एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Nov 2022 - 6:07 pm

image host

इव्हॅन तुर्गेनेव्ह
(९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३)
Turgenev: The Novelist's Novelist

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - ४

.....माझ्या चेहऱ्यावरील वेडेवाकडे हास्य, माझे एकदम गप्प बसणे, निघून जाण्याची तीव्र इच्छा हे सगळे माझ्या चेहऱ्यावर उमटले असणार. माझी आतडी एक नाही अनेक कोल्हे कुरतडत होते. हेवा, मत्सर, स्वतःच्या क्षुद्रत्वाची जाणीव, राग हे सगळे कोल्हे मला कुरतडत होते. प्रिन्सचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि उमदे होते हे मात्र मला मान्यच करायला हवे. मी त्याच्याकडे खाऊ का गिळू या नजरेने एकटक पाहात होतो. माझी पापणीही लवत नव्हती. तो काही फक्त लिझ्ााशीच बोलत होता असं नाही पण तो फक्त लिझासाठीच बोलत होता हे निश्चित. मला वाटते त्याला माझ्या उपस्थितीचा कंटाळा आला असणार. लवकरच त्याला त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढावा लागणार होता, पण बहुधा मी त्याच्या दृष्टीने इतका सामान्य होतो की त्याने मला मोठ्या मार्दवतेने वागवले. तुमच्या लक्षात आले असेल की हे मला किती अपमानास्पद वाटले असेल ते!

मला आठवतंय संध्याकाळी मग मी माझी चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. जे हे वाचतील त्यांनी आता कृपया हसू नये. लक्षात घ्या, लिझा माझे स्वप्न होती. असो. माझ्या डोक्यात अचानक साक्षात्कार झाला. देव साक्षी आहे, लिझा मला डिवचण्याचा प्रयत्न करीत होती. मी आल्या आल्या तिच्याकडे उर्मटपणे दुर्लक्ष केले ना म्हणून. ती माझ्यावर चिडली होती आणि म्हणून प्रिन्सच्या जवळ जाऊन मला जळवत होती. मी संधी साधून तिच्या जवळ गेलो आणि पुटपुटलो, “आता हा छळ पुरे झाला.. मला माफ कर! मी तुला विचारले नाही कारण मी घाबरत होतो.” उत्तराची वाट न पाहाता मी चेहऱ्यावर बळेबळे हसू आणून काहीतरी करायचे म्हणून एक हात वर केला. (त्यावेळेस खरे तर मी माझ्या अंगरख्याची बाही सावरत होतो) मी मागे वळून म्हणणार होतो, “संपलंय सगळं! मी खुशाल आहे आणि येथील सर्वही तसेच असावेत अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो!” पण, मी मागे वळलो नाही आणि असे काही म्हणालोही नाही कारण मी धडपडेन अशी मला भीती वाटली कारण लिझासमोर माझे पाय थिजले होते. तिला तर काय चाललंय याची सुतराम कल्पना नव्हती. तिने माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि मला टाळण्यासाठी घाईघाईने ती प्रिन्सकडे वळली. मी विचारात आंधळा आणि बहिरा झाल्यामुळे मी आपला ती माझ्यावर रागावलेली नाही असाच विचार केला. पण ती माझ्याबद्दल विचारच करीत नव्हती. तो आघात सहन करण्याच्या पलिकडचा होता. माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा क्षणात धुळीस मिळाल्या. एखाद्या बर्फाच्या कड्याचा सूर्यकिरणांनी भेद करावा आणि त्याचे क्षणात तुकडे व्हावेत तसे काहीसे झाले. नाही, ती माझ्यावर रागावलेली नव्हती आणि तेच माझे मोठे दुःख होते. मला दिसत होतं तिला कोणी विचारत नव्हते आणि किंमतही देत नव्हते. पूर आलेल्या नदीच्या किनाऱ्यावर एखादे रोपटे उन्मळावे तशी तिची अवस्था झाली होती. ते रोपटे पाण्यावर अर्धवट झुकले होते आणि त्याच्या बहरासकट त्या पाण्याला अर्पण होण्याची त्याची तयारी चालली होती. या अशा भुरळ पाडणाऱ्या प्रसंगांना ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे किंवा अशा प्रसंगांचे जे साक्षी आहेत त्यांना प्रेमाचा कटू अनुभव आला असेल. प्रेमाला प्रतिसाद न मिळणे ही किती भयंकर बाब आहे हे त्यांनाच कळेल. मी तिची जादूई नजर कधीच विसरु शकणार नाही. तिची नाजूक पावले आणि चाल, निरागसपणे स्वतःला विसरणे, तिरपे कटाक्ष, लहान मुलीसारखे पण तारुण्यात पदार्पण करणारे स्मितहास्य जे ओठावर फुलत होते पण विलग झालेल्या ओठातून बाहेर पडत नसे, तिचे लाजणे.. या सगळ्या गोष्टी, ज्याची तिला फक्त पुसटची कल्पना होती, म्हणजे आम्ही जेव्हा बर्चच्या रानात फिरायला गेलो होतो तेव्हा तरी. ती आता प्रेमाला शरण गेली होती आणि द्राक्षाची मदिरा जशी शांत होते तशी ती आता शांत झाली होती.

