✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विद्या बाळ यांचे अखेरचे आवाहन

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Wed, 10/14/2020 - 16:26  ·  लेख
लेख
विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्‍याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती. ------------------------------------------------------------------------- अखेरच आवाहन... मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या. मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे. मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील. आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे. माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं. विद्या बाळ २९ जानेवारी २०२० संध्या. ७.३०
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64142 वाचन

💬 प्रतिसाद (156)

प्रतिक्रिया

परमसखा मृत्यु

प्रकाश घाटपांडे
Wed, 10/14/2020 - 16:42 नवीन
यापुर्वी परमसखा मृत्यू: किती आळवावा या लेखात इच्छामरण या विषयावर इथे चर्चा झाली होती.
  • Log in or register to post comments

दया मरणाची मुभा....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/24/2020 - 08:49 नवीन
एखाद्या परिस्थितीत दया मरण मागणे ठीक आहे, परंतु अनेक अडचणींच्या गोष्टीही या मागे निर्माण होऊ शकतात तेव्हा दया मरणाची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वाचता येईल. इच्छा मरण चांगले पण.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

दिवा विझताना फडफडतो तशी विचार

चौथा कोनाडा
Wed, 10/14/2020 - 22:05 नवीन
दिवा विझताना फडफडतो तशी विचार करण्याची शेवटची तडफड. हा विचार सर्वांनाच करावा लागणार आहे आगामी काळात, कायदेशीर मार्ग सुद्धा उपलब्ध होईल कदाचित सुखान्त या मराठी सिनेमात सिनेमात हाच विषय हाताळला होता .. आणि त्यातले प्रमुख पात्र त्याच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवतो. ( सिनेमा सुंदर आहे, मिळाला तर नक्की पहा, गुजारिश या हिंदी सिनेमाचा इच्छामरण हाच विषय होता, पण सामाजिक भोवतालाच्या दृष्टीकोना तून " सुखान्त " उजवा आहे असं मला वाटतं.) प्रकाश घाटपांडे सर, धन्यवाद, इथं टाकल्याबद्दल !
  • Log in or register to post comments

स्वेच्छामरण जागृती

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/15/2020 - 08:46 नवीन
आगामी काळात, कायदेशीर मार्ग सुद्धा उपलब्ध होईल कदाचित
प्रयत्नांना चळवळीचे स्वरुप आल्याशिवाय ते होणार नाही. त्यासाठी अगोदर प्रबोधन हवे. विषय लोकांपर्यंत सातत्याने पोहोचवत राहणे हाही एक मार्ग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

चौथा कोनाडा, सुखांत या

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/17/2020 - 20:14 नवीन
चौथा कोनाडा, सुखांत या चित्रपटाच्या निमित्त्ताने झालेले चर्चा सत्रावर २००९ मधे लिहिले आहे. पहा http://www.misalpav.com/node/10219
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सुंदर कव्हरेज, प्रघा सर !

चौथा कोनाडा
Sun, 10/18/2020 - 18:11 नवीन
सुंदर कव्हरेज, प्रघा सर ! घाईत आटोपलेला शेवट सोडला तर हा सिनेमा मला खुप आवडला. कायमचा लक्षात राहिला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

विद्या बाळांच्या मुख्य

माहितगार
गुरुवार, 10/15/2020 - 11:03 नवीन
विद्या बाळांच्या मुख्य कारकिर्दीवर इतर फारशी चर्चा मिपावर पहाण्यात न येताच थेट इच्छा मरणाच्या विषयाच्या समर्थनार्थ विद्या बाळांचे शेवटचे मनोगत सादर केले जाणे जरासे ऑकवर्ड वाटते. अगदी इच्छा मरण असा शब्द वापरला जात नसला तरी कृतकृत्यतेनंतर जिवंत समाधी नावाचा प्रकार संत ज्ञानेश्वर ते १९ व्या शतका पर्यंत होत राहीलेले त्यामुळे अशा विचारधारेत फार काही नाविन्य आहे असे म्हणवत नाही. संत ज्ञानदेव असोत संत नामदेव असो सावरकर अथवा विद्या बाळ समाजाला काही देऊ शकण्याची क्षमता असलेल्या लोकांची आधीच कमतरता असते त्यातले 'काही' स्वेच्छा मरणाने कमी व्हावेत हे भावनीक नव्हे वैचारीक दृष्ट्या सुद्धा न पटणारे वाटते. या सर्वा पलिकडे जाऊन कोण तात्कालिक मानसिक आणि इतर दबावांखाली असे निर्णय घेत असेल हे सांगणे कठीण जाते. दवाखान्यात माणसाचे शरीर बदलून अगदीच कायमचे संपूर्ण यांत्रिकीकरण टाळणे कदाचित श्रेयस्कर असेल पण गर्भात दाखल झाल्या पासून ते निसर्गाने जगणे पूर्ण नाकारे पर्यंत शक्यतोवर प्रत्येक मनुष्य प्राणी 'आदरपुर्वक' जगवणे हेच मानवी लक्ष्य कायम रहाणे श्रेयस्कर असावे.
  • Log in or register to post comments

संत ज्ञानदेव असोत संत नामदेव

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/15/2020 - 16:33 नवीन
संत ज्ञानदेव असोत संत नामदेव असो सावरकर अथवा विद्या बाळ समाजाला काही देऊ शकण्याची क्षमता असलेल्या लोकांची आधीच कमतरता असते त्यातले 'काही' स्वेच्छा मरणाने कमी व्हावेत हे भावनीक नव्हे वैचारीक दृष्ट्या सुद्धा न पटणारे वाटते. >>>> विद्या बाळ पुरेसे जगून गेल्यात. जेवढ शक्य आहे तेवढ समाजासाठी त्यांनी दिल आहे. मृत्यू अप्रिय असल्याने लोक त्या विषयापासून पळ काढतात हे त्यांनी एका भाषणात सांगितले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

मी श्रोत्यात असतो तर...:)

माहितगार
गुरुवार, 10/15/2020 - 18:34 नवीन
...मृत्यू अप्रिय असल्याने लोक त्या विषयापासून पळ काढतात हे त्यांनी एका भाषणात सांगितले होते.?
मी श्रोत्यात असतो तर, 'नेमके कोण पळ काढतेय म्हणालात ?' असा प्रश्न विचारला असता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मैत्रीणी, चळवळीतील सहकारी,

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 10/15/2020 - 18:47 नवीन
मैत्रीणी, चळवळीतील सहकारी, आजूबाजूचे लोक ज्यांच्याशी त्या हा विषय बोलत त्यातील बहुतेक लोक असे सविस्तर त्यांनी सांगितले होते. आपण त्यांची भाषणे संवाद लेखन वेळोवेळी वाचले असेल असे गृहित धरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

अस्थानी

अनरँडम
गुरुवार, 10/15/2020 - 19:50 नवीन
प्रतिसाद इतका प्रचंड 'ऑकवर्ड' आहे की न राहवून या संयत मनोगताच्या संवेदनशील धाग्यावर हा उपप्रतिसाद टंकवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

माणसाच्या जीवनात इतकी उक्रांती झाली पण

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/15/2020 - 12:15 नवीन
मृत्यू सहजेनं कसा येईल या विषयी शून्य संशोधन झालं आहे याचं कायम नवल वाटतं. एक वेळ शास्त्रज्ञांना या विषयाला हात घालायची इच्छा नसणं समजू शकतं पण अध्यात्मिक धुरंधरानी इतक्या महत्त्वाच्या विषयाला चाट मारली हे आश्चर्य आहे. ज्या मंडळींना आपण देह नाही याचा उलगडा झाला होता त्यांच्या उच्च कोटीच्या अनाकलनीय देहत्यागाची निरुपयोगी वर्णनं मात्र भारंभार आहेत. त्यातल्या त्यात संथारा (अन्नत्याग) हा सामान्यांनी अवलंबलेला एकमेव मार्ग आहे पण त्याविषयीची सुद्धा स्टेप-बाय-स्टेप माहिती उपलब्ध नाही आणि ती सुद्धा तशी दीर्घकालिन प्रक्रिया आहे. स्वेच्छेनं आणि सहजपणे श्वास थांबवता आला तर मृत्यूची इच्छा आणि घटना यातला कालावधी कमीतकमी होईल. वेळ मिळाला की यावर संशोधन करुन एक सोपा आणि सामान्यांना सहज अनुसरता येईल असा उपाय नक्की शोधणार आहे.
  • Log in or register to post comments

उपाय

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 10:10 नवीन
वेळ मिळाला की यावर संशोधन करुन एक सोपा आणि सामान्यांना सहज अनुसरता येईल असा उपाय नक्की शोधणार आहे. >>>>> सध्या विषयाबद्द्ल साहित्य उपलब्ध आहे पण उपायांबद्दल फारसे दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

विवेकबुद्धी

अनरँडम
गुरुवार, 10/15/2020 - 19:55 नवीन
खरोखर लोकांना प्रचंड वेळ पृथ्वीवर घालवल्यावर त्याचा कंटाळा येऊ शकतो. लोक जर घर सोडू शकतात, दुसर्‍या देशाचे नागरिकत्व पत्करू शकतात तसेच पृथ्वीवरचे वास्तव्य का 'कायदेशीरपणे' संपवू शकत नाही यावर प्रगल्भ समाजाने विचार होणे आवश्यक आहे. हे मनोगत इथे डकवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वि. सावरकरांनी केलेलं

आंबट चिंच
गुरुवार, 10/15/2020 - 20:28 नवीन
वि. सावरकरांनी केलेलं प्रायोपवेशन म्हणजेच संथारा काय ? दोन्ही वेगळं असेलं तर काय फरक असतो. आणि हे करताना सरकारची परवानगी घ्यावी लागते काय ?
  • Log in or register to post comments

आंबट चिंच : हो दोन्ही एकच

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/15/2020 - 21:34 नवीन
२०१५ मधे राजस्थान हायकोर्टानी आत्महत्येचा प्रयत्न या कलमाखाली यावर बंदी आणली होती पण नंतर सुप्रिम कोर्टानं ती उठवली. थोडक्यात, बाय निगेशन, तो आत्महत्येचा प्रयत्न धरला जात नाही त्यामुळे सरकारी परवानगी जरुरी नाही. ही महावीरानं सांगितलेली प्रणाली असल्यानं जैन धर्मात तिला परमोच्च महत्व आहे. सुप्रिम कोर्टासमोर हे दोन मुद्दे मांडले गेले : १) तो भावनाविवशतेनं घेतलेला निर्णय नाही आणि २) त्यात कोणत्याही शस्त्राचा किंवा विषाचा प्रयोग होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच

आणखी एक अत्यंत वॅलीड मुद्दा होता

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/15/2020 - 21:37 नवीन
संथारा ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, आत्महत्येसारखी ती क्षणिक घटना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते सावरकर होते

अनरँडम
गुरुवार, 10/15/2020 - 22:31 नवीन
मी फार अन्नत्याग वगैरे करून युफेमिष्टिकलि (ओढूनताणून होकारात्मक) 'आत्मसमर्पण' केले तर काय बिघडते असे मलाही वाटत असे, पण पण सुशांत गेला नी म्हटले आपण जावू पण आपल्या आप्तेष्टांचा छ्ळ झाला तर...(छ्ळकिडे मेल्यानंतरही सोडत नाहीत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच

कठीण विषय

गोंधळी
गुरुवार, 10/15/2020 - 20:58 नवीन
विषय खुपच कठीन आहे. लवाटे मॅडम ह्या आमच्या शाळेत उपप्राचार्य होत्या.त्यांची बातमी वाचुन खुप वाईट वाटल होत. आता सगळ्यांना नैसर्गीक मरण याव असेच वाटत. पण जेव्हा आपण त्या अवस्थेत जाउ तेव्हा काय??? ह्याच उत्तर नाही मिळत.
  • Log in or register to post comments

संदर्भ?

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 10:11 नवीन
लवाटे मॅडम ह्या आमच्या शाळेत उपप्राचार्य होत्या.त्यांची बातमी वाचुन खुप वाईट वाटल होत.>>>>>????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

या सगळ्यांनी कृपया याचा नीट

गोंधळी
Fri, 10/16/2020 - 15:42 नवीन
या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. त्यांनी यासाठी कोर्टात याचिका दिली होती. https://indianexpress.com/article/cities/mumbai/their-euthanasia-plea-turned-down-couple-prepares-for-a-changing-mumbai-this-year-5517812/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लेख

गोंधळी
Fri, 10/16/2020 - 16:17 नवीन
https://www.loksatta.com/chaturang-news/narayan-krishnaji-lavate-seeks-euthanasia-1073888/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

भारी लेख आहे गोंधळी साहेब !

चौथा कोनाडा
Tue, 10/20/2020 - 12:20 नवीन
भारी लेख आहे गोंधळी साहेब ! इथं दिल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

मला तेच विचारायच होत. लवाटे

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 16:30 नवीन
मला तेच विचारायच होत. लवाटे दांपत्याची बातमी टीव्हीवर आली होती. मुलाखत ही पाहिली होती. सध्या किमान दयामरणाचा तरी कायदा झाला आहे. संसदेत बिल असताना सरकारने लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या http://www.misalpav.com/comment/845330#comment-845330
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

मरण आणि इच्छामरण या विषयावर

चौथा कोनाडा
गुरुवार, 10/15/2020 - 22:39 नवीन
मरण आणि इच्छामरण या विषयावर चर्चा सुरु पाहुन आज म.टा. मध्ये वाचलेली ही बातमी आठवली: https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pune-13-day-old-baby-boy-killed-and-buried-in-forest-area-in-vadgoan/articleshow/78674986.cms छापिल आवृत्तीत आलेल्या वॄत्तानुसार बाळाचे आई वडिल अत्यंत गरीब होते, बाळाचे पालन पोषण करू शकणार नाही म्हणून दत्तक देण्याचे ठरविले, पण जन्माला आलेले बाळ दिव्यांग होते, या बाळावर काहीच उपचार होऊ शकणार नाहीत आणि याच्यात काहीच सुधारणा होऊ शकणार नाही अशी डॉक्टरानी स्पष्ट कल्पना दिली होती. दिव्यांग बाळ कोणीच दत्तक घेणार नाही म्हणुन त्यांच्या कडे असलेला एकमेव पर्याय, बाळाला मृत्यूदान दिले. हृदयद्रावक आहे हे. पोलीसांनी अटक करून पुढील कारवाई सुरु केलीय, त्यांना शिक्षा वै होईलच. पण, त्या असाह्य आई वडिलांची मजबुरी कोण समजून घेणार ?
  • Log in or register to post comments

हाच खरा प्रश्न आहे

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 10:14 नवीन
पण, त्या असाह्य आई वडिलांची मजबुरी कोण समजून घेणार ?>>>>> माध्यम ही टिपिकल विचारांच्या आशयाची भाषा बातमीत वापरतात. हा मुद्दा वैचारिक लेखांमधे मात्र घेतला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

माध्यम ही टिपिकल विचारांच्या

चौथा कोनाडा
Fri, 10/16/2020 - 17:15 नवीन
माध्यम ही टिपिकल विचारांच्या आशयाची भाषा बातमीत वापरतात.
ते फक्त "बातमी"दार असतात, ही माध्यमांची मजबुरी म्हणायला हवी !
हा मुद्दा वैचारिक लेखांमधे मात्र घेतला जातो.
हे खुपच आश्वासक आहे. असे प्रॉब्लेम्स क्वचित सोडवत देखील असतील, काही संस्था / व्यक्ती पुढं येऊन योग्य ती मदत देखील करत असतील, पण शासकीय पातळीवर असे प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा तयार झाल्या तर उत्तमच ! या गिरिश प्रभुणे यांनी समरसता मंचाच्या माध्यमातून पारधी जमातीचे एकेक प्रश्न कसे हाताळले, उपाय केले हे त्यांनी लिहिलेल्या "पारधी " या पुस्तकात वाचायला मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

विद्या बाळ कोण होत्या आणी

अथांग आकाश
गुरुवार, 10/15/2020 - 23:49 नवीन
विद्या बाळ कोण होत्या आणी त्यांचे कर्तुत्व काय याची मला माहिती नाही! त्यांच्या अखेरच्या आवाहनात म्हणल्या प्रमाणे
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.
असे विचार वाचले आणी त्यांची विचारसरणी नक्षलवादाकडे झुकणारी असावी असा दाट संशय आला! गेलेल्या लोकांविषयी वाईट बोलूनये हे मान्य आहे! वरील बोलण्यातून जो छुपा अर्थ ध्वनित होतो आहे तो फार भयंकर आहे! त्यांच्या या विचारांचे समर्थन त्यांचे पंखे,भक्त,अनुयायी,समर्थक कसे करतात हे वाचण्याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे! म्हातारपणी बुद्धी भ्रष्ट होते म्हणतात तसे काही झाले असेल का???
  • Log in or register to post comments

(प्लिज फक्तभक्तपणा करू नका) किंवा असाहि विचार करून पहा

अनरँडम
Fri, 10/16/2020 - 04:37 नवीन
याचे समर्थन करण्याची गरज नसावी. तुम्हाला पाहिजे तो अर्थ लावला तरी सध्या (कायदेशीरपणे) स्वतःचा सहवास संपवण्याचा मार्ग उपलब्ध नाही. प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. माझ्या व्यक्तिगत पाहण्यात हा प्रश्न डाव्या/उजव्या बाजूचा नाही. अनेक अतिवयस्क ज्येष्ठ नागरिकांचा आहे. विचारपूर्वक समाजाला सर्व बाजू स्मजुन घेऊन याविषयी काहीतरी कायदेशीर करावेच लागणार आहे. केव्हा केव्हा अगतिक लोक व्यक्तिगत प्रसंगी अतार्किक युक्तिवाद करतात. सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

कैच्या कैच युक्तिवाद

अथांग आकाश
Fri, 10/16/2020 - 12:25 नवीन
कैच्या कैच युक्तिवाद
याचे समर्थन करण्याची गरज नसावी. तुम्हाला पाहिजे तो अर्थ लावला तरी सध्या (कायदेशीरपणे) स्वतःचा सहवास संपवण्याचा मार्ग उपलब्ध नाही.
सध्या स्वतःचा सहवास संपवण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध नाही म्हनुन बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करायचा? सुपारी घेऊन मुडदे पाडणाऱ्यांना स्वतःच्या हत्येची सुपारी द्यायची?? सर्प मित्रांकडून विषारी सर्प मिळवून सर्पदंश करवून घ्यायचा?
केव्हा केव्हा अगतिक लोक व्यक्तिगत प्रसंगी अतार्किक युक्तिवाद करतात. सोडून द्या.
पण त्यांच्या असल्या अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात कोणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही? संपादक मंडळालाही नाही?? आश्चर्य आहे! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनरँडम

पण त्यांच्या असल्या

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 13:25 नवीन
पण त्यांच्या असल्या अत्तार्किक,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात कोणालाच काही आक्षेपार्ह वाटत नाही? संपादक मंडळालाही नाही?? आश्चर्य आहे!
मला यात काही ही आश्चर्य वाटत नाही. आपल्या सदस्यत्वाचा कालावधी २ व.१ महिना आहे. मिसळपाव गेली १३ वर्षे सर्व विषयांवरील चर्चापीठ म्हणून अस्तित्वात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

सदस्य आथांग आकाश यांनी

माहितगार
Sat, 10/17/2020 - 18:53 नवीन
सदस्य आथांग आकाश यांनी लक्षवेधलेला मुद्दा विद्या बाळ नक्षलवादी होत्या की नाही हे बाजूस ठेऊन ही महत्वाचा आहे. अगदी ईच्छा मरणाच्या समर्थकांनी मरणासाठीचे इतर असंख्य उपाय सोडून स्वमरणासाठी इतरांना सुपारी देण्याचा विचार पसरवणे हे वयासोबत विवेक आणि बुद्धी हरवल्याचे नक्कीच लक्षण म्हणवता येऊ शकेल . विद्द्या बाळांना त्यांच्या मृत्यूशय्येवरील वयामुळे दुर्लक्षता येईल पण ईच्छा मरणाच्या इतर समर्थकांनी असा विचार अविचारीपणे गौरवणे स्पृहणिय कसे असू शकते हे समजण्या पलिकडचे आहे. अविचारी ,नक्षलवादी, गुन्हेगारी किंवा देशविरोधी प्रकारच्या विचारांचा प्रसार करण्यास मिपामालकांची परवानगी असण्याबद्दल आता पर्यंत तरी बघण्यात / ऐकिवात नव्हते. तरीही, मिसळपाव गेली १३ वर्षे सर्व विषयांवरील चर्चापीठ म्हणून अस्तित्वात आहे, याचे टोक गाठून अविचारी ,नक्षलवादी, गुन्हेगारी विचारांचा प्रसार मिसळपाव सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून केला जातो यात काही वावगे नाही असा अर्थ कळत नकळत निघणे (बहुधा आपणासही अभिप्रेत नसावे) हे मिपा मालकांच्या संमतीने असल्यास तसा पुरावा द्यावा अन्यथा शब्द विनाअट वापस घ्यावेत, हि नम्र विनंती सुज्ञास समजण्यासारखी आहे असा विश्वास आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

.

प्रकाश घाटपांडे
Sat, 10/17/2020 - 18:57 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

माझे काही विचार ....

चौकटराजा
Fri, 10/16/2020 - 12:14 नवीन
काही माणसे अधिक ईहवादी,अधिक प्रयोगवादी ,अगदी भावनाशून्य नव्हेत पण भावना हा आयुष्याचा कणा आहे हे नाकारणारी असतात त्यानाच आपण डाव्या विचारसरणीची माणसे म्हणतो का ? तसे असेल तर मी पक्का डाव्या विचारसरणीचा माणूस आहे. डॉ. मीना प्रभू आपल्या पुस्तकात म्हणतात " लोक मरणाला इतकी वाईट घटना का समजतात ? जन्मासारखीच ती एक जैविक घटना आहे ! " खरे तर माणूस हा प्राणी फार दांभिक आहे. तो जितका दांभिक तितका तो उलट आयुष्याविषयी खास करून मरणाविषयी अधिक उदात्ततेच्या कल्पना मांडत बसतो. आत्महत्या पळपुटेपणा वगैरे आहे पण युद्धांत मरण आले तर ते वंद्य आहे अशा काही खुळचट कल्पना मांडत बसतो. मरण हे मरण असते आपले स्वार्थ त्याला अमंगळ की युक्त ठरावीत असतात. यात असे एक तत्वज्ञान मांडले जाते की तुझ्या देहावर निसर्गाचा हक्क आहे तुझा नाही . सबब नैसर्गिक रित्या मग तो अपघाती का असेना मृत्यू आला तरी तो समाजाला स्वीकारार्ह आहे. आता माणूस व त्यांचे मन हा ही निसर्गाचा एक भाग आहे ना मग आत्महत्या हा मरणाचा गर्हणीय मार्ग कसा ? ज्याला हवे त्याला स्वतः: मरण स्वीकारण्याचा हक्क असला पाहिजे जसा खाणे पिणे तसा . तो जर समाजाने दिला तो मरणारा किमान आनंदाने तरी मरेल. मरणाची कल्पना खास करून स्वतः:च्या मरणाची कल्पना ही माणसाने अगदी आयुष्यात खूप जगण्यासारखे असताना पासून मनोमन स्वीकरली पाहिजे त्याने जगण्यातील मजा निघून काही जात नाही असा माझा दावा आहे !
  • Log in or register to post comments

जगायचीही सक्ती आहे हे मंगला

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 13:18 नवीन
जगायचीही सक्ती आहे हे मंगला आठलेकर यांचे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. त्यात या विषयी वेगवेगळ्या मतांचा उहापोह केला आहे.
  • Log in or register to post comments

https://aisiakshare.com/node

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 13:19 नवीन
https://aisiakshare.com/node/4368 ही लिंक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

विद्याताईंचे विचार विस्कळीत

गवि
Fri, 10/16/2020 - 13:30 नवीन
विद्याताईंचे विचार विस्कळीत वाटले आणि अर्थ कळला नाही. खूपच ओपन एन्ड्स सोडलेत. सुपारी घेणारे, सर्पमित्र* वगैरे उल्लेख प्रचंड खटकले आणि त्याच वेळी गोंधळात पाडणारे वाटले. अखेरच्या काळातले निवेदन असेल तर वयानुसार कदाचित सुस्पष्टता, सुसंबंद्धता कमी झाली असेल. * बाय द वे, हे दोन्ही एकाच संदर्भात उल्लेखलेले पाहून अचंबा झाला. असो.
  • Log in or register to post comments

गवि आपण हे तर विसरत नाही ना!

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 13:47 नवीन
गवि आपण हे तर विसरत नाही ना! कि ते मृत्युशय्येवर असतानाचे विचारस्पंदने आहेत. स्वेच्छामरणाच्या चळवळीतील त्यांचा सहभाग आपल्याला ठाउक असेल कदाचित. जेव्हा त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी सभा झाली होती त्याला मी हजर होतो. त्यात या रेकॉर्डिंगचा उल्लेख झाला होता. ते प्रसिद्ध करावे की नाही याबाबतही ठरले नव्हते. आता काही लोकांना मृत्युचा विचारच अपशकुनी अशुभ विकृत असा वाटतो. त्यामुळे मृत्युचे नियोजन हा अर्थपूर्ण जगण्याचा विषय आहे हे त्यांना झेपत नाही.पारंपारिक विचारांच्या मुशीत मृत्यु हा अप्रिय विषय असतो त्यामुळे टाळला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मी त्यांना व्यक्तिश: ओळखत असे

गवि
Fri, 10/16/2020 - 15:07 नवीन
मी त्यांना व्यक्तिश: ओळखत असे. अनेकदा भेटलोय. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. सन्मानाने मरण्याचा हक्क याबद्दलही मला पूर्ण आदर आणि पाठिंबा आहे. याबद्दल कायदा व्हावा म्हणून चळवळ करणारे आणखी एक खंदे कार्यकर्ते सांगलीत होते. त्यांनाही भेटलोय खूप वर्षांपूर्वी. सुपारी घेणारे, सर्पमित्र वगैरे उल्लेखापुरता तो प्रतिसाद होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

वि.रा. लिमये

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 16:11 नवीन
याबद्दल कायदा व्हावा म्हणून चळवळ करणारे आणखी एक खंदे कार्यकर्ते सांगलीत होते.
ते वि.रा.लिमये. त्यांचे जगायचे की मरायचे, वृद्धांसाठी निवडीचा हक्क- स्वेच्छामरण व सन्मानाने मरण्याचा हक्क अशी पुस्तके आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बरोबर.

गवि
Fri, 10/16/2020 - 17:51 नवीन
बरोबर. त्यांचा मोठा बंगला होता. एकटेच राहायचे. पंचवीसेक वर्षांपूर्वी एकदा त्यांना भेटायला गेलो होतो. बरेच वय झाले होते. बोलता बोलता तीन तास झाले तरी भान राहिले नाही अशा गप्पा रंगल्या. जगावेगळेच व्यक्तिमत्व होते. बहुधा वायदेबाजार, फ्युचर्स यात घरबसल्या सौदे करुन चरितार्थ चालवत असावेत असे वाटले. विचार भन्नाट आणि जगावेगळे होते. मरण्याच्या पद्धती वगैरे अगदी शांतपणे सहज मुद्देसूद बोलताना ऐकून अंगावर काटाच आला होता. आता मात्र तपशीलवार आठवत नाही. परत जाणे झाले नाही. सन्मानाने कायदेशीर मरण मिळावे यासाठी मी थांबलो आहे असे ते म्हणाले होते. अखेरीस ती इच्छा पूर्ण झाली नसावी. ते अद्याप हयात असल्यास हे वाक्य सहर्ष मागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

@ गवि : एक ओळखीचे सुप्रिम कोर्टात इच्छा मरणाचा अर्ज

संजय क्षीरसागर
Fri, 10/16/2020 - 19:25 नवीन
करुन शेवटापर्यंत वाट पहात बसले. त्यांची इतकी गोची झाली की कोर्टानं त्यांचा अर्ज सुनावणीला घेतला नाही आणि त्यांना स्वतःला जीवाचं काही करता येईना. मग असेच हॉस्पिटलाईज होऊन काही वर्षांनी गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

@ गवि

संजय क्षीरसागर
Fri, 10/16/2020 - 13:48 नवीन
विद्या बाळ काय म्हणतात याचे अर्थ काढण्यापेक्षा सुखद मरण हा अत्यंत वॅलीड विषय आहे, त्याची चर्चा फलदायी होईल असं वाटतं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी ...

