✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अज्ञान (Ig) - नोबेल पुरस्कार : विनोदातून विचाराकडे !

ह
हेमंतकुमार यांनी
Sat, 09/14/2019 - 19:40  ·  लेख
लेख
पुढच्या महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच या महिन्यात एक विचित्र प्रकारचे पुरस्कार आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे. आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात ! या पुरस्कार-संस्थेचे ब्रीदवाक्य असे आहे: ' ही संशोधने लोकांना प्रथमदर्शनी हसवतात पण नंतर विचार करायला लावतात !' 'Ig नोबेल' मधील Ig चा अर्थ आहे 'ignoble' (अज्ञानी). संशोधन शाखा व निकष: एकूण १० शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी ६ शाखा या खऱ्या नोबेलप्रमाणेच आहेत. याव्यतिरिक्त जीवशास्त्र, अभियंत्रिकी अशा काही शाखा निवडल्या आहेत. यासाठी सादर करायची संशोधने ही विनोदी, विचित्र किंवा काही अनपेक्षित निष्कर्ष काढलेली असावी लागतात. पुरस्काराचा हेतू असा असतो. संशोधक जगतात बऱ्याचदा अतिसामान्य दर्जाचे शोधनिबंध 'पाडले' जातात. त्यांचा लायकीपेक्षा जास्त गाजावाजा केला जातो आणि काहींचे ढोल उठसूठ बडवले जातात. या सगळ्यावर उपरोधिक टीका करणे हा Ig नोबेल चा खरा उद्देश आहे. मात्र या वरवर विनोदी वाटणाऱ्या उपक्रमाला एक आशेचीही किनार आहे. कधीकधी अशा एखाद्या विचित्र वाटणाऱ्या संशोधनातूनच खऱ्या उपयुक्त संशोधनाला चालना मिळालेली आहे. एक उदाहरण तर अचंबित करणारे आहे. Sir Andre Geim यांना २००० साली Ig-नोबेल दिले होते. पुढे २०१०मध्ये त्यांनाच पदार्थविज्ञानात खरेखुरे नोबेल प्राप्त झाले !! असे हे एकमेव उदाहरण आहे. पुरस्कार वितरण: हे सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठात केले जाते. विजेत्यांना माजी खऱ्या नोबेल विजेत्यांच्या हस्ते पुरस्कार दिले जातात. त्यानंतर विजेत्यांना थोडक्यात भाषण करायची संधीही दिली जाते. एकूणच या समारंभात हास्यविनोद आणि टिंगलटवाळी यांची रेलचेल असते. आता हे सर्व वाचल्यावर वाचकांना उत्सुकता लागली असेल की असली अजब संशोधने नक्की कुठली असतात त्याची. नुकतेच यंदाचे हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तेव्हा त्यातल्याच काहींची ही झलक. फक्त संशोधन-विषय लिहितो; कोणाला मिळाला याला काही आपल्या दृष्टीने महत्त्व नाही. २०१९ चे पुरस्कार: १. रसायनशास्त्र: ५ वर्षाचे मूल एक दिवसात अर्धा लिटर लाळ तयार करते. २. अभियांत्रिकी: बाळांचे लंगोट बदलायच्या यंत्राचा आराखडा. ३. वैद्यकीय: a)पिझ्झा खाण्याने माणसाला मृत्यूचा प्रतिबंध करता येतो. b) पुरुषाचे डावे अंडाशय उजव्यापेक्षा अधिक गरम असते. ४. अर्थशास्त्र: चलनी नोटांच्या हाताळण्यातून रोगजंतूंचा प्रसार होतो. ५. शांतता: आपल्याला शरीराचा कुठला भाग खाजवायला सर्वात जास्त आवडते? त्याचे उत्तर आहे पायाचा घोटा. वरील यादी वाचता वाचता तुमची ह ह पु वा झाली असणार याची मला खात्री आहे ! किंबहुना तोच तर या उपक्रमाचा उद्देश आहे. जर आपण गेल्या २८ वर्षांतील या पुरस्कारांच्या यादीवर नजर टाकली तर आपल्याला एक जाणवेल. बरीचशी संशोधने ही टिंगल स्वरूपाची आहेत. काहींत थोडेफार तथ्य आहे पण त्यांकडे निव्वळ निरीक्षण म्हणून पाहिले जावे. उठसूठ कुठल्याही सामान्य निरीक्षणाला शोधनिबंधाचा दर्जा देता कामा नये, हेच त्यातून ध्वनित होते. तर असे हे गमतीदार अज्ञान-पुरस्कार. या उपक्रमातून प्रचलित संशोधनातील काही अपप्रवृत्तीना छान चिमटे काढले जातात. यातून बोध घेऊन संशोधकांनी खरोखर गरज असलेलेच संशोधन करावे हा संदेश दिलेला आहे. संशोधन विश्वातील एरवी गंभीर असलेल्या वातावरणावर असे उपक्रम विनोदाची पखरण करतात आणि सामान्य माणसालाही घटकाभर हसवतात. **********************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
26479 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

2023 चे विनोदी आणि विचित्र !

हेमंतकुमार
Sat, 09/16/2023 - 10:06 नवीन
सालाबादप्रमाणे यंदाही हे विविध पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यापैकी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या दोघांची नोंद घेतो : 1. साहित्य Ig : जेव्हा काही लोक एकच शब्द लागोपाठ वारंवार वापरत राहतात तेव्हा काय वाटते, याचे संशोधन. या शोधनिबंधाचे नावही असे मजेशीर आहे : The The The The Induction of Jamais Vu in the Laboratory: Word Alienation and Semantic Satiation. 2. वैद्यकीय Ig : माणसाच्या दोन नाकपुड्यांमधील केसांची संख्या समान असते का नाही हे मोजण्यासाठी प्रेतांचा वापर करून संशोधन केले.
  • Log in or register to post comments

2023 चे विनोदी आणि विचित्र !

हेमंतकुमार
Sat, 09/16/2023 - 10:06 नवीन
सालाबादप्रमाणे यंदाही हे विविध पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्यापैकी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलेल्या दोघांची नोंद घेतो : 1. साहित्य Ig : जेव्हा काही लोक एकच शब्द लागोपाठ वारंवार वापरत राहतात तेव्हा काय वाटते, याचे संशोधन. या शोधनिबंधाचे नावही असे मजेशीर आहे : The The The The Induction of Jamais Vu in the Laboratory: Word Alienation and Semantic Satiation. 2. वैद्यकीय Ig : माणसाच्या दोन नाकपुड्यांमधील केसांची संख्या समान असते का नाही हे मोजण्यासाठी प्रेतांचा वापर करून संशोधन केले.
  • Log in or register to post comments

भारीच की....

कर्नलतपस्वी
Sat, 09/16/2023 - 11:33 नवीन
मिपावर असे काही पुरस्कार ठेवता येतील का याचा सासं नई विचार करावा.
  • Log in or register to post comments

यंदाची Igनोबेल विजेती निवडक

हेमंतकुमार
Fri, 09/19/2025 - 08:12 नवीन
यंदाची Igनोबेल विजेती निवडक संशोधने 😍 १. रसायनशास्त्र : “आहारात टेफ्लॉनचा समावेश केल्याने पदार्थांचे आकारमान वाढते आणि उष्मांक देखील न वाढता पोट भरल्याची भावना होते”. २. इंजीनियरिंग डिझाईन हे भारतीय संशोधन आहे. “कुबट वास येणाऱ्या बुटांमुळे बुटांच्या रॅकमध्ये होणारी जंतूंची वाढ व त्रासदायक अनुभव” ३. शांतता “मद्यपान करण्यामुळे एखाद्या माणसाची परकीय भाषेत बोलण्याची क्षमता वाढते”. आणि . . . इतरसाठी पहा
  • Log in or register to post comments

आय्जी नोबेल मिळवणं पण सोप्पं

युयुत्सु
Fri, 09/19/2025 - 13:03 नवीन
आय्जी नोबेल मिळवणं पण सोप्पं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

माझ्या दृष्टीने "कोथिंबीर

युयुत्सु
Fri, 09/19/2025 - 13:21 नवीन
माझ्या दृष्टीने "कोथिंबीर वर्षभर कशी टिकवायची?" हे लोकोत्तर संशोधन असून नोबेल पुरस्कारास पात्र आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. https://youtu.be/6zf9qTa2LjA?si=ygzPYvl6N4ac0ZMi
  • Log in or register to post comments

हा हा !

हेमंतकुमार
Fri, 09/19/2025 - 13:37 नवीन
संबंधितांनी 2026 साठी प्रवेशिका पाठवायला हरकत नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा