धन्य (?) ती लेखनकळा!

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
11 Jun 2020 - 6:23 pm

मी लिहिते. (हे तुम्ही बघता आहातच)..

आत्तापर्यंत बऱ्यापैकी लेखन केलंय. लहानपणी माझे निबंध माझे मराठीचे सर वर्गात वाचून (त्यावरुन अक्षरही बरे असावे.) दाखवत असत. त्यामुळे मला आणखी लिहावंसं वाटायला लागलं. आई कविता करायची. मी मात्र कधीही कविता केल्या नाहीत. (वाचकांनी हुश्श् केलं तरी चालेल. मी माईंड करणार नाही.)

अगदी प्रेमात पडल्यावर सुद्धा कविता केल्या नाहीत. मला आल्या नाहीत. मला झाल्या नाहीत. पण म्हणून काय झालं मला कविता वाचायला आवडतात. मी लिखाण मात्र चालू ठेवले. सुरुवातीला मी अगदीच कच्चं मडकं होते. मी काय करायची तर एखाद्या विषयावरची चार,पाच पुस्तकं वाचायची आणि त्याच्या नोटस् काढून एखादा लेख तयार करायची. त्यात ओरिजिनलिटी दिडकीचीही नसायची. मग पाठवून द्यायची एखाद्या पेपरच्या रविवार पुरवणीमधे. ते चक्क छापून यायचं आणि अहो आश्चर्यं त्याचं मानधनही मिळायचं. मग काय मी शेफारलेच. नित्यनेमाने लिहायचा सपाटाच लावला.

पुढे लग्न झालं. (माझ्यासाठीही देवानं एक नवरा बघून ठेवला होता बरं! अर्थात् ह्या गोष्टीचं माझ्या भावाला आश्चर्य वाटायचं.)
नवरा कामावर गेला की मी लिहित बसायची आणि तो आला की त्याला वाचून दाखवायची. नव्याचे नऊ दिवस नव्हे, तर लग्नानंतर चांगली नऊ वर्षे त्यानं हे सहनही केलं. मग बहुधा त्याचा पेशन्स संपला.

लग्नानंतर यथावकाश मूलबाळ झालं. त्या काळच्या समाजाच्या धारणेनुसार माझ्या स्त्रीजन्माचं सार्थक होऊन मी धन्य झाले.

मूल लहान असताना त्याला मांडीवर घेऊन, उजव्या हाताने रायटिंग पॅडवर कागद ठेवून मी लिहायची. तेव्हा मी मासिकात, पेपरमधे सदर लिहायची. मग मूल मोठं झाल्यावर, त्याला खेळवत बसवून किंवा ते झोपल्यावर पाट मांडीवर घेऊन त्यावर कागद ठेवून लिहायची. प्रेसमध्ये नोकरी म्हणजे वर्तमानपत्राची 'डेड लाईन'पाळावीच लागायची. नंतर चौरंगावर लिहायला सुरुवात केली. पण सतत मांडी घालून बसल्यानं पाय दुखायचे. मग टेबल खुर्ची आली. मी मोठ्या हौसेनं माझं टेबल लावलं. एका कप्प्यात कोरे कागद, एकात टॅग्ज,पंचिंग मशीन, पिन्स,यू पिन्स,(त्यावेळी स्टेपलर नसायचा.) वेगवेगळी पेन्स ,पेपरवेट, असं सगळं ठेवलं. पाय ठेवायला एक फूटरेस्ट बनवून घेतलं. डावीकडून प्रकाश फेकणारा एक आकर्षक टेबललँप आणला.
कंफर्टेबल खुर्ची आणली. पण प्रत्यक्षात ही टेबलखुर्ची वापरायची क्वचितच् वेळ यायची. बहुतांश लेखन हे डायनिंग टेबलवरच व्हायचं. कुकर लावायचा. एक शिट्टी झाली की गॅस बारीक करायचा आणि किती मिनिटं बारीक गॅसवर पदार्थ शिजवायचा इकडं लक्ष ठेवत लिखाण करायचं. ऑफिसात बसला तरी वार्ताहराला शांतता मिळणं कठीण. त्यातच मन एकाग्र करुन लिहावं लागतं. ती कसरत मी केली.

