पोळ्यानिमित्त...

Primary tabs

फुटूवाला's picture
फुटूवाला in जनातलं, मनातलं
31 Aug 2019 - 11:28 am

खरंतर कालच या आठवणींना उजाळा आलेला पण इथं लिहायचं राहून गेलं.
लहानपणी म्हणजे ४त असताना आमच्या घरी जानी गाय होती. माझ्या गावापासून ११ किमीवर बहिणीचे गाव होते. त्यांच्याकडे दुभते जनावर नसल्याने वडिलांनी त्यांना दिलेली. पण गाय इतकी खतरनाक होती की चुकून जरी सुटली तर थेट माझ्या घरी पोहोचून जायची. तीच वासरू नसताना सुद्धा. तीनचार वेळा असं झाल्यावर राहूदे म्हणून नंतर तिकडे पाठवलीच नाही.
नंतर तिने एका खोंडाला जन्म दिला. आम्ही त्याच नाव दगड्या ठेवलं. शाळेत दुपारी १२ वाजता १५ मिनिटाची सुट्टी असायची तेव्हा मी येऊन त्याला वैरण हिबाळून पळायचो. दुपारी जेवायच्या सुट्टीत त्याला वैरण+पाणी. ४ वाजता शाळा सुटली की मग एकदम त्याची मजा. त्याने काय खाल्लं काय नाही खाल्लं हे पाहत त्याला बोलत त्याची मसाज करायचो. मसाज करतानाच शेजारी मित्र जमा व्हायचे. सगळे जमा होईपर्यंत त्याची मसाज. नंतर खेळ.
एकदिवस दुपारी १२ वाजता आलो वाड्याचं दार उघडताना दगड्याचा हंबा ऐकायलाच नाही आला. मनात वाटलं आज आजारी पडला की काय? दार उघडून पाहतो तर दगड्याच नाही घरात. मन कासावीस झालं पण मुलाणी मास्टर उलट्या हातावर छडी हाणणार या भितीपोटी शाळेत पोहोचलो. काय झालं असेल? आबांनी गायीसोबत दगड्याला पण नेलं असेल का? नेलं असेल तर आज आबांची लै पायपीट करेल. असे मनात बरेच विचार यायला लागले. संध्याकाळी शाळा सुटताच दप्तर शेजारच्या चिऊताई(शिवकन्या नाव होत तीच)कडे देऊन थेट शेतात गेलो. पाहतो तर दगड्या नाहीये. आता मात्र काळजात चर्रर्र झालं होतं. विचारल्यावर कळलं की सकाळी पांडुमामा(दलाल) ने घेऊन गेला. आता मात्र मी रागात रडायलाच लागलो. "संभाळलो असतो की मी. तुम्हाला काय चावत होतं. मी त्याच्यावरच शेती करणार हुतो. तुम्हाला त्याचं काडीचं तरी कष्ट देत होतु का म्या." असं म्हणत रडायला लागलो. कहर तर अजून पुढे. त्या सांच्याला मी घरी येताना रडतच एका उसाच्या फडात घुसलो. जाऊन त्या पंड्याच्या बाल्याला(बालाजी, पांडुमामाचा मुलगा)लै हाणणार मी. आबाला बोलणारच नाही. आईनेपण का न्हिऊ दिलं? अशा विचारांत कधी मावळलं कळलंच नाही अन झोपी गेलो. सकाळी जाग आली मी फडात पाचोळ्यावर दंडात झोपल्याने मान आवटळली होती. राग अजूनही तसाच. नै जाणार आज साळत असं मनाशी ठरवलं. घरी सगळे हैराण. सकाळीच एक भाऊ बहिणीकडे मी गेलोय का पाहायला रवाना. आईने आबांना वैताग आणलेला. आबांनी पांडुमामा ला बोलावणं धाडलेलं. मी हळूच मळक्या कपड्यानं वाड्यात जसा पाऊल ठेवतो लग्गे आबा कडाडले. "घ्या, आले कारभारी.. कुटं खपला होतास गुइन्द्या? तिकडच खपला अस्ता की. काह्यला आला घर्ला?"
