आदर्श पत्नी

सरिता बांदेकर's picture
सरिता बांदेकर in जनातलं, मनातलं
18 Dec 2022 - 8:52 pm

आदर्श पत्नी

“मॅम,आज सकाळी दोन मिटींग आहेत.एक ११.३० वा.शेळकेंबरोबर आणि १२ वा. डिसोझांबरोबर.
तुमच्याकडे कुणाला पाठवू?”मॅगीने स्टेफीला विचारलं.
“एक काम कर तू भूषणला विचार आणि ठरव.मला फक्त जरा वेळ बॅंकेत जाऊन यायचं आहे.”स्टेफीने मॅगीला सांगितलं आणि ती बॅग घेऊन बाहेर पडली.
स्टेफीला बॅंकेतून यायला जरा उशीरच झाला.तिने आल्या आल्या बघितलं वेटिंग एरियात कुणीच नव्हतं.मॅगी पण जागेवर नव्हती.मग तिने आपला मोर्चा भूषणच्या केबिनमध्ये वळवला.पण तिकडे भूषण एकटाच विचारात गढून गेला होता.
स्टेफी दरवाजा उघडून आंत गेली,भूषण समोर खूर्चीवर बसली तरी त्याची तंद्री तुटली नाही.
“सॅारी भूषण,बॅंकेत आज खूपच गर्दी होती.दोन्ही क्लायंट येऊन गेले का?”
“हं.काही हरकत नाही गं.तसं डिसोझांचं काम काही खास नव्हतं.तेच नेहमीचं त्यांच्या मुलीला कुणीतरी स्टॅाक( पाठलाग) करतंय.त्याची माहिती काढायची होती.पण ते शेळके ,त्यांचं काम जरा विचित्र आहे.मी त्याचाच विचार करतोय.”भूषण बोलत होता पण त्याचं बोलण्याकडे लक्ष होतं की नाही असं वाटलं स्टेफीला.
“का काय झालंय?तू घेतलंस का ते काम?”
“नाही मी त्यांना उद्या बोलावलंय.बराच वेळ तुझी वाट बघितली.मग त्यांना सांगितलं तुझ्याशी बोलून घेतो आणि सांगतो ,केस आम्ही घेणार की नाही ते.आम्ही फोन करू तुम्हाला आमचं ठरलं की.”भूषणनी स्टेलाला सांगितलं.
“अरे पण केस काय आहे ते तर सांग.” स्टेफीच्या बोलण्यावर भूषण म्हणाला,”आपण आधी जेवून घेऊया.मग सांगतो तुला सगळं.”
“मॅगी,चला आपण सगळेच लंच करूया.मॅगी तू काय आणलंयस?मला आज केतकीनी भेंड्यांची भाजी दिलीय.”भूषण मॅगीला हाक मारत केबीन बाहेर आला.
लंच झाल्यावर भूषणनी मॅगीला सांगितलं,”मॅगी तू पण केबीनमध्ये ये.एक वेगळीच केस आलीय.तुझी पण मदत लागेल.”
मिटींग सुरू झाली.”स्टेफी,आज शेळके एक जगावेगळी केस घेऊन आले.ती घ्यायची की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे.”भूषणनी सुरूवात केली.
“अरे पण जगावेगळी म्हणजे काय?”स्टेफीने विचारलं.तिची उत्सुकता ताणली होती.तिला आता लवकर सगळं जाणून घ्यायचं होतं.
“अगं त्या शेळकेंचा एक मित्र आहे.त्याची बायको आधी खूप बंडखोर होती.पण ते दोघं १५ दिवस कुठेतरी जाऊन आले आणि तिच्यात एकदम विचित्र बदल झालाय.ती एकदम आज्ञाधारक झालीय.जराही भांडत नाही एकदम आदर्श बायको.शेळकेला पोलिसांकडे जायचं नाहीय.त्याला या रहस्यमय बदलाचा मागोवा घ्यायचा आहे.पण कुणाच्याही नकळत.म्हणून तो आपल्याकडे आलाय.आता तुम्ही दोघी काय करायचं ते सांगा.एक स्त्रीच एका स्त्रीमधील बदल समजून घेऊ शकेल असं मला वाटतं.”भूषणनी प्रस्तावना केली.
“ पण तिच्यामध्ये जर हा बदल झाला असेल तर लोकांना संशय का यावा?ती शांत झाली.आदर्श वागू लागली तर त्यात एव्हढं संशय येण्यासारखं काय आहे?आणि त्यामुळे त्यांचा संसार सुखाचा होईल ना.”स्टेफीला जरा शेळकेंचं वागणं विचित्र वाटलं.
“मॅम,सर,मला वाटतं आपण शेळकेंना बोलवून घेऊया आणि नीट सगळं समजून घेऊया.त्यांना यात सगळं विचित्र का वाटतंय.मला वाटतं तसंच काही तरी संशयास्पद असेल त्याशिवाय कुणी एव्हढी फी देऊन चौकशी कशाला करेल?शेळकेंना नक्की त्या बाईंबद्दल काळजी वाटतेय का मित्राबद्दल असूया ते बघायला पाहिजे असं मला वाटतं.”मॅगीनी शांतपणे सांगितलं.
“गुड पॅाईंट मॅगी.तू अचूक सल्ला दिलास.तू त्या शेळकेंना फोन कर आणि त्यांना बोलवून घे.”स्टेफी खूष होऊन म्हणाली.
दुसऱ्या दिवशी शेळके आले तेव्हा मिटींगसाठी मॅगी,स्टेफी आणि भूषण तिघेही तयार होते.
“ मि.शेळके,आम्ही ही मिटींग रेकॅार्ड करणार आहोत.म्हणजे व्हिडिओ रेकॅार्डिंग करणार आहोत.तुमची काही हरकत?” मॅगीने प्रोसीजरप्रमाणे शेळकेंना विचारलं.
