'माया': एक झुंजं संसाराशी!-भाग २

सुहास चंद्रमणी बारमासे's picture
सुहास चंद्रमणी ... in जनातलं, मनातलं
2 Jun 2021 - 1:03 am

........'चंद्रभान' मायाला आणि आपल्या मुलाला द्यायला सासरी आला. सासऱ्याने जावयाचा खास पाहुणचार म्हणून गावरान कोंबडा कापला. 'रत्नाकर' हा मायाचा मामेभाऊ होता तो पण दारुडा होता. त्याने गावच्या 'मोहाची दारू' चंद्रभानला पाजली आणि नशेमध्ये धुंद झाल्या नंतर 'रत्नाकर' चंद्रभानला विचारू लागला, "काय भाऊजी तुमचं काही लफड-वफडं आहे का बाहेर कुठे? जाता की नाही बैठकीत! 'चंद्रभान' लगेच बरळायला लागला, "आहे ना! आपल्या सारख्या पैलवान गड्याची एकीवर थोडी हौस भागते. आहे 'चंपा' नावाची नाचणारी बाई!"रत्नाकर ने ही माहिती लगेच मायाला दिली.मायाला आधी संशय होता पण आता रत्नाकरने सांगितल्यानंतर पुष्टी झाली. 'माया' सासरी आली. सासू फक्त स्वानन्दाचे लाड करी आणि 'अस्मिता' तशीच रडत राही. मायाला फार चीड यायची सासूचे असे वागणे बघून! 'चंद्रभान' हा विद्युत विभागात नोकरीला होता. त्याला पगार जेमतेमच मिळायचा आणि त्यातल्या त्यात आठ-दहा दिवस घरीच बसुन असायचा. पगार झाला की पैसे संपेपर्यंत खूप दारू प्यायचा आणि नंतर आजारी पडायचा असा त्याचा प्रत्येक महिन्याला नित्यक्रमच होता.
मायाला खर्चाकरीता मोजकेच पैसे देई. 'माया' त्यातच बाजारहाट, किराना,मुलांचे दूध, तब्येती, आल्यागेल्यांचे स्वागत सर्वकाही निभावून नेत असे. कधी कधी तर तेल-मीठाला पण पैसे नसायचे त्यामुळे थोड्या तेलात पाणी टाकून भाजीला फोडणी द्यायची पण तिने आपली ही परिस्थिती कधी माहेरच्यांना कळू दिली नाही की कधी त्यांच्यासमोर हात पसरले नाही.
......मायाला तिसऱ्यांदा गर्भधारणा झाली. ह्यावेळेस ते मूल मायाला नको होते पण चंद्रभान म्हणाला, "मला मूल हवे आहे आणि सासू पण अडून बसली, "काय होते ग भवाने तुला! आम्ही नाही का आठ-आठ मुलांना जन्म दिला तू तर दोनच पैदा केलीस. पोसणारा माझा मुलगा आहे गपचूप राहायचं नाही तर जा आपल्या बापाच्या घरी!" रामरावांनी पण जावयाला समजावण्याचा प्रयत्न केला कारण सलग चार वर्षांमध्ये माया तिसऱ्यांदा गरोदर होती त्यामुळे तिच्या तब्येतीची हेळसांड होत होती.नाईलाजाने मायाने तिसऱ्या मुलाला जन्म दिला. नाव ठेवले 'मल्हार' 'मल्हार' नाव ठेवण्याचे खास कारण होते कारण तो रडायला लागला की सूरात रडत असे त्यामुळे मायाने त्याच्या गळ्यातल्या सूर बघून 'मल्हार' या रागाचे नाव ठेवले. मायालापण गाण्याची आवड होती. ती छान पाळणागीत गायची नामकरणाच्या कार्यक्रमांमध्ये!

.....आता मुले मोठी होऊ लागली आणि चंद्रभान चे व्यसन पण वाढत चालले होते. तो झोपेतून उठला की पहाटे पहाटेच दारूच्या गुत्त्यावर जायचा जेव्हा पर्यंत तो दारू नाही प्यायचा तोपर्यंत तो काही हालचाल नाही करायचा. 'माया' आता पुरती त्याला समजावून समजावून थकली होती. 'स्वानंद' अभ्यासात हुशार होता त्याला अभ्यासाची गोडी होती तो स्वतःहूनच अभ्यास करायला बसायचा. जास्त मित्रांमध्ये तो रमत नसे एक प्रकारची गूढ शांतता त्याच्या चेहऱ्यावर असायची.'अस्मिता' आणि 'मल्हार' हे नेहमी खेळण्यात दंग असायचे. 'अस्मिता' ही तर नेहमी मुली सोडून मुलांसोबतच खेळायची. पतंग उडवणे,भोवरा,गोट्या खेळणे,डोहात पोहणे, टायरची गाडी चालवणे हे सगळे तिचे आवडते खेळ आणि 'मल्हार' तर विठ्ठलाच्या मंदिरात हरिपाठ करीत बसायचा. तिथे 'प्रल्हाद' नावाचा मुलगा होता तो एक हरिभक्त गायक होता. त्याने आवड म्हणून छोट्या मुलांचे 'भजनी मंडळ' सुरू केले होते 'मल्हार' शाळा सोडून तिथेच रमायचा. मुलांचे सर्व गुण बघून मायाचा सर्वात आवडता 'स्वानंद'च होता कारण तो नेहमी तिच्या अवती भोवतीच असायचा पण' स्वानंद' हट्टीपण होता त्यामुळे सर्वात जास्त मार पण त्यालाच बसायचा.
...'रमाबाई' मायाची आई पुष्कळ दिवसानंतर मायाला आणि नातवंडांना भेटायला आली होती. 'चंद्रभान' नेहमीप्रमाणे नशेत धुंद होता 'माया' आणि 'रमाबाई' हौदातून पाणी भरत होत्या 'चंद्रभान' मायाकडे पैशाची मागणी केली. "माया मला पैका हवा. लवकर दे. मला प्यायला पाहिजे." जावयाचा हा अवतार बघून 'रमाबाई' त्यांना समजावणीच्या सुरात म्हणाल्या, "जावईबापू असं वागणं बरं नव्हं आता! आता तुम्हाला 3-3 गुणाची मुलं आहेत. त्यांच्याकडे बघा जरा!" तर 'चंद्रभान' लगेच चवतारला. त्याचे डोळे लालबुंद झाले त्याने रागाने रमाबाई कडे बघितले."ये मला जास्त शहाणपणा शिकवू नगं! चालती हो माझ्या घरातून. आपल्या आईचा असा अपमान बघून 'माया' पेटून उठली. "ये मसण्या कुणाला चालता हो म्हणत रे! तुझ्या घरी काय खायला नाही आली. उलट धनधान्य घेऊनच येथे आपल्या घरून! मुडद्या, मेल्या, दारुड्या!" असे शब्द ऐकताच 'चंद्रभान' चिडला त्याच्याजवळ पानाचा लाकडी खोका होता त्याने सरळ मायाकडे भिरकावला तो जाऊन मायाच्या डोक्याला लागला आणि डोक्यातून घळाघळा रक्त वाहायला लागले.रमाबाई ओरडल्या, त्यामुळे शेजारचे लगेच धावून आले बाजूला राहणाऱ्या कांताबाई नी मायाला आपल्या घरी घेऊन गेल्या जखमेवर थोडी तंबाखू लावली आणि आराम करायला सांगितले. रमाबाई हा सर्व प्रकार बघून खूप घाबरल्या त्यांना लगेच कल्पना आली की आपल्या मुलीला किती त्रास सोसावा लागत आहे त्या तशाच तडक गावी निघून गेल्या.

.....माया ला भेटायला 'रामराव' आले. "मुली तू कशाला इतका त्रास सहन करते तुझा 'बा' अजून खंबीर आहे तुला पोसायला चल पोरी आपल्या घरी चल. नको करू संसार या दारुड्या बरोबर!" पण मायाला आपल्या लेकरांची काळजी होती नवरा सोडून बापाच्या घरी आलेल्या मुलीला समाज कोणत्या नजरेने बघतो याची जाणीव तिला होती. ती रामरावांना म्हणाली, "नाही 'बा' मला यातूनच आपला मार्ग शोधावा लागेल माझ्या लेकराच्या भविष्यासाठी! मला कितीही हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या तरी मी घर सोडायची नाय! तुमची माया मला कळते पण ही माया खंबीर आहे सर्व वादळांना तोंड देण्यासाठी!"मायाचे हे बोलणे ऐकून रामरावांचे डोळे भरून आले. "पोरी सुखी राहा, पोरी सुखी राहा!" म्हणत आल्यापावली परत निघून गेले.
......मायाच्या शहरी 'प्रौढ साक्षरता अभियाना'ची योजना आली होती. त्यामुळे प्रौढांना शिकविण्याकरिता 'चाणाक्ष' आणि 'हुशार' स्त्रियांची गरज होती. साक्षरता अभियानाच्या अध्यक्षा सावित्रीबाईंना मायाविषयी कल्पना होती. त्यांनी स्वतःहून मायाचे नाव शिक्षक वर्गामध्ये सामील करून घेतले. आता 'माया' सकाळची घरची सर्व कामे उरकून संध्याकाळी प्रौढांचे वर्ग घ्यायला जायची. शेजाऱ्यांकडून, मायाच्या जावांकडून या गोष्टीला खूप विरोध झाला पण ती कोणत्याही विरोधाला न जुमानता आपले काम सातत्याने करीत राहिली.मायाच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण झाला होता. तिच्यामध्ये एक प्रकारची 'जिद्द' आणि 'चिकाटी' बलवत होत होती. या साक्षरता अभियानातून तिला दरमहा पैसे पण मिळायचे आता चंद्रभान ला तिच्या पैशाबद्दल माहित झाले त्यामुळे तो दारुसाठी तिच्याकडे पैशाची मागणी करू लागला. पैसे नाही मिळाले तर तिची पैशाची पेटी फोडायचा तिथेही पैसे नाही गावले तर घरचे कडधान्य किराणा दुकानात जाऊन मिळेल त्या भावात विकायचा.एकदा तर माया सरळ त्या किराणावाल्या ठाकूरच्या दुकानात गेली आणि त्याला जबर सुनावले, "यापुढे जर तू माझ्या नवऱ्या कडून धान्य विकत घेतले तर तुझी पोलिसात तक्रार करेल!" त्यानंतर त्याने कधीही चंद्रभान कडून माल विकत घेतला नाही.
....दारूचे व्यसन चंद्रभान च्या अंगी फार भिनले होते. जवळ- जवळ तो महिन्याचे पंधरा दिवस दारू पिऊन पडून राहत असे. 'स्वानंद', 'मल्हार', 'अस्मिता'ही मुले लहान होती त्यांना एवढेच कळायचे की आपला बाप हा दारुडा आहे आणि आईला मारहाण करतो. दारूने त्याचे डोके निकामी केले होते. तो दारू आणायला स्वानंद आणि छोट्या मल्हारला पण पाठवत असे. या छोट्या दोन जीवांना काय कळायचे. ते सरळ 'लाला जयस्वाल' च्या देशी दारू दुकानात जात आणि म्हणत, "लाला एक संत्रा दो!"लालाला पण फार आश्चर्य वाटायचे की 'चंद्रभान' आपल्या मुलांना दारू आणायला कसा काय पाठवतो. माया या सर्व प्रकाराला विरोध करायची. दारूच्या नशेत चंद्रभानला दारू गरम करायची त्यामुळे तो मोरीतल्या हौदामध्ये तुडुंब बुडून राहत असे. सगळं पाणी घाण करून टाकायचा. एक दिवस तर त्याने हद्दच केली त्या स्वानंदला आणि मल्हारला पायाकडून पकडले आणि त्यांचे डोके हौदात बुडवायला लागला. चंद्रभान ला दारूच्या नशेमध्ये त्यांची भीती बघुन मजा येत होती. आपल्या मुलांची आरडाओरड बघून माया लगेच बाहेर पडली आणि तिने 'स्वानंद' आणि 'मल्हार' चा हात पकडला आणि त्यांना हौदातून बाहेर काढले आणि त्याचे हे कृत्य शेजाऱ्यांचे निदर्शनास आणून दिले या सर्व प्रकाराने 'चंद्रभान' पुरता पेटून उठला. त्याला मायाबरोबर सूड उगवायचा होता. मायासोबत होणारी रोजची भांडणे त्याला आता कटकट वाटायला लागली होती आणि त्याला दारू ला पण पैसे मिळत नव्हते. एके दिवशी पैशावरून चंद्रभानने मायाशी जोरदार भांडण केले. मायाला लाथाबुक्क्यांनी त्याने खूप मारले. 'माया' खाली बसून रडत होती. त्याने 'केरोसीन' ची डबकी उघडली आणि माया च्या अंगावर केरोसीन टाकायला लागला. मायाला सुरुवातीला वाटले तो पाणी टाकत आहे अंगावर! पण नंतर तिला वास आला तेलाचा! 'चंद्रभान' आगपेटी शोधत होता तोवर प्रसंगावधान साधून 'माया' लगेच घराबाहेर आली आणि शेजाऱ्यांना ओरडून सांगितले, "हा सैतान बघा मला पेटविण्याचा प्रयत्न करीत आहे.मला रोज बदडतो आणि ह्याची हिम्मत बघा आज मला संपवू पाहत आहे."कांताबाईनी धावत येऊन लगेच मायला सावरले तोवर चंद्रभान मागील दारातून सायकल घेऊन फरार झाला होता. मायाला सर्वांनी पोलीस तक्रार करायचा सल्ला दिला पण यामुळे चंद्रभान दुरुस्त नाही होणार उलट तो आणखी त्रास देणार. मायाने आपली सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेवून चंद्रभानला वठणीवर आणण्याचा दृढ निश्चय केला.

क्रमश:

संस्कृतीकथालेखअनुभव

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

2 Jun 2021 - 7:23 am | गुल्लू दादा

छान चालू आहे.

गॉडजिला's picture

2 Jun 2021 - 11:06 am | गॉडजिला

पुरुष म्हणजे गलिच्छ ओंगळ डुकरे... हे सोमरसेट मॉमच्या कथेतील वाक्य खरे की काय असे वाटू लागले आहे... खरे खोटे मायाच्या सासूलाच माहीत... नशीब सासू मारहाण करणारी न्हवती ते.

सुहास चंद्रमणी बारमासे's picture

2 Jun 2021 - 7:23 pm | सुहास चंद्रमणी ...

गुल्लू दादा आणि गाॅडजिला आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!