हा सगळा अत्याचार सहन करत मी त्यादिवशी पूर्ण संध्याकाळ थांबू शकलो. एवढेच नाही तर दुसऱ्या दिवशीही थांबलो पण मला शेवटपर्यंत आशेचा किरण दिसला नाही! उलट प्रिन्स आणि लिझा दिवसेंदिवस एकमेकांच्या जास्तच जवळ येत होते. मी मात्र आत्मसन्मान गहाण टाकला होता. माझे दुःख मी माझ्या ह्रदयाला कवटाळून बसलो होतो. एक दिवस मी तेथे न जाण्याचा प्रयत्न केला. सकाळीच मी स्वतःला शब्द दिला, की मी आज तेथे जाणार नाही. मी घरीच थांबेन पण रात्री आठ वाजता मी एखाद्या वेड्यासारखा तडफडत उठून उभा राहिलो, हॅट डोक्यावर ठेवली आणि पळत सुटलो आणि शेवटी धापा टाकत ओझोगिनच्या घरी पोहोचलो...

माझी भयंकर कुचंबणा होत होती. मी स्वतःवर कठोरपणे बंधने घालून घेतली आणि चूप बसलो. कधी कधी तर मी कित्येक दिवस तोंडातून ब्र काढत नसे. तसाही मी काही फाडफाड बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हतोच म्हणा आणि मी तसं तुम्हाला सांगितलेलेच आहे. पण आताशा प्रिन्सच्या हजेरीत मला तारतम्यच राहात नसे. माझी अवस्था अगदी एखाद्या भेदरलेल्या उंदरासारखी झाली म्हणा ना! शिवाय एकटा असताना मी कालच्या प्रत्येक क्षणाचा अर्थ काढून माझ्या डोक्याचा भुगा पडत असे. इतका की संध्याकाळी जेव्हा मी ओझोगिनच्या घरी पोहोचे तेव्हा लिझाचे आणि प्रिन्सचे निरीक्षण करण्याचीही माझ्याकडे ताकद उरत नसे. एखाद्या आजारी माणसाचे सगळेजण चालवून घेतात तसे ते माझा हा बावळटपणा चालवून घेत होते हे मला स्पष्ट दिसत होते. माझी झोप उडाली. रात्रभर मी तळमळत विचार करीत बसे आणि याच विचारांच्या आधारावर उठल्यावर रोज नवीन कट आखत असे. मी आता लिझाला मित्रत्वाचा सल्ला देण्याचा विचार करू लागलो पण मी जेव्हा तिला एकटीला गाठत असे तेव्हा माझी जीभ टाळ्याला चिकटून बसत असे. शेवटी शांतता असह्य होऊन मग आम्ही कोणीतरी तिसरा माणूस ती शांतता भंग करण्यासाठी येण्याची वाट पाहात असू. मला हे सगळे सोडून तेथून पळून जावेसे वाटे. असे वाटे की एखादे दर्दभरे पत्र तिच्या नावाने लिहावे आणि निघून जावे. मी एकदा ते पत्र लिहिण्यासही घेतले सुद्धा, पण सूडाची आग माझ्या मनात अजून धगधगत होती. मला लगेचच उमजले की मी यासाठी कोणालाच जबाबदार धरू शकत नाही. ते उमजल्यावर मी ते पत्र शेकोटीत जाळून टाकले. नंतर मी विचार केला, जाऊ देत आपणच तिच्या सुखासाठी त्याग करावा आणि उदारपणे लिझाला तिच्या सापडलेल्या प्रेमासाठी शुभेच्छा द्याव्यात.झाल गेलं सगळं विसरून जावं. मी तसे केलेही पण माझ्या त्या निष्ठूर प्रेमिकेने माझ्या बोलण्याकडे साधे लक्षही दिले नाही. आभार तर दूरच राहिले. मग मात्र रागाच्या भरात माझ्या मनात दुसऱ्या टोकाचे विचार येऊ लागले. मी विचार केला की रस्त्याच्या एखाद्या निर्जन कोपऱ्यावर माझ्या या प्रतिस्पर्ध्याचा गळा कापला पाहिजे. नव्हे, तसा मी निश्चयच केला. त्याचा गळा कापल्यावर लिझाचा आक्रोश माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि मी विकट हसलो. पण दुर्दैवाने त्या नतद्रष्ट गावात असा कोपराच नव्हता. जे दोनचार कोपरे होते त्यावर दिवे होते नाहीतर पोलीस तरी उभे असायचे. अशा कोपऱ्यात फक्त पाव विकणेच शक्य होते. रक्तपात तर दूरच राहिला. सूड घेण्यासाठी मग मी इतर काही मार्ग आहेत का याचाही विचार केला. एकदा वाटले तिच्या वडिलांशी या विषयावर बोलावे आणि त्यांना ती कुठल्या धोक्याच्या मार्गावर चालली आहे हे पटवून द्यावे. मी त्यांना एकदा गाठले आणि बोलण्यास सुरवातही केली पण माझे गुळमुळीत बोलणे ऐकून त्यांनी जांभई दिली आणि कंटाळून हातावर हात चोळले आणि निघून गेले.

