अ ब्यूटीफुल डे इन द नेबरहूड- मुलाखतकाराची मुलाखत

ए ए वाघमारे's picture
ए ए वाघमारे in जनातलं, मनातलं
30 Sep 2020 - 12:18 pm

Tom Hanks

प्रसिद्ध अमेरिकी नियतकालिक ई-स्क्वायरच्या १९९८ सालच्या एका अंकात आलेल्या ‘Can You Say … Hero?’ या मुखपृष्ठकथेवर आधारलेला गेल्या वर्षी आलेला हा चित्रपट. सत्य घटनांवर आधारित. फ्रेड रॉजर्स या अमेरिकी टीव्ही सेलिब्रेटीभोवती केन्द्रित.

फ्रेड रॉजर्स हे एक अनोखं व्यक्तिमत्त्व अमेरिकी मनोरंजन क्षेत्रात होऊन गेलं. त्याचा लहान मुलांसाठीचा “Mr. Roger’s Neighbourhood” नावाचा कार्यक्रम जवळपास चाळीस वर्षं तिकडच्या बालचित्रवाणीवर चालला. हा एक विक्रमच आहे. कठपुतळ्यांचा खेळ, गाणी, गोष्टी आणि त्यातून आयुष्यातल्या छोट्यामोठ्या गोष्टींबद्दल लहानग्यांना तयार करणं, आजूबाजूच्या परिसरातील- रोजच्या जगण्यातील गोष्टींची तोंडओळख करून देणं असं या लोकप्रिय कार्यक्रमाचं स्वरूप होतं.

याच फ्रेड रॉजर्सची छोटेखानी मुलाखत घेण्याची जबाबदारी लॉईड वोगलवर येते. लॉइड वोगल हा खरं तर इ-स्व्कायरमध्ये काम करणारा एक शोधपत्रकार आहे. त्यामुळे तो हे ‘किरकोळ’ काम करण्यास साहजिकच अनुत्सुक असतो. अखेर मारून मुटकून तयार झालेला लॉईड ही मुलाखत कशी घेतो, मुलाखतीत कोण कोणाला कसले प्रश्न विचारतो याचीच ही गोष्ट. पण हा रूढार्थाने चरित्रपट नाही. फ्रेड रॉजर्सचा जीवनप्रवास वगैरे यात रंगवला नाही. कारण त्याची गरजही नाही. कारण भारतीय म्हणून आपल्याला जरी त्याच्याबद्दल फारशी माहिती नसली तरी चित्रपटाच्या सर्वसाधारण अमेरिकी प्रेक्षकाला ही वल्ली कोण आहे हे माहीत असतं, इतका त्याचा अमेरिकी जनमानसावर प्रभाव होता. हे दाखवण्यासाठी चित्रपटात काही प्रसंग खास टाकलेले आहेत. असो.

साध्या भाषेत सांगायचं तर ही फ्रेड रॉजर्स (टॉम हँक्स), लॉइड वोगल (मॅथ्यू ऱ्हाईस), त्याचा बाप जेरी वोगल (ख्रिस कूपर) आणि लॉईडचा तान्हा मुलगा गॅविन यांची कहाणी आहे. लॉईड आणि जेरी यांचे संबंध अतिशय ताणलेले आहेत, ज्याची कौटुंबिक कारणं भूतकाळात दडलेली आहेत. पण त्यामुळे लॉइडचा स्वभाव सतत किरकिरा झालेला आहे. तर दुसरीकडे फ्रेडला मुलाखतीदरम्यान या तणावाचा अंदाज येतो. आणि तो जसा इतर लहान मुलांशी वागतो तसाच एका वडीलकीच्या भावनेने त्याची मुलाखत घ्यायला आलेल्या लॉईडचे प्रश्न सोडवायचं बघतो असं सर्वसाधारण कथानक आहे. वाचकांचा रसभंग होऊ नये म्हणून मी येथे तपशीलवार कथानक सांगायचं टाळलं आहे.

अभिनयाच्या बाबतीत टॉम हँक्स या गृहस्थाबद्दल बोलावं तेव्हढं कमीच आहे. हँक्सच्या चेहऱ्यावर नेहमीच असणारा एक शांत भाव, फ्रेड रॉजर्सच्या एखाद्या धर्मोपदेशकासारख्या व्यक्तिमत्त्वाशी अतिशय मेळ साधणारा आहे. हे एक पर्फेक्ट कास्टिंग आहे. परंतु त्याहूनही अधिक गुंतागुंतीची व्यक्तिरेखा ही लॉइड वोगलची आहे. ती साकारण्यात मॅथ्यू ऱ्हाईसने केवळ मुद्राभिनयावर बाजी मारून नेली आहे. ख्रिस कूपर नेहमीप्रमाणेच उत्तम.

नातेसंबंध हा कथाकारांचा एक आवडीचा विषय कायमच राहिलेला आहे. आपण भारतीय आणि त्यातल्या त्यात मराठी प्रेक्षक तर सासू-सुनांच्या नात्यातील ताणेबाणे पाहून कंटाळलेले लोक आहोत. पुरुषांमधल्या नातेसंबंधांबद्दल आपले कथाकार, चित्रपटकर्ते फारसे बोलत नाहीत. अपवाद एखादाच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ किंवा ‘मुळशी पॅटर्न’. पण त्यातही नातेसंबंध हा प्रधान विषय नाही. पुरुषांनी हळवं असता कामा नये, त्यांनी चारचौघात रडू नये हे आमचे संस्कार. वाचायला थोडं क्लिशे वाटेल पण या पार्श्वभूमीवर एका महिला दिग्दर्शकानं पुरुषकेंद्री विषयावरचा असला संवेदनशील चित्रपट काढावा हे कौतुक करण्यासारखं आहे. समस्या, गुंतागुंत आणि उकल वा समाधान या तीनही पातळीवर या चित्रपटात पुरुष पात्रांचा मुख्य सहभाग आहे.

अभिनय तर या चित्रपटात महत्त्वाचा आहेच पण हा चित्रपट सर्वस्वी लेखक- दिग्दर्शकाचा आहे. दिग्दर्शिका मेरिली हेलर हिचा हा तिसरा चित्रपट. विषयात प्रवेश कसा करावा, फ्लॅशबॅक आणि चालू काळ यांची अप्रतिम सरमिसळ याचे उदाहरण म्हणूनही ही पटकथा अभ्यासण्यासारखी आहे. रॉजर्सच्या कार्यक्रमातील आभासी परिसराचा, कठपुतळ्यांचा अतिशय खुबीने वापर; गोष्ट पुढे नेण्यासाठी रॉजर्सच्या या आभासी जगातून वास्तव जगात आणि परत होणारा कथावस्तूचा सहज प्रवास यासाठी पटकथाकारांसोबतच दिग्दर्शिकेचंही तेवढंच श्रेय आहे. कारण हे सगळं नजरेला बांधून ठेवणारं राखण्यात तिने यश मिळवलं आहे. टीव्हीच्या ४:३ अस्पेक्ट रेशोमधून चित्रपटाच्या १६:९ रेशोमध्ये होणारी रुपांतरे यांच्या माध्यमातून प्रसंगांना सेपरेट करण्याची कलात्मक आयडिया वापरलेली आहे.

साधेच पण प्रभावी संवाद हे चित्रपटाचं आणखी एक बलस्थान. उदाहरणार्थ जेरी वोगल मृत्युशय्येवर असताना ‘वाट’ बघत बसलेल्या निराश परिजनांना रॉजर्स म्हणतो

To die is human, and anything human is mentionable. Anything mentionable is manageable.

फकाराचा वापर न करताही प्रेक्षकांना बांधून ठेवता येतं हे दुर्मिळ होत चाललेलं कसब अद्याप शिल्लक आहे हे लेखकांनी दाखवलं आहे. रॉजर्सची बालगीतंही चित्रपटाच्या बांधणीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अमेरिकेतली कुटुंबव्यवस्था, विभक्त शहरी कुटुंबाच्या दैनंदिन समस्या असे इतर अनेक कंगोरे कथेला आहेत.

लॉइड आणि जेरी यांच्यातला तणाव वाढवत नेताना आणि त्यातले उतार चढाव दाखवताना त्यात आक्रस्ताळेपणा न येऊ देण्याची काळजी घेतल्यामुळे काहींना चित्रपट रटाळ व संथ वाटण्याची शक्यता आहे. पण तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असावा. रॉजर्सच्या व्यक्तिमत्त्वातील एकंदरीत असलेल्या संतत्वाच्या तत्वासोबत पटकथेचा वेग आणि चित्रपटाचा रिदम हे दोन्ही सुसंगत आहेत.

अमेरिका श्रेष्ठ आहे असं म्हणतात याचं एक कारण म्हणजे त्यांनी आपलं सांस्कृतिक संचित जपून ठेवलं आहे. फ्रेड रॉजर्स ज्या स्टुडिओत काम करत असे तो पिटर्सबर्गमधल्या स्टुडिओचं आता संग्रहालय करण्यात आलंय. ‘अ ब्युटीफूल डे’ सारखे चित्रपट काढून त्याची लेगसी जिवंत ठेवण्यात आली आहे. मग विचार येतो की फ्रेड रॉजर्ससारखं लहान मुलांसाठी खपलेलं साने गुरुजींसारखं नाव आपल्याकडेही आहे. त्यांच्यासाठी आपण काय केलं तर त्यांच्या गोष्टींना या किती टक्क्यांच्या गोष्टी असं ‘टक्केवारी’च्या हिशेबात मोजलं. तसं पाहिलं तर त्यांच्या नाटयपूर्ण जीवनावर असा उत्कृष्ट चित्रपट होऊ शकतो पण तो कधी होईल देव जाणे. इतर वेळेला आपले आयकॉन कसे दारुडे होते हे पूर्ण लांबीचे दोन दोन चित्रपट काढून दाखवण्यात आम्हाला रस. असो.

वास्तव आयुष्यातही माणसं सर्वसाधारणपणे चित्रपटातल्या पात्रांसारखीच वागत असतात. समजदार माणसंसुद्धा एखाद्या घटनेचा आयुष्यभर डूख धरून बसतात, एखाद्याबद्दल कधीतरी बनलेलं आपलं मत कुरवाळत बसतात. जखमेलाही स्वतःहून भरण्याची इच्छा असली तरी माणसं स्वतःच खपल्या काढून ‘बाऊ बाऊ‘ करत ओरडत बसतात. परंतु समजदार माणसं कधीतरी प्रसंगोपात ताबा सुटल्यासारखी वागली तरी कधी ना कधी आत्मचिंतन करू शकतात. चुका सुधारू शकतात. ही संधी त्यांना कायम उपलब्ध असते. फक्त त्यासाठी त्यांना योग दिशा दाखवणारा, नज करणारा एखादा फ्रेड रॉजर्स किंवा श्रीकृष्ण मिळतो का हे ज्याचं त्याचं नशीब!

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

30 Sep 2020 - 4:43 pm | प्राची अश्विनी

खूप छान ओळख करून दिलीत. नक्की पाहीन चित्रपट.

ए ए वाघमारे's picture

9 Oct 2020 - 2:50 pm | ए ए वाघमारे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

30 Sep 2020 - 6:07 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुरेख ओळख ! एएवा _/\_
अमेरिकेत वेगवेगळे प्रयोग होतात याचे खुपच कौतुक वाटते !

अमेरिका श्रेष्ठ आहे असं म्हणतात याचं एक कारण म्हणजे त्यांनी आपलं सांस्कृतिक संचित जपून ठेवलं आहे. फ्रेड रॉजर्स ज्या स्टुडिओत काम करत असे तो पिटर्सबर्गमधल्या स्टुडिओचं आता संग्रहालय करण्यात आलंय. ‘अ ब्युटीफूल डे’ सारखे चित्रपट काढून त्याची लेगसी जिवंत ठेवण्यात आली आहे. मग विचार येतो की फ्रेड रॉजर्ससारखं लहान मुलांसाठी खपलेलं साने गुरुजींसारखं नाव आपल्याकडेही आहे. त्यांच्यासाठी आपण काय केलं तर त्यांच्या गोष्टींना या किती टक्क्यांच्या गोष्टी असं ‘टक्केवारी’च्या हिशेबात मोजलं. तसं पाहिलं तर त्यांच्या नाटयपूर्ण जीवनावर असा उत्कृष्ट चित्रपट होऊ शकतो पण तो कधी होईल देव जाणे. इतर वेळेला आपले आयकॉन कसे दारुडे होते हे पूर्ण लांबीचे दोन दोन चित्रपट काढून दाखवण्यात आम्हाला रस. असो.

खरं आहे. चांगले चित्रपट रिलिज सुद्धा होत नाहीत, झालेच तर चारपाच दिवसात उडुन जातात, समिक्षक लेखक, माध्यमे अनुल्लेखाने मारतात. ओटीटीवाले सिनेमे घेत नाहीत.
"अस्तू " सारखा नितांत सुंदर प्रयोग किंवा " नदी वाहते " सारखे प्रयोग फारसे चर्चले जात नाहीत !

महासंग्राम's picture

1 Oct 2020 - 11:03 am | महासंग्राम

आज जमाना मार्केटिंग चा आहे, ते जर केलं नाही तर तुमचं प्रॉडक्ट कसं चालेल. फक्त दर्जा आहे म्हणून लोक स्वतः पहायला येतील तो काळ गेला.
सुमित्रा भावेंच्या किती चित्रपटांना मार्केटिंग च बजेट असते ? जर चित्रपट चांगला आहे हे लोकांना कळलं नाही तर ते पाहणार कसे ?
दिठी अजून का प्रदर्शित करत नाहीत. कासव अजून OTT वर आला नाही. एका कार्यक्रमात सुमित्रा भावे पाहुण्या म्हणून आल्या होत्या तिथे मी त्यांना दिठी आणि कासव बद्दल प्रश्न विचारले होते. त्यांनी सरळ काही कल्पना नाही असं सांगितले.

सचिन कुंडलकर आणि गिरीश कुलकर्णी हे लोकं सुमित्रा भावेंच्याच तालमीत तयार झाले आहेत, त्यांचे चित्रपट सुद्धा सकस असतात आणि चालतात सुद्धा

चौथा कोनाडा's picture

1 Oct 2020 - 3:37 pm | चौथा कोनाडा

सुमित्रा भावेंबद्दल +१, ते लोक मार्केटींगला खुपच कमी पडतात ! कदाचित "ओल्ड स्कुल"चे आहेत म्हणुन असेल कदाचित !

सचिन कुंडलकर आणि गिरीश कुलकर्णी मात्र आताच्या काळचे असल्यामुळे हे जमुन येत आहे !

मी फेस्टिव्हली सिनेमाचा प्रेक्षक आहे. कधीकधी वाटतं की या लोकांना खरंच आपले चित्रपट आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हावेत असं वाटतं की नाही? की फक्त खर्च भरून निघावा, पुढच्या निर्मितीसाठी पैसे मिळावे आणि मुख्य म्हणजे विशिष्ट गोटात मिरवून घ्यावं एवढीच अपेक्षा असते? आम्ही अर्थपूर्ण चित्रपट काढतो म्हणून आम्ही ग्रेट असाही काही लोकात असलेला अहंगंड मला दिसलेला आहे. माझा एक मित्र असाच अर्थपूर्ण चित्रपटकर्ता आहे. तो हॉलीवूडचे मेनस्ट्रीमचे चित्रपट किंवा अगदी गाजलेले बाहुबलीसारखे पिक्चर पाहात नाही, कारण का तर ते कमर्शियल आहेत. त्यांचा तो धंदा असल्याने ते आपली शक्ती वाचवण्यासाठी असा भेदभाव करू शकतात. पण माझ्यासारख्या सामान्य रसिकाला तसं करणं कलात्मकदृष्ट्या परवडत नाही. तसं करणं हे माझा आस्वादक म्हणून माझा परीघ आक्रसून घेणं असतं.

ए ए वाघमारे's picture

9 Oct 2020 - 2:54 pm | ए ए वाघमारे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अस्तु मी अद्याप पाहिलेला नाही. 'नदी वाहते' मात्र नागपूर फिल्म फेस्टीव्हलला पाहण्याचा योग आला नव्हता.

मी चित्रपट पूर्ण पाहू शकलो नाही, पाहवला नाही. म्हणून आजवर त्याबद्दल लिहायचं टाळलं आहे. पूर्ण चित्रपट न पाहता बोलणं मला योग्य वाटत नाही. तरी ज्या मोजक्या चित्रपटातून मी अर्ध्यातून उठून आलो आहे त्यापैकी हा एक. मला वाटतं तूर्त एवढं पुरेसं आहे.

ए ए वाघमारे's picture

9 Oct 2020 - 2:55 pm | ए ए वाघमारे

अस्तु हा आजारपट असल्याचं मी ऐकलं आहे. त्यामुळे अजून पाहण्याची हिंमत केली नाही. नेटफ्लिक्स / अमॅझॉन कुठेतरी उपलब्ध आहे.

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2020 - 1:24 pm | चौथा कोनाडा

अस्तुचा विषय आजार हा असला तरी त्याची हाताळणी आजारपटासारखी नव्हती हे मोठं सरप्राईझ होते !
त्या आजाराच्या पार्श्वभुमीवर भावना आणि नातेसंबंध हेच विषय हातळले होते.
इराचे पात्र इरावती हर्षेने अतिशय सुंदर रंगवले होते.
(उत्सुकता टिकावी म्हणुन इथंच थांबतो)

सिरुसेरि's picture

30 Sep 2020 - 11:09 pm | सिरुसेरि

सुरेख ओळख . टॉम हँक्स हा प्रयोगशील कलाकार नेहमीच लक्षवेधक काम करतो . "सेविंग मि. बँक्स " , "टर्मिनल" हे असेच लक्षात राहिलेले चित्रपट .

ए ए वाघमारे's picture

9 Oct 2020 - 3:14 pm | ए ए वाघमारे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

छान लिहिलंय रसग्रहण. साधं सोपं सुटसुटीत तरीही उत्सुकता वाढवणारं . नक्की पाहीन हा चित्रपट.

फकाराचा वापर न करताही प्रेक्षकांना बांधून ठेवता येतं हे दुर्मिळ होत चाललेलं कसब अद्याप शिल्लक आहे हे लेखकांनी दाखवलं >>
मग तर नक्की बघेन, फार म्हणजे फारच वात आलाय या फकाराचा

ए ए वाघमारे's picture

9 Oct 2020 - 3:15 pm | ए ए वाघमारे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!