मी भिताडाला खेटत खेटत आईकडे. आईनं पोटाला लाऊन घेताच माझ्यात ताकद आली आबाला बोलायची. "खपणारच हुतो, हिरीत पडणार हुतो, आईला भेटापायी आलुय... काय घोडं मारलं होत तुमचं दगड्यान?" एवढ्यात पांडुमामाची एंट्री पाहिली. आता मी औटॉफ कंट्रोल.. "ह्या पांड्याच्या बाल्याचा मी मुडदाच बशिवणार. माझ्या दगड्याला आणा नाहीतर काही खरं न्हाई कुणाचं"..
आई डोक्यावरून हात फिरवत मला समजावत होती. "येईल येईल दगड्या. पांडू कुठाय दगड्या? तुमचे सहाशे घेऊन जा अन परत आणा त्याला."
आता तर माझा रुद्रावतारच "क्काय फकस्त सहाशे रुपड्यात इकलाय. थांबा, माझ्या गल्ल्यात जास्तीचे निघतील तीबी घ्या पर दगड्या पाह्यजे मला. ह्यो पांड्या खाटकाला इकतो जनावर(अनुस्वार लागला नाही, कीबोर्ड प्रॉब्लेम)"
हिबाळला ना गल्ला पांडुमामाच्या पायावर.. :)
पण शक्य नव्हतं. त्यांनी ते लातूरच्या मोठ्या दलालाला इकलेलं..
या घटनेनंतर घरातल्या जनवारांचा सौदा माझ्या समोरच व्हायचा. का विकतोय. सांभाळायला काय अडचण आहे. मला सगळं समजावलं जायचं.
पोळा
पोळ्याला लै म्हणजे लै उल्हास. शेतातला एक बंधारा खास पोळ्यासाठी ठेवायचो. म्हणजे त्याच्यावर जनावरं चारायचंच नाही. म्हशीला तर हुंगू बी द्याचो न्हाई. श्रावणातल्या २ सोम्मार पासून बैलं त्याच बंधाऱयाला चारायचो.
वारणेस अन पोळ्याला लागायचं सगळं मी माझ्या लिंबू इक्लेल्या पैशातून आणत असत. आबा बोलायचे "उत्मात करतुया निस्ती" .. माझं उत्तर तयारच.. "तुम्हाला का कराच? मी मागतुय का तुमास्नी? कदर नै तुम्हाला.."
सकाळचं दैवार पडलेलं गवत बैलाला लैच भारी खुराक असतो. अन म्या भल्या पाट्ट् बैलं घेऊन शेतात. सकाळी शाळा भारुस्तोवर चांगलं दोन अडीच घंटे बैलांना चाराचो. अन शाळा सुटली की पुन्हा त्यांच्यापाशी मी हजर. बैल सुधारला म्हणजे पोट फुगले नव्हे तर त्याच्या मांड्या चमकल्या पाहिजे. वस्वनंड पावलासंग डुलली पाहिजे मस्त!!
पोळा तीन दिवसावर असताना शाळेला दांडी हणणार अन फक्त बैलांवर फोकस. पोळ्यादिवशी सकाळी बैलं चारून, पवनी घालायचो. तेव्हा चिक शॅम्पू ५०पैशाला मिळायचा. ते लाऊन चमकवायचो बैलाला. पूजेसाठी गावात आणण्यापूर्वी सजवायची कामं. बैलाला सजवायचो खरं पण पावसाळा असल्याने कुठं ना कुठं पाण्यातून जावं लागायचं. गुडघ्याइतक्या पाण्यात गेलो की बैलांची शेपटी चिखलात माखायची. अन पट्ठ्याने माशा हाणायला इकडच्या पोटाला अन तिकडच्या पोटाला शेपूट हाणला एकदाचा की अजून भारी दिसायचा :) पूजा झाली की दोघांना एकेक पोळी खाऊ घालून(म्हशीकडं डुंकूनबी बघाचो न्हाई) मगच उपवास सोडायचा.
आठवणीतल्या जोड्या
खिलाऱ्या-फुलार्या!!
नववीपासून शेतातली सगळी कामं करायला लागलो. तेव्हा हट्ट करून दोन वासरं घेतली. आबा म्हणले अरे बैल आणला की बकरे दिसनातबी तुरीच्या बाहेर. कारण त्यांची दावण मी तुरीत खळाभर तूर कापून केलेली. ईरवाड, मका, ऊस अन सगळ्यात महत्वाचं बाटूक(ज्वारी ज्याला पोटरी येईल म्हणजे कणीस येईल असं वाटत नाही ती बैलांसाठी जबरा खुराक) बैलांना खाऊ घातला. नावं ठेवली खिल्लाऱ्या अन फुलार्या.
उन्हाळ्यात पहाटेच पेटवायचो कारण लोकं मला येडं समजून हसायचे अन बोलायचे की ही पारडं आंवदा काय पेटणार नाही. बैलाला पेटवणे म्हणजे काम शिकवणे. मी ना पेटवता सोडणार नव्हतो. फुलार्या आगाव होता पट्ठ्या उर्पन्डयचा. पण पेटवलंच शेवटी. दहावीचा वर्ष असताना सकाळ संध्याकाळ शेतात जाणे बैलांची मसाज नित्यनियमाने करणे चालूच. मोडातली कुळवणं मारायला आबा चिडाचे नवीन पारडं आहेत म्हणून. मग मी सुट्टी घेऊन जात असत अशा लवचिक कामाला.
मी माझ्या मोठया भावाला लैच घाबरायचो. येडपट होता अजूनही तसाच आहे. त्याचा बक्कळ मार खाल्लाय मी. एक दिवस फुलार्याने काही तरी आगावपणा केला म्हणून इतकं मारलं होत भावानी की इचारून नगा. त्यात आबाचा बोलण्याचा राग बी काढलेलं. मी जसा शेतात जातो तसा फुलार्याने आवाज दिला. जाऊन पाहतो तर वळ उटले व्हते. आईने झाला प्रकार सांगताच मी फुलार्याच्या गळ्यात पडून रडलेलो. :(
आबा म्हशी चारत व्हते एकदा तेव्हा खिलाऱ्या अचानक आबांवर धावला मारायला. मी लांब व्हतो. रागात निस्त " खिल्लार हट्ट" म्हणताच बैल गपगुमानं माघार फिरलेला. आबा मनले"किती मारतुस बैलाला काय म्हाईत, निस्त्या आवाजाने टरकला गडी" पर आबाला काय म्हाईत की माझा किती जीव असायचा.
गेलसालचा फुटू गेलसालचा फुटू...
सोन्या-रुप्या!!!
बारावीत नापास झाल्यावर शेतकडं जास्तीचं लक्ष दिलं. घरची चार एक्कर च होती अन माझं त्यात भागणार नाही म्हणत २०एक्कर शेजाऱ्याची बटईने वडायचं ठरविलं. मग एवढी जमीन खिलाऱ्या-फुलार्यावर वड्डन शक्य नाही अन वडलच तर बैलांचं मात्र व्हनार हे कळलं.
गावतल्या दलालाकडं जोडी महिनाभरापासून आहे असं कानावर आलेलं. मारकी बैलं असल्याने कोणीच घेत नव्हतं त्येन्ला. ७० हजाराची जोड होती. खतरनाक. मला लै आवडले. खिलाऱ्या-फुलार्या काकांना विकले. अन दलालाला ७० हजारावरून ४५ वर आणलो. कोणी घेतच नव्हते मारकी बैलं आहेत म्हणून. दोन दाव्यानी बांधलेली बैलं रागानं लालभडक होती. जोडी एवढी रागीट होती की समोरच्या दगडाच्या भिताडाला शिंगान कोरून टाकलेली. मला थोडंसं भि वाटलं पण डेरिंग कराच म्हणून केला सौदा.
पुन्हा एकडाव लोकांना मला येडं बोलाचा चानस दिऊन टाकला. चार दिवस शेतातच मुक्काम ठोकला अन पाचव्या दिशी एका कासऱ्याने सांच्यापारीच भर तळ्याहून मिरवत घरी आणलो.(तळ म्हणजे तळ्याकाठी मंदिर, बसस्थानक, गावातलं हर्ट सिटी च म्हणा की)
सोन्या-रुप्या मोठी बैलं. ते दोन पावलं चालले तर आपणाला चार पावलं चालायला लागायचे. दिवसभरात ३ एक्कर टिपणीवर पेरून व्हायचो इतका त्यांचा स्पीड.