अर्थात, मी हा विचार करताना मला स्वतःलाच ग्वाही दिली की हे सगळे मी जगाच्या भल्यासाठीच करतोय. यात माझा स्वतःचा कसलाच स्वार्थ नाही. मी माझ्या मित्राच्या कुटुंबियांप्रति कर्तव्यच पार पाडतोय. पण खरं सांगायचे तर ओझोगिन निघून गेले नसते तरीही मला जे सांगायचे होते ते सांगण्याचा धीर झाला असता की नाही याची शंकाच आहे. कधी कधी मी एकदम एखाद्या संतासारखा विचार करून प्रिन्सच्या गुणांचा अभ्यास करीत असे. बऱ्याच वेळा मी माझी स्वतःची समजूत काढत असे की हे तिचे तात्पुरते वेड आहे. लवकरच ती शुद्धीवर येईल आणि तिला कळेल की तिला वाटतंय ते काही खरे प्रेम नाही. मी सांगतो त्या दिवसात मी एकही मुद्दा सोडला नाही. प्रत्येक मुद्द्यावर विचार केला. फक्त एका उपायावर मी विचार केला नाही. प्रामाणिकपणे सांगतो फक्त एकाच औषधावर - आत्महत्या. ते माझ्या डोक्यातच आले नाही. का, ते मी नाही सांगू शकणार. कदाचित त्यावेळीसुद्धा माझ्या मनात, मागे कुठेतरी ‘आता आयुष्य फार कमी राहिले आहे ’ हा विचार ठाण मांडून बसला असावा. पुढे काहीतरी वाईट घडणार आहे याची कल्पना कदाचित माझ्या मेंदूला आली असावी.

आता या अवस्थेत मी इतर लोकांशी कसा वागत असेन याची कल्पनाच केलेली बरी. मी माझ्या जवळ वावरणाऱ्या माणसांशी कृत्रिमपणे वागू लागलो. क्वचित मी उद्धटासारखाही वागत असे. सगळे जग माझे शत्रू असल्यासारखे मला वाटत होते. आता ती म्हातारी..मादाम ओझोगिनही मला टाळू लागली. माझ्याशी कसं वागावं हेच तिला कळेना. बिझमियान्कॉफ जो माझ्याशी नेहमी आदबीने वागायचा आणि माझी कामे करायचा तोही मला आता टाळू लागला. पण त्याच्यात मला एक समदुःखी दिसायचा कारण त्यालाही लिझा आवडायची, असा मला संशय होता. अर्थात त्याने माझ्या चौकशांना कधी दाद दिली नाही आणि माझ्या चौकशांना तो उडवाउडवीचीच उत्तरे द्यायचा. प्रिन्स त्याच्याशी अगदी मित्रत्वाने वागायचा; तोही त्याला आदराने वागवायचा. मी आणि बिझमियान्कॉफ, आम्ही दोघांनीही प्रिन्स आणि लिझाच्या प्रेमप्रकरणात ढवळाढवळ केली नाही पण त्याने माझ्यासारखे त्यांना कधी टाळले नाही. त्याने असा आव आणला होता की तो लांडगाही नव्हता ना शिकार. जेव्हा जेव्हा ते त्याला बोलावत असत तेव्हा तो मोठ्या आनंदाने त्यांच्याबरोबर जात असे. तो कायम आनंदी असे पण त्या आनंदालाही विषादाची किनार होती, म्हणजे मला तरी असं वाटायचं.

