन्यायाशी कसलाही संबंध नाही. वर्णव्यवस्था अन्यायकारक आहे ही इंग्रजी भूलथाप आहे. ४.
विहित कर्मे म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या वर्णाप्रमाणे करावयाची कर्मे. वैदिक काळात हीच समाजव्यवस्था होती. मी का म्हणून ही हीन (समजली जाणारी) कामे करायची
वैदिक धर्मानुसार कोणतंही काम हीन नाही. अमुकेक काम हीन आहे हे तुम्ही स्वत:च ठरवलं आहे. याबाबत भंगी समाजाचं उदाहरण ठाशीव आहे. हिंदू राजपुतांचा मानभंग करण्यासाठी म्हणून जेत्या परकीयांनी त्यांना डोक्यावरून मैला वाहून न्यायचं काम करायला लावलं. अशा रीतीने त्या क्षत्रियांचा मानभंग झाला म्हणून त्यांना जुलुमी परकीयांनी भंगी अशी संज्ञा दिली. तरीही त्या शूर राजपुतांनी हिंदू धर्म सोडला नाही. त्यांची धर्माप्रती निष्ठा अभंग व अविचल राहिली म्हणून मी त्यांना अभंगी म्हणतो. वास्तविक सफाई कामगारांना भंगी म्हणायची काहीच गरज नाहीये. ५.
मला ज्ञानाचा, लढाई करण्याचा अगर व्यापार करण्याचा का अधिकार नाही?
करा की हवा तेव्हढा व्यापार आणि मिळवा की हवं तेव्हढं ज्ञान. कोणी अडवलंय? असं कोणी कोणाला अडवल्याचं काहीतरी उदाहरण आहे का? ६.
हे प्रश्न शूद्र वर्णात जन्मलेल्या व्यक्तीला पडून तो या व्यवस्थेशी भांडायला उठेल ना!
शूद्र वर्ण आहे. जन्म नाही. ७.
ते होऊ नये म्हणून त्याला पूर्वजन्मीच्या कर्मामुळे तुला हा वर्ण मिळाला व म्हणून तुला क्षमता असली तरी दुसरी कामे करण्याचा अधिकार नाही हे समजावणे, कर्मसिध्दांत समाजात सर्वमान्य असल्यामुळे शक्य झाले.
या अर्थाचा हिंदू धर्मग्रंथात वा इतर पुस्तकांत स्पष्ट उल्लेख आहे का? याउलट महाभारतात युधिष्ठिरास धर्मव्याध या खाटीकाकडून धर्मरहस्य जाणून घ्यायचा उपदेश कोण्या एका ऋषींनी केला. त्याप्रमाणे युधिष्ठिराने खाटकाकडून धर्माची शिकवण घेतली. ८.
हेच उलट पध्दतीने ब्राम्हण वर्णाच्या बाबतीतही झाले असणार. त्याला समजा लढण्याची किंवा व्यापार करण्याची आवड व क्षमता असली तरी काम ते केले तर हीन समजले जाऊ अशी भिती.
असे कितीतरी पोटार्थी जन्मब्राह्मण युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या काळी होते. त्यांना शेतकीचे ब्राह्मण म्हणंत. अशांना त्याने मुख्य वेदीच्या जवळपासही फिरकू दिलं नाही. आणि हेच योग्य आहे. असो. धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयी गैरसमज जास्त आणि ठोस माहिती कमी आहे. प्रत्यक्षांत परिस्थिती फार वेगळी आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

जवळपास सगळे चुकीचे लिहिले आहे

कॉमी
गुरुवार, 02/29/2024 - 23:34 नवीन
जवळपास सगळे चुकीचे लिहिले आहे. पुढे मागे वेळ मिळेल तेव्हा ह्यावर लेख टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

तुमच्या मताचा आदर

स्वधर्म
Fri, 03/01/2024 - 19:09 नवीन
नठ्यारा, असल्या चर्चांमधून मला कळलं ते असं की धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था याविषयीची व्यक्तीची मते ही ती व्यक्ती कोणत्या पार्श्वभूमीतून आली आहे, यावर बव्हंशी अवलंबून असतात. ती सहसा बदलू शकत नाहीत व पुढे जाऊन चर्चेत थांबावे लागते. सहसा व्यक्तीस आहे तीच मते आजूबाजूचा विदा घेऊन बळकट करण्याचा कल असतो. पूर्ण वस्तुनिष्ठ दृष्टीकोन बहुधा कोणालाच घेता येत नाही, असे चित्रगुप्त यांनी वर म्हटले आहेच. पण नविन माहिती आली तर आपले आजवरचे मत दुरूस्त करण्याचा लवचिकपण फार फार थोडे लोक दाखवतात, असा अनुभव आहे. मी गीता वाचणे, समजून घेणे, चिंतन करणे व आचरणात आणण्णाचा प्रयत्न करणे, हे केले आहे. गीतेच्या सरांना खूप प्रश्न विचारायचो. शेवटी काही कल्पना (उदा. पुनर्जन्म) ‘सबजेक्ट थू व्हेरिफिकेशन’ मान्य केल्याशिवाय कर्मसिध्दांत पटू शकत नाही आणि आपण तो व्हेरिफाय करू शकत नाही. इथे मला थांबावे लागले. त्यानंतरही डॉ. आंबेडकर यांचे अनहिलेशन ऑफ कास्ट वाचण्याएवढे मनाचे दार किलकिले राहिले. त्यांनी वर्णाबद्दल लिहिले असून ते समाजात असू का शकत नाहीत याचे बिनतोड उत्तर दिले आहे. लोक काय मानतात यापेक्षा कसे जगतात हे जास्त महत्वाचे आणि आपण समाज म्हणून कसे जगलो हे आपल्या समोर आहेच. मग काय, सुटलो तावडीतून धर्म, कर्मसिद्धांत व वर्णव्यवस्था यांच्या. पण तुमचे मत मात्र असेच राहिल असे वाटते. त्याचा आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

एक थेट प्रश्न विचारतो ....

नठ्यारा
Fri, 03/01/2024 - 19:56 नवीन
स्वधर्म, तुम्हांस एक थेट प्रश्न विचारतो. जर पुनर्जन्माचा पुरावा दिला तर तुम्ही कर्मसिद्धांत मानाल काय? हो म्हणायची सक्ती नाही. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

पुरावा

स्वधर्म
Fri, 03/01/2024 - 20:32 नवीन
ते तुंम्ही पुरावा म्हणून काय देता त्यावर अवलंबून आहे. अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? माझी साधना/ पुण्याई/ गुरूभक्ती कमी पडल्यामुळे मला पडताळा येत नाही अशी बहुतेक श्रध्दाळूंची समजूत करून दिलेली असते, म्हणून विचारतो. समजा मला मी स्वत: मागच्या जन्मी कोण होतो व काय कर्मे केली होती हे जाणता आले व त्यानुसार सध्याच्या जन्मातील फळांची संगती लावता आली, तर जरूर विश्वास ठेवता येईल. कुठलातरी ग्रंथ, कुणाचा तरी यू ट्यूब व्हिडिओ ह्याला पुरावा मानता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

+१

कॉमी
Fri, 03/01/2024 - 20:43 नवीन
ते तुंम्ही पुरावा म्हणून काय देता त्यावर अवलंबून आहे. अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? माझी साधना/ पुण्याई/ गुरूभक्ती कमी पडल्यामुळे मला पडताळा येत नाही अशी बहुतेक श्रध्दाळूंची समजूत करून दिलेली असते, म्हणून विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

