एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - २

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
10 Nov 2022 - 10:02 am

image host

इव्हॅन तुर्गेनेव्ह
(९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३)
Turgenev: the Novelist's Novelist

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग - २

काही वर्षांपूर्वी काही क्षुल्लक कारणांमुळे (पण माझ्यासाठी महत्वाचे) एका विचित्र परिस्थितीत मला सहाएक महिने एका “ओ...” नावाच्या गावात राहण्याचा प्रसंग आला. हे गाव डोंगराच्या उतारावर वसले आहे. लोकवस्ती असेल साधारणतः आठशे एक. तसे लोक गरीबच वाटले मला. जुनीपुराणी झ्ाोपड्यांसारखी दिसणारी त्यांची घरे, मला तरी गलिच्छ वाटली. गावातील मुख्य रस्त्यावर कधी काळी चुनखडी ओतली असणार जी वर येऊन आता त्यात मोठ्ठे खड्डे पडले होते. शेतकऱ्यांच्या गाड्याही त्याला वळसे मारून जाण्याचा प्रयत्न करतात. याच रस्त्यावर गावातील एकुलत्या एका गजबजलेल्या चौकात एक पिवळटसर रंगाचे कळकट्ट बांधकाम उभे होते. या बांधकामात भोके होती आणि त्यात माणसे मोठाल्या टोप्या घालून बसली होती. ती म्हणे व्यापार करीत होती. त्याच्याच मागे एक खांब उभा होता आणि त्याच्या शेजारी सरकारी नियमानुसार एक पिवळ्या गवताचा भारा ठेवला होता. शेजारीच कोंबड्या कलकलाट करीत हिंडत होत्या. थोडक्यात ‘ओ..’ मधे सगळे कसे सुरळीत चालले होते.

माझ्या या मुक्कामाच्या सुरुवातीला मला, कंटाळल्याने अगदी वेड लागण्याची पाळी आली होती. मला एक सांगितले पाहिजे की मी सामान्य माणूस होतो पण माझ्या इच्छेने नाही. मी जरी मनाने रोगट असलो ना, तरी मला मात्र रोगट माणसे आवडत नाहीत. त्यांना मी सहनच करू शकत नाही. आनंदाला माझा मुळीच विरोध नाही. म्हणूनच मी त्याच्याकडे सर्व बाजूने पाहातो पण त्यामुळेच कधी कधी मलाही कंटाळा येऊ शकतो. त्यातच मी या गावात सरकारी कामानिमित्त आलो होतो. अधिकच कंटाळवाणे.

ही म्हातारी मला एक दिवस मारणार आहे. आमच्या संभाषणाचा हा नमुना पहा:
तारन्तिव्हा: मालक तुम्ही लिहित काय बसलाय. तुमच्या प्रकृतीला ते ठीक नाही.
मी: पण तारन्तिव्हा मला भयंकर कंटाळा आलाय ग!
ती: मग थोडा चहा प्या आणि पडून रहा.
मी: पण मला झोप् येत नाही..
ती: का असं म्हणताय मालक? पडून रहा! लागेल डोळा आपोआप. तेवढीच विश्रांती !
मी: आता मरणारच आहे मी..
ती: इडापिडा टळो आणि तसले काही न होवो.. परमेश्वराचे लक्ष आहे तुमच्याकडे. बरं मग करू का चहा तुमच्यासाठी?
मी: तारन्तिव्हा हा आठवडा मी काढेन असे मला वाटत नाही...
ती: मालक का मरणाच्या गोष्टी करताय? मी जातेच आणि चहाचे भांडे ठेवते.

अरे देवा ही म्हातारी म्हणजे.. !