“ओके.नो प्रॅाब्लेम.” शेळकेंनी सांगितलं.
“मि.शेळके,तुम्ही जी केस आणलीय ती जरा जगावेगळी आहे.एखादी बाई जर आज्ञाधारक बायको असेल तर त्यात तुम्हाला संशय येण्यासारखं काय आहे?तुमचा मित्र लक्की आहे असं समजा.त्यात इन्व्हेस्टीगेशन(शोध) घेण्यासारखे काय आहे?”भूषणनी विचारलं.
“तसं नाही भूषण सर,माझा मित्र संकेत हा बायकोच्या भांडखोरपणाला कंटाळून रोज दु:खी असायचा.ॲाफीस संपलं की बारमध्ये जाऊन बसायचा.सकाळी ॲाफीस सुरू व्हायच्या दोन तास आधीच पोचायचा आणि टेबलवर डोकं ठेवून झोपायचा.शेवटी तर एक वेळ अशी आली होती की संकेतला घेऊन त्याचा मामा त्याच्या डॅा.मित्राकडे गेला.पाच सहा महिने काय काय उपाय चालू होते पण संकेतच्या बायकोचा संशयी आणि भांडखोर स्वभावात काहीच बदल होत नव्हता.मग संकेतनी आमचं ॲाफीस सोडलं आणि थोड्या दिवसांपूर्वी आमची भेट झाली.संकेत एकदम खूष होता.संकेतची बायको सायली पण शांत होती.संकेतच्या बोलण्याप्रमाणे सर्व करत होती.काहीच तणाव जाणवत नव्हता.संकेतनी आम्हा मित्रांना जेवणाचे आमंत्रण दिले.जेवताना लक्षात आले की काही संकेतनी सांकेतिक इशारे केले की त्याची बायको रिॲक्ट व्हायची.ती शांतपणे आम्हाला दारू देत होती.चखणा काय पाहिजे म्हणून विचारत होती.पण हे सगळं यांत्रिकपणे चालू होतं.तुम्हीच सांगा कुणी बायको कधी स्वत:च्या हातानी दारू देईल का?तिच्याकडे बघून असं वाटत होतं की ही यांत्रिकपणे किंवा कशाच्या तरी दबावाखाली सगळं करतेय.मला असं वाटतं की याच्या मुळाशी गेलंच पाहिजे.कदाचित तीचं स्वत:चं काही तरी गुपित असावं ते लपवण्यासाठी इतके कृत्रिम वागत असावी.किंवा संकेत तिला ब्लॅकमेल करत असावा.जी बाई नवऱ्याच्या मित्रांना साधा चहा करून द्यावा लागला तरी आकांडतांडव करायची ती शांतपणे दारू देतेय.आग्रहाने जेवण वाढतेय.सगळंच अगम्य होतं.एखाद्या व्यक्तीमध्ये एव्हढा बदल होऊ शकतो?”
मि.शेळकेंनी एका दमात सर्व सांगायचा प्रयत्न केला.
“काय स्टेफी तुला काय वाटतंय?”भूषणनी विचारलं.
स्टेफी थोडी विचारात पडली होती.खरंच जगावेगळी केस आहे.स्टेफीने मि.शेळकेंना थोडावेळ बाहेर थांबायला सांगितलं.शेळके बाहेर गेल्यावर,
“मला असं वाटतं,आपल्यापैकी एकानी संकेत आणि त्याच्या बायकोला भेटायला पाहिजे.मग दुसऱ्यानी भेटून घ्यायचं वेगवेगळ्या कारणासाठी.नंतर आपल्याला काय वाटतं ते ठरवू .भूषण तू सांग त्यांना आपण केस घेतोय त्यांची.आणि भेट कशी घ्यायची ते ठरव.”एव्हढं बोलून स्टेफी केबीन बाहेर गेली.
भूषणनी मि.शेळकेंना केस घेतल्याचं सांगितलं आणि संकेतची भेट कशी होईल ते ठरवायला सांगितलं.
“भूषण सर काहीच प्रॅाब्लेम नाहीय.पुढच्या आठवड्यात माझ्या मुलीचा वाढदिवस आहे त्यावेळी संकेत आणि त्याच्या बायकोला बोलवूया.तेव्हा तुमची ओळख करून देतो.तुम्ही तिघंही याल ना?”शेळके खूष होऊन म्हणाले.
“ नाही आम्ही तिघेही एकत्र नाही येणार.वेगवेगळ्या कारणांनी आम्ही संकेतला वेगवेगळं भेटणार.त्यामुळे आम्हाला केस सोडवायला बरं पडेल.”भूषणनी शेळकेंना सांगितलं.
शेळकेच्या मुलीच्या वाढदिवसाला भूषण केतकी आणि आणि सियाला घेऊन गेला.शेळकेंनी भूषणची ओळख करून देताना बायकोच्या माहेरचा शेजारी म्हणून करून दिली.भूषणची बायको पार्टीमध्ये संकेत आणि त्याची बायको सायली यांच्याबरोबर मैत्री करायचा प्रयत्न करत होती.सायलीला काही विचारलं की उत्तर द्यायच्या आधी संकेतकडे बघायची,त्यानी मान हलवली की ती उत्तर द्यायची.पूर्ण पार्टीभर दोघेपण एकमेकांपासून जराही लांब होत नव्हते.सायलीला लांब नेण्याचा प्रयत्न केला की संकेत तिला स्वत:जवळ ओढून घ्यायचा.
भूषणनी दुसऱ्या दिवशी स्टेफीला सांगितलं,” होय स्टेफी,त्या सायली आणि संकेतचं वागणं रहस्यमय आहे.पण याचा शोध कसा घ्यायचा?मोठं चॅलेंजिंग काम आलंय यावेळी.बरं बाकीच्या केसेसचं स्टेट्स काय आहे?”
