शिक्षक दिन

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जनातलं, मनातलं
9 Sep 2020 - 9:57 pm

५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.
छोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न...
-------------------------------------
एक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - "देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव."
वाचनाची आवड लागावी म्हणून आई त्या मुलाला गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याची सवयही लावते. मुलगा वाचनालयात जाऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही. रामन, स्वामी विवेकानंद यांची पुस्तके वाचून प्रेरीत होतो आणि एके दिवशी त्या वाचनालयाच्या निरव शांततेत डोळे बंद करुन प्रार्थना करतो - "हे देवा, मला जीवनात चांगल्या मित्रांसोबत, नेहमी चांगले शिक्षकही लाभू दे." पुढे कालांतराने त्याची प्रार्थना पूर्णही होते. म्हणजे जादुची कांडी फिरुन सर्व चांगले शिक्षक त्याच्यासमोर आले असे नाही तर जे आहे त्यातूनच सर्वोत्तम कसे उलगडते, हे सांगणारी ही गोष्ट.

आत्मविश्वास

सहावीचा वर्ग. सहामाही परीक्षेच्या उत्तरपत्रिका सर वर्गात वाटतात. सर्व विद्यार्थी आपापली उत्तरे व मार्क्स पडताळून पहात असतात.
दुस-या बाकावरचा एक विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या एकाच पानावर उदास चेह-याने बघत बसलेला सरांच्या लक्षात येतो. त्या पानावर निबंध लिहीलेला असून त्यात त्याला फारच कमी गुण मिळाल्याने तो निराश आहे, हे सरांच्या नजरेने हेरलेले असते. मग सर्व कामे बाजूला सारुन 'निबंध कसा लिहावा' , हे शिकवायला सर सुरुवात करतात. निबंधाची सुरुवात, मध्य, शेवट कसा करावा, व्याकरणातले बारकावे इ. सर्व शिकवतात. हे सर्व करताना सर त्या विद्यार्थ्याकडे बघण्याचेही टाळतात जेणेकरुन त्याला कमीपणा वाटू नये. वर्ग संपल्यावर त्याला वाटते की हे तर सरांनी माझ्यासाठीच शिकवले आणि तो खुषही होतो.
मुलगा वाचनालयात जाऊन मिळेल ती पुस्तके वाचत सुटतो. वाचताना भाषा व्याकरणाकडे विशेष लक्ष देतो. सहा महिन्यानंतर वार्षिक परीक्षेत पुन्हा निबंध लिहिण्याचा प्रश्न असतो. यावेळी मात्र सर ह्या विद्यार्थ्याने लिहीलेला निबंध वर्गात वाचून दाखवतात. 'निबंध लिहावा तर असा' अशी शाबासकीही देतात. त्यावेळी त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो. योग्य वेळी योग्य प्रकारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे ही चांगल्या शिक्षकांची कलाच म्हणावी.

'बाँबे टू गोवा' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान नवशिक्या अमिताभला 'देखा ना हाय रे' या गाण्यावर बसमध्ये नाचायला जमत नव्हते. त्यावेळी दिग्दर्शक मेहमूद आणि सहकलाकारांनी त्याच्या डान्सची खोटी प्रशंसा केली. पुढे जाऊन हाच अमिताभ 'खई के पान बनारसवाला' (डॉन), मी. नटवरलाल इ. असंख्य चित्रपटांतून अफलातून नृत्य करतो. योग्य वेळी आत्मविश्वास वाढवल्यास काय होऊ शकते, याचेच हे उदाहरण. आणि त्यामध्ये सहकलाकार, मित्रांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची.

स्वअभ्यास

नववीचा वर्ग. मॕडम वर्गात सांगतात की मी उद्या संस्कृत विषयातला सर्वात किचकट वाटणारा धडा शिकवणार आहे. उद्या कुणीही गैरहजर राहू नका. तरीसुद्धा हा विद्यार्थी आजाराच्या कारणाने दुस-या दिवशी शाळेला दांडी मारतो. मॕडम ठरल्याप्रमाणे तो धडा शिकवतात. तिसऱ्या दिवशी मॕडम वर्गात येतात. आदल्यादिवशी सांगूनसुद्धा गैरहजर राहिल्याचा राग मॕडमच्या डोळ्यात त्या विद्यार्थ्याला दिसतो. मग मॕडम त्याच धड्यावर परीक्षा घ्यायची ठरवतात आणि मुलांना २५ प्रश्न सोडवायला देतात. उत्तरे तपासल्यावर विद्यार्थ्याची सर्व २५ उत्तरे बरोबर येतात. मॕडम आश्चर्याने त्याच्याकडे बघून म्हणतात, तूला शिक्षकांची गरज नाही. विद्यार्थी म्हणतो - मॕडम, मी आजन्म तुमचा विद्यार्थी आहे. तुम्ही नेहमी स्वअभ्यासाचे महत्त्व सांगत असता, तेच मी पाळले.

व्यक्ती आणि प्रतिमा

दहावीचा वर्ग. विद्यार्थी आपल्या आवडत्या सरांना त्याची वही दाखवतो. त्यात लिहिलेले दहा किचकट प्रश्न समजावून घेण्यासाठी सरांच्या घरी येण्याची परवानगी मागतो. सरही हसत घरी येण्याची त्याला परवानगी देतात. तोपर्यत 'आदर्श' शिक्षक अशी त्या सरांची प्रतिमा विद्यार्थ्याच्या मनात पक्की झालेली असते. मुलगा संध्याकाळी सरांच्या घरी पोहोचतो, वेळेच्या थोडा आधीच. सर अंगणात सिगारेट ओढत असल्याचे त्याला दिसतात. क्षणात 'आदर्श' या कल्पनेच्या चिंधड्या मनात उडालेल्या असतात. झटकन सिगारेट मागे फेकून सर मुलाकडे येतात. तो ही काही न बघितल्यासारखे करतो. आणि मग वहीतल्या प्रश्नांवर सर बोलायला लागतात, त्याला उत्तरे समजावून सांगतात. पण मुलाला काहीच ऐकू येत नाही. त्याच्या मनात आता मोठ्या प्रश्नांचा गोंधळ सुरु असतो.

या जगात सगळे असेच फसवे असते का?
प्रत्येक आदर्शामागे असेच काही वाईट असते का?
या समाजात मुलांसाठी खरंच कुणी आदर्श आहे का?
की मी कुणाकडे आदर्श म्हणून पाहूच नये?
मग मी देवाकडे केलेल्या प्रार्थनेचे काय ?

दुस-या दिवशी वर्ग सुरु होतो. विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही एकमेकांची नजर टाळतात. थोडे दिवस असेच निघून जातात. विद्यार्थीही सर्व विसरल्याचे दाखवतो. सर्व पूर्वपदावर येते. कदाचित मुलाने आपल्या आवडत्या सरांना एक व्यक्ती म्हणून स्विकारलेलं असतं किंवा आपलं नातं हे एका शिक्षकाशी आहे, व्यक्तीशी नाही, हे स्वतःला समजावलेलं असतं.

नावडता विषय आणि तळमळ

नववीचा वर्ग. प्रत्येक विद्यार्थ्याचा एकतरी असा नावडता विषय असतो. इतिहास हा असाच एक. एकतर मधल्या सुटीनंतरचा तास. जेवणानंतर अर्ध्या झोपेत सर दुस-या महायुद्धाच्या कहाण्या सांगत असतात आणि 'सिकंदरने पोरस से की थी लडाई तो मै क्या करु !' असे हावभाव मुलांच्या चेह-यावर. विषय नावडता व्हायला एवढे कारण पुरेसे असते.
पण एकदा गंमतच होते. शाळेचे इन्स्पेक्शन असते. झेड. पी. चे साहेब शाळेत येतात. आणि नेमके इतिहासाच्या तासाला इन्स्पेक्टर साहेब बसतात. एरवी झोपेत शिकवणा-या सरांचे वेगळेच रुप त्या दिवशी पहायला मिळते. शिकवताना अचानक सरांची एनर्जी वाढते आणि अंगात युद्धज्वर चढल्यासारखा हावभाव करुन केवळ वर्णनातून दुस-या महायुद्धाचे पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे करतात. त्या दिवशी एक वेगळेच शिक्षक मुलांसमोर उभे असतात. शिकवताना विस्फारलेले मोठे डोळे, वाढलेली एनर्जी लेवल या सगळ्या गोष्टी मुलांना शिक्षकांची तळमळ दाखवतात आणि मग विद्यार्थ्यांनाही वाटते की आपणही मनापासून अभ्यास करावा कारण आपणही शिक्षकांचे काही देणे लागतो. मग नावडता विषय आवडता व्हायला वेळ लागत नाही. आजच्या अॉनलाईन शिक्षणातही ही तळमळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असावी ही अपेक्षा.

ज्ञान
दहावीचा वर्ग. सरांचे भाषण चालू असते. जीवन ही सर्वात मोठी शाळा आहे जिथे तुम्हांला स्वतःच स्वतःचे शिक्षक व्हावे लागते. आणि या चार भिंतींच्या बाहेर पडल्यावर ही शाळा सुरु होते. भविष्यात तुम्हाला अनेक संकटातून जावे लागेल तेव्हा घाबरु नका. जेव्हा तुमच्या पुढे थक्षप्रश्न उभे राहतील व सर्व आशा मावळलेल्या असतील, तेव्हा फक्त एक लक्षात ठेवा- श्रीमद्भगवद्गीता उघडा आणि समोर असेल ते पान वाचा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

लहान वयात या सर्व गोष्टी ऐकायला, समजायला जड वाटतात.
पण पुढे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रुपात संकटांची वादळे ही येतच असतात. तेव्हा मीच का? या प्रश्नाचे उत्तर कुठेही मिळत नाही.

कालांतराने सुरु होतो स्वतःचा शोध. मी कोण ? तेव्हा आठवतात ते जड वाटणारे सरांचे वरील शब्द...

सर्व प्रश्न कधीच मागे पडलेले असतात. मनही शांत. कोणताही प्रश्न हा मुळात प्रश्न नव्हताच कधी. आणि याबद्दल सरांचे आभार मानण्यासाठी हात जुळतात. तेव्हा सरही अनंतातून त्याच प्रेमळ नजरेने त्या विद्यार्थ्याकडे पहात असतात.

----------- मनोज

साहित्यिकजीवनमानशिक्षणप्रकटनलेखअनुभव