डॉक्टरांकडून चिमटा घेतलेला. एका व्हाट्सअप ग्रुपात एक जण डोकं लावत होते की बैलावर अन्याय आहे हा. लग्गे काल डाक्तरला फोन करून वेदना किती होतात इचारलं. डाक्टर म्हणे "अरे बाळन्त बाईला होतात त्याहून कमी असतात.. आपण दोन दिवस आधीपासून इंजेक्शन त्यासाठीच चालू ठिवतो.. नको डोकं लाउस अतिशहाण्यांसोबत." :)

यावर्षी मराठवाड्यात पाऊसपाणी नसल्याने जनावरांकडं बघितलं जात नाहीये. पोटात गोळा येतो त्यांकडं पाहून. हे देवा निदान त्यांच्यासाठी तरी पाऊस पाड ___/\___

आवडाची जोडी डावीकडच्या बैलाला माहित आहे की मन सरळ केल्यावर फोटोफ्रेमबाहेर जाणार :)

अजून खूप लिहू शकतो या विषयावर पर लोकं वाचायचा कंटाळा करून मला येडं म्हणतील म्हणून आवरतो. :)

वावरशेतीप्रकटनलेख

प्रतिक्रिया

खूप छान लिहिलं आहे .. मन हेलावलं वाचताना .. सगळीकडे पाऊसपाणी व्यवस्थित होऊन जनावरांचे हाल टळू देत आणि बळीराजाचेही कष्ट वाचू देत हीच देवाकडे प्रार्थना ..

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Aug 2019 - 11:46 am | ज्ञानोबाचे पैजार

अजून खूप लिहू शकतो या विषयावर पर लोकं वाचायचा कंटाळा करून मला येडं म्हणतील म्हणून आवरतो.

लिवा की मगं, कोनाला काय वाटायच ते वाटूद्या.
होउदे खर्च मिपा आहे घरच..

पैजारबुवा,

नाखु's picture

31 Aug 2019 - 11:47 am | नाखु

फक्कड लेख.

नाखु बिनसुपारीवाला

मस्त लिहिलंय हो. जनावरांची माया करणाऱ्यालाच कळते.. अजून लिहा. आमच्या पणजोळी गाय वासरू होतं, त्यांची याद आली. तिथे दर सुट्टीला पोचलो की मी तिच्याकडेच गोठयात.

पुढील दारी पाय ठेवलेला, तिला चार पाच खोल्यानंतरच्या मागील दारी कळे. हंबरु हंबरु हाका मारत राही. जाऊन गळ्यात पडल्यावर शांत होत असे, मग लाड करून घेई, स्वतः करत असे. भारी होती गाय, प्रेमळ. वासरू एकदम गुंड! घरातून कोणी हाक मारली आणि जायला निघाले तर मानेने कवळ घाली, जाऊ नको म्हणून. मग समजवायचे, आत्ता येते, म्हणून. किती आठवणी.

खिलाऱ्या फुलाऱ्याला का विकले हो नवीन जोडीसाठी :((

अजून खूप लिहू शकतो या विषयावर पर लोकं वाचायचा कंटाळा करून मला येडं म्हणतील म्हणून आवरतो. :)

लिहिलं नाहीस तर येडं म्हणतील.

झ्याक लिहीलंय.

जगप्रवासी's picture

31 Aug 2019 - 12:13 pm | जगप्रवासी

हिकडं पण येडीच हायती, ती वाचतील

फुटूवाला's picture

31 Aug 2019 - 12:48 pm | फुटूवाला

nishapari, पैजारबुवा, नाखु, यशोधरा, mayu4u, जगप्रवासी आभार सगळ्यांचे...

पशुप्रेमी लोकांचं म्हणणं आहे की जनावरांना बंदिस्त करून आपल्या फायद्यासाठी वापर करतात लोकं. आता यांना काय माहित की शेतकरी किती जीव लावत असतो ते. कधी बांधावरही ना गेलेले हे. ट्रॅक्टर वापरावं म्हणतात. भारतात अशी कितीतरी गावं आहेत जिथं ट्रॅक्टर सोडा सायकलही जाऊ शकत नाही. तिथं शेती कशी करणार?

