२२ यार्ड

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
11 Dec 2021 - 3:37 pm

अगदी नव्वदच्या दशकातही, आमच्या डोंगरपायथ्याला बिलगून असणाऱ्या छोट्याश्या गावात क्रिकेट हा लहान-थोर सर्वांचा आवडता खेळ. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेलही पण उत्साह मात्र तोच, जो भारतात क्रिकेटसाठी इतरत्र कुठेही दिसेल.

फळी (बॅट)
विकत आणलेली बॅट त्यावेळी गल्ली क्रिकेटमधे तरी अपवादानेच सापडायची. एखादी लाकडी फळी शक्य असेल त्या पद्धतीने बॅट मधे रूपांतरीत केली जायची. त्या बॅटने खेळायची एवढी सवय व्हायची की कोणीतरी रेडिमेड बॅट आणली की रुळायला वेळ लागायचा.
एकदा वाढदिवसाला हट्ट करून मिळालेल्या नवीन बॅटचा इतका आनंद झाला की मी भारतीय संघात खेळतोय अशी स्वप्न पडायला लागली. पण काही दिवसात एका मित्राने खेळताना बॅट एवढ्या जोरात आपटली की तिचं हॅण्डल वेगळं झालं, आणि माझं भारतीय संघात जागा मिळविण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं.

चेंडू (बॉल)
सुरुवात लहान मुलांच्या खेळण्यातील प्लास्टिक बॉलने झाली. पण वाऱ्यासोबत सहज उडून जात असल्याने अगदी काहीच पर्याय नसल्यास याचा वापर व्हायचा.

हळू-हळू थोड्याशा जाड आणि जड, किट-कॅट बॉलची लोकप्रियता वाढीला लागली. त्याचं नाव किट-कॅट का, असा विचार लहानपणी कधीही मनाला शिवला नाही. गल्ली क्रिकेट मधे आम्ही सर्वात जास्त काळ वापरला तो हा बॉल. त्यावरील सिम ठळक असल्याने स्पिन किंवा स्विंग करायलाही सोपं जायचं.

त्यानंतर आलेला नवीन प्रकार म्हणजे टकाटक बॉल. आवाजावरून दिलेलं नाव. बऱ्यापैकी वजन असल्याने याची दहशतच जास्त होती. एकदा मी मारलेल्या स्क्वेअर-कट वर, पॉइंटवर फिल्डींगला उभ्या असलेल्या माझ्या मित्राच्या भावाच्या दंतपंक्तीतील एक दात तुटला. तेव्हापासून आम्ही परत या टकाटक प्रकाराच्या वाटेला गेलो नाही.

फुल पिच (२२ यार्ड) खेळात मात्र टेनिस आणि एमआरएफ बॉल्सची चलती होती, तिथे प्लास्टिक बॉलला स्थान नव्हते.
टेनिसचा बॉल खेळायला सोपा, बॅटिंग करताना भीती कमी. टेनिसचा बॉल क्रिकेटसाठी का, हा प्रश्न पडायला टेनिस या खेळाची त्यावेळी एवढी ओळखच नव्हती.

एमआरएफ बॉल मात्र धडकी भरवणारा. फास्ट बॉलरने उसळता टाकलेला बॉल नाकावर आदळल्यावर काय होतं ते शब्दांत सांगणं कठीण.

कॉर्क बॉल मात्र फक्त ऐकण्यातच आला आणि तो खेळणं अजिबात शक्य नाही एवढाच त्याचा परिचय.
इंटरनॅशनल क्रिकेटमधे वापरला जाणारा बॉल आपण खेळू शकत नाही, त्यामुळे आपण गल्ली क्रिकेट मधे आपला वेळ वाया घालवतो आहे अशी खंत बालपणी बऱ्याचदा वाटायची.

खेळपट्टी (पिच)
इंटरनॅशनल मॅच मधे खेळपट्टी एवढी आखीव-रेखीव का असा प्रश्न सुरुवातीला पडायचा. मग हळू-हळू त्याचं महत्व लक्षात यायला लागलं. आम्हीही पिच (खेळपट्टी) क्युरेटरच्या भूमिकेत जाऊन नेहमीच्या मैदानातील खेळपट्टी तयार करू लागलो. अगदी खेळपट्टी झाडून घेऊन, पाणी मारून साग्रसंगीत वातावरण तयार करूनच खेळायला सुरुवात व्हायची. पाण्याचं प्रमाण किती, ते खेळ सुरू व्हायच्या नेमकं किती वेळ आधी मारायचं ही सर्व गणितं मोठ्या उत्साहाने सोडवली जायची. आमच्या शाळेतील ग्राउंड रोलर एकदा पिच रोल करण्यासाठी घेऊन यायला पाहिजे असा विचारही अनेकदा मनात यायचा.

आगळेवेगळे नियम
स्टम्पच्या मागे शून्य रन. फिल्डर्स कमी असतील तर मग ऑन साइडला एक रन किंवा मग एक टप्पा आऊटचा नियम. विषम संख्येत खेळाडू जमा झाले तर मॅच खेळताना एखादा खेळाडू कॉमन असायचा, तो शक्यतो विकेटकिपिंग करायचा आणि त्याला दोन्ही संघाकडून बॅटिंग मिळायची, पण बॉलिंग मात्र नाही. बॅटिंग करणाऱ्या संघाचाच अंपायर असायचा. एकदा मी अंपायर असताना प्रतिस्पर्धी संघाच्या बॉलरला पूर्ण ओव्हर टाकू दिली आणि मग शेवटी सांगितलं की सर्व सहा बॉल्स नो-बॉल आहेत म्हणून, कारण बॉलरने विकेटच्या कोणत्या बाजूने बॉलिंग करणार आहे ते सांगितलं नव्हतं. पहिला बॉल टाकल्या-टाकल्या नो-बॉल सांगता आला असता पण ओवरच्या शेवटी सांगितलं तर माझ्या संघाला ५ अतिरिक्त रन आणि बॉल्स मिळतील एवढं सोपं गणित माझ्या डोक्यात होतं. तेव्हापासून माझं अंपायर पद कायमचं काढून घेण्यात आलं.

चिडके खेळाडू
काही मित्र (किंवा खेळाडू, कारण असे चिडणारे खेळाडू मला कधीच मित्र वाटले नाही) बऱ्याचदा चिडायचे. पण खेळायला इतर कोणी नाही मिळालं किंवा मग त्या चिडक्या खेळाडूला सद्बुद्धी येईल या आशेवर आम्ही एकत्र खेळायचो. एकदा आमच्या इंग्रजी शिकवणाऱ्या सरांच्या मुलाने स्वतः बॅटिंग पूर्ण केली आणि तो लगेच घरी पळून गेला. त्याला घरी जाऊन गाठणं शक्य नव्हतं त्यामुळे उपाय म्हणून आम्ही त्याच्यावर कायमची बंदी टाकली. तेव्हापासून इंग्रजीचे सर वर्गात आले की मला माझ्या राहून गेलेल्या बॅटिंगची आठवण व्हायची.

घरचं मैदान (होम पिच)
पोलिस लाईनच्या मागील माळरान आमच्यासाठी घरचं मैदान (home pitch) होतं. मागच्या बाजूला पडीक असलेली पोलिस लाईनची जुनी इमारत, ऑफ साइडला उताराच्या शेवटी भाताची शेती, ऑन साइडला उताराच्या शेवटी एक लहान घळई, आणि समोर लाँग ऑन, लाँग ऑफला दूरपर्यंत पसरलेलं बऱ्यापैकी सपाट माळरान.
आमच्या संघात बहुतेक सर्वजण सरकारी ऑफिसात (पंचायत समिती, सरकारी दवाखाना, पोलिस लाईन, एमएसइबी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुलं.
प्रतिस्पर्धी संघ वाडा, पेठ, पवारमाळ, खोडद गाव या वेगवेगळ्या ठिकाणाहून चालत यायचे. त्यांच्यासाठी हा क्रिकेटचा परदेश दौरा असायचा. कधी-कधी दोन पेक्षा जास्त संघ एकाच वेळी आले तर मैदानाला जत्रेचं स्वरूप यायचं. काही खेळाडू माळरानावर गाई-म्हशी चरायला सोडून मधल्या वेळेत खेळात सहभागी व्हायचे.
जमलेल्या मुलांची मोजदाद होऊन गरज पडल्यास संघांची फेररचना केली जायची. अटी-शर्ती ठरवल्या जायच्या. अटी-तटीचा खेळ व्हायचा. विजयाचा जल्लोष असायचा. हरल्याची खंतही असायची.

आमच्या संघाचाही कधी-कधी परदेश दौरा व्हायचा. भात शेतातून, डोंगरातून वाट काढत, खेळाची गणितं मांडत आमच्या संघाचा प्रवास व्हायचा, शेजारील गावातील मैदानापर्यंत. तिथलं मैदान आमच्या पोलिस लाईन मैदानापेक्षा खूप वेगळं, खूप मोठं आणि बऱ्यापैकी सपाट. आम्हाला त्या खेळपट्टी आणि मैदानासोबत जुळवून घ्यायला वेळ लागायचा. त्या गावातील संघ मात्र त्यांच्या घरच्या मैदानावर खेळताना वर्चस्व दाखवून द्यायचा. होम पिचवर खेळणे म्हणजे काय याचा अर्थ मी तिथे अनुभवला, कायम लक्षात ठेवला.

माझी क्रिकेट कारकीर्द
शारीरिक शिक्षणाच्या पुस्तकात क्रिकेट विषयी तांत्रिक माहिती दिली होती. मी त्यातून फॉरवर्ड डिफेन्स, बॅकवर्ड डिफेन्स, स्पिन आणि स्विंग गोलंदाजीसाठी सिमचा योग्य वापर इत्यादी सर्व तांत्रिक बाबी आत्मसात केल्या. सचिन तेंडुलकरची स्ट्रेट ड्राईव्ह, शेन वॉर्न, कुंबळे यांची लेग स्पिनची शैली, मुरलीधरनची ऑफ स्पिनची शैली, वेंकटेश प्रसाद, ग्लेन मॅकग्रा यांची फास्ट बॉलिंगची शैली हे सर्व अभ्यासलं, कॉपी केलं. पण आमच्या संघातील मित्रांच्या प्रॅक्टिकल कौशल्यासमोर माझं पुस्तकी आणि कॉपी केलेलं ज्ञान फार काही उपयोगी पडलं नाही. हा सर्व खटाटोप करायच्या खूप आधी, पोलीस लाईन शेजारच्या क्रिकेट ग्राउंडवरील एका मॅचमधे लेग साइडला मी माझ्या नकळत मारलेला षटकार पहिला आणि अखेरचा षटकार ठरला. त्यानंतर मात्र आंतरवाडीय (दोन वेगवेगळ्या वाड्या- वस्त्यांवरून आलेले संघ) मॅचेस मधील माझा सहभाग शेवटचा फलंदाज, बेभरवशाचा गोलंदाज व क्षेत्ररक्षक एवढ्यापुरताच मर्यादित राहिला. आणि जी थोडी फार खेळायची संधी मिळाली ती माझा जिवलग मित्र आमच्या संघाचा कॅप्टन असल्यामुळे.

पुढे जाऊन शिक्षण, नोकरी, प्रपंच या धावपळीत क्रिकेट, सवंगडी, आणि बरंच काही खूप मागे राहिलं, धूसर होत गेलं.
आणि २२ यार्डची खेळपट्टी व्यवस्थित मोजायची राहून गेली...

कथालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

11 Dec 2021 - 4:32 pm | तुषार काळभोर

हलका प्लॅस्टिक बॉल, किटकॅट बॉल, टेनिस बॉल - माझाही प्रवास असाच झाला.
आमच्याकडे 'टुर्नामेंट' (उच्चार टुर्लामेंट) म्हणून क्रिकेट स्पर्धा व्हायच्या. १९९५-२००० काळात. पीचची लांबी बरा फूट. प्लॅस्टिक बॉल. पीच च्या अर्ध्या लांबीवर एक रेष. बॉल टाकताना हात शरीराला लागून, केवळ कोपरापासून हलवून टाकायचा. अर्ध्या रेषेच्या अलीकडे पडला की नो बॉल. मनगटाला झटका दिला की नो बॉल. सहा षटके. चौकार आणि षटकारांची आतषबाजी व्हायची. दोन आठवडे रोज रात्री आठ हॅलोजन दिव्यांच्या उजेडात स्पर्धा व्हायची. लोकल पुढारी बक्षिसे स्पॉन्सर करत. विजेता, उपविजेता, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अंतिम सामनावीर, मालिकावीर, सलग सहा चौकार, सलग सहा षटकार, विकेट्स हॅटट्रिक अशी पारितोषिके असायची. एकूण सैराटच्या सुरुवातीच्या सामन्या सारखं पण प्लॅस्टिक बॉल हाफ पीच.
वर्षातून एकदा किंवा दोनदा स्पर्धा असत. ते दोन आठवडे आमच्यासाठी वर्ल्ड कप माहौल असायचा.

श्रीगणेशा's picture

14 Jan 2022 - 7:16 pm | श्रीगणेशा

असा टूर्लामेंटचा माहौलही पाहण्यात, ऐकण्यात आला आहे, अगदी मराठी, हिंदी, इंग्रजी मिश्रित कॉमेंटरीसहित!

सौन्दर्य's picture

11 Jan 2022 - 12:27 am | सौन्दर्य

क्रिकेटच्या आठवणी एकदम रम्य. माझा जन्म व बालपण मुंबईच्या उपनगरात गेल्यामुळे मोठ्या मैदानावर खेळायला कधी मिळालेच नाही. घराजवळच दोन चाळीच्या मधल्या जागेत आमच्या मॅचेस चालायच्या. लेग साईडला एक बैठी चाळ असल्यामुळे ती पार केली की सिक्सर मिळत असे. बॉलचा टप्पा कौलावर पडला तर तो फोर धरला जात असे. बहुतके करून एमआरएफचा पिवळा टेनिस बॉलनेच मॅचेस होत. हा बॉल मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवला तर फार उसळी घेत नसे व कितीही जोर काढून मारला तरी लांब जात नसे असा काहीसा समज होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार बॉलची जीभ लावून चव घेत व खारट लागल्यास त्या बॉलने खेळणे नाकारले जाई. शिल्डच्या नावाने (लहानपणी आम्ही त्याला सील म्हणत असू) प्रत्येकी चार आणे/आठ आणे व आणखी थोडे मोठे झाल्यावर एक रुपया अशी रक्कम फिक्स होत असे व जिंकलेली टीम ते सर्व पैसे + खेळण्यात वापरलेला बॉल घेऊन जात असे. बहुतेक वेळा आमची टीम हरेच, त्यामुळे बिल्डिंगमधल्या मुली आम्ही आपापसात वाद घालत आलो की समजून जात की आम्ही नेहेमी प्रमाणे हरलो आहोत. संध्याकाळी नक्की कोणामुळे हरलो ह्यावर अत्यंत जिवंत चर्चा होई व त्याचे निष्पन्न मारामारीत होई. मग तो अबोला पुढच्या मॅचपर्यंत चाले. एकूण मागे वळून पाहता ते दिवस आनंदाचे होते असे एकूण वाटते.

श्रीगणेशा's picture

14 Jan 2022 - 6:59 pm | श्रीगणेशा

छान आठवणी!
आमच्याकडेही कधी कधी एक रुपया दिला जायचा जिंकणाऱ्या संघाला, हरणाऱ्या संघाकडून, सहसा कॅप्टन मंडळींच्या खिशातून. पेठेतील नेहमीच्या हॉटेलवर जमून भेळ पार्टी साजरी व्हायची.

अनन्त्_यात्री's picture

11 Jan 2022 - 9:52 am | अनन्त्_यात्री

वेगवेगळ्या लांबीच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचे दिवस आठवले. घराच्या आतमध्ये ( ३ यार्ड - प्लास्टिक बाॅल-काचसामानाला लागल्यास आऊट). गल्लीमध्ये ( १० यार्ड - टेनिस बाॅल- पहिला मजला आऊट).
मरीन लाईन्स स्टेशनच्या पश्चिमेकडील मैदानात (२२ यार्ड - सीझन बाॅल).

श्रीगणेशा's picture

14 Jan 2022 - 7:44 pm | श्रीगणेशा

धन्यवाद! २२ यार्ड बहुतेक वेळा २२ फूट म्हणूनच मोजलं जायचं.

कॉर्क बॉल मात्र फक्त ऐकण्यातच आला आणि तो खेळणं अजिबात शक्य नाही एवढाच त्याचा परिचय.

मी खेळलोय. याला आम्ही चिकी बॉल म्हणायचो. हा लाकडी असायचा. कधीकधी फुटायचाही. मात्र हा पायावर बसला की अस्मान आठवायचे.

सौन्दर्य's picture

14 Jan 2022 - 12:06 am | सौन्दर्य

कॉर्क बॉल हॉकीत वापरला जातो का ? मी देखील खेळलोय पण अगदी दगडासारखा टणक होता एव्हढं आठवतंय.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 9:54 am | मुक्त विहारि

हलका फुलका लेख

श्रीगणेशा's picture

14 Jan 2022 - 7:53 pm | श्रीगणेशा

धन्यवाद तुषार काळभोर, अनन्त्_यात्री, विजुभाऊ, सौन्दर्य, मुवि _/\_