धन्य (?) ती लेखनकळा!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी लिहिते. (हे तुम्ही बघता आहातच)..
आत्तापर्यंत बऱ्यापैकी लेखन केलंय. लहानपणी माझे निबंध माझे मराठीचे सर वर्गात वाचून (त्यावरुन अक्षरही बरे असावे.) दाखवत असत. त्यामुळे मला आणखी लिहावंसं वाटायला लागलं. आई कविता करायची. मी मात्र कधीही कविता केल्या नाहीत. (वाचकांनी हुश्श् केलं तरी चालेल. मी माईंड करणार नाही.)
अगदी प्रेमात पडल्यावर सुद्धा कविता केल्या नाहीत. मला आल्या नाहीत. मला झाल्या नाहीत. पण म्हणून काय झालं मला कविता वाचायला आवडतात. मी लिखाण मात्र चालू ठेवले. सुरुवातीला मी अगदीच कच्चं मडकं होते. मी काय करायची तर एखाद्या विषयावरची चार,पाच पुस्तकं वाचायची आणि त्याच्या नोटस् काढून एखादा लेख तयार करायची. त्यात ओरिजिनलिटी दिडकीचीही नसायची. मग पाठवून द्यायची एखाद्या पेपरच्या रविवार पुरवणीमधे. ते चक्क छापून यायचं आणि अहो आश्चर्यं त्याचं मानधनही मिळायचं. मग काय मी शेफारलेच. नित्यनेमाने लिहायचा सपाटाच लावला.
पुढे लग्न झालं. (माझ्यासाठीही देवानं एक नवरा बघून ठेवला होता बरं! अर्थात् ह्या गोष्टीचं माझ्या भावाला आश्चर्य वाटायचं.)
नवरा कामावर गेला की मी लिहित बसायची आणि तो आला की त्याला वाचून दाखवायची. नव्याचे नऊ दिवस नव्हे, तर लग्नानंतर चांगली नऊ वर्षे त्यानं हे सहनही केलं. मग बहुधा त्याचा पेशन्स संपला.
लग्नानंतर यथावकाश मूलबाळ झालं. त्या काळच्या समाजाच्या धारणेनुसार माझ्या स्त्रीजन्माचं सार्थक होऊन मी धन्य झाले.
मूल लहान असताना त्याला मांडीवर घेऊन, उजव्या हाताने रायटिंग पॅडवर कागद ठेवून मी लिहायची. तेव्हा मी मासिकात, पेपरमधे सदर लिहायची. मग मूल मोठं झाल्यावर, त्याला खेळवत बसवून किंवा ते झोपल्यावर पाट मांडीवर घेऊन त्यावर कागद ठेवून लिहायची. प्रेसमध्ये नोकरी म्हणजे वर्तमानपत्राची 'डेड लाईन'पाळावीच लागायची. नंतर चौरंगावर लिहायला सुरुवात केली. पण सतत मांडी घालून बसल्यानं पाय दुखायचे. मग टेबल खुर्ची आली. मी मोठ्या हौसेनं माझं टेबल लावलं. एका कप्प्यात कोरे कागद, एकात टॅग्ज,पंचिंग मशीन, पिन्स,यू पिन्स,(त्यावेळी स्टेपलर नसायचा.) वेगवेगळी पेन्स ,पेपरवेट, असं सगळं ठेवलं. पाय ठेवायला एक फूटरेस्ट बनवून घेतलं. डावीकडून प्रकाश फेकणारा एक आकर्षक टेबललँप आणला.
कंफर्टेबल खुर्ची आणली. पण प्रत्यक्षात ही टेबलखुर्ची वापरायची क्वचितच् वेळ यायची. बहुतांश लेखन हे डायनिंग टेबलवरच व्हायचं. कुकर लावायचा. एक शिट्टी झाली की गॅस बारीक करायचा आणि किती मिनिटं बारीक गॅसवर पदार्थ शिजवायचा इकडं लक्ष ठेवत लिखाण करायचं. ऑफिसात बसला तरी वार्ताहराला शांतता मिळणं कठीण. त्यातच मन एकाग्र करुन लिहावं लागतं. ती कसरत मी केली.
कोणत्याही लेखनाबाबत, स्फूर्ती आल्याशिवाय चांगलं लेखन होत नाही. तीच रुसून बसली तर अस्वस्थ वाटतं. एकदा कथेचा जर्म सापडला की, ताबडतोब कथा लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. अशी स्फूर्ती आल्यावर मी अनेकदा विचित्र वेळीही लिहायला बसलेली आहे. सेकंड शिफ्ट करुन रात्री बाराला घरी परत आल्यावर पहाटे चार,पाच पर्यंतही लिखाण केलेलं आहे. असा लिहायचा झटका आला की ,अंगात बळ संचारतं. श्रमांची जाणीव होत नाही. आपल्या हातून ते जणू कुणीतरी लिहून घेतं. कथा किंवा लेख नीट जमल्यावर जो आनंद होतो. त्याची तुलना दुसऱ्या कुठल्याही आनंदाशी होऊ शकत नाही. आणि असा लेख, कथा वाचकांनाही आवडते असा माझा अनुभव आहे.
एक दिवस माझा भाऊ म्हणाला,"स्वानुभवातून लिहित जा.ते वास्तव वाटेल."
माझे डोळे त्यानं खाडकन् उघडले. मी त्यानंतर नेहमीच मला आलेल्या अनुभवातून सुचलेल्या धाग्यावर लिहिलं. नंतर तर तेच माझं वैशिष्ट्य बनलं. वाचकांना ते अधिक आवडलं. आपलंसं वाटलं. आता तर मला नुसतं वर्णनात्मक (अहाहा!किती सुंदर सूर्योदय!) काव्यात्मक लिहिताच येत नाही.
आकाशवाणीवर नोकरी केल्यामुळे भंगारवाल्यापासून अभिनेत्यांपर्यंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते थेट राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांना कव्हर करता आलं आणि त्यांतून लेखनाला जर्म्स मिळत गेले. त्यांतूनच अनेक कथा जन्माला आल्या. कल्पनारम्य, खोटं, बेगडी असं काही लिहायची वेळच आली नाही. लिखाण वास्तव, खरंखुरं वाटलं.
मी काही लिहून हातावेगळं केलं, त्यात माझ्या मनातला 'आशय' मोकळा करुन झाला की मागोमाग लगेच माझं लक्ष 'आकारा'कडे म्हणजे 'फॉरमॅट'कडे जातं. विचार सुरू होतो आणि मग मी माझं समाधान हरवून बसते. वाटतं, 'हा मुद्दा घालायला हवा होता, तो आधी घ्यायला हवा होता. शेवट असा नको' इ.इ. मग मी अनेकदा त्यानुसार बदल करते. मी एकटाकी सहसा लिहित नाही.
हल्ली पूर्वीइतकं लिहित नाही. मी एक सामान्य लेखिका असले म्हणून काय झालं? माझीही लेखणी आटतेच, चक्क रायटर्स ब्लॉक वगैरे मलाही येतो. आता वाचतही नाही फारसं. डोळे दमतात. मान दुखते. अगदी फारच वेगळं काहीतरी समोर आलं तरच वाचावंसं ,पाहावंसं वाटतं. कथानकं आधीच कळतात. शेवट काय होणार ते आधीच कळतं. मग सगळी मजाच जाते. हे शाप की वरदान?
मी हल्ली फार लिहित नाही असं मी म्हटलं म्हणून लगेच आनंदित होऊ नका. हे काय मी आता लिहिलं आणि तुम्ही वाचलंतच की! हे लिहून मी तुमचा छळ मांडलाच('खेळ मांडला'च्या चालीवर). नाही आवडलं तर अभिप्राय देताना 'वाजवा की बारा!'.
प्रतिक्रिया
वाचकहो, तुमचेही तुमच्या
छान वाटले लेख वाचल्यावर..
छान मनोगत
लेखिका आजी
सुचत गेलं तसं कागदावर उतरवलं
अनुभवातून साकार होऊन अगदी
बापरे, लेखन आवडतं म्हणून
तुमचा लेखन प्रवास आवडला. खंड
माझा प्रतिसाद अर्धवट गेला
मी एकटाकी सहसा लिहित नाही....
तुमच्या निमित्तानं संकेतस्थळाला
आपल्या हातून ते जणू कुणीतरी
वाह !
आजी,
साधं सरळ असतं तुमचं लिखाण.
गणेशा-छान वाटलं,प्रतिक्रिया
उपाय
आता व्हॉट्स एप वर पण बोलून
कसे ?
छान!
मस्त लेख
कसं काय जमतं बुवा!