मार्च २४. बर्फ
ज्या दिवशी मी त्या गावात आलो त्याच दिवशी माझ्या कामाच्या संदर्भात माझी एका माणसाची गाठ पडली. त्याचे नाव होते “ओझोगिन किरिला मॅटव्हेव्हिच” हा त्या काऊंटीचा एक मुख्य अधिकारी होता. पण या माणसाची आणि माझी जवळून ओळख झाली अंदाजे दोन आठवड्यानंतर. त्याचे घर गावातील त्या मुख्य रस्त्यावर होते आणि आकाराने इतर घरांपेक्षा खूपच मोठे होते. त्याचे छप्पर रंगवलेले होते आणि त्या बंगल्याच्या फाटकाच्या दोन्ही बाजूला सिंहाचे पुतळे होते. हे सिंह मॉस्कोतील अपयशी कुत्र्यांचे वंशज असावेत बहुधा. ते काहीही असो, त्या सिंहाकडे पाहून ओझोगिन श्रीमंत असावा असा निष्कर्ष कोणीही काढला असता आणि खरंच होते ते. त्याच्याकडे जवळजवळ ३०० नोकरचाकर होते; त्याच्या घरी गावातील सगळ्या प्रतिष्ठित मालदार असामींची ये जा असे. त्याच्या आदरातिथ्याची पंचक्रोशीत चर्चा होई. पोलीसप्रमुख त्याच्या घरी त्याच्या चारचाकी बग्गीतून येत असे. हा पोलीसप्रमुख चांगलाच धिप्पाड व उंचापुरा होता. एखाद्या टाकावू सामानातून तयार केलेला पुतळ्यासारखा तो दिसत असे. अजून एक किरकोळ कामे करणारा, पांढुरक्या चेहऱ्याचा, नीच वृत्तीचा एक वकील येत असे. चमचेगिरी करणारा एक जमिनीचा मोजणी अधिकारीही येत असे. हा बहुधा जर्मन वंशाचा असावा कारण याची चेहरेपट्टी तार्तारांसारखी होती. हा एक चांगला गायक होता पण कुचाळक्या करण्याचा याला छंद होता. याशिवाय एक निवृत्त काऊंटी मार्शलही तेथे येत असे. त्याचा रुबाब अजूनही तेवढाच होता. त्याचे केस रंगवलेले असत. दुमडलेल्या बाह्या, पट्टे असलेली विजार आणि अधिकाराच्या जागेवर असलेल्यावर जर एखादा खटला चालू असेल तर चेहऱ्यावर जसा भाव असतो तसा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत असे. त्यांना भेट देणाऱ्यांमधे दोन वय झालेले जमिनदार असत. यांची मैत्री अतूट असावी. यातील जो वयाने मोठा होता तो फालतूक विनोद करायचा आणि बाकीचे त्याचा मान राखण्यासाठी खोटेखोटे हसत. अरे देवा मी सारखे विसरतोय की माझे दिवस भरत आले आहेत. मी उगाचच अनावश्यक तपशिलात जातोय. तर या ओझ्ाोगिनला एक मुलगी होती जिचे नाव होते एलिझाव्हेटा किरिलोव्हना आणि मुख्य म्हणजे मी तिच्या प्रेमात पडलो.

आझोगिन दिसण्यास सर्वसाधारण माणसांसारखाच होता आणि त्याच्या बायकोला आता अवकळा आली होती. पण त्यांची मुलगी मात्र त्यांच्यापैकी कोणावरही मुळीच गेली नव्हती. ती सुंदर तर होतीच पण ती कायम उत्साहाने सळसळत असे. तिच्या चमकदार करड्या डोळ्यात चांगुलपणा डोकावत असे आणि त्या कमानदार भुवयांखाली असलेले तिचे हसरे डोळे कोणाच्याही मनाला भुरळ पाडत. तिच्या ओठावर लहान मुलीसारखे हसू कायम विलसत असे आणि थोड्याशा कारणाने ती खळाळून हसायची. तिच्या आवाजात एक प्रकारचा ताजेपणा होता आणि तिच्या आवाजाला प्रसन्न पोत होता. ती हालचालही मोठ्या डौलाने आणि तरंगत गेल्यासारखी करत असे आणि तिचे लाजणे म्हणजे... (ती सारखी लाजत असे). तिचे पोषाख महागडे नसत पण अत्यंत साधे कपडेही तिला शोभून दिसत.

मी शक्यतो स्वतःहून ओळख करून घेण्यास जात नाही. म्हणजे ते माझ्या स्वभावातच नाही. पण जर माझ्या पहिल्याच भेटीत जर मला मनमोकळेपणाने त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर बोलता आले तर मात्र मी सांगतो त्याचे सारे श्रेय मी त्या दुसऱ्या व्यक्तिलाच देईन. मला अनोळखी स्त्रियांबरोबर कसे वागावे हे मुळीच कळत नाही. मी लाजतो तरी किंवा वेडीवाकडी तोंडे करून उभा राहातो किंवा मूर्खासारखा दात विचकत हसतो तरी. सगळेच विचित्र. कधी कधी मी जीभ गालात फिरवत विचार करत अवघडून उभा राहतो. एलिझ्ाासमोर मात्र पहिल्या क्षणापासून मला फार मनमोकळे वाटायचे. त्याचं काय झ्ाालं, मी एकदा ओझ्ाोगिनच्या घरी आलो आणि तेे घरी आहेत का ते विचारले. नोकराने सांगितले, “हो! पण ते कपडे बदलत आहेत. तुम्ही बैठकीच्या खोलीत थांबू शकता.” मी आत गेल्यावर मला एक तरूण मुलगी दिसली. तिने पांढराशुभ्र किमती गाऊन परिधान केला होता आणि ती खिडकीपाशी उभी होती. तिची पाठ माझ्याकडे होती आणि तिच्या हातात एक पक्षाचा पिंजरा होता. तिला बघून मी वळलो पण सवयीने थोडासा खाकरलो. ती मुलगी पटकन वळली. एवढ्या पटकन, की तिच्या त्या गिरकीने तिची एक बट लोभसपणे तिच्या गालावर आली आणि परत मागे गेली. तिने माझ्याकडे पाहून एक स्मितहास्य केले आणि गुडघ्यात पाय किंचितसे वाकवले. हातातील एक बिया भरलेली छोटी पेटी मला दाखवून ती म्हणाली,

“जरा थांबाल का?”

आता अशा प्रसंगात परंपरेनुसार जे करतात ते मी केले. डोकं थोडेसे पुढे झुकवले आणि त्याच वेळी गुडघे ताठ केले. जणुकाही कोणीतरी मागून माझ्या कंबरड्यात लाथ घातली आहे. अर्थात प्रत्येकाला हा रितीरिवाज माहीतच असतो. मग मी तिच्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि आदराने माझा हात हवेत हलवला. ती चटकन मागे फिरली आणि तिने त्या पिंजऱ्यातून एक फळी काढली व चाकूने ती जोरजोरात तासण्यास सुरुवात केली. त्यात खंड न पाडता ती अचानक म्हणाली,

“हा पपांचा बुलफिंच! तुम्हाला आवडतो का बुलफिंच?

“नाही मला कॅनरी पक्षी आवडतात.” मी म्हटले.

“मलाही आवडतात कॅनरी; पण याच्याकडे बघा, किती गोंडस दिसतोय तो आणि बिलकुल घाबरत नाही.” पण मला आश्चर्य वाटत होते की मलाही बिलकूल भीती वाटत
नव्हती.

“या जवळ या. त्याचे नाव पोप्का आहे.” मी जवळ गेलो आणि त्याच्याकडे वाकून पाहिले.

“छान आहे ना?” तिने विचारले.

तिने तिचे तोंड माझ्या दिशेला वळवले; आता ती माझ्या इतक्या जवळ उभी होती की तिला माझ्याकडे पाहण्यासाठी तिचे मस्तक जरा मागे झुकवावे लागले. मी तिच्याकडे पाहिले, तिचे डोळे चमकत होते आणि तिचा चेहेरा हसत होता. तिच्या चेहेऱ्यावर आमची जन्मोजन्मीची ओळख असल्याचा भाव होता. ते पाहून मलाही हसू फुटले. मी आनंदाने जरा जास्तच मोठ्याने हसलो असणार. कारण तेवढ्यात दार उघडले आणि ओझोगिन आत आले. मी लगेचच त्यांच्याकडे गेलो व अगदी अनौपचारिकपणे त्यांच्याशी बोलू लागलो; मी रात्रीच्या जेवणासाठी कसा काय थांबलो हे माझे मलाच माहीत नाही. ती संध्याकाळ मी तेथेच घालवली आणि दुसऱ्या दिवशी ओझोगिनच्या मठ्ठ नोकराने मला कोट काढताना मदतही केली. एवढेच नाही तर मी घरातलाच असल्यासारखा, माझ्याकडे पाहून त्याने आदराने स्मित केले.
आजवर घर, घरातील माणसे, त्यांच्यातील नातेसंबध, दररोजच्या जीवनातील नाती गोती आणि त्यामुळे मिळणारा आनंद, हे असले काही मला माहीतच नव्हते. जर मला फुलाची अनाठायी उपमा देता आली आणि जर घासून गुळगुळीत झालेली उपमा वापरायची म्हटले तर त्या क्षणापासून माझ्या चित्तवृत्ती फुलल्या, प्रफुल्लित झाल्या असं म्हणायला हरकत नाही. माझ्यात आणि माझ्या आजुबाजूच्या प्रत्येक गोष्टीत मला अचानक बदल जाणवू लागला. माझे आयुष्यच बदलून गेले. ते प्रेमाने उजळून गेले. जणूकाही एखाद्या अंधारकोठडीत एखादी पणती पेटावी आणि ती कोठडी उजळून जावी असं काहीतरी झालं. माझ्या झोपण्यात, माझ्या उठण्याबसण्यात, पाईप ओढण्यात एक प्रकारचा रुबाब आलाय असं मला वाटू लागले. (उगाचंच). चालताना तर मी चक्क उड्या मारत चालू लागलो. खोट नाही सांगत मला पंख फुटले होते आणि त्या पंखांनी जर मला थोडे वर उचलले, तर मी तरी काय करणार? हे सगळे एलिझामुळे झाले होते याबद्दल माझ्या मनात एका कणाचीही शंका नव्हती. पहिल्या दिवसापासूनच मी तिच्या प्रेमात पडलो. मी तीन आठवडे तिला रोज भेटत होतो. हे दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी दिवस होते. आता त्या दिवसांची साधी आठवणही मला सगळ्यात जास्त दुःखी करते ती गोष्ट वेगळी. दुर्दैवाने मी फक्त त्याच आठवणी वेचू शकत नाही कारण त्या दिवसांनंतर जे काही झाले त्याच्या आठवणींचे विष माझ्या ह्रदयात पसरते आणि माझे ह्रदय पिळवटून टाकते.