मागील जन्माच्या आठवणी

नठ्यारा
Fri, 03/01/2024 - 21:55 नवीन
स्वधर्म,
समजा मला मी स्वत: मागच्या जन्मी कोण होतो व काय कर्मे केली होती हे जाणता आले व त्यानुसार सध्याच्या जन्मातील फळांची संगती लावता आली, तर जरूर विश्वास ठेवता येईल.
तुम्ही म्हणता की तुम्हाला मागील जन्म आठवले तर विश्वास ठेवता येईल. तसे कोणालाच आठवंत नसतात. तरीपण काही विशिष्ट व्यक्तींना ते आठवतात. त्यांचा पुनर्जन्म झाला आहे यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

>> अन तो पुरावा पुरावा ठरला

स्वधर्म
Sat, 03/02/2024 - 19:52 नवीन
>> अन तो पुरावा पुरावा ठरला नाही, तर तुंम्ही तुमचे मत बदलून या श्रध्दांचा त्याग करणार का? याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? ते सांगा ना आधी. असो. मी आधी म्हटल्याप्रमाणे पुनर्जन्म ही संकल्पना 'अनव्हेरिफाएबल' न पडताळता येणार्या आहेत. तुंम्ही जर अशा लोकांचे केवळ 'सांगणे' हा पुरावा मानत असाल, तर नाही. त्याची पडताळणी कशी करायची याची व्यक्तीनिरपेक्ष, सर्वांना अवलंबून बघता येणारी पध्दत तुंम्हालाच सुचवावी लागेल. असे करून जर एकच निष्कर्ष आला, तर मग विश्वास ठेवण्याचा विचार करता येईल. पण ते पुढे, आधी वरील प्रश्नाचे उत्तर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

अपडताळणीय ?

नठ्यारा
Sun, 03/03/2024 - 19:51 नवीन
स्वधर्म, जर पुरावा नसेल तर मी माझ्या श्रद्धांचा त्याग करायला तयार आहे. पण ती वेळ येणार नाही कारण की पुरावा सज्जड आहे. तुम्ही पुनर्जन्म अपडताळणीय म्हणता हे पार चुकीचं आहे. पुनर्जन्माच्या अनेक घटना डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी आपल्या पुस्तकांत चर्चिल्या आहेत. पुस्तकाविषयी माहिती इथे आहे : https://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Lives-Reincarnation-ebook/dp/B004EYSWWG पडताळणी करूनंच पुनर्जन्म आहे हे सिद्ध केलेलं आहे. अनेक प्रसंगांत सदर बालकाच्या कथनावरून पूर्वजन्मीचे नातेवाईकही शोधण्यांत आले आहेत. आणि त्यांनी पूर्वजन्मीच्या व्यक्तीच्या विदांची पुष्टी केलेली आहे. काही प्रसंगांत पूर्वजन्म हिंसक पद्धतीने संपुष्टात आल्याच्या खुणाही बालकाच्या अंगावर आढळल्या आहेत. इतका भरभक्कम पुरावा असल्यावर कोण पुनर्जन्म नाकारेल? -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

कर्मसिद्धांत अपडताळणीयच, पुनर्जन्म कदाचित पडताळणीय!

