नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
15 Sep 2022 - 6:28 pm

नेताजीचे सहवासात - भाग २ - अ

१

नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भव्य प्रतिमा विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने नेताजींचे काही स्वभाव पैलूंवर प्रकाश

नेताजींचे सहवासात
लेखक -कॅप्टन पुरुषोत्तम नागेश ओक

        
कै . पुरुषोत्तम ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकांचा परिचय करून देताना त्यांचा चुलत पुतण्या म्हणून अभिमान वाटतो.
कै. काकांनी ह्या पुस्तकांतून त्यांच्या व नेताजींच्या सहवासात घडलेल्या घटना आणि त्यातून नेताजींच्या स्वभावाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातील मराठी बाजाने केलेल्या लिखाणात पुनांच्या वैशिष्ठ्यपूर्ण लेखनपद्धतीचा व शब्दसंचयाचा परिचय मिळतो. त्याचा प्रत्यय म्हणजे पुस्तकाचे शीर्षकः नेताजीं'च्या' ऐवजी त्यानी 'चे' असा प्रत्यय लावला आहे.
पुस्तकात एकंदर १२ प्रकरणे असून शेवटची दोन, २००० सालच्या आवृतिच्या निमित्ताने भर घालून प्रकाशित झाली होती. त्यातील काही वेचक भाग वाचकांना आनंदित करतील म्हणून हे कमलपुष्प २ सादर.
नेताजींची वीरवृत्ती
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ईश्वरावर पूर्ण विश्वास होता मानवाने प्रयत्न करायचे सोडू नये, परंतु ईश्वरेच्छेपुढे मानवाचा काही इलाज चालत नाही. परमेश्वरी योजनेने सर्व घटना घडत असतात, परमेश्वराची लीला अगाध व अतर्क्य आहे अशी त्यांच्या मनाची पूर्ण खात्री झालेली होती. वरीलप्रमाणे निष्ठा असणाऱ्या ईश्वरभक्तांचे त्यांच्या स्वभावाप्रमाणे दोन वर्ग पडतात. कोणी "असेल माझा हरी ती खाटल्यावरी" अशा विश्वासाने निवृत्तिमार्ग स्वीकारून “जे जे होईल ते ते पहावे" - मताचे होतात. याचे उलट इतर निष्ठावंत ईश्वरानुयायी- श्रीमद्जगद्गुरु आद्य शंकराचार्य समर्थ रामदास व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचेसारखे “सामर्थ्य आहे चळवळीचे” अशा निश्चयाचे आटोकाट प्रयत्न करण्याचा प्रवृत्तिमार्ग पत्करतात. यातील दुसरा मार्ग हाच जास्त सयुक्तिक व तर्कशुद्ध आहे; कारण इतर बाबतीत निवृत्तिमार्गाचे समर्थन करणाऱ्यांसही स्वत:च्या शारीरधर्माची काळजी वहावीच लागते. तेथे ईश्वरावर हवाला ठेवून चालत नाही. यशापयशाबद्दल सुखदुःख न मानता “देह जावो अथवा राहो” अशा निश्चयाने सर्व प्रकारची कर्तव्ये अडीअडचणींची पर्वा न करता निर्विकार मनाने पार पाडणे व कुडीत प्राण असेपर्यंत सद्सद्विवेकबुद्धीने दाखवून दिलेल्या मार्गाने अविरत कर्म करीत राहणे हे नेताजींच्या जीवनाचे मूलतत्त्व होते. हेच त्यांच्या वीरवृत्तीचे उगमस्थान होते. ईश्वराचे मनात असेल तोपर्यंत आपण जिवंत राहू. मृत्यू यावयाचाच असला तर त्याचा प्रतिकार करणे मानवास केव्हाही शक्य नाही. अर्थात त्याबद्दल विवंचना अथवा भीति बाळगण्याचे काय कारण? “देव तारी त्याला कोण मारी" अशी खात्री झाल्यामुळे सामान्य लोकांच्या मनात धडकी भरविणाऱ्या प्रसंगास तोंड देताना नेताजींची शांत व निर्विकार वृत्ती ढळत नसे. केवढेही महत्त्वाचे व जबाबदारीचे कार्य अंगावर घेताना ते डगमगत नसत; कारण इतरांप्रमाणे आपल्यातही ईश्वरी अंश आहे, सारासार विचारबुद्धी आहे, ईश्वराची कृपादृष्टी सर्व प्राणीमात्रांवर असते तशी ती आपल्यावरही आहे, आपण जे योग्य तेच करीत आहोत अशी साक्ष आपल्या अंत:करणास पटत असताना मग भिण्याचे कारण काय? असा दांडगा आत्मविश्वास त्यांचे ठायी वसत होता.
अभिजात स्वातंत्र्यप्रेम
नेताजी सुभाषचंद्र बोस व इतर देशभक्त यांच्यात हाही एक महत्त्वाचा फरक चटकन नजरेत भरतो व तो म्हणजे नेताजींची स्वातंत्र्योर्मी अभिजात होती तशी इतरांची नाही. स्वातंत्र्यप्रेम हा त्यांचा फावल्यावेळचा उद्योग नव्हता. प्रवाहपतिताप्रमाणे ते नकळत राजकारणाच्या काठाला लागले नाहीत. अंतिम उद्देश संतकोटीस पोचण्याचा. परंतु जाता जाता साधल्यास देशकार्यही करावे अशा हेतूने त्यांनी राजकारणाकडे आपली पावले वळविली नाहीत. अलोट संपत्ती तर आहेच, आता त्याच्या जोडीस आयता मान पाहिजे? अशा त-हेची वृत्तिही त्यांनी त्यांनी कधी दाखविली नाही.
निष्काम कर्मयोग
रोजचे व्यवहारात व घरादारात वावरताना सूक्ष्मपणे पाहणाऱ्यास नेताजींचे वृत्तीत एक प्रकारचा अलिप्तपणा स्पष्ट दिसून येई. त्यांचे अवतीभवतीचा थाटमाट व व्याप जरी मोठा असला तरी त्यात गुरफटल्यासारखे ते दिसत नसत. “इहलोकीचे कर्तव्य म्हणून या परिवारात मी वावरत आहे; नाही तर माझ्या आवडीनुरूप वातावरण व माझे स्थान अन्य ठिकाणी आहे.” असा ध्वनि त्यांचे हालचालींतून निघे. आंतरराष्ट्रीय गाठीभेटीकरिता सुटबूट घालून विमानातून परदेशी जात असताना, चांदीच्या काट्याचमचांनी मेजाशी बसून पाश्चात्य पद्धतीची मेजवानी झोडीत असताना, आंतरराष्ट्रीय शिष्टाचारास अनुसरून परस्परांचे यशचिंतनाचे वेळी दारूचे घोट घेत असताना अलिप्तपणाची त्यांची वृत्ती केव्हाही भंग पावली नाही. 
"माझे ध्येय ठरलेले आहे.... या ध्येयपूर्तीस्तव जे जे म्हणून करावे लागेल ते सर्व मी छातीठोकपणे करीन, परंतु त्याने माझा आत्मा कदापि मलिन होणार नाही... त्यात तो कधीच गुरफटणार नाही.” अशा प्रकारची त्यांची विचारसरणी होती.
जर्मनीत व अतिपूर्वेत नेताजी सिगारेटही ओढीत असत, पण हे सुद्धा लालसेने नव्हे. सिगारेट असल्याशिवाय काम सुचत नाही, झोप येत नाही अशी त्यांची स्थिती कधीच झाली नाही व पुढेही कधी झाली नसती. जातीच्या सुंदराला सर्वच शोभते अशा अर्थाची आपल्यात एक म्हण आहे तद्वत् ज्यांची बुद्धी स्थिर झाली आहे अशा नेताजींच्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण होते.
नेताजी आणि इतर राजकीय समकालीन नेते

६

अतिपूर्वेतच काय परंतु अखिल विश्वातील राजकारणात प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींची नेताजीशी तुलना केली, तर नेताजींच्या तोलाची, त्यांच्या समकालीन एकही व्यक्ती सापडणे शक्य नाही. बडेजाव, मानमरातब, रिकामपणाचा उद्योग संतपणा, परंपरेने चालत आलेला मान व अधिकार, अधिकारपदास चिकटलेली राजकीय जबाबदारी, जीवनप्रवाहाबरोबर वाहत वाहत राजकारणाच्या काठास लागलेले व अशा अनेक कारणांमुळे राजकीय क्षेत्रात शिरलेले लोकच बहुधा आपणास आजकालच्या राजकारणात दिसतील. लहानपणापासून स्वातंत्र्याची सुसंगत तळमळ लागलेला सुभाषचंद्र बोसांसारखा त्यांचा समकालीन दुसरा कोण आहे? त्यांचा निश्चय, त्यांची सचोटी, त्यांची संन्यस्तवृत्ती, दिवसरात्र काम करण्याची शक्ती, त्यांचे कर्मयोगित्व हे गुण किती राजकारणी व्यक्तीत एकसमयावच्छेदेकरून दिसतात.
एकदा दुपारचा भीषण हवाई हल्ला चालू असताना इतर सर्व लोक खंदकात गेले किंवा नाही याचे नेताजींनी निरीक्षण चालविले. डॉक्टर xxx यांनी नेताजीसही खंदकात चलण्याचा आग्रह केला तेव्हा ते म्हणाले, "मला मारू शकणाऱ्या विमानाचा अजून इंग्रज किंवा अमेरिकेस शोध लागलेला नाही म्हणून मी खंदकात गेलो नाही तरी चालण्यासारखे आहे.” एवढा दांडगा आत्मविश्वास व धैर्य त्यांचे अंगी होते.
कसल्याही परिस्थितीत यत्किंचितही न डगमगता त्यातून आपले ध्येय गाठण्याचा मार्ग शोधून काढणे अथवा त्या प्रयत्नात मृत्यू आल्यास तोही आनंदाने पत्करणे हे वीरवृत्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे. जगातील कोणत्याही वीरपुरुषास ही कसोटी लावून पडावी. अडचणींचा डोंगर दुर्लघ्य समजून ध्येयप्राप्तीबद्दल निराश होईल तो वीर नाहीच. औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या शिवछत्रपतींचे किंवा वन्य पशूप्रमाणे रानोमाळ फिराव्या लागणाऱ्या महाराणा प्रतापचे उज्ज्वल उदाहरण पहा. सर्वस्वाचा होम झाल्यावरही ध्येयप्राप्तीकरिता त्यांचे प्रयत्न चालूच राहिले. इंग्रजांस हैराण करून सोडणाऱ्या फ्रेंच सम्राट नेपोलियनमध्येही आपल्याला हेच स्वभाववैशिष्ट्य प्रामख्याने दिसते. अद्वितीय पराक्रम गाजविणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्यातही वीरवृत्तीचे स्पष्टपणे दिसुन येते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वीरवृत्तीचे हे अंग स्पष्टपणे आपणास दिसून येते.

वाद-संवाद माध्यम

नेताजींस बहुधा हिंदुस्थानीतच बोलावयास आवडे. हिंदुस्तानी ज जाणणाऱ्या तामीळ वगैरे स्वदेशी गृहस्थांशी किंवा विदेशी अधिकाऱ्यांशी गत्यंतरच नसल्यामुळे ते इंग्रजीत बोलत, नाहीपेक्षा ते नेहमी हिंदुस्थानीतच संभाषणास सुरवात करीत. स्वदेशाचे स्वातंत्र्य व तदनुषंगिक जितक्या स्वदेशी आचार-विचार-व्यवहार इत्यादि, यांच्याबद्दल नेताजींच्या मनात, कळकळ, आदर व प्रेम असल्यामुळे त्यांच्या तोंडून वा हातून विदेशी गोष्ट अथवा क्रिया घडून येत नसे. हिंदुस्थानातच पहा आपल्या कल्पनेच्या पलिकडे परदास्य आपल्या रोमरोमात शिरलेले आहे. आपल्यातील सुशिक्षित लोक नेहमी की बोलतात, लिहितात, भांडतात, पोषाख अस्सल इंग्रजी पद्धतीचा करतात. स्वदेशी म्हणवून खादी परिधान करणारे लोकही त्या खादीस कोट, विजार, कॉलर, अनेकदा इत्यादींचा आकार देऊन विटाळून टाकतात. अशांनी जरी बाहेरून स्वदेशीचा आव आणला तरी त्यांचे मन विदेशीच असते. राष्ट्रकार्यात उच्च पदवीस पोहोचलेल्या लोकांची राहाणीही अस्सल इंग्रजी पद्धतीची असते. दिल्लीतील राष्ट्रीय सभेची बैठक व लंडनमधील इंग्रजी मंत्रिमंडळाची बैठक यांच्यात तात्त्विक फरक काहीच दिसून येत  नाही. दोन्ही अस्सल इंग्रजी वातावरणातच होतात.

सुभाषचंद्र बोस यांचे भावपूर्ण अश्रू

स्वातंत्र्य सरकारस्थापनेचा प्रसंग हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. त्यांच्या जीवनकमानीचा हा अत्युच्च बिंदू होता. आपले मंत्रिमंडळ घोषित करून नंतर स्वतंत्र सरकारचे राष्ट्रपती या नात्याने अधिकारग्रहणापूर्वीची स्वत:ची शपथ घेण्यास त्यांनी सुरवात केली. शपथेच्या मसुद्याचा कागद त्यांचे हातात होता. त्यांनी शपथ वाचण्यास प्रारंभ केला. "मी ईश्वरास साक्ष ठेवून अशी शपथ घेतो की, माझ्या ३८ कोटी हिंदी बांधवांचा मी आजन्म सेवक राहीन. त्यांचे स्वातंत्र्य त्यास परत मिळवून देण्याच्या प्रयत्नात मी यत्किचितही कसूर करणार नाही व या ध्येयपूर्तीस्तव प्राणार्पण करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही...” ही शपथ घेताना "माझे ३८ कोटी हे शब्द उच्चारताच त्यांचे डोळ्यात अश्रू उभे राहिले, कंठ सद्गदित होऊन स्वर गदगद झाला. हिंदी जनतेच्या करुणाजनक परिस्थितीचे दारुण चित्र त्यांचे समोर उभे राहिले. हजारो लोक भिकेस लागले; लाखो भुकेने तडफडून मेले; अवधी रोज अपमान, छळ, व जुलूम सहन करीत कसेतरी जीवन कंठीत असतात हे चित्र नेताजींच्या डोळ्यासमोर उभे राहिले. या काटेरी विचारकाहुराने त्यांचे अंत:करण रक्तबंबाळ झाले व अश्रूरूपाने ते रक्त बाहेर आले. शपथेतील सुरवातीची एक-दोन वाक्ये उच्चारल्यावर डोळ्यात उभे राहिलेले अश्रू व भरून आलेला कंठ यामुळे पुढील शब्द दिसणे अथवा वाचणे अशक्य झाले. शपथ घेता-घेता मध्येच पंधरा-वीस क्षणांचा अवधी गेला. हदयात थरारणाऱ्या भावनांमुळे त्यांचा स्वर व शपथेचा कागद असलेला डावा हात या दोन्हीस तेवढ्या वेळेपुरता कंप सुटलेला होता. त्या वेळी तेथे हजर असलेले सर्व लोक तटस्थ व निश्चल बसले होते. जिकडे तिकडे पूर्ण स्तब्धता व शांतता होती. नेताजीचे कष्टी व व्यथित झालेले हृदय पाहून इतर पुष्कळांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्या वेळी नेताजीकडे पाहण्याचा कोणास धीर होईना. तो क्षण युगाप्रमाणे भासू लागला. हा कष्टमय कालखंड जितका लवकर संपेल तितका बरा असेच सर्वांस वाटू लागले. नेताजीचे शेजारी जपानी राष्ट्राचे प्रतिनिधी जनरल थामामॉटो बसलेले होते. निस्सीम देशभक्तीच्या गंगोत्रीतून अगदी अनपेक्षितपणे प्रगट झालेली ही अश्रुरूप स्वातंत्र्यगंगा पाहून त्यासही आश्चर्याचा धक्का बसला असल्यास नवल नाही. उत्कट देशभक्तीचे दृश्यस्वरूप पाहण्याचे भाग्य सर्वांस लाभत नसते. भावनांच्या वादळाने सुटलेला मनाचा तोल नेताजींनी दहा-पंधरा क्षणांनी कसाबसा सावरला. काही काल हरपलेले देहभान पुन्हा देशकाल परिस्थितीच्या स्मरणाने जागृत झाल्यावर, त्यांनी महत्प्रयासाने हृदयातील भावनांचा कल्लोळ आतल्या आत दडपला. या प्रयत्नात दोन-चार हुदके त्यांस आलेच. उजव्या हाताने ब्रीचेसच्या खिशातील रुमाल काढून, नेताजींनी ओघळलेले अश्रू पुसले व तेवढ्या वेळात आपल्या भावनांवर ताबा मिळवून त्यांनी रापथ पूर्ण केली.
अशाच एका दुसऱ्या महत्त्वाच्या प्रसंगी नेताजींस भावनांचा उद्वेग थोपवून धरणे कठीण झाले. सिंगापुर शहरी हिंदी स्वातंत्र्य सरकार स्थापन झाल्यावर, नेताजी सुभाषचंद्र बोस इतर चार सहकाऱ्यांसह टोकियो येथे भरणाऱ्या अतिपूर्वेतील सर्वराष्ट्रीय परिषदेकरिता गेले. या परिषदेत ब्रह्मदेशाचे अधिपती डॉक्टर बा माँ यांनी "अतिपुर्वेतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेल्या हिंदी स्वातंत्र्ययुद्धास तनमनधनाने मदत करावी" असा ठराव मांडला. हा ठराव सर्वानुमते संमत झाल्यावर नेताजी आभारप्रदर्शक भाषण करण्यासाठी म्हणून उठले. ते म्हणाले, "हिंदी जनतेची व भारताची करुणाजनक परिस्थिती लक्षात घेऊन आपण या अभागी देशास जी अमोल मदत करण्याचे अभिवचन दिलेले आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले अत्यंत आभारी आहो. वास्तविक ४० कोटी जनतेच्या, एके काळी संस्कृतीच्या अत्युच्च शिखरावर पोचलेल्या या अवाढव्य देशावर सर्वांचे मदतीची याचना करण्याचा हा दीनवाणा प्रसंग यावयास नको होता, परंतु तो आला आहे हे खरे. त्याला काही इलाज नाही...” या प्रसंगीही निर्बल, निःशस्त्र, निष्कांचन, अज्ञानी, अस्थिपंजर झालेल्या व सर्वस्वी पिळून नागवलेल्या आपल्या असंख्य बांधवांचे जीवनचित्र तेथे जमलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर रेखाटताना नेताजींचे डोळे पाण्याने भरून आले. “एवढे सांगितले हे तर काहीच नाही; याहून आमच्या लोकांची परिस्थिती शतपटीने बिकट आहे असेच जणु काय त्यांचा गदगद स्वर त्या प्रतिनिधींस सांगत होता. श्रोतृवृंदातील सर्व लोकांस तो प्रसंग अपूर्व असाच होता. नेताजींच्या हृदयातील आत्यंतिक राष्ट्रीय कळकळीचे उदात्त
स्वरूप त्यांच्या अश्रूंत पूर्णपणे प्रतिबिंबित झालेले होते. जपानमधील सर्व वृत्तपत्रांनी या प्रसंगाचा गौरवपूर्ण उल्लेख करून नेताजींच्या निस्सीम देशभक्तीची मुक्तकंठाने प्रशंसा केली

एकदा झालेला भाषेचा भीषण घोळ

पहाटेच्या सुमारास सतांग नदी पार करून आम्ही त्या नदीच्या दक्षिण तीरावरील जंगलात तळ दिला. आमच्या मागोमाग स्वातंत्र्य सरकारचे दरबारी जपानी वकील श्री. हाचिया हेही आम्हाला येऊन मिळाले. त्यांच्या स्वागतार्थ या परिस्थितीतही नेताजींनी भाताची खीर करविली होती. त्या आधी तेच दिवशी भीषण हवाई हल्ला झाला. हवाई हल्ला संपल्यावर एक देखणा जपानी तरुण, शर्ट व पँट घातलेला असा, नदी पार करून जंगलातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शोध करीत आमच्या छावणीचा पत्ता लावण्याचा प्रयत्न करीत येत होता. तो श्री. हाचिया यांच्या वकिलातीतील एक कार्यकर्ता होता. पीछेहाटीच्या गडबड-गोंधळात व वाटेतील अनेक प्रकारच्या अडीअडचणी व  कामे यामुळे इतरांपासून त्याची फारकत होऊन तो मागे राहिलेला होता. प्रसंग सापडताच तो नदी पार करून आला व त्याला श्री. हाचिया यांचा शोध लावून त्यांचे पुन्हा सामील व्हावयाचे होते. त्यांनी सांगितलेल्या कामाबद्दलही त्याला त्यांच्याशी बोलावयाचे होते. श्री. हाचिया हे नेताजींच्या छावणीतच असावेत असा त्याने तर्क केला. त्या जंगलात हिंदी स्वातंत्र्य सैन्याच्या विमानविरोधक तोफखान्याचा तळ पूर्वीपासून असल्यामुळे या तुकडीचे लोक त्यास त्या जंगलात अधूनमधून भेटले म्हणजे तो जपानी त्यास 'नेताजी कोठे आहेत?' असे इंग्रजीत विचारी. आमच्या या अशिक्षित शिपायास इंग्रजी भाषेची दोनचार वाक्येच येत होती. या जपान्यास तर हिंदुस्थानी भाषा अजिबात येत नव्हती. जपान्यास ज्याप्रमाणे पाश्चात्यांचा गोरा रंग व हिंदी माणसाचा गोरा रंग यातील फरक कळत नसे तद्वतच आमच्या या अशिक्षित हिंदी शिपायास इंग्रजी बोलणाऱ्या गोऱ्यागोमठ्या शर्टपँट घातलेल्या जपान्यात व पाश्चात्यात सहजासहजी भेदाभेद करता येत नसे. ब्रह्मदेशात ते वेळी हेरांचा अतोनात सुळसुळाट झालेला होता. त्यामुळे प्रत्येकाची वृत्ती संशयित झालेली. नेताजींचा तपास करणारा हा कोण गोरा भामटा, असे दोन स्वातंत्र्य-सैनिकास वाटले, परस्परांना एकमेकांच्या भाषा अवगत नसल्यामुळे उपभयपक्षी स्पष्ट विवरण शक्य नव्हते. त्या जपान्याचा इंग्रजीत तोच प्रश्न पुनः पुनः ऐकून त्या हिंदी सैनिकांचा संशय बळावत चालला. त्यांनी त्या जपान्यास पकडण्याचा प्रयत्न केला. मुकाट्याने कोणाचेही कैदी बनणे हे जपानी क्षात्रवृत्तीस लांछनास्पद असल्याचे प्रत्येक जपान्याच्या पूर्णपणे गळी उतरविले गेल्यामुळे तो जपानी त्यांचेपासून लांब पळून जाऊ लागला. त्या दोघांनी त्याला कैद करून नेताजींच्या अथवा श्री. हाचिया यांच्यासमोर न्यावे ही कल्पनाच त्या जपान्यास कशीशी वाटली. “तू सहजासहजी यांचा कैदी होण्यास हातात काय बांगड्या भरल्या होत्यास?" अशीच सर्व कनिष्ठ-वरिष्ठ जपान्यांनी त्याची हेटाळणी केली असती म्हणून तो दूरदूर पळू लागला. यामुळे त्या हिंदी सैनिकांचा संशय अधिकच बळावला. हा आपले हातून पळून निसटून जाणार असे जेंव्हा त्या दोघा सैनिकांनी पाहिले तेव्हा एकाने आपल्या कमरेला लटकाविलेली संगीन या काढून त्या जपान्याचे मागोमाग पळत त्याचेवर एकामागून एक पडतील तसे घाव घालण्यास सुरवात केली. शेवटी तो पळण्यास असमर्थ झाल्यावर त्या म्हणून त्या दोघा स्वातंत्र्य सैनिकांनी उचलून नेताजींच्या समोर आणला. तो हेर नसून श्री. हाचिया यांचा एक सहकारी असल्याचे कळले.
समजुतीच्या घोटाळ्यामुळे उगाच एक जपानी घायाळ झाला होता तो जिवंत राहण्याचीही आशा नव्हती. त्याची ती दशा पाहून नेताजींचे हृदय व्यथित झाले.
सर्व हकीगत कळाल्यानंतर त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन प्रकरणाचा काय तो निकाल लागेपर्यत त्या दोघां हिंदी सैनिकांस अधिक नजरबंद करण्याची आज्ञा दिली. पुढे काही चौकशी झाल्यावर त्या दोघा हिंदी सैनिकांस निर्दोष म्हणून सोडून देण्यात आले. परंतु तेवढ्यापुरती तरी नेताजींची परिस्थिती फार बिकट झाली. हवाई हल्ल्याने जपान्यांच्या तुकडीतील एक तरुण अधिकारी दोन तासांपूर्वीच जायबंदी झाला होता व आता तर या जपान्यास हिंदी शिपायांनी घायाळ केले होते. या दुसऱ्या घटनेचा आंतरराष्ट्रीय घोर परिणाम होण्याची पुष्कळ शक्यता होती. नेताजी अशा तही डगमगले नाहीत. जखमी इसमाबद्दल पूर्ण सहानुभूती दाखवून त्यांनी सैनिकास पुढील चौकशीसाठी अटकेत ठेवले. जपान्यांचेही यामुळे समाधान झाले. याहून आणखी काहीच करणे शक्य नव्हते. नेताजींच्या हृदयातील दुःखाची छाया त्यांचे चेहेऱ्यावर स्पष्टपणे दृग्गोचर होत होती. मात्र कपाळाला हात लावून खिन्न अथवा किंकर्तव्यमूढ होऊन बसण्याची त्यांस सवय नव्हती. जखमी इसमास अखेर प्रेमाचे व धीराचे चार शब्द बोलून त्यांनी त्यास डॉक्टरांच्या स्वाधीन केले व लगेच पुढील कार्याला ते लागले....

पुढील २ आ भागात वाचा -
नेताजींचे ते वीरश्रीयुक्त भाषण ...चेष्टेचा प्रसंग ... सैनिकांविषयी भोजन आस्था... “झांशीची राणी” नाट्य लेखन... पुनांचे वैयक्तिक अनुभव... नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सहभागी त्यांची मुलगी नात आणि पणती यांचे विचार...

२

मांडणीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

16 Sep 2022 - 9:00 am | विवेकपटाईत

लेख आवडला. वाचल्या सारखा वाटला. 1980 पूर्वी आम्ही जुन्या दिल्लीत राहत होतो. मी लहान असताना तुमचे काका आमच्या घरी आलेले आठवते. त्यांनी लिहलेली अनेक पुस्तके घरी होती बहुधा त्यावेळी वाचन झाले असावे.

शशिकांत ओक's picture

16 Sep 2022 - 10:55 am | शशिकांत ओक

आपल्या घरी काका आले होते हे वाचून आनंद झाला.
यावरून आठवले की मी जनकपुरी नवी दिल्ली येथे राहात असे. तेंव्हा ते व काकू ग्रेटर कैलाश च्या घरून आमच्या घरी राहायला येत असत.
लॉस एंजल्स मधे झालेल्या ऑलिंपिक खेळांचा विसर्जन समारंभ पहायला ते आले होते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2022 - 12:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण भाग एक कधी आला होता?
वाचल्यासारखा वाटत नाही
पैजारबुवा,

शशिकांत ओक's picture

16 Sep 2022 - 3:51 pm | शशिकांत ओक

श्री ज्ञानेबाचे पैजार जी,
सन २०१३सालात भाग १ मिपावर सादर केला होता.
आता त्यात सादर केलेले फोटो टायनीपिकने आपली मोफत सुविधा बंद केल्याने ते फोटो आता दिसत नाहीत.
त्या नंतर ई बुक रूपाने भाग - एक बनवला होता. आता नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याच्या निमित्ताने ईबुक रूपात दुसरा भाग सादर केला होता.
लिखाण फार लांबलचक असेल तर वाचकांचा धीर राहात नाही म्हणून इथे भाग ला २ तुकडे करून सादर करत आहे.

मुक्त विहारि's picture

16 Sep 2022 - 6:34 pm | मुक्त विहारि

आवडला ...

मुक्त विहारि's picture

16 Sep 2022 - 6:35 pm | मुक्त विहारि

आवडला ...