परीक्षण : haunting at bly manor (नेटफ्लिक्स)

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
13 Oct 2020 - 7:16 am

नेटफ्लिक्स च्या ह्या नवीन भयकथेला चांगले प्रतिसाद येत आहेत आणि मी संपूर्ण सिरीस काल पाहून संपवली. मी ह्या परीक्षणात विशेष असे स्पॉईलर्स दिलेले नाहीत.

भयकथा हे थोडे addiction प्रमाणे आहे. किंवा कुणी तरी म्हटल्या प्रमाणे थोडे पॉर्न प्रमाणे आहे. पहिल्यांदा आम्ही जेंव्हा भयकथा पाहतो तेंव्हा अगदी प्यासा हैवान किंवा १०० डेज सुद्धा आमचा थरकाप उडवतो. पण हळू हळू कुठल्याही भयकथेचे भय वाटत नाही. मग काही तरी नवीन प्रकारची भयकथा पाहावीशी वाटते. त्यामुळे इतर कुठल्याही कथा प्रकारा पेक्षा "भयकथा" ह्यांत अनेक नानाविविध सब-जनर्स आहेत. गॉडझिला पासून रागिणी mms पर्यंत आणि कॅनिबल होलोकास्ट पासून saw पर्यंत अनेक भयकथा कल्पक लोकांनी TV वर आणल्या आहेत. काहीतरी नवीन प्रकाराने दर्शकांना धक्का द्यायचा आणि घाबरावयाचे आणि ह्या नवीन प्रकारच्या शोधांत विविध निर्माते, लेखक दिग्दर्शक इत्यादी धडपडत असतात.

नेटफ्लिक्स ची हि नवीन मालिका गॉथिक हॉरर ह्या प्रकारांत मोडते. ड्रॅक्युला हि एक खूप लोकप्रिय गॉथिक होर्रर् कथा आहे. गॉथिक भयकथांत बहुतेक करून प्रकाश कमी वापरला जातो, इथे सर्वांत महत्वाचे स्थान असते एक प्रचंड मोठा वाडा अथवा किल्ला, मूळ कथानकाला थोडी प्रेमकथेची झालर सुद्दा असते. आणि सर्वांत महत्वाची बाब म्हणजे इथे भयकथा एखाद्या घटनेशी संबंधित नसताना लोकांच्या संपूर्ण आयुष्याशी संबंधित असते. अनेक कथानकांत आपले नायक नायिका चुकीच्या वेळी चुकीच्या जागी पोचतात आणि त्यांच्या बरोबर वाईट घटना घडतात आणि संपूर्ण प्रकार काही दिवसांत संपतो. पण इथे नाही. इथे वाडा अनंत काळा पासून झपाटलेला असतो आणि लोकांना त्यांचे परिणाम खूप वर्षे पर्यंत भोगावे लागतात. मायिक फ्लॅनागन ह्यांनी हि मालिका निर्माण केली आहे.

संपूर्ण कथा एक वृद्ध महिला एका लग्नाच्या समारंभाच्या आधी सांगते. आदल्या रात्री सर्व लोक शेकोटीच्या जवळ बसून

ब्लाय मॅनॉर हे लंडन पासून दूर एका गांवातील प्रचंड मोठे मॅनॉर (वाडा) आहे. विन्ग्रेव्ह ह्या गर्भश्रीमंत घराण्याचा हा वाडा आहे. एका अपघांतातं वाड्याचा मालक आणि त्यांची पत्नी ह्यांचा भारतात फिरायला गेलेले असताना मृत्यू होतो. ह्यांची दोन निरागस आणि गोंडस मुले मात्र घरीच असतात त्यामुळे ती वाचतात. त्यांची जबाबदारी त्यांचे काका हेन्री ह्यांच्यावर येते. हेन्री लंडन मध्ये राहतात आणि नेहमीच दारूच्या नशेत असतात.

हेन्री ह्या मुलांच्या देखरेखी साठी दाना ह्या अमेरिकन मुलीची निवड करतात. दानाने ह्या मुलांसोबत ब्लाय मध्ये राहायचे, त्यांना शिक्षण आणि संस्कार द्यायचे असे हे काम असते.

मग दाना ब्लाय मध्ये उपस्थित होते आणि कथेची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. ब्लाय ह्या प्रचंड वाड्यांत हन्नाह हि कृष्णवर्णीय महिला प्रॉपर्टी किपर म्हणून असते, भारतीय वंशाचा ओवेन शर्मा हा कुक आणि जेमी हि युवती माळी म्हणून कामाला असते. खेडेगांव असल्याने तिथे विशेष अशी काहीच वर्दळ नसते.

वाडा झपाटलेला असतो का ? ह्याचे उत्तर विविध पात्रांच्या स्वभावातून देण्याचा प्रयत्न आधीच्या भागांत होतो. सर्वच पात्रे काही प्रमाणात झपाटलेली वाटतात. विशेष करून दोन्ही मुले काही तरी लपवत आहेत असे वाटते. मग सावल्यांचा स्वरूपांत आम्हाला भुतांचे दर्शन होऊ लागते. हि खरी बहुतेक आहेत कि सावल्यांचा खेळ कि विविध पात्रांच्या मनातील समजुती ? हे आधीच्या भागांत समाजात नाही पण नंतरच्या भागांत प्रत्येक पात्राची पार्श्व् कथानक दाखवले जाते ज्यातून आम्हाला सर्वचन्ह उलगडा होत जातो. फ्लॅनागन ह्यांची जी शैली आहे त्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे ते काही तरी अतींद्रिय गोष्टी किंवा एखादे भूत अगदी "हिडन इन द प्लॅन साईट" ठेवतात, थोडे सिस्कस्थ सेन्स ह्या चित्रपटा प्रमाणे. ह्याची जाणीव बहुतेक दर्शकांना पहिल्या भागापासूनच होईल पण त्यांत सुद्धा फ्लॅनागन तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

पहिल्या ४ भागांत जे अनेक धागे उलगडले जातात त्यांची टोके एक एक करून शेवटच्या काही भागांत बांधली जातात. शेवटचा भाग, जिथे कथा सुरु झाली तिथे येऊन संपतो म्हणजे एक वृद्ध महिला एका लग्नाच्या घरांत आधीच्या रात्री हि कथा अनेकांना सांगत आहे. मग ऐकणारी नववधू त्या कथा सांगणाऱ्या महिलेला म्हणते "आपण हि भूतकथा आहे असे म्हणून कथा सांगितली, पण मला मात्र ती एक प्रेम कथा वाटली", ती सुरकुतलेल्या चेहेर्याची महिला मग थोडा विचार करून म्हणते "बहुतेक वेळा त्यांत काहीही फरक नसतो".

ह्या एका वाक्यांत संपूर्ण कथेचे सार आहे असे दर्शकांना सुद्धा वाटेल.

मालिकेची उजवी बाजू म्हणजे अत्युच्च दर्जाचा अभिनय आणि विशेषतः बाल कलाकारांचा अभिनय. संपूर्ण सिरीज थोडी लो बजेट आहे आणि बाहेरून वाडा प्रचंड दाखवला असला तरी आतील शूटिंग फक्त काही थोडक्याच खोलीत होते. बाकी कुठल्याही भयकथेला लागणारा मसाला इथे माफक प्रमाणात टाकला आहेच. विचत्र दिसणारे चेहेरे, सूडाच्या भावनेने फिरणारे आत्मे, अडकलेले आत्मे, खून करणारे माणूस, द्रव्यलोभाने वाईट गोष्टी करणाऱ्या व्यक्ती, थोडे फार प्रमाणात सेक्स, इत्यादी अनेक गोष्टी तुम्हाला ह्या सिरीज मध्ये पाहायला मिळतील.

मालिकेची वाईट वाटलेली बाजू म्हणजे, मुख्य कथानक अगदी साचेबद्ध वाटते. फ्लॅनागन आपल्या जुन्याच ट्रिक्स वापरत आहे असे वाटते. भयचकित करणारी प्रत्येक गोष्ट ह्या आधी आपण हे आणखीन कुठे तरी अनुभवले आहे अशी जाणीव करून देते. मालिकेत एक संकल्पना आहे ती म्हणजे "tucked away". जिवंत तसेच मृत व्यक्ती काही ना काही कारणास्तव एका आठवणींच्या दुनियेत जातात आणि तिथे एका लूप मध्ये पडतात, हे नक्की का होते आणि कसे होते हे दर्शकांना समजणार नाही. हि संकल्पना नवीन नसली तरी त्याचा ह्या मालिकेतील प्रयोग अगदी फेल आहे. माझ्या मते कथानकातील कच्चे दुवे लपवण्यासाठी हि संकल्पना त्यात टाकली गेली आहे.

भयकथांचे प्रेमी हि मालिका आवडीने पाहतील, डोके भिंतीवर आपटावे असे ह्यांत काहीच नाही त्यामुळे तशी मालिका सुसह्य आहे पण त्याच वेळी आयुष्यभर आठवणीत राहावी असे सुद्धा ह्या मालिकेत काहीच नाही.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

शा वि कु's picture

13 Oct 2020 - 5:48 pm | शा वि कु

या मालिकेचा "द हॉंटिंग ऑफ हिल हाऊस" शी काही संबंध आहे का ? नाव तसेच आहे आणि काही अभिनेते/अभिनेत्री पण समान आहेत.

कथानकाच्या दृष्टीने काहीच संबंध नाही. नेटफिक्स हाउंटिंग ऑफ क्स प्रकारच्या अनेक मालिका करणार आहे. निर्माते सेम असल्याने इतर गोष्टी सुद्धा सेम असतील.

सोन्या बागलाणकर's picture

20 Oct 2020 - 8:45 am | सोन्या बागलाणकर

मला या सिरीज कडून खूप अपेक्षा होत्या. Haunting of hill house सारखी अप्रतिम कलाकृती बनवल्यानंतर Mike flanagan त्याच तोडीची किंवा त्याहूनही सरस अशी सिरीज बनवेल अशी अपेक्षा होती.

पण ही मालिका सुरुवातीपासूनच तद्दन रटाळ आणि भरकटलेली वाटली. HOHH मध्ये असलेलं गूढ, भीतीदायक वातावरण या मालिकेत अजिबात नाही. HOHH मधील वाडा हे एक मुख्य कॅरॅक्टर होते आणि त्यातील कॉरिडॉर, अंधारे कोपरे, जिने, भीतीदायक म्युरल्स आणि चित्रं इत्यादींचा भीती वाढवण्यासाठी उत्कृष्ट उपयोग केला होता. शिवाय प्रत्येक व्यक्तिमत्व व्यवस्थितपणे हाताळले होते. पाच मुलांवर पछाडलेल्या वाड्यात बालपण घालवल्याने झालेले मानसिक आघात, त्याचा त्यांच्या उर्वरित आयुष्यावर झालेला खोल परिणाम, पाची मुलांची वेगवेगळी व्यक्तिमत्वे, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध या सगळ्या कंगोऱ्यांमुळे ती मालिका परिणामकारक होते.

याउलट HOBM मध्ये उगाच घुसवलेले सबप्लॉट्स, रटाळ प्रेमकथा, अधांतरी सोडलेले प्लॉट पॉईंट्स आणि सर्वांवर कहर म्हणजे अतिशय संथगती यामुळे हा हॉरर शो म्हणण्यापेक्षा स्लीपिंग शो म्हणायला हरकत नाही. डायलॉग तर अगदीच निर्बुद्ध आहेत. उदाहरणार्थ it's you, it's me, it's us किंवा she slept, she woke up, she walked. असे डायलॉग ऐकून मला आपले मराठी बालवाडीचे पुस्तक आठवले - अजय हरण बघ, भरत बदक बघ. बरं ते म्हणणार्यांनी तरी पटपट म्हणावे, पण नाही. प्रत्येक डायलॉग जणू काही अटलबिहारीजी म्हणतायेत एवढा मोठा पॉझ. या सगळ्यावर ताण म्हणजे ती टिवटिव करणारी चिमुरडी फ्लोरा. सुरुवातीला तिचा it's perfectly splendid जरासा गमतीशीर वाटला पण काही वेळानंतर त्याचा vi vi च्या जाहिरातीसारखा कंटाळा आला.

बरं हे सगळे सुद्धा सहन केलं असतं जर मालिकेत थोडे तरी भीतीदायक सीन्स असते. पण त्या बाबतीतही ही मालिका संपूर्ण निराशा करते. बिना चेहऱ्याची भूतं हीच जर भीतीची परिसीमा मानली तर आपले मक्ख चेहयाचे राजकारणीही काही कमी भीतीदायक नाही.

एकंदरीत जर तुम्हाला निद्रानाश असेल तर ही मालिका तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकते. बाकी जशी तुमची मर्जी.

थोडक्यात, फ्लोराच्या भाषेत सांगायचं झालं तर इट्स परफेक्टली बोरिंग!