हणमंतअण्णा शंक…
Mon, 03/04/2024 - 22:14 नवीन
Interestingly, and contrary to most religious notions of reincarnation, there was zero evidence of karma. On the whole, it appeared to be a fairly mechanical soul-rebirthing process, not a moralistic one. What those mechanisms involve, exactly, is anyone’s guess—even Stevenson’s.
ही पुनर्जन्माची प्रक्रिया मेकॅनिकल दिसते थोडी. म्हणजे, पुनर्जन्माचे पुरावे ग्राह्य धरले तरी कर्मसिद्धांत सिद्ध होत नाही आणि इयन स्टेव्हनसन यांच्या विद्यामध्ये असा कोणताही पुरावा आढळला नाही जो कर्मसिद्धांत सिद्ध करेल. यावर लेजली कीन यांचे एक अलिकडेच उत्तम पुस्तक आले आहे. पुनर्जन्म आणि एकंदरित कॉस्मिक गोष्टी एकमेकांना पूरकच आहेत. गमंत म्हणजे चरकसंहितेत एकंदरीत सेंटिनेल जीव कोण यावर बराच खल केला आहे. या मध्ये मानस, शरीर आणि आत्मा/पुरुष या तीनही वेगवेगळ्या गोष्टी मानल्या आहेत. विषेशतः मानवी जन्माची प्रोसेस वाचताना हे लक्षात आले की पुरुष हा गर्भात मिसळतो. (का मिसळला जातो?) नुकतेच विश्व हे लोकल आणि रियल एकाच वेळेस असू शकत नाहीत या संशोधनाच्या कर्त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. यावरून आपल्याला एकंदरीतच काहीही झ्याटभर सुद्धा माहित नाही असे वाटते इतके सगळे बिझार आहे. कुछ तो गडबड है दया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

पुस्तकाचा संदर्भ

सतिश गावडे
Tue, 03/05/2024 - 09:53 नवीन
यावर लेजली कीन यांचे एक अलिकडेच उत्तम पुस्तक आले आहे.
या पुस्तकाचा संदर्भ/दुवा देता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर

पुस्तकात पुरावा नाहीच

स्वधर्म
Tue, 03/05/2024 - 16:30 नवीन
तुंम्ही दिलेल्या दुव्यावरून पुस्तकाची माहिती व परिक्षणे वाचली. पुस्तक चांगली भरपूर माहिती गोळा करूनच लिहिले आहे, पण परिक्षणे मात्र संमिश्र आहेत. काही लोकांना हे पुस्तक ‘रोचक’ वाटलेले आहे. काहिंनी त्याला अपूर्व योगायोगांची जंत्री म्हटले आहे तर काहिंनी सदर लेखक हे वैद्यकिय विषयातले एम. डी. आहेत का असा संशय व्यक्त केला आहे. एकूणात, हे पुस्तक हा पुनर्जन्माचा ठोस पुरावा आहे, असे मात्र मानता येणार नाही, असे वाटते. त्याचे कारण म्हणजे या पुस्तकातून पुनर्जन्म हे एक नैसर्गिक फेनॉमेननच आहे, असे सिध्द होत नाही. तो एक वेगवेगळ्या संस्कृतीत आढळणार्या ‘समजां’चा अभ्यास म्हणून फार तर समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय घटितांचा अभ्यास म्हणता येईल. अर्थात, मी पुस्तक वाचले नाही, पण पुस्तकातील विभाग व परिक्षणे वाचून असे जाणवते. समजा पुनर्जन्माची काही जैविक प्रक्रिया किंवा अगदी मानसिक प्रक्रियासुध्दा कुणाला सापडली असती, आणि लोकांना ती अनुभवून अथवा कुणा सब्जेक्टवर सिध्द करून पाहता आली असती, तर पुरावा आहे असे मानता आले असते. तुंम्ही आधीच पुनर्जन्मावर तुमच्या धार्मिक श्रध्देमुळे विश्वास ठेवत असल्यामुळे कन्फर्मेशन बायस तय़ार होऊन हे पुस्तक तुंम्हाला पुरावा वाटत असणे सहज शक्य आहे. सयामी जुळे का होतात अशासारख्या संख्याशास्त्रीय दृष्ट्या अगदी कमी आढळणार्या गोष्टीसुध्दा सिध्द करता येतात. पण ते असते हे प्रत्यक्ष दिसते, व का व कसे होते हे कुणालाही पडताळून पाहता येते. तसा काही पुरावा या पुस्तकात असल्याचे वाचक म्हणत नाहीत. कर्मविपाक कल्पना सिध्द होणे हे तर फार फार पुढचा टप्पा झाला. कर्मविपाक कल्पना जर हे जर नैसर्गिक घटित असतं तर मानवाला इतक्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत त्याचा उलगडा झाला असता, असे ववाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा

हम्म!