अशारितीने दोन आठवडे गेले. प्रिन्स नुसता दिसायला रुबाबदार आणि बुद्धिमान नव्हता तर तो पियानोही उत्कृष्ठ वाजवायचा, चांगले गायचा आणि तो तैलचित्रही उत्तम रंगवायचा. शिवाय त्याला लोकांना भुरळ पडेल अशी बोलण्याची कलाही अवगत होती. राजधानीतील बड्या धेंडांच्या वर्तुळातील किस्से तो रंगतदारपणे रंगवून सांगायचा. ऐकणाऱ्यावर त्याच्या बोलण्याची पटकन छाप पडत असे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे किस्से सांगताना तो अगदी त्रयस्थपणे सांगायचा. जणूकाही गावकऱ्यांपैकीच तो एक आहे. (जरी तो त्या वर्तुळातील असला तरी)

त्याच्या या कपटी, लबाड वागण्याने, त्याच्या त्या मुक्कामात (अर्थात त्या वागण्याला तुम्ही कपट म्हणणार असाल तर) त्याने त्या गावातील सगळ्यांना त्याच्या नादी लावले होते. सधन वर्गातील माणसाला दरिद्री माणसांना नादी लावणे तसेही सोपेच असते म्हणा. प्रिन्स, ओझोगिनच्या हवेलीला वारंवार भेटी देऊ लागल्यावर गावातील इतर प्रतिष्ठितांच्या भुवया वर गेल्या नसत्या तरच नवल. पण बारा गावचे पाणी प्यायलेल्या प्रिन्सने त्यातील एकाही माणसाकडे दुर्लक्ष केले नाही. त्याने त्या सर्वांना व्यक्तिशः भेटून अगदी खूष करून टाकले. तो त्यांच्याकडे जाई, तेथील स्त्रियांची त्यांच्या समोरच सौंदर्याची स्तुती करत असे, किंवा त्याच्या स्वयंपाकाची तोंड फाटेतोपर्यंत स्तुती करे आणि त्या घरातील मद्याचे कौतुक करीत असे. थोडक्यात म्हणजे तो मर्यादेत राहून सगळ्यांना खूष करीत होता. प्रिन्स नेहमी हसतमुख असे. त्याला माणसात मिसळण्यास आवडे. तो स्वभावतःच मनमिळावू आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा होता.

प्रिन्स आल्यापासून मी पाहात होतो, त्या हवेलीतील राहणाऱ्यांचा वेळ कसा उडून जात असे हे त्यांनाच कळत नव्हते. तो आल्यापासून सगळं कसं छान चालले होते. ओझोगिन वरून दाखवत नव्हते पण ते मनोमन प्रिन्ससारखा जावई मिळणार म्हणून स्वतःवरच खूष होते. प्रिन्सही सगळी पावले नीट, विचार करून, शांतपणे टाकत होता पण तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली...

आता थांबतो. आज मला अगदी थकवा आलाय. माझी वर जाण्याची वेळ झाली तरी या आठवणी मला छळतात. ही म्हातारी आज मला म्हणाली की माझे नाक आता चांगले वर आले आहे... त्यांच्या मते हे काही चांगले लक्षण नाही.

मार्च २७; बर्फ अजून वितळतोय.
तर त्या वेळेची परिस्थिती थोडक्यात अशी होती; प्रिन्स आणि लिझा एकमेकांच्या प्रेमात पडले होतेे, लिझाचे आईवडील पुढे काय होणार याची आतुरतेने वाट पाहात होते. या सगळ्यात बिझमियान्कॉफ जागा अडवून होता. त्याच्या विषयी सांगण्यासारखे काही नाही. मी बर्फाच्या लादीवर पडलेल्या मासोळीसारखा तडफडत होतो आणि त्या दोघांवर नजर ठेवून होतो. मला आठवतंय त्या काळात मी स्वतःवर एकच कामगिरी सोपवली होती. ती म्हणजे लिझाला त्याच्यापासून वाचवणे मग त्यासाठी मी लिझाच्या मोलकरणींवर आणि त्या हवेलीच्या मागच्या दरवाजांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. कधी कधी मी रात्रभर, स्वप्नात लिझाचा हात हातात घेऊन उदार अंतःकरणाने तिला म्हणत असे, “त्याने तुला फसवले आहे, पण घाबरू नकोस मी तुझा खरा मित्र आहे. मागचे सगळे विसरुन जाऊ आणि आनंदाने जगू.” अशी स्वप्ने पाहात असतानाच अचानक सगळ्या गावात उत्साह निर्माण करणारी एक बातमी पसरली; गावाच्या मार्शलने त्याच्या हवेलीत, गावात आलेल्या आदरणीय पाहुण्यांसाठी एक मेजवानी आयोजित केली होती. ही हवेली ज्या इस्टेटीत होती त्याचे नाव होते गोर्नोस्टाव्हका. अर्थातच गावातील सगळ्या प्रतिष्ठीत मंडळींना आमंत्रणे गेली. सगळे गाव त्या मेजवानीला जाण्याच्या तयारीला लागले. मेजवानी नुसती नव्हती तर त्याचबरोबर वॉल्ट्झ होता असं कानावर आलं होतं. गावातील दुकानातील पोमेड, अत्तरे संपली. बायकांनी फुगीर झगे बाहेर काढले आणि आपल्या मस्तकासाठी नक्षीदार हॅट निवडण्यास सुरुवात केली. त्या बायका त्या प्रकाराला हॅट का म्हणतात हे आजवर तरी मला कळलेले नाही..