स्वलिखित's picture

31 Aug 2019 - 2:27 pm | स्वलिखित

अशा लोकांना दुरून डोंगर साजरे दिसतात ..
हिंस्र किंवा अहिंस्र ,, मानसाळल्याशिवाय आणि पाळल्याशिवाय हे नामशेष होतील इथं पर्यंत परिस्थिती बिकट होऊ पाहते आहे ,, Peta वैगेरे अलग बात

परिस्थिती:(
खर्च खूप असतो जनावरांचा.

यशोधरा's picture

31 Aug 2019 - 1:25 pm | यशोधरा

ते समजते हो :((
विकायला लागतानाच्या मन:स्थितीच्या दुःखाने विचारले...

पद्मावति's picture

31 Aug 2019 - 1:08 pm | पद्मावति

खुप सुरेख लिहिलंय.

दुर्गविहारी's picture

31 Aug 2019 - 1:11 pm | दुर्गविहारी

अपेक्षेप्रमाणेच छान लिहीले आहे. असेच अनुभवांवर आधारित लिखाण जोमाने येउ देत.
फक्त काही शब्द जे मराठवाड्यात प्रचलित आहेत त्यांचा रूढ भाषेतील अर्थ धाग्याच्या खाली लिहीले तर नवीन शब्द समजतील.
पु.ले. शु.

जालिम लोशन's picture

31 Aug 2019 - 2:45 pm | जालिम लोशन

ऊत्तम लिखाण.

अनन्त्_यात्री's picture

31 Aug 2019 - 3:06 pm | अनन्त्_यात्री

आठवली!

लय भारी लिव्लय पाउस पडु दे रे द्येवा तुम्च्या गावाला :)

प्रदीप's picture

31 Aug 2019 - 3:45 pm | प्रदीप

लिहीलेयत, फुटुवाला ! असेच अजून काही अस्सल, आपल्या मातीतले येऊद्यात!

फुटूवाला's picture

31 Aug 2019 - 4:51 pm | फुटूवाला

दुवि मराठी भाषेतील शब्द सांगणारच होतो. पण प्रकाशित करताना विसरलो.

काल एका व्हाट्सअप समुहात चर्चा झाल्यावर लिहिणं टाळणार होतो पण तरीही लिहिलं. प्रतिसाद वाचून आनंद झाला__/\__

कुलदादा's picture

31 Aug 2019 - 6:49 pm | कुलदादा

फुटूवाले,
लय झ्याक लीवली की राव येकदम शंकर पाटलावाणी !!
थोडं ईस्कळित हाये पण झक्कास !!
खिल्लारी फुल्लारी जोडी वाचून प्रेमचंद ची हिरामोती याद आली !!
लिवते र्हावा !!

कुलदादा's picture

31 Aug 2019 - 7:06 pm | कुलदादा

फुटूवाले,
लय झ्याक लीवली की राव येकदम शंकर पाटलावाणी !!
थोडं ईस्कळित हाये पण झक्कास !!
खिल्लारी फुल्लारी जोडी वाचून प्रेमचंद ची हिरामोती याद आली !!
लिवते र्हावा !!

सुबोध खरे's picture

31 Aug 2019 - 6:56 pm | सुबोध खरे

सुंदर लेखन
लिहिते राहा

फारएन्ड's picture

1 Sep 2019 - 9:45 am | फारएन्ड

मस्त मस्त लेख! अजून लिहा. आवडेल वाचायला.

ती फोटोतील बैलाच्या मानेबद्दलची कॉमेण्टही जबरी :)

तुषार काळभोर's picture

1 Sep 2019 - 10:02 am | तुषार काळभोर

तुमचा जित्रापावर किती जीव आहे ते शब्दाशब्दातून दिसतंय.
अजून लिहा.

फुटूवाला's picture

1 Sep 2019 - 10:36 am | फुटूवाला

लिंबाचं झाड
हा फोटो २०११ चा. पण या झाडाचे लिंबू शाळेत असताना सायकल शिकल्यापासूनच विकायचो मी. आधी गावात अन नंतर झाडाला फळ वाढलं तर बहिणीच्या गावच्या दिशेने जे खेडेपाडे लागायचे तिथं. फायनली बहिणीच्या गावात जाईपर्यंत संपायचेच. मग तिथं जेवण करून मी परत.
सुरवातीला याचं फळ उन्हाळ्यात मिळायचं नाही. मग आबांना बोलून एक युक्ती काढली अन दिवाळीआधीचा मोहर पाडून टाकला. झाडाला मीठ, पाणी आणि खताचा डोस असा दिला की दिवाळीनंतर पुढच्याच महिन्यात नवीन मोहर लागला. अन सुदैवाने उन्हाळ्यात दिवसाआड १००-१५० मग लिंबू मिळायला लागले. गावच्या आडातून चार घागरी शेंदायच्या अन सकाळ संध्याकाळ एक चक्कर फक्त लिंबूसाठी. त्याला जपलं तर त्यानेही घर खूप तारलं. म्हणजे शाळेच्या सुट्ट्या असताना मला काम अन घरच्यांना दाम मिळाला.

यावर्षी हे झाड जाईल असं कळलं. बाजूला दुसरे लावले होते पण ते मोठे झालेच नाहीत इतके. आयुष्यभर या झाडाची आठवण राहणार.

झाडाचा आकार

उन्हाळ्यात याची सावली इतकी दाट आणि सगळीकडून झुकलेलं असल्याने आत झळा पण नसत येत. झाडावर एका पिशवीत साखर-मीठ कायमच असायचं. वाटलं मनाला की प्या सरबत :)

फटूवाले, शब्दा शब्दातून तुमचे बैलांवरचे प्रेम दिसून येते.
ग्राम्य शैलीत लिखाण केल्याने कुठलीही अकृत्रिमता आलेली नाही. अगदी सैराट लेखन झाले आहे.

ग्रामिण भागातले जीवन कसे असते ते देखील याद्वारे समजते.
घरचा भाजीपाला विकायला लहान मुले आईबापाच्या कामाला येतात. ते लिंब विकण्यावरून समजते.

आंबट चिंच's picture

1 Sep 2019 - 3:52 pm | आंबट चिंच

+१११११
फटुवला तुम्ही भाग्यवंत की अश्या शेतकरी कुटुंबात जन्मले ते.
तुम्ही आवश्य लिहा आम्ही वाचतोय.
आणि नावा प्रमाणे शेतीचे , शेतासाठी वापरण्यात येणाऱ्या जनावरांचे भरपूर फोटो टाका.

बबन ताम्बे's picture

1 Sep 2019 - 4:34 pm | बबन ताम्बे

अस्सल गावरान मातीतील लिखाण. अजून लिहा.
लहानपणी आत्याच्या बैलगाडीत भरपूर फिरलोय. त्यांच्याकडे रतन, लक्ष्मण आशा नावाची तगडी बैलजोडी होती. खूप गुणी आणि कष्टाळू होती. तुमच्या लेखामुळे जुन्या आठवणी जागल्या.

मायमराठी's picture

1 Sep 2019 - 4:48 pm | मायमराठी

आपल्या चौथीतल्या वास्तव्यापासून ते रसरसलेल्या लिंबाच्या झाडापर्यंतच्या फुटूपर्यंत मला सहभागी करून घेतल्याबद्दल आपले शतशः ऋणी आहोत. हा प्रवास खूप खडतर असला तरी त्यांत जीवनाची अनेक गुपितं, रहस्य आणि जंगलभर समाधानही दडलेली असणार, असं वाटतं. आम्हाला ते सर्व शब्दांच्या आधारे कृत्रिमरीत्या का होईना अनुभवायला आवडेल.
तुम्ही ज्यांना शहाणं मानता ती माणसं आजही घराघरांत आपल्या नापास/ कमी गुण मिळालेल्या मुलांना गाय बैल म्हशी घेऊन द्यायची धमकी देत असतात. समृद्धतेची व्याख्या विसरलेला आजचा समाज एवढा समृध्द झालाय की त्याला शेतीबिती कशाशी खातात हे ठावं नाही. फक्त ताटात चार वेळा खायला लागतं. ते कुठून व कसं येतं, याची त्याला फारशी फिकीर नाही. तर अश्या शहाण्यांच्या परीस येडी बरी, न्हायी का?
आम्हाला येडं करत रहा, ही विनंती .

उपेक्षित's picture

1 Sep 2019 - 5:15 pm | उपेक्षित

@ फुटूवाला काय बोलू ? शब्दच न्हाईत बघा, लिहित राहा असेच बोलतो फ़क़्त.

उपयोजक's picture

1 Sep 2019 - 6:07 pm | उपयोजक

आणि तुम्हाला प्राण्यांचा भारी लळा!
ग्रामीण भाषा वापरुन सुंदर लिहिले आहे.लिहित रहा.पुलेशु! :)

Rajesh188's picture

1 Sep 2019 - 8:03 pm | Rajesh188

मस्त लिखाण

भारताची दुर्दशा झाली जाहिरात बाजी सरकार पासून गुलाम मनो वृत्तीच्या विचारवंत मुळे .
हायब्रीड बियाणे ,संस्कृत जनावरे ,रासायनिक खते,शहर केंद्रित अर्थ व्यवस्था,आणि लोकांना गृहीत धरणारे राजकारणी,स्वतः विचार करायची कुवत नसणारी अडाणी जनता.
ह्या मुळे स्वालंबी भारत परावलंबी झाला .
आता परत फिरायचे मार्ग
बंद झालेत .
1% लोकांची 30000000 कोटी रुपयांची गाडी बघून देश किती प्रगत झालंय हे उपाशी पोटी टीव्ही वर बघा

तुषार काळभोर's picture

2 Sep 2019 - 8:09 am | तुषार काळभोर

अरे देवा!!
अशी कोणती गाडी आहे?
चांद्रयान किंवा गेला बाजार ISS सुद्धा एवढं महाग नसेल!

अति अवांतर: सव्वा कोटी भारतीयांकडे 30000000 कोटीची गाडी असेल तर आनंदच आहे की!!
(पण शिंच्या दिसत नाहीत कुठं!)

फुटूवाला's picture

2 Sep 2019 - 8:18 am | फुटूवाला

म्हणजे किती शून्य असत्यात वं?

मला हाकाला ठिवलं तरी चालन. :)

श्रीरंग_जोशी's picture

2 Sep 2019 - 8:55 am | श्रीरंग_जोशी

फुटूवाला साहेब हे अनुभवकथन खूप भावले.

माझ्या आजोळी दुधाचा व्यवसाय असल्याने काही आठवणी जाग्या झाल्या.

या विषयावर तुम्ही अधिक लिहावे ही विनंती.

सिरुसेरि's picture

2 Sep 2019 - 6:19 pm | सिरुसेरि

खुप छान . "टिन्ग्या " मधला आपल्या बैलांवर प्रेम करणारा मुलगा आठवला .

अभ्या..'s picture

2 Sep 2019 - 7:03 pm | अभ्या..

फटुवाले,
तुम्ही तर अपल्याकडलेच. हिबाळून बिबाळून शब्द वाचले की आपली वळख पटलीच.
पण भारी लिव्हलय हा. जनवारांचे येड लै भारी. अशी मया लावतेती की मानस लाजावीत. तुमची लिंबाची स्टोरी वाचली आन आमचं पावले रव्या आठीवल. घरात जाताना यादीनं म्हसराकड जायाचं. पार गळ्यात पडुपडू बाता करायचं. त्येनं पण लिंब इकून घरचा खिळगा केला. दुधावर शिमीटाच घर केलं, गाडी झाली.
कोटकल्याण झालं.

लिखाण मनापासून आणि सरळ-सोपे आहे. फार आवडले.

लहानपणी सुट्टीत आजीकडे गेल्यावर परत निघतांना गोठ्यातल्या सर्व गाई-बैलांना 'पुन्हा येईन' असे सांगत असे :-) त्यांची मायाच तशी असते.

अगदी झकास लिवलंय फटूवाले. लेखन अगदी भावलं बघा.

सगळं बालपण शहरात गेलं, सगळे नातेवाईक पण शहरातच राहणारे आणि त्यात गाव नाही त्यामुळे अशी गावाकडची शेतीची किंवा जनावरांची गम्मत कधी अनुभवायला मिळाली नाही.

हां, एक मात्र होते, लहानपणी नेहमी बैलोबा असा उध्दार होत असे आणि कौतुक क्वचितच वाट्याला येत असे त्यामुळे बैलपोळा सणाशी नेहेमीच रिलेट करता येते. :))