राघव
Mon, 03/04/2024 - 23:20 नवीन
पुरावे कदाचित ढीगभर दिले जातील आणि सरळ नाकारलेही जातील. कोणतीही गोष्ट आपल्याला अनुभवाला आली नाही/येत नाही म्हणून ती नसतेच ही मानसिकता चुकीची आहे इतकंच. पुनर्जन्माबद्दल मांडणारी दोन पुस्तकं आहेत. दोन्ही जबरदस्त आहेत. अर्थात् हे कर्मविपाकाबद्दल बोलत नाहीत पण कर्मफला बद्दल बोलतात. मननीय आहेत. मेनी मॅन्शन्स - लिंक मेनी लाईव्ज, मेनी मास्टर्स - लिंक नाकारायला काहीच लागत नाही. पण पटलं तर मान्य करायला खूप काही लागतं. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

चांगला प्रतिसाद.मलापण भारतीय

Bhakti
Fri, 03/01/2024 - 20:12 नवीन
चांगला प्रतिसाद.मलापण भारतीय तत्वज्ञान समजून घ्यायला खुप आवडतं.पण कर्मविकाप सिद्धांत आणि पुनर्जन्म आले की बुद्धीभेद होतो.सुवर्णमध्य म्हणतात तो तरी कुठवर साथ देणार?शेवटी मनाशी प्रामाणिक राहत पुढे जायला आवडतं, अवलंबले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

'सत्य' निखळ स्वरूपात सांगण्यापेक्षा काल्पनिक गोष्टींतून सांगणे

चित्रगुप्त
Fri, 03/01/2024 - 23:01 नवीन
बहुतांश लोकांना - अगदी लहान मुलांसकट - कुणी उपदेश केलेला सहसा आवडत नाही (अपवादः एकाद्याला अतिशय आदरणीय असलेल्या व्यक्तिकडे मुद्दाम उपदेश ग्रहण करायला म्हणून गेल्यावर लाभणारा उपदेश) परंतु तोच उपदेश अप्रत्यक्ष रीत्या, गोष्टींच्या स्वरूपात सांगितला गेला तर तो भावतो. उदा. इसापनीति, कथासरित्सागर, जातककथा, रामायण, महाभारत वगैरेतील कथांमधून होणारा बोध. --- याबद्दल माझे अनुभवः माझी सुमारे चार वर्षांची नात कारमधून बाहेर जाताना पट्टा लावणे, रात्री दात घासणे वगैरे अजिबात करायला तयार नसायची. मग मी तिला अमूक नावाची एक मुलगी होती, ती पट्टा लावायची नाही, मग एक दिवस ती गाडीतून पडली, आणि तिला खायला वाघ, सिंह, मगर, कोल्हा, अजगर...... ( लांबलचक यादी) प्राणी जमा झाले आणि तिला चावू लागले, मग बाबांनी येऊन त्या प्राण्यांना हाकलून लावले, दवाखान्यात जाऊन कडू औषध घ्यावे लागले..... मग ती पट्टा लावू लागली... वगैरे लांबलचक गोष्ट सांगायचो. मग तीच गोष्ट अगदी रोज सांगावी लागायची, आणि त्यात माझी जराशी चूक झाली, की ती मला थांबवून आबा, कोल्हा राहिला.. वगैरे दुरुस्ती करायची. मात्र याचा परिणाम म्हणून ती न चुकता पट्टा लावू लागली. -- मग दात घासण्याबदल आणखी वेगळी गोष्ट (यात दातात अडकलेले अन्न खायला रात्री खूप किडे तोंडात यायचे, आणि ते खाऊन तिथेच शी-सू करायचे त्यामुळे तोंडातून खूप घाणेरडा वास यायचा वगैरे...) रात्री लवकर झोपण्याबद्दल, पौष्टिक खाण्याबद्दल, छोट्या बहिणीला त्रास न देण्याबद्दल अश्या अनेक त्याच त्याच गोष्टी रोज सांगाव्या लागायच्या पण त्या सर्वांचा यथायोग्य परिणाम झाला. माझ्या कल्पकतेलाही अफाट कुरण लाभले. ..... अमूक एक सत्य त्याच्या निखळ स्वरूपात सांगण्यापेक्षा विविध काल्पनिक गोष्टींच्या स्वरूपात रंगवून सांगितले, तर ते अधिक परिणामकारक ठरते, या अनुभवातूनच जगभरातल्या सर्व संस्कृतींमधे विविध पौराणिक/धार्मिक कथा जन्माला आल्या असाव्यात, असे मला माझ्या अनुभवावरून तरी वाटते. काल्पनिक साहित्य, चित्रे, गाणी वगैरेंचा जनमानसावर किती घट्ट परिणाम होत असतो याचे एक उदाहरण: माझे लग्न झाले, तेंव्हा माझ्या सुशिक्षित बायकोची अशी समजूत होती, की राम, सीता, कृष्ण, शंकर, लक्ष्मी, सरस्वती वगैरे देव खरोखर अस्तित्वात असून ते कॅलेंडरात वगैरे दाखवतात, हुबेहूब तसेच दिसतात. मग मी सांगितले की ही सगळी चित्रकारांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे रंगवलेली चित्रे असून ती प्रिंटिंग प्रेस मधे छापली जातात. या गोष्टीचे तिला खूप आश्चर्य वाटले होते. 'रामायण' सिरीयलमधील अरूण गोविल वगैरे अभिनेत्यांना लोक देव का मानायचे याचा उलगडा यातून होतो. माझ्या ओळखीच्या एका सुशिक्षित ख्रिस्ती माणसाची 'गॉड' हा एक पांढरी, भव्य दाढी असलेला वृद्ध असून तो आकाशात खूप उंचावर रहातो, अशी पक्की समजूत अजूनही आहे. थोडक्यात काय, तर काल्पनिक गोष्टींना सत्य मानणारे लक्षावधी लोक सर्व काळात असतात, आणि त्यांना त्याच स्वरूपात सांगितलेले पटत असते. त्यांना कितीही समजावले तरी उपयोग होत नसतो म्हणून त्यांना पटेल, अशा स्वरूपातच सांगणे आवश्यक ठरते.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला

मुक्त विहारि
Sat, 03/02/2024 - 15:13 नवीन
प्रतिसाद आवडला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

मतभिन्नतेच्या आदरासहित

वामन देशमुख
Sat, 03/02/2024 - 19:55 नवीन
सुविचार "जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते."* - फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअर "जग हे तर्काच्या कर्कश्यतेवर चालत नसून ते व्यवहाराच्या लवचिकतेवर चालत असते." - किरकोळ मिपाखरू वामन देशमुख बोधकथा "आई, मी बाहेर खेळायला जाऊ?" "नको बाळा, बाहेर किती ऊन आहे!" "आई, जाऊ दे नं, मला खेळायचं आहे" "नको रे बाळा, तुला ऊन लागेल!" "तू सारखं असंच म्हणतेस, मला खेळूच देत नाहीस! जाऊ दे नं मला." "जा मर, पुन्हा सांगू नको मला!" वरील "जा मर" या या शब्दप्रयोगातून, आईला आपले मूल उन्हामुळे मरून जावे असे वाटत असेल का? शब्दकोशाधारित व्याकरण तर तसे सांगते. तुम्हाला काय वाटते? तत्वविवेचन ईश्वर आहे की नाही, कर्मविपाक सिद्धांत खरा की खोटा, पुनर्जन्म असतो की नसतो, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या सर्व बाबी सुजाण-अजाण विद्वानांच्या चर्चेचा भाग आहेत. जगाचे व्यवहार त्यावर चालत नाहीत. जगाचे व्यवहार लवचिक, वाजवी, मानवी संवादाधारित देवाणघेवाणीवर चालतात. युक्तिवाद तर्काच्या फूटपट्टीवरच राहून जातो, जगरहाटी मानवी भावनेला धरून पुढे चालत राहते. ईश्वरअस्तित्वाची असत्यता कदाचित तर्क सिद्ध करून दाखवेल, मानवी भावना ते मानेलच याची खात्री नाही. एखाद्या रुग्णाची बरे होण्याची शक्यता, संबंधित औषधोपचाराइतकीच त्या रुग्णाच्या मनाच्या उभारीवरदेखील अवलंबून असते. ती मनाची उभारी येण्यासाठी विज्ञानाकडे ज्ञात उपाय नाही; अध्यात्माकडे अनेक ज्ञात उपाय आहेत. मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे असे विज्ञान म्हणते, "बाबा मी तुला रोज दारू आणून देतो, पण तू आईला मारू नकोस" असे "वास्तव"मधील डेढफुट्या म्हणतो! हे ज्याला उमगले तो नक्कीच शहाणा, ज्याला उमगले नाही तो कदाचित विद्वान किंवा अविद्वान! संदर्भ स्पष्टीकरण *"जर ईश्वर अस्तित्वात नसता, तर त्याचा शोध लावणे आवश्यक झाले असते" हे फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हॉल्टेअरचे वाक्य आहे. "सामाजिक व्यवस्था सुसंस्कृतपणे चालण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व आवश्यक आहे" या त्यांच्या व्यापक भूमिकेचा हा सार आहे. व्हॉल्टेअर हे भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य यांचे पुरस्कर्ते होते व धर्मकारण-राजकारण वेगवेगळे असावे या मताचे होते!
  • Log in or register to post comments

पाप एक भास आहे,एखादी गोष्ट

Bhakti
Tue, 03/05/2024 - 07:39 नवीन
पाप एक भास आहे,एखादी गोष्ट एकासाठी सकारात्मक तर दुसर्यासाठी नकारात्मक असू शकते.-स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

पुनर्जन्म व कर्मविपाक

नठ्यारा
Wed, 03/06/2024 - 20:32 नवीन
स्वधर्म, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. तुमची एकेक विधानं पाहूया. १.
.... या पुस्तकातून पुनर्जन्म हे एक नैसर्गिक फेनॉमेननच आहे, असे सिध्द होत नाही.
यांत अनैसर्गिक काय आहे? २.
तो एक वेगवेगळ्या संस्कृतीत आढळणार्या ‘समजां’चा अभ्यास म्हणून फार तर समाजशास्त्रीय किंवा मानसशास्त्रीय घटितांचा अभ्यास म्हणता येईल.
पूर्वजन्मीच्या आघाताची खूण बालकाच्या चालू जन्मातील शरीरावर उमटणे हा समज नव्हे. ते मानसशास्त्रीय घटीतही नव्हे. हे पुनर्जन्माकडे अंगुलीनिर्देश करणारं वास्तव आहे. पुनर्जन्म माना वा ना माना. ३.
समजा पुनर्जन्माची काही जैविक प्रक्रिया किंवा अगदी मानसिक प्रक्रियासुध्दा कुणाला सापडली असती, आणि लोकांना ती अनुभवून अथवा कुणा सब्जेक्टवर सिध्द करून पाहता आली असती, तर पुरावा आहे असे मानता आले असते.
नेमक्या अशाच शक्यतांचा मागोवा घेऊन शास्त्रज्ञांनी अनेक रहस्ये उलगडली आहेत. त्यांच्या यादीत पुनर्जन्म का नको? निदान यादीत सामील करायला काय हरकत आहे? ४.
आधीच पुनर्जन्मावर तुमच्या धार्मिक श्रध्देमुळे विश्वास ठेवत असल्यामुळे कन्फर्मेशन बायस तय़ार होऊन हे पुस्तक तुंम्हाला पुरावा वाटत असणे सहज शक्य आहे.
मलातरी कन्फर्मेशन बायसची गरज नाही. कोण्या बालकाच्या मनांत पूर्वजन्मीच्या स्मृती अचानक का जागृत होतात, यावर संशोधन व्हायला हवं. बस इतकंच मला वाटतं. पुनर्जन्म असो वा नसो. ५.
कर्मविपाक कल्पना सिध्द होणे हे तर फार फार पुढचा टप्पा झाला.
न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतावर आक्षेप असणे म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीवर आक्षेप घेणे नव्हे. न्यूटनचा सिद्धांत अमान्य असला तरी डोंगरावरून दरीत कोणी उडी मारीत नाही. वस्तू खाली पडतात ही सार्वत्रिक अनुभूती आहे. तद्वत कर्मविपाक ही सार्वत्रिक अनुभूती आहे. ६.
कर्मविपाक कल्पना जर हे जर नैसर्गिक घटित असतं तर मानवाला इतक्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत त्याचा उलगडा झाला असता,
तसा झालाय. म्हणूनंच कर्मसिद्धांत विकसित झाला आहे. केवळ हिंदूंतच नाही तर जगातल्या इतर पंथोपपंथांतही कर्मविपाक आहेच. असो. या घडीला पुनर्जन्म ही अमन्य वा अमान्य करायची गोष्ट नसून अधिक संशोधन करायचा विषय आहे. बाकी, भूक तहान वगैरे बाबी दिसंत नसल्या तरी अस्तित्वात असतात. तसाच कर्मविपाकही अस्तित्वात आहे. पुनर्जन्म ही त्याची पडछाया आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

झालं तर मग

स्वधर्म
Fri, 03/08/2024 - 20:16 नवीन
आपण म्हणता तसे, पुनर्जन्म ही मान्य किंवा अमान्य करण्याचा विषय नसून अधिक संशोधन करण्याचा विषय आहे. असो बापडा, आमच्यासारख्यांची काहीही हरकत नाही. ज्यांना त्यात रस असेल ते करोत की संशोधन त्यात. आमच्यासारख्यांसाठी महत्वाचं हे की त्याचा आंम्हाला (किंवा तुंम्हाला) काही पडताळा येतो का, काही उपयोग होतो का? हे तुमच्या बाबतीत तर तुंम्ही काही सांगितले नाही. पडताळणी शक्य नसल्याने त्यावर घातलेला वाद हा निव्वळ बौध्दिक करमणूक आहे. फक्त कुणी त्याचा आधार घेऊन चुकीच्या समजूतीपायी आपल्या अन्यायकारक परिस्थितीचा दोष मागील जन्मातील कर्मावर ढकलून अन्याय, शोषण याविरूध्द काही करण्याचे टाळू नये. बाकी सकाळी भरपूर नाष्टा केल्यामुळे दुपारी कडकडून भूक लागणार नाही, इतपत कर्मविपाकावर विश्वास आहेच मुळी. फक्त ते आधीच्या जन्मातलं आहे ना, त्याचा प्रॉब्लेम आहे बघा. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर, गणितात तीन पेक्षा जास्त व्हेरिएबल आले, तरी ते सोडवणं किती अवघड बनतं. आपण राहतो त्या जगात तर अनंत चल घटक आहेत आणि ते सतत परस्परांवर परिणाम करत राहतात. यामुळे एखादी भाग्य व दुर्भाग्यकारक घटना घडली तर कोणतेतरी अत्यंत गुंतागुंतीचे आपल्या मानवी क्षमतेने उलगडा न होऊ शकणारे कारण असणार, हा विचार पुरेसा आहे. यावर आपल्या मागील जन्मातल्या कर्माचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे, त्यावर फोकस करून चालणंच महत्वाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नठ्यारा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा