स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि आठवणी
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव
स्मृतींची चाळता पाने -अनगाव2
स्मृतींची चाळता पाने --ठाणे आणि नातीगोती
माझ्या आठवणीप्रमाणे १९५५मध्ये एका स्वयंसेवी संस्थेने ठाण्याचा मासुंदा तलाव साफ करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी तिथे फक्त दलदल आणि निळी कमळे उगवलेली होती. आता जो रस्ता दिसतो तो नव्हता.त्यामुळे पलीकडे जायचे असल्यास कौपिनेश्वर मंदिराला वळसा घालून जावे लागे.
त्यामुळे ठाण्यातील सर्व शाळा कॉलेज, कामगार वर्ग सगळ्यांना गांधी जयंती निमित्त आवाहन केले गेले आणि २ ते ९ ऑक्टोबर व नंतरही काही दिवस श्रमदानाने तलाव साफ करण्याचे ठरले. आम्हा विद्यार्थ्यांबरोबर शाळेचे शिक्षकही सहभागी झाले आणि प्रत्येकी ८-१० जणांची रांग करून कामगार जसे विटा वगैरे वाहून नेतात तसे आम्ही तलाव साफ करायला उभे राहिलो.झाडांची मुले तलावात खूप खोलवर गेली होती त्यामुळे मोठी माणसे पायात गमबूट घालून पाण्यात उतरून झाडे ओढून काढत असत व मागे पाठवीत असत. सकाळी ७-११ व नंतर पुन्हा २-७ वाजेपर्यंत महिनाभर काम चालू होते. त्यामुळे बरीच जागा मोकळी झाली आणि आता जो रस्ता कौपिनेश्वर मंदिरामागून जातो तो भराव टाकून तयार केला गेला. तो तलाव आता खूपच सुशोभित केला आहे आणि बोटिंगची सोय,कारंजे ,बसायला कठडे वगैरे केले आहेत. पण त्यामागे ठाण्यातील सर्व शाळा कॉलेजेस ,संस्था यांचे श्रम आहेत हे मान्य करावेच लागेल. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा ह्या कामात हातभार लागला याचा मला अभिमानच आहे.
आमची जी चाळ आहे त्या ठिकाणी लाल मातीचा डोंगर होता त्यामुळे या वस्तीला लालबाग असे नाव पडले असे माझे काका सांगत. आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे चाळीतील सर्व बिऱ्हाडे एकमेकांशी मिळून मिसळून राहत. दिवाळी आली कि सगळ्या घरातून भाजणी भाजण्याचे वास यायला लागत.प्रथम धान्ये भाजून मग जात्यावर भाजणी दळली जाई , नंतर सगळ्या बायका एकत्र येऊन एकमेकींच्या मदतीने चकल्या करंज्या शंकरपाळे असे वेळखाऊ पदार्थ बनवत असत. आम्ही मुलेही मधेमधे लुडबुड करत असू व जमेल तशी मदत करत असू. हे सगळे पदार्थ तेव्हा आजच्या सारखे सहज बाहेर तयार मिळत नसत व वर्षातून एकदाच दिवाळीला घरी केले जात त्यामुळे त्यांचे अप्रूप असे. दिवाळीनंतर सर्वांचा एकत्र फराळ होत असे. त्यात प्रथम रविवारी सकाळी १० च्या सुमारास पुरुषवर्ग एकत्र जमून आपापले फराळाचे पदार्थ आणत व एकत्र बसून गप्पा टप्पा करत खात. नंतर दुपारी ४ वाजता बायका व मुले जमत असत व त्यांचा फराळ होई. कोणाचा कोणता पदार्थ चांगला झाला आहे अशी स्पर्धा लागत असे. जिचा जो पदार्थ नावाजला जाई तिच्या अंगावर मूठभर मांस चढत असे. मे महिन्यातही बटाटा किस ,पापड ,चीकवड्या हे सर्व वर्षभराचे वाळवणाचे पदार्थ एकमेकींच्या मदतीने होत असत. आम्ही लहान मुले पापड वाळत घालायचे आणि मधेच लाट्या मटकावयाचे काम करत असू. तसेच तुटके पापड खाणे हाही उद्योग असे. मात्र मध्येच आईचे लक्ष गेले तर ओरडा बसे.
दिवाळीनंतर आमच्या शेजारी लोहोकरे नावाचे कुटुंब राहत असे त्यांच्याकडे दणक्यात तुळशीचे लग्न होत असे. खऱ्या लग्नाप्रमाणे अंतरपाट धरून मंगलाष्टका म्हटल्या जात आणि लग्न लागल्यानंतर सर्वांना चिवडा लाडू चहा कॉफी देत असत. तसेच बायकांना हळदीकुंकू व अत्तर लावत असत आणि गुलाबपाणी शिंपडणे वगैरे कामे मुलांकडे असत.
कोजागिरी पौर्णिमेला चाळीतील मोठी मुले सगळ्यांकडून वर्गणी गोळा करून मसाला दूध व भेळीचा कार्यक्रम करत असत तसेच होळी पौर्णिमेला मधल्या मोकळ्या पटांगणात होळी लागत असे आणि पूजा होत असे. नवरात्रात आम्ही मुले आई व काकू तसेच इतर बायकांसोबत घंटाळी मंदिरात जात असू. त्यावेळी तो परिसर अगदी मोकळा होता. सगळीकडे शेत आणि गावात वाढलेले असे. पहाटे तिथून जायला प्रसन्न वाटे. आता तेथे सर्वत्र मोठ्या इमारती झाल्या आहेत. नौपाडा, कोपरी कॉलनी परिसरातही शांतता होती. आनंदाश्रम कॉलनीत आईचे मामा राहत असत आणि काही गणित वगैरे अडले तर आई त्यांच्याकडे विचारायला जाई. विठ्ठल सायन्ना मंदिर येथे आमची मराठी शाळेची सहल जात असे. कोपरी कॉलनीला बारा बंगला परिसर म्हणत कारण तेथे कलेक्टर मामलेदार न्यायाधीश लोकांचे बंगले होते.
तसेच उपवन, मखमली तलाव ,वसंत विहार, वृन्दावन आणि श्रीरंग सोसायटी हे सर्व त्यावेळचे लांब वाटणारे भाग आता शहराचाच एक भाग आहेत आणि गजबजून गेले आहेत. आजही मी मुलीकडे किंवा बहिणीकडे गेले कि रिक्षाने तो सगळं भाग फिरून येते आणि झालेले बदल टिपते.(क्रमशः)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान वर्णन
आयशप्पत ....
धन्यवाद गा.पै.
हा भाग पण मस्तच
छान आठवणी व लेखन .
छान लिखाण
स्मरणरंजन लेखन आवडले.