ज्या दिवसाची सगळे गाव आतुरतेने वाट पाहात होते तो दिवस अखेरीस उजाडला. मीही आमंत्रितांपैकी एक होतोच. गावापासून गोर्नोस्टावका अंदाजे सहा ते सात मैल असेल. मि. ओझोगिन यांनी मला त्याच्या घोडागाडीत जागा देऊ केली होती पण मी त्याला नकार दिला. मुले जशी त्यांच्या आईबापांवर सूड घेण्यासाठी टेबलावरील चविष्ट, आवडत्या अन्नाला तोंड लावत नाहीत तसेच काहीतरी. पण मला असेही वाटले की मी गाडीत असल्यामुळे लिझाला बिचारीला अवघडल्यासारखे वाटेल. शेवटी बिझमियान्कॉफने माझी जागा घेतली. प्रिन्स स्वतःच्या आलिशान बग्गीतून गेला आणि मी या सभारंभासाठी खास भाड्याने आणलेल्या बुटक्या, मोडक्या घोडागाडीतून हट्टाने प्रस्थान ठेवले.

त्या मेजवानीचे आणि नाचाचे वर्णन करत नाही कारण ते सगळे नेहमीप्रमाणे झाले. वाद्यवृंदाच्या सज्जात नेहमीप्रमाणे वाद्ये घेऊन कलाकार बसले होते, घरंदाज जमिनदारांची वचवच; रंगी-बेरंगी आईसक्रीम; बदामाचे पेय; उंची पादत्राणे घातलेले आणि हातात विणलेले मोजे घातलेले पुरुष इत्यादि...इ.. आणि ही मेजवानीची छोटीशी दुनिया एका माणसाभोवती फिरत होती-‘प्रिन्स’. मी त्या गर्दीत अगदी विरघळून गेलो. इतका विरघळून गेलो, की थोराड आणि वय वाढलेल्या मुलींनीही माझ्याकडे पाहिले नाही. या गर्दीमधून मी त्या दोघांना अगदी टक लावून न्याहाळीत बसलो. तिने घातलेला पोषाख तिला फारच शोभून दिसत होता. फारच सुंदर दिसत होती ती. ते दोघे एकमेकांबरोबर फक्त दोनदाच नाचले पण त्यांच्यावर लक्ष ठेवताना मला जाणवत होते की ते कितीही एकमेकांपासून दूर असू देत, त्यांच्यात काहीतरी गुजगोष्टी चालूच होत्या. कधी नजरेने, तर कधी पुटपुटत, तर कधी बोलून. तो तिच्याशी प्रत्यक्ष बोलत नव्हता, तिच्याकडे बघतही नव्हता, पण जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकले असते तर तुम्हाला जाणवले असते की तो तिच्यासाठीच आणि तिलाच उद्देशून बोलत होता. ती त्या सभारंभाची अनभिषिक्त राणी होती याची तिलाही जाणीव होती आणि कोणीतरी तिच्याभोवती पिंगा घालत आहे याचीही तिला कल्पना होती. तिच्या चेहेऱ्यावर एकाच वेळी निरागस अभिमान आणि सुख याचे मजेदार मिश्रण चमकत होतं आणि मधेच तिच्या चेहेऱ्यावर जग जिंकल्याची भावना दिसत होती. हे मी सगळं अनिमिष नजरेने पाहात होतो. अर्थात मी काही त्या दोघांना प्रथमच पाहात नव्हतो. पहिल्यांदा त्यांना तसे पाहताच माझ्या ह्रदयात एक बारीकशी कळ उठली आणि काही क्षणात त्याचे रुपांतर रागात झ्ााले. अचानक माझ्या मनात खुनशी भावना दाटून आली. मला आठवतंय त्या भावनेने मला जरा बरं वाटलं होतं. डोक्यावरचे ओझे उतरल्यासारखं वाटलं मला. मी स्वतःला म्हटले, “चल आपण त्यांना दाखवून देऊ की आपण अजून जिवंत आहोत.” जेव्हा मार्झुर्काच्या आमंत्रणाची धून वाजली तेव्हा मी अगदी सहजपणे इकडे तिकडे नजर टाकली आणि एका पांढऱ्याफटक, उभट चेहऱ्याच्या तरुणीला, जिच्या नाकाचा शेंडा लालभडक होता आणि जिची मान लांबुळकी होती, माझ्याबरोबर नाचण्याची विनंती केली. तिने रंग उडालेला गुलाबी पोषाख
परिधान केला होता आणि तिच्या डोक्यावर जुनाट हॅट होती. ही रडक्या चेहऱ्याची मुलगी म्हणजे मूर्तिमंत कंटाळा होता. पहिल्यापासून तिने आपली खुर्ची सोडली नव्हती ना तिला कोणी नाचण्याची विनंती केली होती. मी पाहात होतो, एका तरुणाने तिच्या दिशेने पाऊल टाकले होते पण तिचा अवतार पाहिल्यावर त्याने बहुधा विचार बदलला असावा. तो थबकला व गर्दीत नाहीसा झाला. आता अशा प्रसंगी तिने माझे आमंत्रण किती आनंदाने स्विकारले असेल याची तुम्हाला कल्पना आली असेल..
मी नाटकीपणे तिला त्या हॉलमधे चालवत नेले आणि मार्झुर्काच्या वर्तुळात जाऊन बसलो. १० व्या क्रमांकाची आमची जोडी होती. प्रिन्सच्या बरोबर समोर. अर्थातच त्याला पहिली खुर्ची देण्यात आली होती. मला आणि माझ्या जोडीदाराला गप्पा मारण्यासाठी भरपूर वेळ मिळत होता कारण आम्हाला नाचासाठी कोणी निमंत्रण देत नव्हते. अगदी खरे सांगायचे तर माझी जोडीदारीण म्हणजे एक पात्रच होते. तिला सरळ साधे दोन शब्द बोलता येत नव्हते. ती तिच्या ओठांचा जास्तीत जास्त उपयोग तिच्या ओशाळवाण्या, विचित्र, ओघळणाऱ्या हास्यासाठी करत होती. हसताना ती मजेदारपणे डोळ्याची बुबुळे वर फिरवायची जणू काही एक अदृष्य शक्ती तिचा मुखवटा दोन्ही बाजूला खेचतोय. पण मला अर्थातच ती बोलावी असं वाटतंच नव्हते म्हणा.. नशिबाने माझा खुनशीपणा वाढत होता आणि माझी जोडीदार तो सौम्य करेल अशी शक्यताच नव्हती. मी तिच्याशी बोलताना तोंड सोडले. मी जगातील सगळ्यांना शिव्या दिल्या आणि विशेषतः राजधानीहून आलेल्या नवथर श्रीमंतांवर टीकास्त्र सोडले. ते ऐकताना माझ्या जोडीदाराच्या चेहेऱ्यावरील उसने आणलेले हसू लोप पावले आणि माझ्या बोलण्यातील द्वेष असह्य झाल्यामुळे तिची बुबुळे आता नाकाजवळ ओढली गेली. ती चक्क चकणे पाहू लागली. क्षणभर मला वाटले तिच्या डोळ्यांना बहुधा आजच कळले असावे की त्यांच्यामधे एका नाकाचा अडथळा आहे आणि तो ओलांडण्याचा निकराचा प्रयत्न ते डोळे करत होते. माझा आवाज ऐकून जवळपासचे पाहूणे माझ्याकडे माना वळवून वळवून पाहू लागली. माझे लक्ष अर्थातच लिझा आणि प्रिन्स या जोडीकडेच लागले होते. त्यांना वारंवार नाचण्याची आमंत्रणे मिळत होती. त्या दोघांना नाचताना पाहून मला एवढा काही राग आला नाही. त्यांना गुलुगुलु गप्पा मारताना पाहूनही मला एवढा राग आला नाही. पण लिझा एका माणसाबरोबर नाचण्यासाठी पाठमोरी जात असताना, प्रिन्स तिची शाल मांडीवर घेऊन तिच्या डौलदार हालचाल करणाऱ्या कमनीय बांध्याकडे अधाशासारखा पाहात होता, जणू काही एखाद्या लढाईत जिंकून आणलेली ती मालमत्ता आहे. ते पाहून मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते दृष्य पाहाताना माझ्या तोंडातून अशा काही शिव्या बाहेर पडल्या की त्या ऐकून माझ्या जोडीदाराची बुब्बुळे जवळजवळ एकमेकांना टेकायला आली.

तोपर्यंत मार्झुर्का संपत आला होता. या नाचाच्या शेवटी एक छोटेसे नाट्य असते. यात सगळ्यात सुंदर मुलगी सर्व पाहुण्यांनी केलेल्या वर्तुळात बसते व एका मुलीला तिची प्रतिनिधी म्हणून नेमते. तिच्या कानात ती तिला आता कोणाबरोबर नाच करायला आवडेल हे सांगते. मग सर्व नाचणारे एक एक करून तिच्या समोरून जातात. ती प्रतिनिधी मग तो तोच माणूस आहे का नाही हे सांगते. साधारणतः असा काहीतरी खेळ असतो. अर्थात आजच्या मेजवानीची लिझाच नायिका असल्यामुळे ती वर्तुळात बसली व तिने यजमानांच्या मुलीला तिची प्रतिनिधी म्हणून निवडली. मग प्रिन्स त्या माणसाला शोधण्यासाठी हिंडू लागला... बरेच पुरुष झाल्यावर त्याने मला विनंती केली. मी प्रथम नाही म्हटले पण शेवटी आढेवेढे घेत गेलो. लिझाच्या प्रतिनिधीने नकारार्थी मान हलवली. लिझाने माझ्याकडे साधे पाहिलेही नाही. मग प्रिन्सने मोठ्या नाटकीपणाने माझ्यासमोर झुकून मला पुढे चलण्याची विनंती केली. हा नाटकीपणा, लिझाचा नकार, आणि मला हिणवण्याचा माझ्या प्रतिस्पर्ध्याचा प्रयत्न या सगळ्याने माझ्या मनात रागाचा स्फोट झाला. मी प्रिन्सपाशी गेलो आणि त्याच्या कानात पुटपुटलो,

“तू माझ्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो आहेस, हो ना?” माझ्या आवाजातील कडवटपणा ऐकून तो चमकला. त्याने माझ्याकडे तिरस्काराने पाहिले आणि मला परत जागेवर सोडण्याच्या बहाण्याने माझ्या कानात म्हणाला,

“ मी?”

“हो! तूच!” मीही पुटपुटलो. “पण मी तुझ्यासारख्या लफंग्याला, नवश्रीमंताला यशस्वी होऊन देणार नाही हे लक्षात ठेव.”

प्रिन्सने शांतपणे स्मितहास्य केले. माझ्याशी हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने माझा हात त्याच्या पोलादी पकडीत घेतला आणि म्हणाला,

“मला समजतंय, पण ही जागा यावर चर्चा करण्यास योग्य नाही. आपण नंतर बोलू या विषयावर!”

एवढे बोलून तो बाजूला सरकला व बिझमियान्कॉफला घेऊन लिझाकडे गेला. शेवटी त्यालाच लिझाबरोबर नाचण्याचा मान मिळाला. लिझा त्याच्याबरोबर नाचण्यास उठली.

मी माझ्या पात्राबरोबर उदास होऊन बसलो होतो. मला आठवतंय माझ्या छातीत जोरात धडधडू लागले. माझी छाती झालेल्या अपमानाने फुलली, माझे स्नायू फुरफूरु लागले.. मी माझ्या शेजारीच असलेल्या एका जमिनदाराकडे इतक्या त्वेषपूर्ण कटाक्ष टाकला की त्याने पुढे टाकलेले पाऊल मागे घेतले. मी नाचणाऱ्यांवर नजर फिरवली. एक दोघे सोडल्यास आमची कुरबूर कोणाच्या लक्षात आलेली दिसली नाही. माझा प्रतिस्पर्धी आता त्याच्या खुर्चीत निवांत बसला होता. घडलेली घटना त्याच्या खिजगणतीतही नव्हती. बिझमियान्कॉफने लिझाला तिच्या जागेवर सोडले. तिने मंद स्मित करून मान तुकवून त्याचे आभार मानले आणि ती लगेचच प्रिन्सकडे वळली. तिच्या चेहेऱ्यावर थोडीशी काळजी दिसत होती, म्हणजे मला तरी तसे वाटले. पण प्रिन्सने तिच्याकडे पाहून स्मित केले आणि तो तिला काहीतरी म्हणाला. तिला ते आवडलेले असावे कारण ती परत दिलखुलास खळखळून हसली, तिच्या पापण्या खाली झुकल्या आणि तिचे डोळे परत त्याच्यावर खिळले. अगदी प्रेमाने !
माझ्या अंगात जे काही संचारले होते ते माझुर्का संपेपर्यंत काही ओसरले नाही; पण मी माझ्या जोडीदाराकडे तिरस्काराने पाहात राहिलो ज्याने ती बिचारी अगदी भेदरून गेली. तिला बोलताही येईना. ती ततपप करू लागली. ते पाहून मला काहीतरी पुरुषार्थ गाजवल्यासारखे वाटू लागले. शेवटी मी तिला तिच्या आईकडे सोडले. मी तसाच एका खिडकीकडे गेलो आणि गजाला धरुन आता काय होतंय याची वाट पाहू लागलो. मी बराच वेळ थांबलो. प्रिन्सच्या भोवती स्त्रीपुरुषांचा गराडा पडला होता.. आता हे सगळे सोडून त्याला माझ्यासारख्या फालतू माणसाकडे येणे शक्यच नव्हते. खरे सांगायचे तर माझ्या या फालतूपणाचा मला त्यावेळी आनंदच झाला होता. बरं झाले ब्याद टळली मी मनात म्हटले. त्याच्याकडे पाहाताना मी एक शिवी हासडली. पण तो एकामागून एका माणसांशी बोलण्यात गर्क होता. पण एका कवीने म्हटल्याप्रमाणे-

‘तुझा मी अपमान केला आहे;
तुला माझ्याकडे येणे भाग आहे;’

मी त्याची वाट पाहात उभा होतो.
शेवटी त्याने हुशारीने त्याच्या चाहत्यांना कटवले आणि तो जायला निघाला. जाताना त्याने माझ्याकडे नजर टाकली. म्हणजे ना माझ्याकडे पाहिले ना खिडकीकडे.. तो मला ओलांडून जाणारच होता तेवढ्यात थबकला जणूकाही त्याला काहीतरी आठवले..

“ हंऽऽऽ ” माझ्याकडे पाहात हसून तो म्हणाला, “ माझे तुमच्याकडे एक काम आहे..” त्याच्या बरोबर त्याचे जे चमचे होते त्यांना वाटले काहीतरी खाजगी काम असेल म्हणून ते थोडे पुढे निघून गेले. प्रिन्सने मित्र असल्यासारखा माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला जरा बाजूला ओढले. माझ्या छातीतील धडधड वाढली..

“ तू..” माझ्याकडे नजर रोखून तो म्हणाला. इतका वेळ हसत असलेले त्याचे डोळे आता आग ओकत होते.. “ तू मगाशी माझ्याबद्दल काहीतरी अपमानास्पद बोललास. काय म्हणालास तू ” त्या ‘तू’ मधे इतकी तुच्छता भरली होती की मी नाही म्हटले तरी थोडासा दचकलोच.

“ मी म्हणालो...”मीही माझा आवाज चढवला., “...

“शू.. हळू..हळू.. सभ्य लोक अशा ठिकाणी मोठ्याने बोलत नाहीत. हा वाद आपण द्वंद्व करून मिटवावा असं मला वाटते. काय म्हणणं आहे तुझ्ां?”

“कसा मिटवावा हा तुमचा प्रश्न आहे.. माझी कशालाही तयारी आहे.” मीही चिडून म्हणालो.

“ जर तुला तुझे शब्द मागे घ्यायचे नसतील तर मला वाटते तोच एकमेव मार्ग उरेल. नाही का?” तो म्हणाला.

“मला कुठलेही शब्द मागे घेण्याची आवश्यकता वाटत नाही.” मी म्हणालो.

“ खरं?” तो कुत्सितपणे हसून म्हणाला. त्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, “ठीक आहे मग मी पुढच्या बाबी ठरविण्यासाठी आपल्याकडे माझा प्रतिनिधी पाठवेन. अर्थात रीतिरिवाजाप्रमाणे. मी तो माझा बहुमानच समजतो. आपणही तसंच समजाल अशी मला आशा आहे.”

“ठीक आहे.” मी तिरसटपणे उत्तर दिले.

त्याने मान झुकवून मला आदबीने अभिवादन केले आणि उर्मटपणे डोळे बारीक करून म्हणाला,

“मी एक क्षुल्लक माणूस आहे असा विचार करण्यापासून मी तुम्हाला रोखू शकत नाही पण आमच्या घराण्यात कोणी नवश्रीमंत असणे निव्वळ अशक्यच आहे... असो. आता मी तुमचा निरोप घेतो मि. शुकातुरीन.”

त्याने माझ्या उत्तराची वाट न पाहाता पटकन माझ्याकडे पाठ वळवली आणि तो यजमानांकडे गेला. यजमानही हे काय चालले आहे म्हणून वैतागलेले दिसले. शुकाटुरीन.... नालायक! माझ्या नावाचे मुद्दामच त्याने विडंबन केले.. पण मी प्रत्युत्तर देऊ शकलो नाही. मी त्याच्या पाठीकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिले आणि दात ओठ खात रागातच म्हणालो, “ठीक आहे.. भेटूच उद्या.” असं म्हणून लगेचच मी माझ्या ओळखीच्या अधिकाऱ्याला शोधून काढले. त्याचे नाव होते कॅप्टन कोलोबर्डेव्ह. मी त्याला थोडक्यात सगळी हकिकत सांगितली आणि त्याला माझा प्रतिनिधी होण्याची विनंती केली. त्याने ताबडतोब या विनंतीला मान्यता दिली आणि मीही घराचा रस्ता धरला....

क्रमशः
अनुवाद : जयंत कुलकर्णी १२/११/२०२२

कथालेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Nov 2022 - 12:30 pm | मुक्त विहारि

सध्या तरी, फक्त पोच ...

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

13 Nov 2022 - 12:52 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मी सुद्धा वाचत आहे. पुभाप्र.