“ नाही आता जास्त केस नाहीत आपल्याकडे.आपण तिघं मिळून या केसवर काम करू शकतो.”स्टेफीने भूषणला सांगितलं.
“मला वाटतं मी त्या सायलीच्या पाळतीवर राहते.बघूया काही हाती लागतं का?”
स्टेफीला संकेतच्या घराजवळ रहाणारं कुणीच ओळखीचं सापडलं नाही.मग ती सेल्सगर्ल म्हणून त्यांच्या बिल्डिंगमध्ये गेली.पण सायलीने जाळीचा दरवाजा उघडून सांगितलं.”तुम्ही जा.आम्हाला काही नकोय.”
स्टेफीने तिला वेगवेगळी आमिषं दाखवायचा प्रयत्न केला पण सायली पोपटाप्रमाणे एकच वाक्य बोलत होती,
“आम्हाला काही नकोय.”
स्टेफीनी बिल्डिंगच्या वॅाचमनबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला.तर त्याने सांगितलं,”त्या मॅडम हल्ली एकट्या बाहेर जात नाहीत.एका रिक्षाचा त्यांना धक्का लागला होता.जास्त लागलं नव्हतं पण त्या महिनाभर कुठच्यातरी हॅास्पिटलमध्ये होत्या.तिथून आल्यापासून त्या एकट्या घराबाहेर पडत नाहीत आणि एकट्या असताना कुणाला घरात घेत नाहीत.जे काही काम असेल ते साहेबांच्या समोर करायचं.कामवाल्या मावशी फक्त अपवाद.”
वॅाचमनकडून हे ऐकल्यावर संशयाचे ढग गडद व्हायला लागले.
या रहस्याचा भेद कसा करायचा यांवर भूषण,स्टेफी आणि मॅगीमध्ये रोज चर्चा होत होती.महिना उलटला तरी पुढे काय करायचं हा प्रश्न तसाच होता.शेवटी मॅगीच्या डोक्यात एक कल्पना आली.खरं तर ही कल्पना मॅगीच्या डोक्यात आली तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते.तरी मॅगीने स्टेफीला फोन केला.
“मॅम,मला एक कल्पना सुचलीय आपण त्या संकेत साहेबांच्या मोलकरणीची मदत घेतली तर?”मॅगीनी उत्साहित होऊन विचारलं.
“मॅगी,तुला काय झोपेतसुद्धा तो संकेत आणि त्याची बायकोच दिसते का?पण खरंच तू ग्रेट आहेस.मस्त आयडिया आहे.आपण उद्याच भेटूया तिला.झोप आता शांतपणे.गुड नाईट.”स्टेफी खरंतर अर्धवट झोपेतच होती.
सकाळी ॲाफीसमध्ये शिरल्या शिरल्या मॅगीनी विचारलं,” मग मॅम कधी जाऊया आपण?”
“ कुठे जायचंय?नवीन केस आलीय का?” स्टेफीनी आश्चर्यचकीत होत विचारलं.
“मॅम मी रात्री फोन केला होता ना तुम्हाला आपण त्या संकेतच्या मोलकरणीला भेटून बघूया असं मी सुचवलं होतं.तुम्ही म्हणालात मस्त आयडिया आहे.”मॅगीनी जरा विस्मयानी विचारलं.
“ओह! या या आय रिमेंम्बर नाऊ.मी अर्धवट झोपेत फोन घेतला त्यामुळे विसरून गेले.”स्टेफीनी मॅगीला सांगितलं.
दोघी जणी संकेतच्या सोसायटीच्या वॅाचमनला भेटल्या.वॅाचमननी संकेतच्या मोलकरणीचा फोन नं.दिला.दोघी तिकडेच समोरच्या फूटपाथवर उभ्या राहिल्या.थोड्या वेळानी संकेतची मोलकरीण शेवंता आली.
वॅाचमननी शेवंताला हाक मारून सांगितलं.”शेवंता,तुला भेटण्यासाठी या दोघी बाया कधीच्या थांबल्या आहेत.”
शेवंता जवळ आली तेव्हा मॅगीने जास्त वेळ न दवडता तिच्याशी बोलायला सुरूवात केली.
“हे बघ शेवंता आम्हाला त्या तुझ्या संकेत साहेब आणि सायली मॅडमबद्दल काही माहिती हवी आहे.”
“पण मॅडम तुम्ही कोण?पोलिस तर नाही?मला काही त्रास होणार नाही ना?”शेवंतानी विचारलं.
“नाही शेवंता तसं काही पोलिस मॅटर नाहीय.त्यांना कर्ज पाहिजे आहे म्हणून चौकशी करायची आहे.त्यांच्या घरात दोघंही नोकरी करतात का ,पैशांची तंगी असते का वगैरे बारीक सारीक माहिती पाहिजे आहे.”स्टेफीनी सांगितलं.
“आधी सायली मॅडम नोकरी करायच्या पण आजारी झाल्यावर त्या कुठेतरी महिनाभर गेल्या होत्या तेव्हापासून नोकरी नाही करत.आधी दोघांची खूप भांडणं व्हायची.कचा कचा भांडायचे म्हणजे मॅडमच भांडायच्या.साहेब सारखे घराबाहेर असायचे.पण मॅडम आता एकदम शांत झाल्या आहेत.साहेब पण वेळेत घरी येतात.आणि दोघं अजिबात भांडत नाहीत.मॅडम साहेब सांगतील ते सगळं निमूटपणे ऐकतात.मी तर कधी कधी मजेत मॅडमला गूंगी गुडिया म्हणते.”शेवंतानी भडाभडा सगळं सांगितलं.
