भिती

Primary tabs

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
19 Oct 2020 - 5:57 pm

भिती
आज दुपारपासुनच मळभ दाटून आलय. हवेतला उष्माही वाढलाय. आलोक गेले पाच दिवस ऑफिसच्या टूरवर दिल्लीला गेलाय. अस्मिताला एकटं रहायची खुप भिती वाटते खरंतर, ती कधीच आजवर एकटी राहिलीच नाहीए.
सासुबाई येणार होत्या पण तब्येतीमुळे नाही आल्या.
नाईलाज झाला अस्मिताचा.
त्यात अस्मिता- आलोक या नव्या बिल्डींगमधे नुकतेच रहायला आलेले. इतर दोघे तीघेच रहायला आलेत. पण अजून ओळखी नाही झाल्या.
समोरच्या रस्त्यावर रहदारी आहे . दोन-पाच दुकानं आहेत..थोड्या अंतरावर आणखी बिल्डींगची बांधकामं चालू. त्यातल्या मजूरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या झोपड्या...बाकी जास्त वस्ती काही नाही, अशा परिस्थितीत अस्मिता खुपच घाबरून गेलीय. आलोकचा फोनही कालपासून लागलाच नाहिए. परवा बोललाच होता दोन दिवसांनी येणार असा. तरी तीचं मन काळजीने आणि एकटेपणाने व्याकुळ झालं होतं. रिकाम्या मनाला उगाचच अनामिक भितीने ग्रासलं होतं.
आज सकाळी फिरायला आणि दुध आणायला बाहेर पडली होती, आपल्याच विचारात दंग होती. जरा वेळाने तीचं लक्ष गेलं एक दारूडा तांबारल्या डोळ्यांचा माणूस तीच्या मागे मागेच चालत येतोय. ती घाबरली तरी तशीच चालत राहिली. लिफ्टची वाट न बघता तशीच धडपडत चार जीने चढून तीच्या फ्लॅटमधे येईतो जीवात जीव नव्हता..आतून लॅच, वरची कडी सगळं बंद करून दाराला टेकूनच कितीतरी वेळ उभी राहीली. श्वास नियमीत झाला तेव्हा खुर्चीवर शांतपणे बसली.
दिवसभर गॅलरीत जायची पण भिती वाटली होती तीला. तरी मघा थोडावेळ उभी राहिली होती तेव्हा सकाळचाच माणूस समोरच्या हाॅटेल वजा टपरीजवळ उभा आहे नी तिच्याच गॅलरीकडे बघतोय असं वाटलं तीला. ती पटकन मागे झाली मग आत आली. दहा मिनीटांनी जिन्यात पावलं वाजली आणि दाराशी थांबली असं तीला वाटलं. तीला श्वास घ्यायची पण भिती वाटु लागली, श्वासाचा आवाज बाहेर गेला तर? पण नंतर ते आवाज दूर गेले. खरंतर इंटरकाॅम वरून खाली वाॅचमनच्या इथे काॅल करता येईल..पण नको. नकोच ते. आता आज रात्र आणि उद्याची सकाळ फक्त एकटीला राहायचय मग दुपारी आलोक येणारच आहे. आता आला की त्याला कुठे नाही जाऊ देणार एकटीला सोडून असं ठरवल्यावर जरा धीर आला तीला.
आलोकच्या आठवणींमधे रमलं मन थोडावेळ. परत आशंकित मन उगाचच दाराबाहेरच्या चाहूलीच्या भासाने घाबरत होतं. ती गॅलरीत अंधारातच उभी राहिली, आता रस्त्यावरची वाहतूक मंदावत होती. दुरवरून रेडिओवरच्या गाण्यांचा आवाजाचे सूर हवेवर तरंगत होते. झोपड्यांमधून भांडणांचे, लहान पोरांच्या रडण्याचे संमिश्र आवाज येत होते. दूर कुठेतरी पाऊस पडला असावा...गार ओला मंद वारा सुटला होता. थकलेल्या तीचे डोळे आपोआप मिटले. गॅलरीतल्या आरामखुर्चीतच तीला झोप लागली.
कसल्याशा आवाजाने जाग आली. बाहेर किर्र अंधार., सामसूम. घड्याळ्यात बारा वाजून दहा मिनीटं झाली होती. सुतार करवतीने लाकुड कापतो तसा आवाज वाटला तीला तो. ताडकन् उठली. कानोसा घेऊ लागली. तो आवाज जवळूनच येतोय असं वाटलं. मनात शंका.."चोर.? करवतीने दार कापून आत घुसेल का ? तो सकाळचा माणूस तर नसेल? अरे देवा परमेश्वरा मी काय करू" भितीने घामाने चिंब भिजली...हातापायातली शक्ती गेलीय असं वाटलं...ह्रदयातली धडधड एवढी वाढली की त्याचा आवाज बाहेर ऐकू जाईल असं वाटलं तीला.
ही तीची स्थिती दहा मिनीटं टिकली. तीला सासुबाईंचे
शब्द आठवले. "भिती मनातच तयार होते" मग एक खोल श्वास घेऊन शोधक रितीने आवाजाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. थोड्यावेळाने आवाज बंद झाला. ती तशीच हाॅलमधे खुर्चीवर बसून राहिली कानोसा घेत. हळूहळू शांत झाली. नंतर झोपही लागली तीला.
ती एका छानशा तळ्याकाठी बसली होती..निसर्गरम्य परिसर होता. तळ्यातली डौलदार बदकं बघताना रमली होती. हळूहळू अंधारून आलं. ती उठली घरी जायला हवं. त्या सुंदर परिसरातून यावसं वाटत नव्हतं पण..निघाली. लांबलचक रस्ता दुतर्फा दाट झाडी.
ती भराभर चालू लागली. रस्ता संपतच नव्हता. घाबरली. रस्ता चुकले की काय,? उगाच एकटी आले इकडे..आता घरी कशी जाऊ..आलोक आला असेल माझी वाट पहात असेल..घर बंद आहे..तो बेल वाजवत बसेल जोराजोरात...त्याच्या नेहमीच्या स्टाईलने..तीला खुदकन हसू आलं..अरे, हे काय बेलचा आवाज? ....दचकून जागी झाली..."हं ! स्वप्न होतं वाटतं ! रस्ता,जंगल ,तळं...अरेच्चा ! पण बेल खरी वाजतेय. एक क्षण श्वासच थांबला. घडयाळात बघितलं साडेपाच वाजलेत. कोण असेल इतक्या सकाळी? पीपहोलमधून बाहेर आलोकला पाहिलं आणि दार उघडून त्याला बिलगून थरथरत रडायलाच लागली. आलोकने तीला शांत केले आणि घरात घेऊन आला. त्याचं काम लवकर झालं म्हणून तो लवकर आला होता. आलोकच्या येण्याने तीची भिती कुठल्याकुठे पळून गेली होती. सगळं नंतर हळूहळू समजत गेलं. समोरच्या फ्लॅटमधे रात्री उशीरापर्यंत सुतारकाम चालू होतं. आणि तो तांबारल्या डोळ्यांचा माणूस सुताराचा मदतनीस होता.
आलोक सगळी हकिकत ऐकून खुप हसला. तीलाही हसू आलं आणि सासुबाई म्हणल्या ते ही पटलं भिती मनातच निर्माण होते. ती खरी नसतेच.

©सौ वृंदा मोघे
13/10/17

कथालेख

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

22 Oct 2020 - 12:27 am | कपिलमुनी

पुलेशु