कोणत्याही लेखनाबाबत, स्फूर्ती आल्याशिवाय चांगलं लेखन होत नाही. तीच रुसून बसली तर अस्वस्थ वाटतं. एकदा कथेचा जर्म सापडला की, ताबडतोब कथा लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. अशी स्फूर्ती आल्यावर मी अनेकदा विचित्र वेळीही लिहायला बसलेली आहे. सेकंड शिफ्ट करुन रात्री बाराला घरी परत आल्यावर पहाटे चार,पाच पर्यंतही लिखाण केलेलं आहे. असा लिहायचा झटका आला की ,अंगात बळ संचारतं. श्रमांची जाणीव होत नाही. आपल्या हातून ते जणू कुणीतरी लिहून घेतं. कथा किंवा लेख नीट जमल्यावर जो आनंद होतो. त्याची तुलना दुसऱ्या कुठल्याही आनंदाशी होऊ शकत नाही. आणि असा लेख, कथा वाचकांनाही आवडते असा माझा अनुभव आहे.

एक दिवस माझा भाऊ म्हणाला,"स्वानुभवातून लिहित जा.ते वास्तव वाटेल."

माझे डोळे त्यानं खाडकन् उघडले. मी त्यानंतर नेहमीच मला आलेल्या अनुभवातून सुचलेल्या धाग्यावर लिहिलं. नंतर तर तेच माझं वैशिष्ट्य बनलं. वाचकांना ते अधिक आवडलं. आपलंसं वाटलं. आता तर मला नुसतं वर्णनात्मक (अहाहा!किती सुंदर सूर्योदय!) काव्यात्मक लिहिताच येत नाही.

आकाशवाणीवर नोकरी केल्यामुळे भंगारवाल्यापासून अभिनेत्यांपर्यंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते थेट राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांना कव्हर करता आलं आणि त्यांतून लेखनाला जर्म्स मिळत गेले. त्यांतूनच अनेक कथा जन्माला आल्या. कल्पनारम्य, खोटं, बेगडी असं काही लिहायची वेळच आली नाही. लिखाण वास्तव, खरंखुरं वाटलं.

मी काही लिहून हातावेगळं केलं, त्यात माझ्या मनातला 'आशय' मोकळा करुन झाला की मागोमाग लगेच माझं लक्ष 'आकारा'कडे म्हणजे 'फॉरमॅट'कडे जातं. विचार सुरू होतो आणि मग मी माझं समाधान हरवून बसते. वाटतं, 'हा मुद्दा घालायला हवा होता, तो आधी घ्यायला हवा होता. शेवट असा नको' इ.इ. मग मी अनेकदा त्यानुसार बदल करते. मी एकटाकी सहसा लिहित नाही.

हल्ली पूर्वीइतकं लिहित नाही. मी एक सामान्य लेखिका असले म्हणून काय झालं? माझीही लेखणी आटतेच, चक्क रायटर्स ब्लॉक वगैरे मलाही येतो. आता वाचतही नाही फारसं. डोळे दमतात. मान दुखते. अगदी फारच वेगळं काहीतरी समोर आलं तरच वाचावंसं ,पाहावंसं वाटतं. कथानकं आधीच कळतात. शेवट काय होणार ते आधीच कळतं. मग सगळी मजाच जाते. हे शाप की वरदान?

मी हल्ली फार लिहित नाही असं मी म्हटलं म्हणून लगेच आनंदित होऊ नका. हे काय मी आता लिहिलं आणि तुम्ही वाचलंतच की! हे लिहून मी तुमचा छळ मांडलाच('खेळ मांडला'च्या चालीवर). नाही आवडलं तर अभिप्राय देताना 'वाजवा की बारा!'.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

वाचकहो, तुमचेही तुमच्या लिखाणाबद्दल अनुभव इथे लिहा. धन्यवाद.

छान वाटले लेख वाचल्यावर.. आवडले..

मराठी_माणूस's picture

11 Jun 2020 - 7:36 pm | मराठी_माणूस

छान मनोगत

मौनी's picture

11 Jun 2020 - 7:42 pm | मौनी

आजी तुझं लेखन नाव सांग की आणि तुझं लेखन कुठे मिळेल आता वाचायला तेही सांग.
हाही लेख वाचनीय आहे बरंका.

सुचत गेलं तसं कागदावर उतरवलं या पद्धतीचं लेखन करता ते आवडतं.
फार वैचारिक ( विचार कर करून ठाकून ठोकून ) लेखन कंटाळवाणं वाटतं.

अनुभवातून साकार होऊन अगदी सहजपणे गमतीदार होणारी आणि तरीही मुद्दा न सोडणारी व पाल्हाळिक न होणारी लेखनकळा/लेखनशैली आवडते.

बापरे, लेखन आवडतं म्हणून केवढी मेहेनत घ्यायचात !!! मला तुमचे लेख नेहमीच आवडतात, साधे सोपे सुटसुटीत.

<<आता तर मला नुसतं वर्णनात्मक (अहाहा!किती सुंदर सूर्योदय!) काव्यात्मक लिहिताच येत नाही.>>

मला असे शब्दबंबाळ लेख वाचायला खरंच नकोसे वाटतात, प्रचंड वर्णन, भरपूर मोठे मोठे शब्द वाचले कि लिहिणारा आपल्याला माहिती असलेले आणि भारी वाटणारे सगळे शब्द कागदावर ओकतोय असं वाटतं :(

तुमचा लेखन प्रवास आवडला. खंड न पड़ू देता लिहित रहाणे सोपे नक्कीच नाही.

स्वत:बद्दल कुठलाच complex नसणे आणि प्रवाही आडंबर-रहित भाषा हे तुमच्या लेखनातले गुणविशेष सर्वांनी शिकण्यासारखे आहेत.

माझा प्रतिसाद अर्धवट गेला म्हणून पूर्ण देत्ये -

बापरे, लेखन आवडतं म्हणून केवढी मेहेनत घ्यायचात !!! मला तुमचे लेख नेहमीच आवडतात, साधे सोपे सुटसुटीत.

"आता तर मला नुसतं वर्णनात्मक (अहाहा!किती सुंदर सूर्योदय!) काव्यात्मक लिहिताच येत नाही."

मला असे शब्दबंबाळ लेख वाचायला खरंच नकोसे वाटतात, प्रचंड वर्णन, भरपूर मोठे मोठे शब्द वाचले कि लिहिणारा आपल्याला माहिती असलेले आणि भारी वाटणारे सगळे शब्द कागदावर ओकतोय असं वाटतं :(

अनिंद्य's picture

11 Jun 2020 - 9:24 pm | अनिंद्य

मी एकटाकी सहसा लिहित नाही....... - ditto !

एक प्रश्न:-

लेखन हे audience प्रमाणे बदलते, कोण वाचणार आहे त्यानुसार लेखकांकडून कमी जास्त होत असावे असे मला वाटते. तुम्ही तसे करता का ?

संजय क्षीरसागर's picture

11 Jun 2020 - 10:50 pm | संजय क्षीरसागर

एक सोपं, सुटसुटीत, शुद्ध आणि वेधक लिहिणारी लेखिका मिळालीये !

तुमच्या कथा इथे पोस्ट कराल का ?

विनिता००२'s picture

12 Jun 2020 - 12:25 pm | विनिता००२

आपल्या हातून ते जणू कुणीतरी लिहून घेतं. >> अगदी अगदी :)

वर्णनात्मक लिहीलेले मला पण वाचायला आवडत नाही. मी पण असे शब्दबंबाळ लिहीत नाही. :) सेम पिंच आज्जे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2020 - 2:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजी तुम्ही सहज ओघवते लिहिता ते खुप आवडतं. लिहिते राहा.

''अगदी प्रेमात पडल्यावर सुद्धा कविता केल्या नाहीत' या बद्दल काय म्हणत होता ? कविता नसतील केल्या पण तेव्हाच्या तुमच्या प्रेमाच्या गोष्टीबद्दल नक्की लिहा.

बाकी एकटाकी लेखन जमत नाही. एकदा की एखादा विचार मनात आला की तो बोळा मोकळा करून कागदावर आतून देतो, मग त्याला गंध-पावडर नीट-नेटकं करून गोजीरवाणे वाटलं की मग ते लेखन अंगणात सोडतो.

-दिलीप बिरुटे

mrcoolguynice's picture

12 Jun 2020 - 3:08 pm | mrcoolguynice

आजी,
तुम्ही खूप छान, साधं सोपं करून लिहिता ... बरं वाटत असं लिखाण वाचायला.

(तुमच्यासारख्या ) चांगलं लिहिता येणाऱ्यांचा मला नेहमी असूया वाटते. कारण
तुम्ही लिहिता तसं लिखाण, हे जरी वाचायला साधं सरळ सोप वाटलं, तरी असं लिहिताना, मला तरी खूप श्रम पडतात.. ४-५ ओळी जरी लिहिल्या (विचार करून)
तर मला , माझा मेंदू , हा जणूकाही 'पाटी पुसण्याचा पाण्याने थबथबलेला स्पंजचा बोळा आहे", आणि ४-५ ओळी जरी लिहिल्या (विचार करून), तर तो आपणंच आपल्या हाताने पिळून कोरडा करून, परत कवटीच्या डबीत ठेवल्यागत होत.

प्राची अश्विनी's picture

13 Jun 2020 - 8:27 am | प्राची अश्विनी

साधं सरळ असतं तुमचं लिखाण. म्हणूनच आवडतं

गणेशा-छान वाटलं,प्रतिक्रिया वाचल्यावर.

मराठी माणूस-चांगलं मनोगत. धन्यवाद.

मौनी-"हाही लेख वाचनीय"हा अभिप्राय पाहून बरे वाटले. अनामिक लेखन करत राहणे हीच इच्छा आहे.

कंजूस-"मी सुचत गेलं तसं कागदावर लिहिते,ते आवडतं"हा अभिप्राय मनाला समाधान देऊन गेला.

पलाश-"अनुभवातून साकार,सहज,मुद्देसूद, लेखनशैली"हा तुमचा अभिप्राय मनाला सुख देणारा आहे.

वीणा३-माझे लेख तुम्हांला आवडतात.ते साधे,सोपे,पारदर्शी,सुटसुटीत,शब्दबंबाळ नसलेले असतात.हा तुमचा अभिप्राय आनंददायक.

अनिंद्य-प्रवाही,आडंबररहित भाषा,स्वतःबद्दल कुठलाच गंड नाही. ह्या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

अनिंद्य-लेखन हे कोण वाचतंय,कोण ऐकतंय यावरच भाषा अवलंबून असते. तोच पहिला निकष आहे.

संजय क्षीरसागर-माझी कथा नक्की पोस्ट करेन ,पण कथा लांबीला मोठी असते.आणि मला टायपिंगचा कंटाळा येतो.तरीही देईन.

विनिता ००२-सेम पिंच विनिता.कुणीतरी आपल्याकडून लिहून घेतं,हे खरं आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे-तुमच्यासारखं मीही गंध पावडर करुन बाळ अंगणात सोडते.माझ्या प्रेमाचे अनुभव लिहिणे म्हणजे संकोच. जाऊ दे ना! आता वय झालं.

Mrcoolguynice-किती छान अभिप्राय लिहिलायत! तुम्हांला लिहिता येत नाही असे कोण म्हणेल?

प्राची अश्विनी-धन्यवाद,साध्या सोप्या अभिप्रायासाठी.

सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

आवडाबाई's picture

16 Jun 2020 - 2:27 pm | आवडाबाई

आजी छान लिहिले आहे.

मला टायपिंगचा कंटाळा येतो - ह्यावर मराठी स्पीच टू टेक्स्ट app/website वापरता येईल. ह्यामध्ये आपण बोलायचे, तसेच्या तसे मराठी मध्ये टाईप करुन मिळते. ९०-९५% बरोबर टाईप होते, थोडेफार दुरुस्त करावे लागेल, पण वापरायला अत्यंत सोपे असते.

थोडा शोध घेऊन हे करता येईल. मदत हवी असल्यास सांगावे.

पण लिहित राहा, थांबू नका. शुभेच्छा.

विनिता००२'s picture

17 Jun 2020 - 1:03 pm | विनिता००२

आता व्हॉट्स एप वर पण बोलून टाईप होतेय.

आवडाबाई's picture

19 Jun 2020 - 3:59 pm | आवडाबाई

मला हे नाही सापडले. मी अन्ड्रॉइड वापरते.
external app ?

गड्डा झब्बू's picture

18 Jun 2020 - 1:44 pm | गड्डा झब्बू

छान!

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jun 2020 - 4:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

आज्जींचे लेखन नेहमीच खुसखुशीत चकलीसारखे असते. त्यामुळे आवडते. काही वाक्यांशी खास सहमत.

विषय सुचला की लगेच दोक्यातुन कागदावर उतरवल्याशिवाय चैन न पडणे,लेख जमल्याचा आनंद होणे, वाचकांनाही उत्स्फुर्त लेखन आवडणे वगैरे

एस's picture

20 Jun 2020 - 12:41 am | एस

लेखामागोमाग लेख पाडू शकणाऱ्यांच्याबद्दल आश्चर्यमिश्रित आदर वाटतो. डोक्यात कित्येक लेख कित्येक वर्षांपासून दाटले आहेत. पण लिहीन तर शप्पथ!