“बरं मी काय सांगते ते नीट ऐक.उद्या तू मला तुझी मामी किंवा मावशी म्हणून घेऊन जायचंस.मी दोन तीन दिवस तुझ्याबरोबर येईन.या कामासाठी मी तुला हजार रूपये देईन.”स्टेफीने शेवंताला सांगितलं.
“बाई बाई हजार रूपये?तुम्ही चोरी वगैरे तर नाही करणार ना?”शेवंता जरा साशंक झाली.
“ नाही तू काळजी करू नकोस.असं काहीही होणार नाही.आम्ही बॅंकेचे मॅनेजर आहोत.हे आमचं कार्ड घे.आणि तुला संशय आला तर बिनदिक्कत तू पोलिस स्टेशनमध्ये आमची चौकशी करू शकतेस.”स्टेफीने एक बॅक मॅनेजरचं व्हिजिटींग कार्ड शेवंताला दिलं.दुसऱ्या दिवशी किती वाजता कुठे भेटायचं ते ठरवून मॅगी आणि स्टेला ॲाफीसमध्ये आल्या.
स्टेफी वेशांतर करण्यात तरबेज होती आणि तिला भाषा पण चांगल्या अवगत होत्या.त्यामुळे स्टेफी दुसऱ्या दिवशी शेवंताला भेटली तेव्हा एका म्हाताऱ्या बाईच्या रूपात होती.तिला शेवंतानी ओळखलंच नसतं म्हणून मॅगी तिच्याबरोबर आली होती.
“शेवंता,ही तुझी सीता काकी किंवा मामी तू काय ते ठरव.ही कोल्हापूरहून तुझ्याकडे दोन दिवस रहायला आलीय आणि घरात एकटी बसून काय करणार म्हणून तुला मदत करायला तुझ्या बरोबर आली आहे असं तू सांगायचं.”
“हो चालेल.ही माझी सीता मामी.बरं झालं मॅडम तुम्ही आलात यांच्या बरोबर नाही तर मी ओळखलंच नसतं यांना.”शेवंता अजून सावरली नव्हती.
दोन घरची कामं करून स्टेफी आणि शेवंता संकेतच्या घरी आल्या.दरवाजा शेवंतानीच किल्लीनी उघडला.सायली पुतळ्यासारखी बसली होती.शेवंता आत आली तरी तिला कळलं नव्हतं.
“मॅडम,सॅारी मामी या अशाच बसलेल्या असतात.मी त्यांना जेवण वाढते तेव्हा त्या गुपचूप जेवतात.मी मुद्दाम मीठ घातलं नाही तरी सांगत नाहीत.तसंच अळणी जेवतात मग मीच त्यांना मीठ वाढून देते.फक्त साहेब घरी असतात तेव्हा साहेब जे सांगतील ते करतात.त्यांनी जोक सांगितला आणि हस म्हटलं की हसतात नाहीतर हे असं पुतळा.साहेबांची सगळी कामं मात्र न चुकतां करतात म्हणजे साहेब घरी आले की त्यांचे बूट काढायचे मग त्यांच्या पायात स्लीपर सरकवायची.ते बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेले की बाहेर टॅावेल घेऊन उभं रहायचं वगैरे वगैरे.”शेवंता बोलत होती आणि स्टेफीनी तिच्या नकळत रेकॅार्डर चालू केला होता.हे सगळं ऐकल्यावर भूषण आणि मॅगी काय म्हणतात ते बघायचं होतं.
अलार्म झाला सायली उठली आणि तिने कपाटातून गोळ्यांची स्ट्रीप काढून एक गोळी घेतली.आणि परत जाऊन बसली. ती ना टिव्ही बघत होती ना गाणी ऐकत होती.वाचण्यासाठी कुठे पुस्तकं पण नव्हती.मग सायली दिवसभर वेळ कसा घालवत होती?तिच्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं की बाई आहे का रोबो?त्यांच्या घरात शेवंताचं काम जवळ जवळ तीन तास असायचं पण दोघींमध्ये काहीच संवाद होत नव्हता.
स्टेफी ॲाफीसमध्ये परत आली आणि तिने भूषणला ते रेकॅार्डिंग दिलं.सायलीला तीन तास बघून स्टेफी एव्हढी हादरली होती की तिने मॅगीला सांगितलं,”मॅगी,भूषणला सांग मी घरी जातेय.आपण सर्व उद्या डिस्कस् करू. त्या सायलीला बघून मला हादरल्यासारखं झालंय.तुम्ही रेकॅार्डिंग बघा.ओके बाय.”स्टेफी लगेच तिकडून निघालीच.
भूषण आणि मॅगीनी ते रेकॅार्डिंग परत परत बघितलं.दोन तीन वेळा ते रेकॅार्डिंग बघितल्यावर भूषणला कसली तरी शंका आली.
त्याने मॅगीला सांगितलं,” मॅगी मला वाटतंय मला लक्षात आलंय काय गोलमाल आहे.पण हे असलं सिव्हिलीयन्स(सामान्य नागरिक)च्या बाबतीत होत असेल?तू स्टेफीला सांग उद्या पण तुला तिकडेच जावं लागेल.मी स्टेफीला मेल करून सांगतो तिकडे गेल्यावर काय करायचं ते.”
