जब I met मी :-6 (भाग दुसरा)

Cuty's picture
Cuty in जनातलं, मनातलं
2 Sep 2020 - 7:02 pm

एक दिवस आम्हाला गोड बातमी मिळाली. आम्ही दोघेही खूष होतो. माझी नोकरी सुरूच होती. नवरा जमेल तशी माझी कळजी घेत होता. आता माझा दवाखान्याचा, खाण्यापिण्याचा वगैरे खर्च वाढला होता. पण नवरा काही कमी पडू देत नव्हता. त्याचीही खरेतर ओढाताण सुरू होती. मंदीमुळे बरेच दिवस पगारवाढ झाली नव्हती. तरीही आम्ही काटकसरीने पण आनंदाने राहत होतो. पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, तशी मला चिंता भेडसावू लागली. कारण आईवडिल अलिकडे महिना दिडमहिना फोनसुध्दा करत नव्हते, माझ्या तब्येतीची विचारपूस तर दूरच राहिली. त्यांच्या मनात काय चालू आहे, आता ते माझे पहिले बाळंतपण तरी करतायत की नकार देणार, मग नवर्याला आणि सासरच्या लोकांना मी काय आणि कसे सांगणार, असे नाही नाही ते विचार मनात येऊन माझ्या मनावर प्रचंड ताण यायला लागला. दुसरीकडे मी, आईकडे गेल्यानंतर तिला द्यायला पैसे लागतील म्हणून स्वतःसाठी फळे, महाग भाज्या वगैरेही घ्यायचेही टाळत होते. स्पेशल रिक्षा करण्याऐवजी बसने धक्के खात प्रवास करत होते. डाॅक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांपैकी फक्त अतिशय गरजेची औषधे घेत होते. विटामीन आणि रक्तवाढीची औषधे घेतच नव्हते.जमतील त्या मार्गाने पैसे जमवत होते. पण याचा परिणाम तब्येतीवर झालाच! सातवा महिना संपतासंपता माझा बीपी वाढला! वजन कमी झाले. डाॅक्टर वारंवार विचारत होते, 'कसला मानसिक त्रास आहे का?,औषधे, खाण्यापिण्यात हलगर्जीपणा होतोय का?' आम्ही दोघेही 'नाही, नाही' म्हणत होतो. नवर्याला काहीच माहित नव्हते पण माझे मन मला खात होते. शेवटी नवर्याने स्वतःच माझ्या आईवडिलांना फोन लावला अन सर्व काही सांगून मला माहेरी नेण्याचे सुचविले. पण ' तिथेच शहरात चांगले दवाखाने आहेत. इथे तिला गावात आणून काय करणार? आणि तिची नोकरीही चालू आहेना?' असे म्हणत त्यांनी स्पष्ट नकार दिला. माझ्याशी फोनवरदेखील बोलले नाहीत की मी कशी आहे वगैरे विचारले नाही. मला घरी आणून विश्रांती देण्याऐवजी आता माझी नोकरी त्यांना महत्वाची वाटत होती. आता मात्र माझ्या नवर्यालाही ही गोष्ट खटकली. त्याने तसे बोलूनही दाखवले. शेवटी तोदेखील पहिल्यांदाच बाबा होणार होता. त्यालाही या सर्व गोष्टींचे टेन्शन आले होते. माझ्या तब्येतीत जर काही चढउतार झाले असते तर हे सर्व निभावणे त्यालाही अवघडच गेले असते. पण आता त्याने मला काळजी वाटू नये म्हणून सबुरीने घेतले. आणि 'हवे तर तू सरळ नोकरी सोड. नोकरी नंतरही करता येईल पण विश्रांती घे. आणि घरकामाला सरळ मोलकरणी ठेव. दगदग करू नको' असे सांगितले. आता फारतर दीडदोन महिन्यांचा प्रश्न होता. मग मीही इथून पुढे, काही हलगर्जीपणा करायचा नाही असे ठरवले. नोकरी सोडली, वरकामाला बाई ठेवली आणि आरामात खाणेपिणे, तब्येत सांभाळू लागले.

