परतीचा प्रवास

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जनातलं, मनातलं
20 Sep 2020 - 7:22 pm

मनी ध्यानी नसताना अचानक आज माहेरी जाण्याचा योग आला. ती स्वतःशीच हसली. सणवार, लग्न-मृत्यू, दुखणी-खुपणी असं काही मिशन नसताना स्वच्छंदपणे माहेरी जायला मिळणं, ही तिच्यासाठी पर्वणी होती. दादा-वहिनी मुलांना घेऊन आठवडाभर ट्रीपला गेले म्हणून आईच्या सोबत ती.. असं ठरलं कारण आई आता ७६ वर्षांची होती. एक अनामिक हुरहुर वाटत होती. गरमागरम चहा आणि तिच्या आवडीच्या दडपेपोह्यांनी आईनं स्वागत केलं.. तासभर चहाच्या टेबलावरच गेला.. पण पाण्यात टाकल्यावर अळीव फुलावा,.. तशी ती सुखावली. रात्री कढी खिचडीचा सोपा बेत करून मायलेकी, जुन्या आठवणींच्या गप्पात रंगून गेल्या..
ती निजायला जाणार इतक्यात आईनं बोलवलं. कपाट उघडलं... तोच वाळ्याच्या अत्तराचा चिरपरिचित मंद सुगंध दरवळला. साड्यांच्या एकावर एक सुरेख घड्या.. अगदी टोकाला टोक जुळणारं.. आई अजूनही तश्शीच आहे, असं मनात येतयं तोच, आईनं साड्यांच्या तळाशी हळुवार जपलेली गोष्ट बाहेर काढली... माझी मॅक्सी..!! ती ओरडली. हा तिच्या आवडीचा ड्रेस..!! खूप घेर, खूप झालरी लाऊन आईने तिच्या वाढदिवसाला ती शिवली होती... अजून जपलीयेस..? ती म्हणाली.. आज हीच घालावीस म्हणून काढलीये गं.. दोघीच तर आहोत आपण.. घाल तू ! आई, दादापेक्षा लहान असले, तरी पन्नाशीची झालेय गं मी.. आता कुठे होणार मला..... अरे व्वा, अजूनही फिटिंग मस्त आहे गं.... "सुकलीय माझी राणी".. इति आई..!! बारीक असणंच चांगलयं गं आई..!! तिला आठवलं, लग्नाच्या चार दिवस आधी, तिनं हीच मॅक्सी घातली होती. आणि "इवलं इवलसं पाखरू," असं गात.. आईनेच तिला थोपटून झोपवलं होतं.... डोळ्यांच्या कडा चुकारपणे उगीचच पाणावल्या.....
आज सकाळी तिला नेहमीची घाई नव्हती. आल्याचा कडक चहा पीत, ती आईला म्हणाली, आजकाल रेश्मा- सुमती कुठे असतात गं.. गावातच दिल्यात ना..? त्यांचे फोन नंबर घेऊन तिने आजचा दिवस मस्त घालवला.. जणु वहीची मागची पानं उलगडली.. मग ती फुलपाखरू झाली.. सगळ्या मित्रमैत्रिणींना घेऊन मनसोक्त हुंदाडून झालं.. जसा काही वसंत पुन्हा आला.. कोकिळा मनमुराद गाऊ लागली... हा कसला गं हट्ट, असं लटक्या रागाने म्हणत, आईने तिची वेणी घातली. काल संध्याकाळी आणलेले मोग-याचे गजरे तिनं माळले अन् खुश्शाल हेडफोन लाऊन गाणी ऐकत बसली. दुपारी पानात चिरोटे पाहून ती गडबडली.. आई कधी केलसं हे..? तू काल दिवसभर बाहेर होतीस तेव्हा..!! आई पहिल्या पासून सुगरणच..!! आईने केलेल्या चिरोट्यांचे सुटलेले पदर मोजताना, लहानपणी खूप मजा वाटायची. बाबा तिला लाडानं चिरोटा म्हणत..कारण ती हरहुन्नरी होती..!! एकाच चिरोट्यात जसे अनेक नाजूक पदर असतात, तशी ती चतुरस्त्र होती.., तितकीच हळवी..!! चटकन् विरघळणारी.... तिच्या स्वभावाचे अनेक वेगवेगळे पैलू.. पण
स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपणारे.. !! आई या वयात, तिच्यासाठी झटत होती म्हणून, तिनेही आईच्या आवडीच्या सुरळीच्या वड्या केल्या. तिच्या सुरळीच्या वड्यांचे पदरही एकमेकांना चिकटत नसत.. तिच्या एकाकीपणाची अन् स्वभावाची जणु साक्ष देत असत..!!
आणि बघता बघता आठवडा सरला.. भैयाची भेळ, मनोहरची पाणीपुरी, नदीकाठचा गणपती.. काय काय नाही केलं आपण..!! तेवढ्यात दादाचा फोन आला... उद्या दुपारी येतोय..! हं.....तिनं मनात उसासा सोडला. पसारा आवरायला घेतला.. बॅगही भरली..!! आईनं मेतकूट, कुरडया, भोकराचं लोणचं, आठवणीनं दिलं. क्षणभरच पण मायलेकींचे डोळे पाझरले. दादा, वहिनी, भाचरं आली... घराचं गोकुळ झालं. वहिनीने आठवणीने आणलेली साडी तिला दिली. अबोली रंग अन् मोरपिशी काठ.. व्वा.. वेगळचं काँबिनेशन होतं... एखाद्या अनवट रागासारखंं.. खूप मस्त आहे गं.. आवडली मला.. ती उत्स्फूर्तपणे म्हणाली..!! तिची आवड कुणीतरी मनापासून जपली होती... आईला मात्र नातवंडांना पाहून भलताच आनंद झाला होता... खूप बोलत होती.. हसत होती.. मजेत होती..!! तिला आई दूर जात असल्याचा भास झाला... माहेरपणाचं मृगजळ अदृश्य झालं...!!
परतीचा प्रवास सुरु झाला होता , खरंतर तो दादाचा फोन आल्याक्षणीच सुरू झाला होता. स्टेशनवर नेहमीप्रमाणे तिला न्यायला कोणी आले नव्हते. एकटीच घरी आली. तिला हे माहेरपण प्राजक्ताच्या फुलांसारखं वाटलं.. मोहक पण अल्पजीवी!!
भूतकाळाचा स्पर्श लेऊन , सवयीने उमललेल्या लाजाळू सारखी तिची अवस्था झाली. वर्तमानाचे भान आल्यावर आपसूक मिटून गेली पुन्हा….. दोन दिवसात रूटीन पुन्हा स्थिरावलं,.. पण सुकलेल्या बकुळफुलांसारखा आठवणींचा दरवळ मनात दाटत राहिला. तिचं मन वाचणारं जवळ कुणीच नव्हतं. नवरा,मुलगा, सून सारे स्वतःच्या विश्वात दंग होते. संसारकोषात परतताना तिचे फुलपाखराचे पंख मात्र दुखावले होते...!!
हेच आहे का जीवन? आईचाही संसार... आणि माझाही संसारच तर आहे. मग तो प्राणी- पक्षीही करतातच की.... माहेरपण सुटताना जर एवढा त्रास होत आहे.... तर खरा परतीचा प्रवास कसा झेपणार मला? ही कसली खळबळ माजली आहे माझ्या मनात? कोण देईल माझी शेवटपर्यंत साथ? त्यातच तिने देवाजवळ निरांजन लावायला घेतलं. तिन्हीसांज दाटून आली होती.... तिच्या आयुष्यासारखी.....!! तेवढ्यात रेडिओवरील स्वर कानी पडले ..... "मम मनी कृष्ण सखा रमला"... देवघरातील बाळकृष्ण हसत होता. अगं.. माहेर सोडल्यापासून प्रत्येक प्रसंगात मीच साथ देतो आहे .. विसरलीस मला ?
... पुन्हा तारा जुळल्या. ती ही कृष्णाबरोबर हसली. मनातलं मळभ दूर होऊ लागलं. विचारांचं काहूर शांत होऊ लागलं...
तिनं पुन्हा मुक्त भरारी घ्यायचं ठरवलं...
आता तिनं निर्धारानं डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला.
"भेटेल तिथे गं सजण(कृष्ण) मला...."
मन गात होतं.. त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर ..... मोरपीसाचा स्पर्श...!!! तिने जाणीवेतून आर्त प्रार्थना केली...
कान्हा.., तुझ्या परीसस्पर्शाने ह्या जीवाचं सोनं होऊ दे... अगदी राधा-मीरा नाही, पण.. मला गोपी तरी होऊ दे....!!

जयगंधा....
२६-८-२०२०

कथालेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

20 Sep 2020 - 8:38 pm | चौथा कोनाडा

व्वा, सुंदर, सुरेख !

तिला आई दूर जात असल्याचा भास झाला... माहेरपणाचं मृगजळ अदृश्य झालं...!!
परतीचा प्रवास सुरु झाला होता , खरंतर तो दादाचा फोन आल्याक्षणीच सुरू झाला होता. स्टेशनवर नेहमीप्रमाणे तिला न्यायला कोणी आले नव्हते. एकटीच घरी आली. तिला हे माहेरपण प्राजक्ताच्या फुलांसारखं वाटलं.. मोहक पण अल्पजीवी!!


क्या बात हैं !

बबन ताम्बे's picture

20 Sep 2020 - 9:08 pm | बबन ताम्बे

स्त्रीचे भावविश्व उत्तम चितारलेय.
पुढील लेखनास शुभेच्छा!

गोरगावलेकर's picture

20 Sep 2020 - 9:14 pm | गोरगावलेकर

हाच लेख फेसबुकवर "छंद" या महिलांसाठीच्या ग्रुपवर Aruna Maldhure यांनी ४ सप्टेंबर रोजी पोस्ट केला आहे. त्यात आपलं नाव दिसत नाही.
आपणच Aruna Maldhure आहात का?

संजय क्षीरसागर's picture

20 Sep 2020 - 10:59 pm | संजय क्षीरसागर

इंटरनेटच्या जमान्यात कधी काय बाहेर येईल सांगता येत नाही.

संजय क्षीरसागर's picture

20 Sep 2020 - 11:04 pm | संजय क्षीरसागर

लेखिकेनं २६-८-२०२० अशी तारीख टाकलीये त्यामुळे हे लेखन ओरिजिनल असण्याची शक्यता जास्त.

चलत मुसाफिर's picture

20 Sep 2020 - 9:15 pm | चलत मुसाफिर

लेख/कथा आवडली. मी स्वतः पुरुष असल्यामुळे केवळ अंदाजच बांधू शकतो पण मुलीची ती हुरहूर अगदी नेमकी पकडलीय असं वाटलं. तपशीलही अगदी अचूक टिपलेत. खूप शुभेच्छा.

Rajesh188's picture

21 Sep 2020 - 1:36 am | Rajesh188

आताच्या सामाजिक परिस्थिती शी बिलकुल जुळत नाही.
म्हाताऱ्या आई ची ओढ आता नाही.
आता फक्त प्रॉपर्टी मध्ये हिस्सा कसा मिळेल.
हाच विचार असतो.

Gk's picture

21 Sep 2020 - 7:01 am | Gk

आम्हा पुरुषांना ना माहेर ना सासर

Gk's picture

21 Sep 2020 - 7:10 am | Gk

बायकांनी पुरुषांना नांदवायला न्यावे ,
मग पुरुषही अधून मधून इकडे तिकडे फ़िरतील आणि असे लेख लिहितील

विटेकर's picture

21 Sep 2020 - 3:20 pm | विटेकर

खूप छान लिहिल आहे ,.. आवड्ले .. पु ले शु

नात्यातील इतका हळुवारपणा आताशा राहीला नाही ..

शरद's picture

22 Sep 2020 - 11:20 am | शरद

मिपावर आपले स्वागत. छान लिहले आहे. भाषा भावनेला साजेशी आहे. लिहीत रहा.
शरद

श्वेता२४'s picture

22 Sep 2020 - 11:29 am | श्वेता२४

स्त्रीच्या माहेरपणाचे चित्र नेमकं रंगवलंय.

शित्रेउमेश's picture

30 Sep 2020 - 9:58 am | शित्रेउमेश

अप्रतिम.... खूप मस्त....