भूषणनी स्टेफीला मेल करून एका गोळीचं नांव सांगितलं आणि ती गोळी सायली घेत असलेल्या गोळीच्या जागी ठेवायला सांगितली आणि सायली घेत असलेली गोळी चेक करण्यासाठी घेऊन यायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी स्टेफी परत शेवंता बरोबर संकेतच्या घरी गेली.रूममधला कचरा काढताना स्टेफीनी सफाईनी गोळ्या बदलल्या.अलार्म झाला तेव्हा सायलीनी जी गोळी घेतली ती झोपेची होती.त्यामुळे पंधरा वीस मिनीटांत सायली शांत झोपली. शेवंताला वाटलं मॅडमला बरं नाहीय कदाचित त्यामुळे अशी अवेळी झोपलीय.दोघी सर्व काम आटपून घराबाहेर पडल्या तेव्हा सायली गाढ झोपली होती.
स्टेफीने संकेतच्या घरातून आणलेली गोळी भूषणला दिली.तिला पण आता उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती.
“भूषण हा काय प्रकार आहे?तू कुठची गोळी बदललीस?ती गोळी घेतली आणि ती सायली थोड्या वेळात गाढ झोपली.”स्टेफीने भराभर प्रश्न विचारले.पण भूषण लॅपटॅापवर काहीतरी करत होता.त्याने हातानेच स्टेफीला थांब म्हणून खूण केली.
“ येस् मला वाटलंच असंच काही तरी असणार म्हणून.” भूषण एकदम एक्साईट होऊन ओरडला.
“स्टेफी,आर्मीमध्ये युद्ध कैदी असतात ना त्यांच्यावर हा प्रयोग करतात.आधी थोडे दिवस ब्रेन वॅाश करायचा मग हे असं ड्रग्ज देऊन एखाद्या व्यक्तीला ताब्यात ठेवायचं.ती व्यक्ती फक्त ठराविक आवाजाला प्रतिसाद देते.सायलीच्या बाबतीत हाच प्रकार झालेला आहे.आपण ही केस पोलिसांना रिपोर्ट करायला पाहिजे.तेच त्या संकेतला शिक्षा देऊ शकतात.मॅगी तू इ.सावंतना आणि शेळकेंना फोन करून बोलवून घे.”भूषणनी सांगितलं.
इ.सावंत आणि शेळके आल्यावर भूषणनी सर्व केस दोघांना समजावून सांगितली.कदाचित या केससाठी इ.सावंतांची मदत लागली असती तर त्यांना आधीच सगळी कल्पना देऊन ठेवावी,असं भूषणचं आणि स्टेफीचं ठरलं.
संकेत आणि सायलीची भांडणं होत होती तेव्हा जो कुणी मध्यस्थी होता त्याची चौकशी करायला लागणार होती.त्या गोळ्या लॅबमधून टेस्ट करून रिपोर्ट काढायला लागणार होता ते सगळं करायला पोलिसांची मदत लागणार होती.असं कुणा व्यक्तीचं ब्रेनवॅाशींग करणे आणि माणूस आपल्या कंट्रोलमध्ये रहावा म्हणून बंदी असलेली औषधं देणे हा गुन्हा होता.
संकेत आणि सायलीची भांडणं सोडवायला नेहमी येणारी व्यक्ती म्हणजे संकेतचा मामा.पण त्याचं बॅकग्राऊंड क्लिअर होतं.मग संकेतच्या सगळ्या मित्रांची चौकशी झाली.पण कुणीही असं नव्हतं ज्याने संकेतला असा सल्ला दिला असेल.मग सायलीचा दोन वर्षांपूर्वी रिक्षाचा अपघात झाला होता त्या हॅास्पिटलची चौकशी झाली पण तिकडे पण काही सापडलं नाही. तो अपघात झाला तेव्हा त्या जखमी अवस्थेतसुद्धा सायली भांडत होती.मग असं काय झालं की ती एकदम एव्हढी शांत झाली याचा शोध लागला की सगळी कोडी उलगडली असती.
या सगळ्यासाठी शेवंताची मदत घ्यावी यांवर इ.सावंत,स्टेफी आणि भूषण यांचे एकमत झाले.
शेवंताला घेऊन मॅगी ॲाफीसमध्ये आली.तिला सर्व गोष्टींची कल्पना दिली तेव्हा तिला शॅाक बसला.’बापरे नक्की कोणावर विश्वास ठेवायचा?’ ती विचार करत राहिली.
शेवंताच्या मदतीने सायलीच्या गोळ्या बदलल्या.गोळ्या बदलल्यावर सायलीच्या वागण्यात काही फरक पडतोय का ते बघायला मॅगी दोन,तीन दिवसांनी संकेतच्या घरी गेली.मॅगीच्या सांगण्याप्रमाणे शेवंतानी सायलीला चहा करून दिला.
“हे काय आहे?” सायली आज चक्क शेवंताशी बोलली.
मॅगीने ॲाफीसमध्ये येऊन सांगितलं.”आता आपल्या गोळ्यांचा व्यवस्थित परिणाम व्हायला लागला आहे.आज सायली शेवंताशी बोलली.संकेत देत असलेल्या गोळ्यांचा परिणाम कमी व्हायला लागला आहे.म्हणजे संकेत आता तिला डॅा.कडे किंवा जो कुणी सायलीला ट्रीटमेंट देत होता तिकडे घेऊन जाणार.”
मग संकेतवर पाळत ठेवायची जबाबदारी भूषणच्या पीए ला दिली.तो स्कूटरवरून भूषणवर पाळत ठेवत होता.
पण दोन तीन आठवडे काहीच हालचाल नव्हती.
एक दिवस शेवंता स्वत: ॲाफीसमध्ये आली.शेवंताला काही तरी सांगायचे होतं.
शेवंतानी स्टेफीला सांगितलं ,”आज मॅडमनी साहेबांना सांगितलं मी आता गोळ्या घेणार नाही.मला त्या गोळ्यांचा त्रास होतो.मग साहेबांनी कुणाला तरी फोन केला आणि सांगितलं की पेशंट नॅार्मल व्हायला लागला आहे.समोरून काय सांगितलं माहित नाही.पण साहेब म्हणाले ठीक आहे आज रविवार म्हणजे तुमचं क्लिनिक बंद आहे तर ऊद्या येतो सकाळी अकरा वाजता.”
भूषणनी हे सगळं इ.सावंतना सांगितलं आणि ऊद्या तुमची मदत लागेल हे सांगून ठेवलं.
दुसऱ्या दिवशी संकेत आणि सायली निघाले तेव्हा भूषण आणि स्टेफी त्याच्या मागे निघाले.संकेतची गाडी आता हायवेवर वळली.गावाबाहेर चाळीस किलोमीटरवर आल्यावर संकेतची गाडी एका कच्च्या रस्त्यावर वळली.तीन किलोमीटर आत आल्यावर गाडी भूषणच्या नजरेतून सुटली.मग स्टेफी आणि भूषण गाडी तिथेच सोडून पायी चालू लागले.झाडीतून आंत गेल्यावर एक पडका किल्ल्या सारखं काही तरी होतं.
आता सगळंच रहस्यमय वाटायला लागलं होतं.भूषणनी आपली जीपीएस् लोकेशन इ. सावंतना पाठवलं आणि रेकॅार्डिंग सुरू केलं होतं.
त्या पडक्या किल्ल्याच्या आंत एक बंगला होता.म्हणजे तो पडका किल्ला मुद्दाम लोकांची दिशाभूल करण्यासाठी होता.भूषणनी बघितलं कुठे कॅमेरे लावलेत का.पण बहुदा आतल्या लोकांना पक्की खात्री होती इकडे कुणी येणार नाही याची.कुठेही कॅमेरे लावलेले दिसत नव्हते.
कुठेही कॅमेरे दिसत नसले तरी भूषण आणि स्टेफी दबक्या पावलांनी बंगल्याच्या जवळ पोचले.स्टेफीने खिडकीतून आत बघितलं तर एक बाई कॅाटवर बसल्या होत्या आणि कसला तरी आवाज येत होता.कसलं तरी रेकॅार्डिंग वाजत होतं.कसल्या तरी सूचना होत्या.ती बाई पुतळ्यासारखी बसली होती.जणू रोबोट.
भूषणनी ज्या खिडकीतून बघितलं तर तिकडे पण तेच चित्र होतं.
इतक्यात भूषणचं लक्ष संकेतकडे गेलं.तो वेटींग रूम सारख्या रूममध्ये बसला होता.थोड्या वेळातच एक माणूस संकेतला घेऊन आतल्या खोलीत गेला.भूषणला काही कळत नव्हतं काय चाललंय पण स्टेफी दुसऱ्या बाजूने ज्या रूमच्या खिडकीजवळ आली तिकडे सायली एका खूर्चीवर बसली होती.त्या माणसाने संकेतला सांगितलं,
“मी परत हिला संमोहित केलं आहे.तू तुझा आवाज तिच्यापर्यंत पोचव.”मग त्या माणसाने सायलीला सांगितलं,
“सायली,आता तू जो आवाज ऐकशील तो तुझा मालक आहे.तू त्याचंच ऐकायचं.त्याच्याशी भांडायचं नाही.त्यानी केलेली आज्ञा भंग करायची नाही.”
म्हणजे सायलीमध्ये जो बदल झाला होता तो या माणसाच्या ट्रीटमेंटमुळे होता तर.
आता स्टेफी आणि भूषण आत घूसले.त्या माणसाला गनपॅाईंटवर एका खुर्चीत बसवलं आणि विचारलं,
“ हे काय चाललंय?”तेव्हढ्यात इ. सावंत आपल्या टीमला घेऊन आले.त्यांनी ॲम्ब्यूलंस बोलवून घेतली आणि तिकडे ज्या पंधरा स्त्रिया होत्या त्यांना आधी हॅास्पिटलमध्ये पाठवलं.
आता त्या माणसाची चौकशी सुरू केली.त्याने जे सांगितलं ते अतिशय भयानक आणि माणूसकीला काळीमा फासणारं होतं.त्याचा जबाब होता.
“मी डॅा.धायगुडे.मी सैन्यात होतो पण मला तिथून कोर्टमार्शल करून हाकलून लावलं.माझा गुन्हा एकच होता,मी संमोहन शास्त्राचा अभ्यास केला आणि त्याचा उपयोग करून मी अनेक स्त्रीयांना वश करून त्यांना गुलाम बनवले.सैन्यातून हाकलल्यावर मी या गावात आलो.सैन्यातल्या सवयीप्रमाणे रोज लांब फिरायला जायचो मग ही जागा सापडली.मग बाहेरच्या पडक्या भिंती तशाच ठेवून मी आत हा बंगला बांधला.आणि मग अशा लोकांच्या शोधात फिरायला लागलो जे आपल्या बायकोच्या अत्याचाराला कंटाळले होते किंवा ज्यांना आपल्या बायकोला आपल्या कह्यात ठेवायचं होतं.तेव्हाच एकदा कधीतरी मला संकेत एका बारमध्ये दिसला.मी त्याच्यावर पाळत ठेवली.माझ्या लक्षात पहिल्याच दिवशी आलं होतं की हा दारू प्यायला इकडे येत नाहीय तर वेळ घालवायला येतोय.संकेत दारूचा एक पेग प्यायचा पण बारमध्ये दोन तीन तास बसायचा.मग मी त्याच्याशी मैत्री केली.त्यावरून मला कळलं की संकेतची बायको संशयी आणि भांडखोर आहे आणि बायकोपासून दूर रहाण्यासाठी बारमध्ये बसायचा.कधी कधी पेग संपवायचा पण नाही.मग मी त्याला विश्वासात घेऊन सांगितलं की मी त्याचा हा त्रास दूर करू शकतो.पहिल्यांदा त्याचा विश्वास नव्हता पण एक दिवस मी त्याचा मित्र म्हणून त्यांच्या घरी गेलो.मी आधीच संकेतला गोळ्या दिल्या होत्या त्या त्यानी कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळल्या.आम्ही दोघं दारू प्यायलो आणि सायलीला ते कोल्ड ड्रिंक दिलं मग ते प्यायल्यावर मी तिला संमोहित केलं.तो दिवस ती सगळ्या माझ्या आज्ञा पाळत होती.शांत होती.मग ते बघून संकेतचा विश्वास बसला.”
“पण डॅा. तुम्ही या कुठच्या गोळ्या दिल्यात?”इ. सावंतनी मध्येच विचारलं.
“मी स्वत: त्या गोळ्या तयार करतो.”डॅा. नी सांगितलं.
“ठीक आहे.पण त्या रिक्षाच्या ॲक्सीडंटचं काय?”भूषणनी विचारलं.
“तो ॲक्सीडंट वगैरे काही झाला नव्हता.आम्ही ते लोकांना काही तरी सांगायचं म्हणून सांगत होतो.सायलीला मीच धक्का देऊन पाडलं होतं.मग एका हॅास्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तिकडून इकडे आणलं.ते सगळं लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी होतं.इकडे आणल्यावर तिला प्रथम संमोहित केलं.मग संकेतचा आवाज रेकॅार्ड करून सतत संकेतचा आवाज ऐकवला.आणि दुसरा आवाज ऐकला तर काय करायचं हे पण तिला सतत ऐकवत राहिलो.त्या गोळ्या घेतल्यामुळे तिचा मेंदू कधी संमोहित अवस्थेतून बाहेर येणार नाही याची खात्री होती.दोन वर्ष व्यवस्थित गेली पण या दहा पंधरा दिवसात काय झालं माहित नाही ही सायली परत पहिल्यासारखी व्हायला लागली.म्हणून तिला परत इकडे आणावं लागलं नाही तर एकदा मी संमोहित केलं आणि गोळ्या न चुकतां चालू ठेवल्या की आयुष्यभर बायका आज्ञाधारक आणि आदर्श बायको म्हणून रहातात.”
“पण सायलीचे नातेवाईक?तिची बहिण,भाऊ,आई,वडिल ते या सगळ्यात कुठे आहेत?त्यांना हे सगळं विचित्र नाही वाटलं?” स्टेफीने विचारलं.
“हो त्याची पण तजवीज आम्ही केली होती.त्यांचे आवाज ऐकले की त्यांना काय सांगायचे हे पण आम्ही तिच्या मनावर बिंबवलं होतं.त्यामुळे कंटाळून ते सगळे यायचे आणि फोन करायचे पण बंद झाले.”डॅा.नी सांगितलं
“संकेत,सायलीच्या नातेवाईकांचे फोन नं. दे.स्टेफी तू मॅगीला सांग त्यांना बोलवून घ्यायला.”इ. सावंतनी स्टेफीला सांगितलं.
“सावंत सर,या विकृत माणसाला वाटलं आपण सगळं फूल प्रूफ केलंय.पण शेळकेंना सायलीच्या वागण्याचा संशय आला.या सायलीचं नशीब चांगलं होतं म्हणून शेळकेंना तिची काळजी वाटली आणि त्याने आमच्याकडे या संकेतची कंम्प्लेंट केली.”भूषणनी सांगितलं.
“खरं तर सायलीच्या नातेवाईकांना संशय यायला हवा होता पण ......”
“सावंत सर,ही केस आता तुमची आहे.तुम्ही या डॅा.बरोबर या संकेतलासुद्धा कडक शिक्षा होईल अशी कलमं लावा.बाकीच्या बायकांचे नातेवाईक शोधायला आम्ही तुमची मदत करू.” स्टेफीनी सावंत सरांना सांगितलं.
स्टेफी आणि भूषण परत येताना गप्पच होते.स्टेफीनी शेळकेंना आणि मॅगीला फोन केला आणि सांगितलं.
“ केसचा उलगडा यशस्वीरित्या झाला आणि संकेतसह मुख्य आरोपी गजाआड झाला.”
“पण स्टेफी तू शेळकेंना सांगितलं नाहीस तुमच्या सतर्कतेमुळे आम्हाला ही केस मिळाली.आणि सायलीची बाई शेवंताच्या मदतीमुळे आपण ही केस यशस्वीरित्या पार पाडू शकलो.”भूषणनी स्टेफीला सांगितलं.
“होय भूषण ही केस आपण यशस्वीपणे सोडवू शकलो.पण आता मी लवकर दुसरी केस हाताळू शकेन असं वाट नाहीय.मला थोडे दिवस ब्रेक घ्यावा लागेल.मनाला मरगळ आलीय.बायको आपल्या आज्ञेत पाहिजे असा विचार कुणी कसा करू शकतो?आणि त्यासाठी असा अघोरी उपाय?”स्टेफी म्हणाली.
“ होय सगळं अतर्क्य आणि अघोरी आहे.आणि तू घे सुट्टी.फ्रेश हो दुसरी केस सोनवण्यासाठी तयार हो ,पण मी दुसऱ्या केससाठी तयार आहे.” भूषण म्हणाला.

एक अशक्य वाटणारी केस सोडवल्याचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता........

सौ सरिता सुभाष बांदेकर

कथालेख

प्रतिक्रिया

सामान्यनागरिक's picture

19 Dec 2022 - 12:57 pm | सामान्यनागरिक

१. त्या गोळ्यांचे नांव जाहीर करा.
२. त्या संमोहन करणाऱ्याचा नांव आणी पत्ता द्या.

गोळ्यांची तूफ़ान विक्री होईल आणि संमोहन करणाऱ्याला सुद्धा हजारो ग्राहक मिळतील यात शंका नाही.

सौंदाळा's picture

20 Dec 2022 - 2:22 pm | सौंदाळा

भारीच जमली आहे कथा.

स्मिताके's picture

21 Dec 2022 - 10:25 pm | स्मिताके

मस्त रंगवली आहे रहस्यकथा. कल्पना अशक्य वाटत होती, तरीही उत्सुकता शेवटपर्यंत ताणली गेली. पुढची केस येऊद्या..

सरिता बांदेकर's picture

22 Dec 2022 - 6:18 pm | सरिता बांदेकर

सामान्यनागरीक, धन्यवाद.
गोळ्या मिळतील लवकरच.सध्या त्याची किंमत किती ठेवायची यावर विचार चालू आहे.
सौंदाळा धन्यवाद.
स्मिता के धन्यवाद.

शानबा५१२'s picture

24 Dec 2022 - 12:25 pm | शानबा५१२

कथा फार गुंतवुन ठेवणारी होती. वाचताना उत्कंठा जाणवत होती.

सरिता बांदेकर's picture

25 Dec 2022 - 9:18 pm | सरिता बांदेकर

धन्यवाद शानबा ५१२

मुक्त विहारि's picture

19 Aug 2023 - 5:55 pm | मुक्त विहारि

मस्तच