चौकटराजा
Fri, 10/16/2020 - 13:58 नवीन
मरण अटळ आहे ! ते एक रूपांतरण आहे ! हे एकदा "मनोमन" स्वीकारले की आपलया हातात राहातो फक्त ते येण्याची प्रक्रिया ठरविण्याचा अधिकार ! मरताना खरोखरीच यातना होतात का ? की त्या कळण्याच्या पलीकडे गेल्यावरच मरण येते हे आजही ठामपणे कोणाला सांगता सांगता येणार नाही. जीवनाची आसक्ती असेल तर वेदनेची तयारी ठेवली पाहिजे हा निसर्गाचाच नियम आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

इच्छामरण आवश्यक पण

गवि
Fri, 10/16/2020 - 15:18 नवीन
इच्छामरण आवश्यक पण कॉम्प्लिकेटेड विषय आहे. अ. जबाबदारीतून सुटका म्हणून तो वापरला जाऊ नये (त्या अनुषंगाने कर्जे, कौटुंबिक जबाबदारी हे पाहणे आले. कर्जे मोजता येतात.. इतर नैतिक जबाबदार्या मोजता येत नाहीत) ब. झटका प्रतिक्रिया म्हणून हा निर्णय अंमलात येऊ नये. (त्या अनुषंगाने निर्णय नोंदणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात बरेच अंतर राखणे आवश्यक. काही महिन्यांनी पुन्हा एकदा कन्फर्मेशन घेऊन मग अंमलबजावणी आवश्यक) क. स्वत:च्या जिवावर खरोखर सर्वार्थाने आपला एकट्याचा हक्क असतो का? हे एकदा ठरवावे लागेल. ड. पूर्ण वेदनाविरहीत वैद्यकीय उपाय शोधला पाहिजे. असे उपाय अस्तित्वात असले तरी डॉक्टरी व्यवसायिक प्रतिज्ञा आणि नैतिकतेची व्याख्या बदलावी लागेल. हा खूप मूलभूत बदल असेल. ई. स्वेच्छामरण हा उपाय कितीही कमी जास्त वयाच्या आणि अगदी ठणठणीत प्रकृती आणि उत्तम मानसिक आरोग्यावस्था असतालेल्या व्यक्तींनाही द्यावा लागेल. केवळ असाध्य आजारी, वेदना होत असलेले, वृद्ध लोक यांनाच पात्र ठरवता येता येणार नाही. किंबहुना याबाबत योग्य निर्णय त्या अवस्थेत घेण्यास ते लोक पात्र नसतील. या अनुषंगाने चर्चा करता येईल.
  • Log in or register to post comments

@ गवि : हे अँगल्स वॅलीड आहेतच

संजय क्षीरसागर
Fri, 10/16/2020 - 17:09 नवीन
पण एकूणात मृत्यू झोपेसारखा सुखद यायला हवा असं वाटतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मरण आणण्याची नेमकी पद्धत हा

गवि
Fri, 10/16/2020 - 17:53 नवीन
मरण आणण्याची नेमकी पद्धत हा अगदी गौण तांत्रिक मुद्दा आहे. बाकीचे मुद्दे किचकट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मरण आणण्याची नेमकी पद्धत हा

प्रकाश घाटपांडे
Fri, 10/16/2020 - 18:29 नवीन
मरण आणण्याची नेमकी पद्धत हा अगदी गौण तांत्रिक मुद्दा आहे.
वेदनाविरहीत मृत्यु हा महत्वाचा मुद्दा आहेच की! काही लोक मृत्युपेक्षा त्याच्या वेदनामयी स्थितीला घाबरतात. सिझेरियन ने जर वेदनाविरहीत प्रसुती होते तर वेदनाविरहीत मृत्यु का असू नये. विज्ञानाने जन्मात हस्तक्षेप केला मग मृत्युत का करु नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो म्हणजे तसे उपाय व्यवस्थित

गवि
Fri, 10/16/2020 - 18:32 नवीन
अहो म्हणजे तसे उपाय व्यवस्थित मिळतील. आहेतच अस्तित्वात. कसा यावा याबद्दल शांतपणे यावा हे अंमलात आणणे ही समस्या किंवा कायदा येण्यातली अडचण नसून त्या आधीचे एथिकल सोशल इ इ मुद्दे कॉम्प्लेक्स आहेत असं म्हटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

@ गवि : इतर मुद्दे सोडवत बसलो तर

संजय क्षीरसागर
Fri, 10/16/2020 - 19:15 नवीन
सुखानी मरायचा मुद्दाच बाजूला पडेल ! 😄 एखादी सोपी, सहज आणि सुखानं मरायची युक्ती (कोणत्याही मेडीकल किंवा तत्सम उपायांखेरिज) माणसानं इतक्या अनंत वर्षात का शोधली नाही असं मला वाटतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा