शेर अफगाण- भाग ३ (अंतिम)

विश्वनिर्माता's picture
विश्वनिर्माता in जनातलं, मनातलं
22 May 2021 - 9:25 pm

A savage lesson for Khusru by compelling him to ride on an elephant between ling line of his companions impaled on stakes.jpgBy Unknown author - <a rel="nofollow" class="external free" href="https://archive.org/details/hutchinsonsstory00londuoft">https://archive.org/details/hutchinsonsstory00londuoft</a>, Public Domain, Link
खुसरौची शिक्षा.
सहा
जहाँगिरला एकूण एकोणीस बायका होत्या. आणि, ह्या फक्त त्याच्या कायदेशीर लग्न झालेल्या पत्नी. उपस्त्रिया सुद्धा शाही झनान्याच्या सदस्या असत, अर्थात,त्यांचा दर्जा पादशहांच्या पत्न्यांईतका नसे. जहाँगिरची पहीली पत्नी, खुसरौची आई- मान बाई- हिला आपल्या पती आणि मुलामधल्या वितुष्टाने अतीव दुःख दिले. तिने खुसरौला अनेक आर्त विनवण्या करणारी पत्रे लिहीली. तिने खुसरौला विनवले, की बाळा, फक्त तीस वर्षे धीर धर, त्यानंतर तुच सम्राट होणार आहेस. वडिलांशी नको वैर घेऊस. खुसरौने अर्थातच तिचे ऐकले नाही. या अतीव दुःखात मान बाईने अफूचे (ओपियम) अतिसेवन करुन आपले प्राण त्यागले.
मान बाई निर्वतल्यानंतर जनान्यामधले प्रभुत्व आले ते दोन स्त्रियांकडे- पहिली म्हणजे जहाँगिरची दुसरी पत्नी जगत गोसिनी, आणि दुसरी म्हणजे पादशहा अकबरची विधवा साम्राज्ञी- रुकैय्या बेगम. ह्या दोघी स्त्रियांच्या प्रभुत्वामागे एकच दुवा होता, तो म्हणजे शहजादा खुर्रम.
जहाँगिरला एकूण पाच पुरुष वंशज जन्मले. ते म्हणजे- खुसरौ, परवेझ, खुर्रम, जहंदर आणि शहरीयार. त्यातला जहंदर जन्मानंतर काही महिन्यांमध्येच निर्वतला.
रुकैय्या बेगम ही अकबराची अत्यंत लाडकी पत्नी होती. त्याअनुषंगाने ती अकबराच्या हयातीत खूप ताकदवान सुद्धा होती. अकबराची आणखी एक अत्यंत ताकदवान पत्नी म्हणजे मरियम मकानी, मूळची जोधाबाई. मरियम माकानी अत्यंत नावजलेली व्यापारी होती, आणि तीची ब्यापारी गलबते मक्केपर्यंत प्रवास करत. एकूणच, मुघल राजघराण्यातल्या स्त्रिया अत्यंत धनवान असत. त्यांच्या स्वतःच्या जहागिर्या असत आणि तनखे असत. एकमेकीन्मध्ये ह्या जहागिरांची देवाण घेवाण सुद्धा त्या करत असत. त्याशिवाय, पुरुष वंशजाला जन्म देणार्‍या राण्यांचे महत्व अनन्यसाधारण असे, आणि झनान्याच्या उतरंडीमध्ये त्या सर्वात वर असत.
जगत गोसिनीने खुर्रमला जन्म दिला खरा, पण पादशहा अकबराच्या आज्ञेवरुन खुर्रमचे पालकत्व रुकैय्या बेगमनी स्विकारले होते. त्यामुळे आपला स्वतःचा मुलगा सुद्धा जगत गोसिनीला परका होता. पण, तसे असले तरी खुर्रमची जन्मदाती आई असल्याने तिचे जनान्यातले स्थान वरचढच होते.
मेहरुन्निसाच्या अली कुली सोबतच्या लग्नाबाबत काय भावना होत्या ह्याची कल्पना करणे फारसे अवघड नाही. दरबारात वाढलेली सुंदर मुलगी इतकेच तिचे आयुष्य नव्हते, तर शाही जनान्यातले आयुष्य तिने अत्यंत जवळुन पाहिले होते, कारण साम्राज्ञी रुकैय्या बेगमला ही चटपटीत पोर ती अगदी लहान असल्यापासूनच आवडली होती. त्यामुळे मेहरुन्निसाला कायमच जनान्यामधे बोलावुन घेतले जाई. त्यामुळे जनान्यातले राजकारण, अर्थकारण हे सगळे तिने लहानपणीच जवळुन पाहिले होते. पट्टराणी असल्यावर राज्यकारणातला सहभाग आणि सत्ता काय असतो हे सुद्धा तिने जवळुन पाहिले होते.
मेहरुन्निसा जनान्यात इतकी मिसळलेली होती की, तिने खुर्रम लहान असताना त्याला खेळवले सुद्धा होते. इतकेच नाही, तर सलीमचे तिथे येणे जाणे असल्याने दोघांनी एकमेकांना अगदी जवळून पाहीले असण्याची सुद्धा शक्यता आहे ! त्यामुळे तिच्या मनात काही महत्वकांक्षा तयार झाल्या नसतील तर नवल. त्या महत्वकांक्षांवर पादशाहांच्या प्रस्तावाने पाणी फिरले, आणि लाखात देखण्या निस्साचा विवाह अली कुली सारख्या फौजी गड्याशी झाला.
त्यात नियतीने जश्या सोंगट्या हलवल्या, त्यात मेहरुन्निसा, अली कुली आणि सलीमची कथा निर्णायक क्षणी आली.
मेहरुन्निसाचा परिवार आता शाही दरबारात अगदी उच्च पदावर होता. वडील इतमदुदौला (घियास बेग) दरबाराचे मुख्य दिवाण होते. मेहरुन्निसाचे भाऊ असफ बेग आणि मुहम्मद शरीफ दोघेसुद्धा दरबार आणि सैन्यात उच्चपदस्थ होते. पण, या कुटुंबाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला जाणार होता, जो अधीच्या सर्व यशास झाकोळून टाकेल. पादशहाँनी असफ बेगची मुलगी, अर्जुमंद बानो, हीचा विवाह शाहजादा खुर्रमशी लावायचा ठरवला. वाड्गनिश्चयाचा कार्यक्रम लाहोरमध्ये, इत्मदुदौलच्या घरी होणार होता. अर्थातच, मेहरुन्निसाला आमंत्रण होते. अर्जुमंद खुर्रमची पहीलीच पत्नी होणार होती, त्यामुळे हा समारंभ आणखी महत्वाचा होता. मेहरुन्निसा लाडलीला सोबत घेऊन लाहोरला निघाली.
मेहरुन्निसाचे स्वप्न, तिच्या भाचीसाठी, अर्जुमंद बानोसाठी पूर्ण होणार होते, आणि मेहरुन्निसाने ते फक्त उघड्या डोळ्यांनी पाहायचे होते...

सात- मेहरुन्निसा- (ईसवी सन १६०७) I
लाहोरमधून परतीच्या वाटेवर असलेल्या मेहरुन्निसा लाडलीच्या उत्साहीत बडबडीला हसून उत्तर देत होती. लाडलीचा जन्म बर्दवान मध्येच आजपर्यंत गेला होता. मेहरुन्निसा आणि... ‘त्या’च्या शिवाय.., लाडलीला कोणीच सोबती माहीत नव्हता, आणि धुळकट बर्दवानच तिचे विश्व होते. लाहोरला सलीहादीदीच्या मुली आणि अर्जुमंद सोबत दिवसदिवस खेळणे लाडलीसाठी नवीन होते. आणि, शाही समारंभाचा थाट. लाडलीला त्याचा विसर पडण्याची शक्यता फारच कमी होती.
“आई सारखीच मुलगी.” मेहरुन्निसाने कडवटपणे विचार केला. लाहोरला निघताना कुठेतरी खोलवर तिला अर्जुमंद बद्दल असुया वाटत होती. मेहरुन्निसाने ऊराशी बाळगलेले स्वप्न अर्जुमंदला किती सहजरित्या मिळाले.
पण लाहोरमध्ये झालेल्या घडामोडींनंतर अर्जुमंद बद्दलची असुया मागे पडली होती- आणि मनात वादळ उठले होते. त्या वादळाचा स्त्रोत होता- मेहरुन्निसाच्या अंगरख्यामागे दडवलेला शाही खलिता. राहुन राहुन निस्साचे विचार त्या खलित्याकडे जात होते.
अर्जुमंद च्या समारंभात सलीम आला. अर्थात, आता तो सलीम नव्हता, नुरुद्दीन मुहम्मद जहाँगिर पादशाहा गाझी! पादशहाँनी तिचा चेहरा पुन्हा पाहिला, थेट बारा वर्षांनी ! पण ती नजर अजुन तशीच होती, जशी बारा वर्षांपूर्वी रुकैय्या बेगमच्या बागेमध्ये असे. गंभीर, तीक्ष्ण, ‘मला तू हवी आहेस’ म्हणणारी. पादशहांच्या आदेशामुळे मेहरुन्निसाचे लग्न ‘त्या’च्याशी झाले, पण मेहरुन्निसा हरवलेल्या शक्यतांना कधीच विसरु शकली नाही.
आणि त्याउलट सलीम ? “तो माझ्यासारख्या हजारो सुंदर मुली पाहात असेल.” तिने तेव्हा विचार केला होता. “तू सलीमचा विचार करत झुरत राहातेस, आणि सलीमच्या मनात क्षणभंगुर आसक्तीशिवाय काहीही नसेल. अकरा वर्षात तुझा विचार तर लांबच, चेहेरा सुद्धा सलीमला आठवला नसेल.” पण, लाहोर मध्ये आल्यावर, त्याला पुन्हा पाहिल्यावर निस्सा मधला सगळा काळ विसरुन गेली.
मेहरुन्निसाला सुद्धा आपल्या वागण्याचे परिणाम माहीत असून सुद्धा तिने वारंवार जहाँगिरला तिचा चेहरा पाहू दिला. इतक्या दिवसांनी ती तिच्या परिवारासोबत होती, बर्दवान आणि ‘त्या’च्या पासून लांब. किती दिवसांनी खरोखर जगत असल्यासारखे तिला वाटले, आणि ‘त्या’चा विचार तिने आपल्या मनामधून शक्य तितका लांब ठेवला होता.
तिच्या आई वडिलांना काय होते आहे याचा सुगावा लागला होता, खासकरुन अस्मत बेगमला, तिच्या आईला. पण पादशहांच्या आज्ञेमुळे एका यःकश्चित सैनिकाशी लग्न करायला लागले, तेव्हा निस्साने शांतपणे ते कडवट औषध पचवले होते. त्यामुळे आज निस्साला टोकण्याची त्यांची छाती होत नव्हती.
निस्साने विचार करणे थांबवले होते, आणि तिच्या बालपणीच्या स्वप्नातला खेळ ती खेळत होती. शहजाद्याच्या जवळ जाण्याचा, त्याच्याशी बोलण्याचा, आणि साम्राज्ञी होण्याची दिवास्वप्ने पाहण्याचा. जेव्हा तिने गंभीरपणे यावर विचार केला तेव्हाच तिला ‘त्या’ची आठवण झाली. तिचा पती, अली कुली इस्तज्लू. पण तोवर उशीर झाला होता. पादशहाच्या सहीचा खलिता घियास बेग पाशी येऊन पोहोचला होता.
घियासचा चेहेरा खलिता वाचताना भावनांचे मिश्रण होऊन गेला होता. निस्साला वडीलांच्या भावनांचा थांग लागला नाही.
“काय आहे बाबा ?”
घियासने मेहरुन्निसाकडे पाहीले. त्याला स्वतःला या बातमीने आनंदीत व्हावे की दुःखी समजले नव्हते.
“बेटा, तुला तुरा-ई-चंगेझी माहितीये का ?”
मेहरुन्निसा च्या कपाळावर आठी पडली. “तुरा-ई-चंगेझी ? ‘तिमुरच्या वंशाचा हक्क’, ह्यात पादशहांचे हक्क सांगितले आहेत ना ?”
“हो.”
“त्याचे काय, बाबा ?” पण अचानकच मेहरुन्निसाला सुद्धा खलित्यातल्या मजकूराचा अंदाज आला, आणि तिला धाप लागल्यासारखे झाले. ती जोरात निश्वास सोडत बाजूच्या खुर्चीवर मटकन बसली.
“बेटा, तुरा-ई-चंगेझी नुसार पादशहांना आपल्या कोणत्याही प्रजाजनास पत्नीला तलाख देण्यासाठी सुचवता येते. पादशहांनी अली कुली ला तुरा-ई-चंगेझी वापरुन तुला तलाख देण्याचे सुचवले आहे, कारण पादशहाँना तू...” घियास ने श्वास घेतला. “...हवी आहेस.”
मेहरुन्निसाला वाटलं, आज तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. खुद्द सम्राट तिच्या लग्नाला रद्द करुन तिला मिळवू पाहातो आहे. लहानपणी पासून तिला खात्री होती की एकनएक दिवस आपण शाही जनान्यात असणार. ‘त्या’च्या सोबतची वर्षं तिला तिच्या या महत्वकांक्षेपासून लांब करु शकली नाहीत.
तो. त्याचे काय ?
मेहरुन्निसाने घियासला विचारले- “ हे अली कुली साठी बंधनकारक आहे का ?”
घियासने मान हलवत सांगितले- “शहनशहाँची इच्छा आणि फर्मान ह्यांच्यात किती फरक असतो हे तुझ्यापेक्षा चांगले कोणाला माहिती आहे, निस्सा ?”
परतीच्या वाटेवर मेहरुन्निसाला एक अनाकलनीय खिन्न पणाने ग्रासले. तो काय करेल हा खलिता वाचून? मेहरुन्निसाला भिती वाटत होती. नाही, तो तिला ईजा करेल याची भिती नव्हती, पण तो स्वतःचे काय करेल ही भिती होती.
बर्दवानला ती आणि लाडली पहाटे पोहोचल्या. घरात त्याचे चिन्ह दिसत नव्हते. अली कुली आणि मेहरुन्निसाच्या दिमतीला एक आचारी होता, तिने त्याला बोलावले.
“तुझे साहेब कुठे आहेत ?”
“शिकारीला गेलेत साहीबा. बाजूच्या जंगलात वाघ दिसला होता. निरोप्या पाठवलाय मी.”
मेहरुन्निसा नकोश्या संभाषणाची वाट पाहात बसून राहीली.
आठ- अली कुली (ईसवी सन १६०७) IV
समोरुन येणार्‍या माणसाला पाहून अली कुली तंद्रीतून बाहेर आला.
“जनाब, साहीबा घरी पोहोचल्या आहेत असे कळवायला मला पाठवले.”
“ठीक आहे, येतोय आम्हीसुद्धा.”
बर्दवानला घरी पोहोचेपर्यंत सूर्य मावळतीला आलेला. अली कुलीने वाघाची कातडी साफ करायला सांगितली, आणी तो अंघोळीसाठी निघाला. तेव्हढ्यात तिथे त्याचा आचारी आला.
“साहीब, तुम्हाला साहीबांनी बोलवायला सांगितले आहे.”
अली कुली खोलीत पोहोचला, तेव्हा ती दरवाज्याकडे पाठ करुन अंधारात बसलेली.
“काय ?” अली कुलीने विचारले.
ती चमकून उठली, आणि तिने घाईघाईने बाहेरून एक दिवा आणला, आणि आणखी दोन दिवे उजळले.
“खुप सुंदर समारंभ झाला, लाडली सगळे बघून अवाक झाली...” अली कुली ने भुवया उंचावून तिच्याकडे पाहीले, ती बोलायची थांबली.
ती काही वेळ निःशब्दपणे पलंगाच्या पायाकडे पाहात राहीली आणि मग उठून तिने शालीखाली ठेवलेला खलिता उचलून अली कुली कडे दिला.
अली कुलीने खलिता वाचला, खुद्द सलीमचा खलिता आहे पाहून त्याचे हृद्य धडधडू लागले. पहिल्या काही ओळींमध्ये त्याला माहित नसलेले शब्द होते- तुरा-ई-चंगेझी. खलित्यात नक्की काय म्हणले आहे हे त्याला पूर्वी सुद्धा लवकर समजत नसे. शाही खलिता म्हणजे तर सगळ्यात खराब. पादशहांच्या लांबलचक पदव्या, नाटकी भा...
खलित्यातला संदेश त्याच्या मेंदूवर उल्केसारखा आदळला. त्याने अविश्वासाने दोन वेळा खलिता पुन्हा वाचला. मग थरथरत्या हाताने त्याने खलिता बाजूला ठेवला.
मूकपणे तो मेहरुन्निसाकडे पाहात राहीला. तिच्या नजरेत त्याला अनेक गोष्टी दिसल्या- शरम, लपवायचा प्रयत्न केलेला आनंद, आणि काहीतरी ज्याचा त्याला थांग लागत नव्हता. त्याचे सर्वांग थरथरत होते. मग एका झटक्यात त्याने तिला जोरात थप्पड मारली. त्या जोराने ती जमिनीवर कोसळली.
तिचे केस मोकळे सुटून तिच्या चेहेर्‍यावर पसरले होते. तिने मान वळवून अली कुली कडे पाहीले. केसांमधून तिचा डावा डोळा दिसत होता- त्यात अली कुलीला पुन्हा तो भाव दिसला, आणि त्याने तो ओळखला सुद्धा- करुणा.
अली कुलीने तिच्या दंडाला धरुन खसकन ओढून तिला उभं केलं. “तु..तुला... तुला हे कधीपासून माहित होतं?”
“पहिल्यापासूनच.”
“म्हणजे तू सुद्धा इतक्या दिवस सलीम वर...” अली कुलीच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
ते ऐकून मेहरुन्निसाच्या डोळ्यात अंगार आला. “ह्याचे उत्तर तुम्हाला खरोखरच ऐकायचे आहे काय ? असल्यास स्पष्ट शब्दात सांगायची माझी तयारी आहे. तुमची आहे का ?”
अली कुलीने तीचा हात सोडला.
“पादशहा अकबर आणि त्यांच्या मुलामध्ये आलेल्या वितुष्टामुळे हे सगळे झालं. माझ्या वडिलांनी मला सांगितलं, सलीम पादशहांकडे गेला होता. आपलं नातं जोडू नका हे सांगायला ! पण आपल्या जिवावर उठलेल्या सलीमला दया किंवा भेट देण्याच्या मनस्थितीत पादशहा नव्हते.”
“मग... अकरा वर्षे... इतक्या दिवस तो काय..?”
मेहरुन्निसा कडवट पणे हसली. “शहजादे ठरले ना. सुंदर स्त्री ही काही फार दिवस विचारात राहणारी गोष्ट थोडीच असते ? शहजाद्याच्या गोष्टी नाही ऐकल्या का तुम्ही ? पादशहा अकबरच्या जनान्यातील स्त्री वर शहजाद्याची आसक्ती निर्माण झाली,जन्मानुजन्मे प्रेमाच्याआणाभाका झाल्या. पादशहाला समजल्यावर ‘अनारकली’ भिंतीत चिणली गेली, शहजाद्याला काय तोषीष पडली ? अनारकली- तिचे हे खरे नाव सुद्धा नाही! तिची आठवण उरली ती म्हणजे फक्त- सम्राटांनी तिला दिलेले नाव ! तोच हा शहजादा आहे ! लाहोरला पुन्हा आठवण झाली, त्यामुळे हा खलिता.”
मेहरुन्निसाच्या चेहेर्‍यावर दुःख आणि विनवणीचे मिश्रण दाटले. “तुम्हाला या बाबतीत निर्णय घ्यावा लागणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही पादशहाला उत्तर देणार आहात. तुमच्याकडून हवे ते मिळवण्यासाठी त्याच्याकडे चतुरंगी फौज आहे ! तसही मी तुम्हाला मनस्ताप आणि अवहेलनेशिवाय काय देऊ शकले आणि देणार आहे ? तुम्ही स्वतःला वाचवा!”
अली कुलीने खलित्याचे तुकडे तुकडे करुन भिरकाऊन दिले, आणि तो बाहेर निघाला.
मागून आवाज आला- “शाही खलिता फाडण्याने काहीही होणार नाही ! काहीही नाही !”
***
पंधरवडा उलटून गेला. वाट बघण्याशिवाय अली कुली आणि मेहरुन्निसाच्या हातात काहीच नव्हतं. अर्थात, अली कुली स्वस्थ बसला नव्हता. त्याने पहिले काम केले ते म्हणजे अब्दुर्रहीम खानांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ईतकेच काय, त्याने आगतिकतेत खुसरौशी सुद्धा संपर्क साधायचा प्रयत्न केला. दोनीही प्रयत्नांमधून काही साध्य झाले नाही, मेहरुन्निसा सतत अली कुलीशी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण अली कुली तिला टाळत होता.
काही दिवसांत मेहरुन्निसाने त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करणे सोडून दिले. अली कुलीच्या डोक्यात विचार येत असे- अकरा वर्षांत जितका एकमेकांशी भावनिक संबंध आला नाही, तितका संबंध काही दिवसांमध्ये आला त्यांचा आला होता. कत्तलखान्यातल्या जनावरांसारखा अनुभव ! मेहरुन्निसा आणि अली कुली एकमेकांशी बोलत नसले तरी दोघेही प्रत्येक क्षणाला अंताची वाट पाहात होते.
आणि...
अली कुलीला आग्र्यात पादशहाँसमोर सादर होण्याचा हुकूम आला. मेहरुन्निसाने पुन्हा एकदा अली कुलीला तिथे जाण्याचा आग्रह केला, पण अली कुलीने त्या आदेशाच्या सुद्धा खलित्यासारख्याच चिंध्या केल्या. वादळापूर्वी हवेत जशी अस्थिरता असते, तसेच काहीसे दोघांना जाणवत होते.
अलीला राहून राहून त्याने नुकत्याच मारलेल्या वाघाची आठवण होत होती. त्या वाघाच्या अगम्य आग्रहात तो स्वतःला पाहात होता. अली कुलीला माहीत होते, त्याने जो मार्ग निवडला आहे तो त्याच्यासाठी चांगल्या जागेवर जाणारा नाही आहे. पण अली कुलीला तो एकच मार्ग दिसत होता, ज्यात त्याचे स्वत्व तो गमावत नव्हता.
आणि मेहरुन्निसा. तिच्याबद्दलच्या द्वेषाचा ज्वालामुखी उफाळुन वर येईल अशी त्याची कल्पना होती. पण जसा त्याने विचार केला, तर तसे काहीही झाले नाही. त्याला समजले होते, की ह्या घटनाचक्रात मेहरुन्निसाचा तेव्हढाच हात होता, जितका त्याचा ! जे काही घडले, त्याला विधीलिखित म्हणता येत नसले, तरी, अली कुली आणि मेहरुन्निसाच्या आवाक्याबाहेरच्या शक्तींमुळे ही परिस्थीती तयार झाली होती. त्याला मेहरुन्निसाबद्द्ल फारसे काही वाटणे थांबले होते. तो जे काही करत होता, त्यात मेहरुन्निसाला राखणे हे उद्दिष्ट त्याच्या विचारात नव्हतेच.पण- स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा आणि आत्मसन्मानाचा उरलासुरला तुकडा सलीमला घेऊ देणार नाही- हे त्याने स्वतःला दिलेले वचन होते.
काही दिवसांनी अली कुलीला आणखी एक आदेश आला. बंगालचा सुभेदार- कुत्बुद्दीन कोकाने अली कुलीला भेटायला येण्याचे फर्मान सोडले होते. अली कुलीने त्या आदेशाला सुद्धा कचर्‍याची टोपली दाखवली.
त्यानंतर दोन दिवसांनी अली कुली अंघोळ करुन परतत असताना अली कुलीचा आचारी धावत आला.
“हुजूर.. शिपाई... घोडेस्वार.”
अली कुली तत्काळ सावध झाला.
“कुठपर्यंत आलेत ?”
“जवळ आहेत. पोहोचतीलच इतक्यात.”
अली कुलीने गच्चीत जाऊन पाहीले. आठ घोडेस्वार रांगेत दौडत येत होते. त्यांच्या भोवताली उडणार्‍या धुळीतून सुद्धा उन्हात त्यांच्या भाल्यांची टोकं चमकत होती.
अली कुली खाली गेला, आणि आपल्या खोलीत जाऊन कमरेला तलवार आणि खंजिर बांधू लागला. तो जेव्हा वळला, तेव्हा दरवाज्यात उभारून मेहरुन्निसा त्याच्याकडे पाहात होती. तिने आर्जवाने अली कुली कडे पाहिले.
“नको, अली.”
अली कुलीने चमकून पाहिले. त्याच्या नावाने ती त्याला जणू पहिल्यांदाच हाक मारते आहे असे त्याला वाटले. तो काही बोलणार तितक्यात बाहेरुन आवाज आला-
“अली कुली इस्तज्लू ! पादशहा नुरुद्दीन पादशहा जहाँगिर गाझी ह्यांनी दिलेल्या हक्काने, आणि त्यांच्या नावाने, बंगालचे सुभेदार कुत्बुद्दीन खान कोका तुला बाहेर येण्याचा आदेश देत आहेत!”
अली कुलीने मेहरुन्निसाला बाजूला केले आणि तो बाहेर निघाला. ती काय बोलतीये ह्याकडे लक्ष देणे त्याला आवश्यक वाटले नाही. रस्त्यात त्याला आचारी दिसला.
“साहेब, मी काय ...”
“मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐक. मेहरुन्निसा आणि लाडलीला सुरक्षित जागेवर घेऊन जा. तुझ्या घरी घेऊन गेलास तरी चालेल.”
आचार्‍याच्या गोंधळलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत अली कुली ने दरवाज्याबाहेर पाऊल टाकले. बाहेर एक व्यक्ती सोडून सगळे तलवारी उपसून थांबले होते. तो व्यक्ती म्हणजे कुत्बुद्दीन कोका होता. त्याने अलीकडे बघून स्मितहास्य केले.
“अली. किती वर्षांनंतर भेट होते आहे. यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी भेट झाली असती तर आणखी आनंद झाला असता.”
अलीने कोकाच्या स्मितहास्याकडे दुर्लक्ष केले, आणि तो तसाच कोकाकडे पाहात राहीला.
कोकाच्या चेहेर्‍यावरचे हास्य मावळले. तो गंभीरपणे अली कुलीला म्हणाला,
“अली कुली इस्तज्लू, पादशहांनी त्यांच्यासमोर हजर होण्याच्या हुकूमाचे तुम्ही उलंघन केले आहे. तुम्हाला पादशहांनी बगावतखोर शहझादा खुसरौशी पुन्हा संगनमत केल्याच्या आरोपासाठी आग्र्याच्या दरबारात हाजिर होण्यास सांगितले होते. पादशहांसमोर तुम्हाला पेश करण्यासाठी मी आलो अहे आणि तुम्हाला अजुनही येण्याची संधी देत आहे, कारण तुम्ही अजमेरला पादशहांची मोठी सेवा केली होती. शेर अफगाण सोडून इतर कोणी असते तर बदफैलीसाठी तुमची गर्दन उडवली असती.”
शेर अफगाण ह्या उल्लेखानंतर अली कुलीच्या नजरेत ठिणग्या उडाल्या, आणि त्याने आपली तलवार सर्रकन म्यानातून काढली, आणि दुसर्‍या हातात खंजीर पाजळला. कुत्बुद्दीन कोकाच्या चर्येवर क्षणभर निराशेचा भाव तरळला, पण त्याने बाजूला पाहून सैनिकाला ईशारा दिला.
सगळे सैनिक अली कुली वर तुटून पडले.अली कुली त्यांच्याच दिशेने, पण डावीकडे पळाला, आणि सर्वात टोकाच्या सैनिकाचा वार चुकवत त्याने त्या सैनिकाच्या पोटात खंजीर खुपसला. त्या क्षणीच अली कुलीच्या मस्तकावर, आणि उजव्या खांद्यावर सुद्धा वार झाले. अली कुलीच्या डोळ्यावर रक्त ओघळून येत होते, त्याने आंधळेपणाने एका घोडेस्वाराला धक्का देऊन पाडले, आणि त्याच्या पोटात तलवार खुपसली.
सैनिकांच्या तोंडातून “सुभेदार! सुभेदार पडलेत!” असे उद्गार ऐकल्यावर अली कुलीला त्याने पाडलेला घोडेस्वार कोण आहे ते ध्यानात आले. अर्थात, त्याबद्दल दुःख किंवा आनंद व्यक्त करण्याच्या आधीच अली कुली वर चहुबाजूंनी सपासप वार झाले, आणि तो कोसळला.
समाप्त
Tomb of Sher Afgan Khan 05.jpgBy <a href="//commons.wikimedia.org/wiki/User:Pinakpani" title="User:Pinakpani">Pinakpani</a> - <span class="int-own-work" lang="en">Own work</span>, CC BY-SA 4.0, Link
अली कुली आणि कुत्बुद्दीन कोकाच्या बर्दवान मधील कबरा.

इतिहासकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

23 May 2021 - 11:31 am | गॉडजिला

अली कुलीची कथा आवडली...

तुषार काळभोर's picture

24 May 2021 - 10:54 am | तुषार काळभोर

शोकांतिका आहे, पण अली कुलीची कथा तुमची अतिशय छान सांगितली आहे. आवश्यक तिथे उपकथा सुद्धा आहेत, ज्या अजिबात अजोड नाहीत.

खूप छान!

आणि या मेजवानी साठी धन्यवाद!