अजून एक महिन्यांनी आईचा फोन आला. 'काय गं! कधीची तारिख दिलीय तुला? अजून तुझ्या लग्नाचं कर्ज फिटलं नाही तोवर आम्हाला परत दुसर्या खड्ड्यात लोटलंस! आतातरी बाळंतपणाला काही पैसे काढलेस की नाही बाजूला? तो तुझा नवरा..!! फोनवर तर अगदी तुझी काळजी दाखवतोना आम्हाला! मग बाळंपणात खर्चासाठी लागतील, म्हणून सरळ त्याच्याकडून येताना पैसे मागून आण आता..! आणि नसतील जमंत तर सांग तुझ्या सासूला, तिकडेच कर म्हणावं सगळं!' यावर फक्त, 'अगं माझ्याकडे आहे बर्यापैकी रक्कम. तू नको काळजी करूस', एवढं बोलून मी फोन ठेवला, अन मला अचानक भडभडूनच आलं. बराच वेळ मी एकटीच ढसाढसा रडत होते!

नऊ महिने संपत आल्यावर, जवळपास दिवस भरत आल्यावर आईवडिल मला गावी घेऊन गेले. मला जाणवले, या नऊ महिन्यात एकदाही ते मला भेटायला आले नव्हते. गावी गेल्यावर तेथील डाॅक्टरनी स्पष्ट सांगितले, 'सिझेरिअन करावे लागेल'. झाले! आता तर आईने खर्च वाढणार म्हणून माझ्या नावाने बोटे मोडायलाच सुरूवात केली. वडिल रागारागाने न जेवता नुसते धुमसत फिरू लागले. 'ही पोरगी काही जगू देणार नाही आम्हाला!' असे पुटपुटत बाहेर निघून गेले.आता मात्र मी या दोघांचा अवतार बघून भेदरलेच. माझी काकू, आत्या वगैरे नात्यातल्या आणि शेजारच्या बायका मला धीर द्यायला घरी येऊ लागल्या आणि आई त्यांच्यापुढेच, तिला आता कसा त्रास आणि खर्च होणार, याचा पाढा वाचू लागली! आलेल्या सर्वजणी एकमेकींकडे बघत काढता पाय घेऊ लागल्या.

आठदहा दिवसांनी मला मुलगा झाला ! माझा नवराही माझ्यासोबतच दवाखान्यात राहिला.ज्यादिवशी मला घरी सोडणार होते, त्यादिवशी अर्धेच बिल भरून वडिलांनी हात वर केले. मग नवर्यानेच समजून घेत उरलेले बिल भरले. माझ्याकडचे पैसे आईने कधीच काढून घेतले होते. मला आणि बाळाला खर्चासाठी राहूदेत, म्हणून अजून बरीच मोठी रक्कम नवर्याने मित्राकडून घेऊन मला दिली. मला माहित होते फ्लॅटसाठी पैसे जमा करताकरताच त्याच्या नाकीनऊ येत होते. बिलाचे पैसेही त्याने उधारउसनवारीनेच जमा केले असणार! इकडे माझा भाऊ अगदी भरभक्कम पगारावर नोकरीला होता. वर खर्च असा काहीच नव्हता. माझ्या लग्नासाठीचे कर्जाचे हप्ते थोडेच राहिले होते अन दरमहाचा हप्ताही आवाक्यात होता. आईच्या हाताखाली वरकामाला आधीच दोन मोलकरणी होत्या अन आता माझ्या बाळंतपणाच्या नावाखाली स्वयंपाकात मदतीलाही बाई ठेवली. तिला फारसे जास्त कामही नसे.आजकाल तिचे आणि भावाचेही राहणीमान अगदी भपकेबाज असे. गळ्यातील सोन्यात भर पडली होती. आम्ही नवराबायको दोघांनी शहरात नोकर्या करून, काटकसर करून, मी गर्भारपणात स्वतःचे हालआबाळ करून, पै पै करून फ्लॅटसाठी जमवलेला पैसा असा बिनदिक्कत उधळला जात होता.

बरे एवढे होऊनही आता आई माझे बाळंतपणही नीट करायला तयार नव्हती. माझे तान्हे बाळ लवकर पहाटेच ऊठायचे. मी त्याला घेऊन बसायचे. ते रडले की झोपमोड झाली म्हणून आईचे तोंड सुरू व्हायचे. कसेबसे मी त्याला चूप केले की आई परत झोपायची ते सकाळी आठलाच उठायची. मग निवांत सर्वांचे आवरून झाल्यावर नऊसाडेनऊला सर्वजण बाहेरच्या खोलीत नाष्टा उरकून घ्यायचे. मी आत बेडरूममधे बाळाला घेऊन अगदी अवघडून गेलेले असायचे. पहाटेपासून दूध पिणारे बाळ अन त्याला चारपास तास मांडीवर घेऊन मलाही भूक लागलेली असायची. पण एव्हाना माझे आंघोळ, ब्रश काहीच झालेले नसायचे कारण तोपर्यंत बाळाला घ्यायला कोणीच नसायचे. सर्वांचा नाष्टा झाल्यावर थोडावेळ बाळाला घेण्यासाठी मी आईला हाक मारली की, ती वसकन अंगावर यायची, 'ये... थांब जरा! तू काय मोकळीच आहेस खायला! इथे आम्हाला कामं पडली आहेत. कामाला बाया येतील आता. त्यांना घासायला भांडी, कपडे कोण काढणार? स्वयंपाकाला बाई येईल, तिला सामान काढून द्यायचंय. तूला हीच वेळ मिळते का कटकट करायला ?' मग मी तशीच बराच वेळ बाळ मांडीवर घेऊन बसे. कामाला मोलकरणी आल्यातरी आई मुद्दाम लक्षात नसल्यासारखे दाखवून त्यांच्याशी बाहेर गप्पा मारत बसे. मग मी हाका मारत राहिले की, ' फारच बाई त्रास आहे माझ्यामागे!' असे म्हणून आत येऊन तोंड वेगाडून बाळाला घेऊन बसे. अशा तर्हेने, मला बाहेर येऊन दात घासायलाच साडेदहाअकरा वाजत. मग आंघोळ उरकून नाष्टा करणार तोच आई रागारागाने 'होतंय का तुझं आज?' म्हणून हाका मारायला लागे. हे पाहणार्या कामवाल्या बायाही माझी दया येऊन एकमेकींकडे पाहून चुकचुकायच्या. मग दुपारीतर सर्वांचे जेवण झाल्यावर अडिचतीनला मला जेवायला मिळे. रात्री हटकून दहासाडेदहाच होत. जेवायची वेळ सोडली तर आई एक मिनिटही बाळाला घ्यायची नाही. तिच्या चांगल्या साड्या बाळ खराब करेल म्हणायची. तिला घरात बाळ बघायला कोणी आलेगेले, तर छान दिसायचे असायचे.माझे सिझर झालेले. अवघडून सलग कित्येक तास बाळाला घेऊनघेऊन पाठ भरून यायची. दुखायची. पण आईला कधीच दयाही आली नाही.माझे खाणेपिणे तर सोडाच औषधपाणीही तिने नीट होऊ दिले नाही. माझ्यासाठी एखादा पदार्थ रांधणे तर दूरच! आणि वडिलांनीही डोळ्यांवर अगदी सोयीस्कररित्या पट्टी बांधून नामानिराळे राहिले होते.

एक गोष्ट मात्र होती. आता दर पंधरा दिवसांनी वडिल माझ्या नवर्याला स्वतः फोन करून 'बाळाला बघायला' बोलावायचे. तो आला की 'असूदेत तुला' म्हणून एखादे नोटाचे पुडके हातात ठेऊन जायचा. त्याला वाटे, आपली बायकोमुलगा इथे आरामात राहत आहेत. त्याची पाठ फिरली की, माझ्या हातातले पैसे आईच्या हातात जात. माझ्या सासरची मंडळी बाळाला बघून गेली, त्यादिवशी तर 'आमच्या मागे हात धुवून पडली आहेस!' असे म्हणून दिवसभर शिव्याशाप देऊन आईने अगदी जीव नकोसा केला. रात्री उशीरा बाळ झोपल्यावर मी तासभर तरी एकटीच रडले.

चार दिवसानंतरची गोष्ट. रविवारी आठवडेबाजार होता. आई बाजारात गेली होती. अचानक कामवाली मावशी आली, आणि डोळे पुसू लागली. म्हणाली, 'हे बघ पोरी! तुला लहाणपणापासून पाह्यली. माझ्या पोरीसारखी तू म्हणून सांगते, हितं थांबू नको. तुझी आबाळ बघवत नाही. कसातरी बाळाला दीडमहिना होईतोवर दम काढ, अन लगेच नवर्याला सांग येऊन न्यायला. ही काय आई म्हणायची, का काय!! हितं रायली तर ही कैदाशीन खाऊन टाकंल तुला. तुजं नशिबंच फुटकं, बाप पण शाणा नाही दिला देवानं. अग सगळं गाव नावं ठेवतंय तुझ्या आईबापाला. सगळ्यांना कळलंय तुझं. किती कोंबडं झाकलं, तर उगवायचं राहतं का? ऐक माझं. आई म्हणून सांगते, नवर्याच्या घरात अर्धी भाकरी खाऊनपण सुखी राहशील. परत हितं सारखं येऊ पण नको. सासूनं विचारलं तर, पोरगं अजून लहानंय म्हणून सांग सरळ.'

बरोबर दीड महिन्यांनी नवर्याबरोबर घरी आले. आता मला इथे कसलाच त्रास नव्हता. मुले लहान असली की, दिवस कसे भरकन जातात. नवर्याचा पगारही अलिकडे वाढला होता. बाळ बरेच अवखळ झाले होते आता. मी लहान बाळाचे निमित्त करून माहेरी जायचंच टाळायचे. वर्षभर गेलेच नाही तिकडे. आता सर्व नातेवाईकांत चर्चा सुरू झाल्यामुळे, सर्वांना दाखवण्यासाठी आईने एकदोन वेळा फोन करून बोलावले. मग मात्र मी निश्चयाने मनाशी काही ठरवून, दोन दिवसांसाठी गेले. जाताना रिकाम्याहाती गेले. माझ्या सर्व बहिणी, काकू, आत्या सर्वांना मनमोकळेपणाने भेटले. आईवडिलांशी मात्र जेवढ्यास तेवढेच. आईवडिलांच्या 'कर्तृत्वाचा' बोभाटा झाला असल्याने, मला यावेळी कुणी काहीच त्रास दिला नाही. मीपण त्यांना माझ्याकडचा एकही नवापैसा न दाखवता माझ्या घरी परत आले. पुढे दोनतीनदा असेच झाले.

आता माझा मुलगा तीन वर्षांचा झाला.आम्ही फ्लॅट बुक करून, त्याचे हप्ते सुरू झाले. तरीही नवर्याला आता पगार चांगला मिळत असल्याने, शिल्लक राहत होती. ती आम्ही मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवत होतो. माझ्यासाठीही नवर्याने काही सोन्याचे दागिने केले होते.गेले वर्षभर आईवडिलांनी मला फोनदेखील केला नव्हता. अचानक एक दिवस फोन आला. 'भावाच्या लग्नाचे आता बघायला हवे, येतेस का एक दिवस?' मी 'ठिक आहे', म्हणून फोन ठेवला.

गावी गेल्यागेल्या थोड्याच वेळात आई माझ्या गळ्याकडे बघत सहज बोलल्यासारखी म्हणाली, ' हं..... बराच पैसा ओढतोय की तुझा नवरा! आता अगदी दागिने मिरवायला लागलीस की! इथं आमच्यामागे नुसते खड्डे बुजवायचंच काम लागलंय.आता नविन सून शोधायची, तर चागल्या नोकरीवाली मिळते की, काहितरी फुटकळ काम करणारी काय माहित? मुली जन्माला घाला..मग शिकवा.. त्यांच्या लग्नाचं कर्ज फेडा..आणि या सगळा पगार नवर्याच्या घशात घालून, वर तोंड करून, दागिने घालून गावासमोर मिरवायला मोकळ्या!! ' कायकाय अन कायकाय! आई खूप वेळ नुसता आकांडतांडव करीत होती. मी शांतपणे ऐकून घेत होते, पण माझा छकुला अगदी भेदरून गेला होता! वडिल जणू काही ऐकूच गेले नाही असे दाखवत होते. शेवटी तिचे बोलणे संपले अन मी ठामपणे सांगितले, " हे बघ आई, आता मी काही नोकरी करीत नाही. आणि पुढेमागे कधी केलीच तरी, मी आणि माझा नवरा, दोघे घाम गाळून जो पैसा कमवू, तो आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि घरासाठीच असेल. आता तर माझ्या घराचे हप्तेही सुरू झाले आहेत. तेव्हा आजपर्यंत जे काही झाले असेल ते असेल, पण ईथून पुढे माझ्याकडून तुम्हाला दमडीही मिळणार नाही. अपेक्षादेखील करूच नका." माझे बोलणे संपत नाही तोच, वडिल अगदी चवताळून उठून, जवळजवळ माझ्यावर धावून आल्यासारखे हाताचे एक बोट पुढे करत ओरडले, "ये.....! काय बोललीस? कुणाला बोलतेस?... शिकवून लग्न करून दिली, तुझ्या पोराची सगळी उस्तवार केली अन आता माज चढला काय! थांब तुझा माज आताच उतरवतो! आत्ताच्या आत्ता तुझ्या नवर्याला फोन लावतो न सगळा तुझा घेतलेला पैसा त्याच्याच तोंडावर फेकतो! परत इकडे आम्हाला तर तोंडही दाखवू नको." आता मात्र हद्द झाली, आता वडिल मला नवर्याची भिती घालून ब्लॅकमेलच करत होते. त्यांना चांगले ठाऊक होते, माझ्या नवर्याला याबाबत काहिच खबरबात नाही. तितक्यात माझा मुलगा घाबरून पळत आला अन मला मिठी घालूनच बसला. आता मात्र माझ्या डोक्यात तिडिक गेली. मी त्वेषाने बोलले, " काय करायचंय ते करून बघा! नवर्याला सांगा नाही तर सासूला सांगा! सगळ्या गावाला सांगितलं तरी तेवढ्याने लगेच काही माझा संसार मोडणार नाही. सोन्यासारखा मुलगाही दिलाय मला देवाने. पण उद्या आपली मुलगी, तुमच्या घरात सून म्हणून द्यायला, एखादा बाप शंभरवेळा विचार करेल, हे लक्षात असू द्या!!" ईतके बोलून मी पर्स उचलली, मुलाला घेऊन सरळ बाहेर दारात चप्पल घालू लागले. वडिल खाऊ का गिळू असे बघत बोलले, ' माहेर तुटलं म्हणून समज.' पण त्यांच्या आवाजातली हतबलता लपत नव्हती. मी दाराबाहेर उभी राहूनच जोरात उत्तरले, "विकतचं माहेर मला नकोच!! " आणि चालू लागले.

कोपर्यावर आल्यावर मी एकदा मागे वळून पाहिलं, आईवडिल दोघेही बाहेर येऊन, कोणी पाहिलंऐकलं तर नाही ना हे चाचपत होते. माझ्याकडे दोघांपैकी कुणाचेही लक्ष नव्हते. आणि लाज किंवा शरम याचा मागमूसही दोघांच्या चेहर्यावर नव्हता. मी मुलाचा हात धरला अन पुढे चालू लागले!!

कथालेख

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलंय, आवडलं म्हणवत नाही :(. ओळखीतल्या वेग-वेगळ्या व्यक्तींना यातल्या कुठल्या न कुठल्या समस्येतून जाताना बघितलंय. आणि बाहेरच्या लोकांना तोडणं सोपं असतं, पण स्वतःच्या पालकांबरोबर जशास तसं नाही होत पटकन, अगदी स्वार्थी आहेत, फायदा घेतायत हे दिसत असलं तरीही.

नेत्रेश's picture

5 Sep 2020 - 4:32 am | नेत्रेश

भाउ तरी तुमच्या बाजुने होता की तटस्थ?

ही माझी कथा नाही. मात्र कथानायिकेचा भाऊ तिच्या लग्नाआधीपासूनच तिच्याशी आईवडिलांचे वागणे बघत आहे. एकतर तो तिच्यापेक्षा लहान आहे. बहिणीची हतबलताही तो पाहत आहे. अन त्याचा या गोष्टीशी प्रत्यक्ष काही संबंध नसल्याने तो सोयीस्कररित्या मौन पाळतो. त्याला शेवटी आईवडिलांबरोबरच रहायचे आहे, त्यामुळे स्वार्थी विचार करून तो आईवडिलांना विरोध करत नाही.

बरे झाले सुटका झाली त्या नकली लोकांपासून