जेव्हा माणसाचे डोके ठिकाणावर असते, तेव्हा तो आनंदी असतो कारण त्याच्या बुद्धीला विशेष काम नसते. हे सगळ्यांनाच माहीत आहे. तो शांत असतो आणि तृप्ति त्याच्या नसानसातून वाहात असते. या भावनेने त्याला अगदी गिळंकृतच केलेले असते म्हणा ना! त्याच्यातील “मी” नाहिसा होतो आणि तो परमानंदात न्हाऊन निघत असतो- असे अडाणी कवी म्हणतात. पण एकदा का स्थिती बदलली की माणूस दुःखी होतो आणि त्याला त्या आनंदी काळात त्याचे स्वतःकडे दुर्लक्ष झाले होते याचे दुःख होते. म्हणजे त्या सुखात तो इतका वाहवत गेलेला असतो की ते दिवस परत परत यावेत यासाठी तो काहीच प्रयत्न करीत नाही. स्वच्छ सूर्यप्रकाशातील माशीप्रमाणे त्याची अवस्था असते. म्हणूनच जेव्हा मला ते तीन आठवडे आठवतात तेव्हा आमच्यात काय घडले हे मला नीटसे आठवत नाही. ते वीस दिवस माझ्यासाठी ऊबदार होते, उत्साहाने सळसळते होते, त्याच्या आठवणी रोमांचित करणाऱ्या आहेत यापलिकडे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. माझ्या उदास आयुष्यात रंग भरणारे दिवस होते ते! माझ्यावर जेव्हा आकाश कोसळते तेव्हाच मला त्या घटनांचे बारीकसारीक तपशील आठवतात- अर्थात हेही काही अडाणी लेखकांनी म्हटल्याप्रमाणे.
हंऽऽऽ ते तीन आठवडे.. पण त्याबद्दल मी काही अचूकपणे सांगू शकत नाही. माणूस आनंदात असला की त्याच्या लक्षात फक्त आनंदच राहतो. आनंदी घटना किंवा क्षण नाहीत. कधी सायंकाळी आकाशाकडे आपण नजर लाऊन बसतो आणि अचानक एखादा तारा आपल्या दृष्टीसमोर येतो तसेच कधी कधी त्या वीस दिवसातील एखादी घटना माझ्या मनःपटलावर अचानक येते. मला आठवण येते ती विशेषतः एका संध्याकाळची. त्या दिवशी आम्ही एका राईमधे फिरायला गेलो होतो. आम्ही चौघे जण. मादाम ओझोजिन, लिझा , मी आणि बिझमियान्कॉफ नावाचा त्याच गावात राहणारा एक उमदा, लाजरा (किंवा विनम्र म्हणा) तरूण. हा गातील एक किरकोळ अधिकारी होता. त्याच्याविषयी पुढे बोलूच! मि. ओझोगिन डोके दुखत असल्यामुळे घरीच थांबले होते. त्यांचे डोके म्हणे जास्त झोपल्यामुळे दुखत होते. असेलही.. दिवस मस्त ऊबदार होता आणि कुठेही गडबड गोंधळ नव्हता. मी तुम्हाला सांगतो रशियन माणसाला सरकारी बागा आणि सरकारी ठिकाणे फारशी आवडत नाहीत. तुम्ही जर तेथे गेलात तर तुम्हाला एखादा माणूस फिरताना भेटणे अशक्य आणि भेटलाच तर फाटकासमोरचे घाणेरडे दुकान बंद आहे असं खुशाल समजावे. भेटलीच तर एखाद्या बाकावर एखादी म्हातारी तुम्हाला दिसेल पण तीही थोडा वेळ. सूर्याची किरणे तिच्या अंगावर पडेपर्यंत. पण जर गावाच्या आसपास बर्चची राई असेल तर मात्र तुम्हाला तेथे झुंबड उडालेली दिसेल. तेथे व्यापारी, नोकरवर्ग रविवारी जमतो आणि मौजमजा करतो. तेथेच ते चूल लावतात आणि चहा उकळतात, मनसोक्त गप्पा हाणतात. कलिंगडे, खाद्यपदर्थांचा फडशा पाडतात. त्या काळात याच प्रकारची एक राई गावाबाहेर होती. आम्ही तेथे जेवणानंतर गेलो. चहापानाच्या कार्यक्रमानंतर मग आम्ही चौघेही पाय मोकळे करण्यासाठी तेथे फिरायला गेलो. बिझमियान्कॉफने मादाम ओझोगिन यांना हात दिला होता तर मी लिझाला. दिवस मावळायला आला होता. मी माझ्या पहिल्यावहिल्या प्रेमाच्या धुंदीत होतो. (आमच्या भेटीस त्यावेळेस अजून दोन आठवडे व्हायचे होते). त्या अवस्थेत तुम्ही तुमच्या प्रियेची प्रत्येक हालचाल निरखीत असता, डोळ्यात साठवत असता आणि तिचे मनोमन कौतुक करत असता त्यावेळी तुमच्या ह्रदयात काय चालले आहे हे १०० फुटावरचा माणूसही सहज सांगू शकतो. तुमच्या चेहऱ्यावर तृप्ति ओसंडून वाहत असते आणि तुमच्या चेहऱ्यावर लहान मुलासारखे एक निरागस हास्य विलसत असते.

त्या दिवसापर्यंत मला लिझाचा हात हातात घेण्याची संधी मिळाली नव्हती. आज मी तिच्या बाजूने मऊशार गवतावरून हळुवारपणे चालत होतो. बर्चच्या वनातून मंद वारा आमच्या भोवती घुटमळत होता. तिच्या हॅटची रिबीन त्यामुळे उडून सारखी तिच्या चेहेऱ्यावर येत होती. ती सावरताना तिच्या होणाऱ्या विलोभनीय हालचाली मी एकटक पाहात होतो. कदाचित ते लक्षात आल्यामुळे तिने माझ्याकडे पाहून स्मित केले. तिच्या विलग झालेल्या ओठातून तिच्या दंतपंक्तीची नाजूक किनार मला दिसली आणि माझे काय झाले याचे वर्णन मी लिहू शकणार नाही. मीही तिच्याकडे पाहून हसलो. पक्षी वर किलबिलाट करत होते आणि फांद्यांमधून निळेशार आकाश डोकावत जणू आमचे कौतुक करत होते. माझे डोके अतिआनंदाने गरगरू लागले. पण वेळीच सांगितले पाहिजे की लिझाचे माझ्यावर मुळीच प्रेम नव्हते. तिला मी आवडत असे एवढेच! तशी ती कोणालाच लाजत नसे आणि तिच्या शांत डोहासारख्या निरागस मनात तरंग उठविण्याचे माझ्या नशिबातच नव्हते. ती माझ्या हातात हात घालून चालत होती जशी ती तिच्या भावाबरोबर चालली असती. त्यावेळी तिचे वय असेल सतरा एक.. पण त्या संध्याकाळी तारुण्यात पदार्पण करताना ह्रदयात जे काही बदल होत असतात ते तिच्यात होत होते. मी त्या बदलांना साक्षी होतो. तिची कावरीबावरी नजर, कापरा आवाज, धुंद नजर हे सगळे माझ्यामुळे तर नव्हते? अरे देवा! किती मूर्ख असेन मी! मागच्या आठवड्यापर्यंत, मी बेशरम, हा सगळा बदल माझ्यामुळेच घडतोय असं समजून चाललो होतो. सामान्य माणसाचे सामान्य विचार दुसरं काय!...

अनुवाद : जयंत कुलकर्णी. १०/११/२०२२

कथालेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Nov 2022 - 8:42 am | प्रचेतस

हाही भाग आवडला.

कर्नलतपस्वी's picture

12 Nov 2022 - 9:56 am | कर्नलतपस्वी

तिची कावरीबावरी नजर, कापरा आवाज, धुंद नजर हे सगळे माझ्यामुळे तर नव्हते?

यांचे झेगांट व्हणार का रे बाबा.
अनुवाद आवडला.

सौंदाळा's picture

14 Nov 2022 - 11:40 am | सौंदाळा

वाचतोय